पुरानी जिन्स

परवा घरी गेले तर वरुन एक मोठा खोका काढून त्यातलं तुला हवंय ते घे आणि बाकीचं टाक तरी आता असा पिताश्रीनी आदेश दिला. किती वर्षं सांभाळायचं हे? काय करता मग खोका उघडून बसले. ही माझी इस्टेट आहे. यात शाळेपासून कॊलेजपर्यंतचं अख्खं जग आहे. पत्ते कसे पिसतात नां तशा पिसून पिसून ठेवलेल्या आठवणी. माझी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली, माझा सगळ्यात आवडता फ्रॊक, कसली कसली कात्रणं, पहिले पहिले छापून आलेले लेख, आवडती मासिकं, पत्रं, शुभेच्छापत्रं.....माझं कोवळं जग होतं त्या खोक्यात. हाताला एक डायरी लागली आणि पुढची उचकापाचक थांबवून डायरी उघडली. त्यात काय होतं हे माहित असूनही आणि असंख्यवेळा वाचून झालेली असूनही पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी ती माझी डायरी म्हणजे माझ्या सगळ्यात सुंदर दिवसांची सोबतीण आहे. विद्यापिठात पूर्ण दोन वर्षं जिनं माझ्यासोबत घालवली ती माझी "सगुणा". तिचं नाव मी खरंच सगुणाच ठेवलं होतं. एक तर आकार इतका सुटसुटीत की घेउन फिरता यायची आणि तिचा इंचन इंच काही ना काही खरडून पावन केलेला होता. म्हटलं तर फुटकळ म्हटलं तर खुप काही उराशी बाळगुन असणारी.या माझ्या सगुणानं माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणिंची अक्शरं अजुनही जपून ठेवली आहेत. लेक्चर बोअर झालं की आम्ही यातून एकमेकाला निरोप पास करत असायचो. ती आमची संदेशवाहक होती. त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनाच कवितांचा किडा चावलेला होता आणि चंद्र्शेखर गोखल्यांनी त्याला चाळवला होता. जे बोलायचं ते कवितेतच अस जणू नियम बनून गेला होता. त्यातले ते संदेश वाचत वाचत  किती लेक्चर मी परत ऐकली. एका पानावर कोणाचं तरी अक्शर होतं, चहाला जायचं का? पुढे उत्तर-कोण उदार होणार आहे? मध्येच कोणीतरी-ए मी पण कटात आहे, आज कोणाला तरी छान दिसावं लागणार त्याशिवाय चहा मिळणार नाही, कोणाला पकडायचं पण, शमाला सांग- तू चालू कर आम्ही सामील होतो, चालेल, हा पिरपिर गेला की बाहेर पडू, अरे पण आता बाईच लेक्चर आहे, असू दे की, प्रेझेंटेशनची तयारी करायला चाललोय म्हणून सांगू. चालेल. असा तो चहाकटाचा मसुदा इतक्या जणांच्या अक्शरात कोरला गेलाय की बहुदा त्या लेक्चरनंतर मॆडमना पटवून त्यांना बरोबर घेउनच आम्ही चहाला गेलोलो असणार.  होस्टेलवरच्या भयंकर जेवणावरही आम्ही कवीत केली होती, त्याला चाल लावली होती, हिची चाल तुरु तुरुची 
मेसमधून चालू झालेली कवीता बाथरुमपर्यंत गेलेली होती. डायरीच्या एका पानावर मार्शल कॆलुहानचं मॊडेल आणि त्याच्या शेजारीच विमान उडालं हा संदेश, म्हणजे हे मॊडेल कोणाच्यातरी डोक्यावरुन गेलेलं होतं. इतकंच नाही तर लेक्चर देताना कोणिही काहीही गंमतशीर वाक्य(म्हणजे आमच्या द्रुष्टिनं) बोललं की त्याची लगेचच नोंद होत असे. आमच्या वर्गात एक मुलगा होता. 
त्याचा आवाज किशोरकुमारसारखा होता, युथफेस्टिव्हलल आम्ही बसविलेल्या पथनाट्यात त्यानं सूत्रधाराची भुमिका केलेली होती. त्यात त्याला सतत गाणी होती, तिही टिपेच्या सुरात आणि लोकसंगीताच्या बाजात. एकदा रिहर्सल झाल्यावर आम्ही बसलो होतो आणि 
त्याला त्याचं आवडतं किशोर कुमारचं "पल पल दिल के पास" हे गाणं म्हणायला लावलं तर त्यानं चुकून त्याच सुरात म्हटलं. 
काय हसलो होतो, गडाबडा लोळायची वेळ आली. 
त्याचा बिचारयाचा आयुष्यभरासाठी ते गाणं म्हणायचा कॊन्पिडन्सच गेला. 
कोणीतरी हा ऐतिहासिक प्रसंग चुकवला  असावा कारण डायरीतून तो
असंख्य अक्शरात वर्णन झालेला होता. .....
कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.....त्याच डायरीत शेवटी कॊलेज संपल्यावर
सगळ्यांनी आवर्जुन लिहिलेल्या एकत्र असतानाच्या आठवणी....
सगळंच पुन्हा कॆम्पसमध्ये घेउन जाणारं....
दोन वर्षांत घरची आठवण येउन कितीतरीवेळा रडले असेन; पण त्यानंतरघरी परतल्यवर, सगळ्यांच्या वाटा पसरल्यावर जितक्यावेळा
ती डायरी वाचली तितक्यावेळा डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.....त्याच डायरीच्या शेवटच्या पानावर कोणीतरी भावनाविवश होउन
 हे अखखं गाणं लिहिलं आहे, "पुरानी जीन्स और गिटार....यादे बस यादे रह जाती है...
कुछ छोटी छोटी दो बाते याद आती है..." मला ही जीन्स मनापासून आवडते कितिही पुरानी झाली तरी.:)) आय मिस यु ऒल.....:(