प्रपंच

झी मराठीचा सुरवातीचा काळ. झी आणि ई अशा दोनच मराठी वाहिन्या त्यावेळेस फ़ॉर्मात होत्या. स्टारचा 'तारा' म्हणावा तसा चमकत नव्हता. ई वरच्या मालिका किंचित बटबटीतपणाकडे झुकलेल्या, मेलोड्रामा असलेल्या होत्या तर झीवरच्या मराठी मध्यमवर्गाची नस समजलेल्था्य ाणि पकडलेला .

आयुष्यभराचं गारूड करणारी मालिका प्रपंच.  ज्यांनी ज्यानी बघितलीय त्यांना ती कधिही विसरता येणं शक्य नाही. यातलं कुटुंब हे मागच्या शतकातलं प्रातिनिधिक होतं. आज  जी चिटकू पिटकू मंडळी आहेत म्हणजे माझ्या पिढीची मुलं त्यांना एकत्र कुटुंब ही एक कवी कल्पना वाटावी अशी परिस्थिती आहे. माझी पिढी मात्र सुदैवी होती. बर्‍याचजणांनी एकत्र कुटुंबाचा अनुभव घेतला. काही कुरबुरी,  रूसवे फ़ुगवे मात्र एकत्र असण्यातली धमाल माझ्या पिढीनं अनुभवलीय. मोबाईल नसण्याचा आणि टेलिव्हिजन हा दिवसभरात केवळ दोन मालिका आणि सात आणि साडे नऊच्या बातम्या बघण्यापुरताच होता. बुधवारचं छायागीत, रविवारची रंगोली, शनिवारचं विक्रम वेताळ, हमलोग पुरतं टिव्हीपुढं बसणारी माझी पिढी. बाकिचा वेळ अभ्यास आणि भावंडं, मित्र मैत्रीणींसोबत विट्टीदांडू पासून गल्लीभर चालणार्‍या लपंडावानं भरगच्च. हा सगळा फ़िल देणारी, "प्रपंच". १९९९. माया कम्युनिकेशन्सची निर्मिती आणि प्रतिमाताई कुलकर्णींचं दिग्दर्शन.
एक छान एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या घटनांची गोष्ट म्हणजे प्रपंच. डोळे ताणून बघावे लागणारे ढिंकचाक सिन नाहीत. कानठळ्या बसणावं संगीत नाही की आक्रस्ताळेपणा करणारी पात्रं नाहीत.  सगळी पात्रं छान पॉझिटिव्ह तरिही अधून मधून होणार्‍या कुरबुरी.  अण्णा देशमुख (सुधिर जोशी) हे कुटुंब प्रमुख,  त्यांची पत्नी माई (प्रेमा साखरदांडे) या दोघांची दोन मुलं प्रभाकर देशमुख (संजय मोने) त्याची बायको  प्रमिला (सुहास जोशी) , बाळ देशमुख (बाळ कर्वे) आणि त्याची बायको शालिनी (अमिता खोपकर) अण्णांची आई - अक्का (रेखा कामत) आणि मुलं- प्रशांत (सुनिल बर्वे), अलका (रसिका जोशी), आनंद (भरत जाधव),  लतिका (सोनाली पंडीत),  कलिका (शर्वरी पाटणकर), भार्गवी चिरमुले , आनंद इंगळे

यातली बरीच मंडळी तेंव्हा तशी नविनच. पण नंतर छोट्या मोठ्या पडद्यावर गाजलेली. भरत जाधव, रसिका यांच्या भूमिका आजही आठवतात आणि नैसर्गिक अभिनय शिकण्यासाठी इतकं पाहिलं तरिही नविन पुढीला पुरेसं आहे.

करेक्ट कास्टिंग हे या मालिकेचं वैशिष्ट्य.  पेटी ओढून गाणं म्हणणारा काका, कुरबुर करणारा काका, ओल्या नारळाच्या करंज्या करणारी काकू. सख्खं-चुलत न मानणारी मुलं. कोणी हुशार तर कोणी ऍव्हरेज. खरंतर तसं या घरात खूप काही नाट्यमय घडत होतं असं नाही. अगदी तुमच्या माझ्या घरातलीच गोष्ट पण तरिही या मालिकेनं पकडून ठेवलं होत. कदाचित याचं कारण हे असेल की माझी पिढी विशीत असतानाच हळूहळू एकत्र कुटुंब विभक्त होत चालली होती. एकत्र रहाण्यातली मजा जशी होती तशीच स्वत:ची "स्पेस" न मिळण्याची घुसमट लक्षात येत वाढत चालली होती. अमेरिकेची दारं खुली झाली होती. एकाडएक घरातला तरूण मुलगा सॉफ़्टवेअर क्षेत्रात डिग्री घेऊन एचवन मिळवून चालता झाला होता. तिकडच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारांची हवा इकडे जोरात पसरू लागली होती. प्रत्येकाला अगदी भाजी कोणती करायची ते आर्थिक निर्णयांपर्यंतचे स्वातंत्र्य हवे होते. एक पाय उंबर्‍याबाहेर पडला असला तरिही मागे काहीतरी बंध शिल्लक राहिले होते. पुढचं दिसत असताना, खुणावत असताना मागचं विसरता येत नाही अशी काहीतरी विचित्र गोची झाली होती. म्हणूनच तुमची माझी भावनिक गोची या मालिकेनं मांडली आणि ती खूप लाडकी झाली. त्यावेळेस टीआरपी नावाचा राक्षस अजून आला नव्हता म्हणून कथानकावर भर देत मालिका बनत आणि सांगायची गोष्ट संपली की मालिका चुटपूट लावत निरोपही घेत.
प्रपंचमधेही लतिकाला अमेरिकेचा नवरा मिळतो. मोठा मुलगा प्रशांतही त्या वाटेने निघतो. अलका घरच्याना एनएसडीमधे जाण्यासाठी मनवते. एक एक मूल घराबाहेर पडतं. देशमुखांचं घरही त्यावेळच्या रितिला धरून रिडेव्हलप करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग एका गुडीपाडव्याला गुडी उभी करून देशमुख कुटुंबियानी घराचा आणि प्रेक्षकांचा भरलेल्या डोळ्यानं निरोप घेतला.

या मालिकेतला मला सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे, कलाकारांचं प्रचंडच सहज भूमिका करणं.  अगदी आपल्या घरातलंच समोर घडतंय असं वाटायचं.

दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे देशमुखांचं बैठं घर. अप्रतिम. ती वास्तूच सुंदर होती. मागच्या दारानं बाहेर पडलं की थेट समुद्रकिनार्‍यावर जाता यायचं. देशमुखांची मुलं या छोट्या दाराशी बसून कधी गंभीरपणे तर कधी मजा करत गप्पा मारायची.

आता अशी मालिका बनणं जवळपास अशक्य आहे. कारण काहीच मेलोड्रामा नसणारी मालिका अलिकडे प्रेक्षकच नाकारतात मग बनवेल तरी कोण? कशाला?

म्हणूनच आता केवळ आठवणीतच राहिलेली "प्रपंच".
दुर्दैवानं इतक्या सुंदर आणि सुपरहिट मालिकेचे भाग आता इंटरनेटवर उपलब्ध नाहीत (मला तरी मिळाले नाहीत. कोणाला माहित असतील तर जरूर शेअर करा)केवळ टायटल ट्रॅक युट्युबच्या कृपेनं मिळाला तोच या पोस्टसोबत शेअर करते.  हे म्हणजे दुधाची तहान ताकावर आहे पण नाईलाज आहे.

त.टी.- तुम्हीही माझ्यासारखे या मालिकांचे चाहते असाल. तर तुमच्या आठवणी कमेण्टमधे जरूर शेअर करा.

 

सोडून द्यायच्या गोष्टी: तिची डायरी


मी अम्माची सून, आजपर्यंत कोणाला काही बोलले नाही. कारण बोलण्यात काही अर्थच नव्हता.
  कसंय की, इतरांना  लहान सहान वाटणार्‍या गोष्टी आपल्यासाठी खूप मोठ्या असू शकतात की नाही? पण होतं काय की लग्न करून आपण सासरी आलो की मंगळसुत्रासोबत फ़्री मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्याला गृहित धरलं जाणं. सून म्हणजे अमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे. बायको म्हणजे तमूक गोष्ट तिनं केलीच पाहिजे , कर्तव्यच नाही का तिचं? या तर दोन बाजू पण अनेक नाती मिळतात आणि त्या नात्यांतल्या अपेक्षा, गृहित धरणंही वाढतं...एका लग्नानं.  आता माझंच बघा, माझी सासू, अम्मा, अगदी रीतसर खाष्ट म्हणता येण्याइतपत तिखट स्वभावाची. लव्ह मॅरेजला परवानगी दिली ही केवळ एकच गोष्ट ती हुकमी पत्त्यासारखी गेली वीस वर्षं वापरतेय. मुळात तिचा हा हुकमाचा पत्ता अजूनही चालतोय याचीच मला कधी कधी गंमत वाटते. लग्नाला परवानगी दिल्यामुळे अनेक गोष्टीत मला गृहित धरलं गेलं आणि मुख्य म्हणजे मी धरू दिलं कारण विचाराल तर लहानपणापासूनचे संस्कार, "सोडून द्यायचं गं. ताणलं की तुटतं" तर ताणून तुटू नये म्हणून अनेक गोष्टी सहन...हो सहनच... करत गेले आणि मग तो पॅटर्न बनला. कधी मधी संयम सुटून बोललं गेलं तर फ़टकळपणाचा शिक्का बसला. वर आजूबाजूचे समजूत घालणारे होतेच,"सोडून दे गं" वाले. असं सोडून देता देता एक मात्र झालं की मी माझ्या सासूला शांतपणानं स्विकारलं. ती तशीच आहे आणि तशीच रहाणार हे सुरवातीला तणतणत मग नाईलाजापायी आलेल्या थंडाव्यानं स्विकारलं. आता असं झालंय की बर्फ़ाच्या लादीसारखं थंडगार पडलंय आमच्यातलं नातं. ना कौतुकाचं कौतुक ना राग रुसवा. मनाची तडफ़ड कमी झाली. मग आता परिस्थितीनं कुस पालटली आणि चार दिवस सासूचे संपत आल्याची जाणीव तिला झाली. माझ्याबाबतीत वाईट वागलेल्याचा पश्चात्ताप झाला म्हणून नव्हे तर आता या उतारवयात आपलं कोणीच नाही मग आपलं काम काढून घ्यायचं तर माझ्याशी संबंध चांगले ठेवले पाहिजेत या उपरतीनं खोटं का होईना पण ती चांगली बोलायला लागली.  एम्पथी नावाची गोष्ट माहेरून संस्कारांच्या गाठोड्यातून सोबत आल्यानं  उतारवयातली  बापुडवाणी भासणारी सासू तोडता आली नाही. फ़क्त कसं झालंय नां की आयुष्यभर "सोडून द्यायचं असतं" हे इतकं अंगात भिनलंय की आता तिचं बरं वागणंही सोडूनच द्यायला होतंय.  ताणलं की तुटतं हे ऐकून ऐकून आता ताणण्यासाठी मुळात काही पकडलंच जात नाही.
म्हणणारे म्हणतात की जग बदललंय, आता पूर्वीसारखं सासू सुनेचं कुठं असतं? आपल्याला किती स्वातंत्र्य आहे, नवरे आपल्याला किती समजून घेतात वगैरे वगरे पण कुठेतरी काहीतरी साखरेत घोळवलेलं कचकचत असतंच. नाही का? पण काय नं विचार नाही करायचा....सोडून द्यायच्या अशा गोष्टी!

#तिच्या डायरीतलं पान.
 

सुहानाचं सासर

सिनेमाबद्दल बरेचजण लिहितात. सिरियल्सवर मात्र तुरळक, तुटक त्यातल्या त्यात हिंदी मराठीतल्या मालिकांबद्दल विशेष  नाहीच, म्हणूनच मला आवडलेल्या काही मालिकांवर लिहिण्याचं मी ठरवलंय, मला माहितीय की यातल्या बर्याच मालिका नंतर नंतर पाणी घालून वाढवलेल्या होत्या तरिही त्यावर मला लिहायचंय. मला स्वत:ला नातेसंबंध उलगडणार्‍या साध्या सुध्या कौटुंबिक मालिका फ़ार आवडतात. मग त्या देख भाई देख सारख्या खुसखुशीत विनोदी असोत की आभाळमायासारख्या थोड्या गंभीर धाटणीच्या.

हमलोग आणि बुनियादपासून मी सिरियल्स बघायला लागले, त्यामुळे तिथंपासून ते इथंपर्यंतच्या माझ्या आवडत्या सिरियल्सवर मी लिहिणार आहे. याला काही सुसुत्रता असेलच असं नाही. अडम तडम करत ज्या सिरियलचं नाव मनात येईल त्यावर लिहिणार आहे.

तर, आज अडम तडम अडकलाय स्टार प्लस अगदी अलिकडे म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या "ससुराल गेंदा फ़ूल" या सिरियलवर. २०१२ म्हणजे सासबहू सिरियलनी कळस गाठलेला काळ. तरिही विशेषत: या दोन तीन वर्षांत काही खरंच हटके मालिका आल्या होत्या. स्टार प्लसनं रिश्ता वो ही सोच नयी ची ग्वाही देत काही खरोखरच चांगले शो आणले. त्यापैकी एक एसजीबी अर्थात ससुराल गेंदा फ़ूल

हिंदी मालिकांनी सास बहू ड्रामा लोकप्रिय केला. एक वाईट सास आणि बिचारी बहू अशा साच्यातून अनेक चकल्या पडत होत्या आणि त्याचवेळेस अगदी नावातच ससुराल असणारी एक मालिका आली. चेहरे सगळेच परिचित. 
रागिणी खन्ना (राधा की बेटियां मधून पदार्पण केलेली) , जय सोनी, सुप्रिया पिळगावकर अशी एकाहून एक नावं या सिरियलशी जोडलेली होती. सुप्रियाचं वैशिष्ट्य हे की, मोठ्या पडद्यावरून लहान पडद्यावर आल्यावरही तिनं उगाचच करायच्या म्हणून सिरियल्स मधीच केल्या नाहीत. तिच्या प्रत्येक सिरियलमधलं प्रत्येक पात्र लक्षात रहावं असंच आहे. सगळ्या भूमिका साधारण एकाच साच्यातल्या असूनही त्यात तिनं राखलेलं वैविध्य खरंच कौतुक करण्यासारखं आहे.

यातही तिनं सासूची म्हणजेच बडी मां ची भूमिका इतकी क्युट साकारलीय की प्रत्येक लग्नाळू मुलिला वाटावं असं सासर आणि अशी सासू मिळावी. 

या सिरियलची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे यातले संवाद. शुध्द उर्दू मिश्रीत हिंदी वापरणारी बहुतेक ही शेवटची सिरियल. यानंतर मालिकांत युपीवाल्या भाषेची चलती सुरू झाली. दिल्लीतलं हे कुटुंब अत्यतं सुंदंर भाषा आणि लहेजा वापरायचं. बडी मां चे रिश्तों की समझ देणारे खरं तर एरवी पुस्तकी वाटू शकणारे संवाद इतके सहजपणानं यायचे की ऐकून वाह! असं  वाटायचं. तिचं ते हळूवार पणे समजून सांगणां आणि समजून घेणं प्रचंड क्यूट होतं.

या सिरियलमधली दुसरी छान गोष्ट म्हणजे यातले कपडे. एरवी हिंदी सासबहू मालिकांत कचकच काचा लावून चमचम करणार्या बेगडी साड्या आणि घाण दिसणारे खोटे दागिने बघून वीट आला होता. यातल्या सगळ्या बायकांच्या साड्या साध्या पण क्लासी होत्या. तुमच्या आमच्या घरात जशा दिसतात तशाच या सगळ्याजणी दिसायच्या. अगदी नायिका सुहानाचं उच्चभ्रुपणही तिच्या क्लासी साड्यांतून जपलं होतं. शिवाय बहुतेक पहिल्यांदाच मालिकेतली सून गुडघ्यापर्यंतच्या वनपीसमधे, ऑफ़ शोल्डमधे आणि पारदर्शक नायट्यांमधे दाखवली असावी, असं असूनही त्यात कुठेही ती निगेटिव्ह होत नव्हती. एरवी पाश्चात्य कपडे घालणं हा मालिका विश्र्वात व्हॅम्पिशपणा ठरतो. इथे सुहाना तिला हवं ते बिनधास्त घालताना दाखवलीय तरिही ते सगळं सहज खपून जातं. उलट तिनं हट्टान आपल्या जावांनाही वनपीस घालायला लावणंही प्रेक्षक सहज स्विकारतात.

तिसरी छान गोष्ट म्हणजे कश्यपांचं चावडी बाजाराच्या गल्लीत असलेलं पुश्तैनी असरटपसरट घर. मालिकांतली खोटी खोटी दिसणारी, भासणारी चकाचक घरं आणि कश्यप कुटुंबाचं हे टिपिकल उत्तरेकडचं दिसणारं साधं पण रूबाबदार घर. घराचा भक्कम आणि सदा उघडा मोठा लाकडी दरवाजा, अख्खं कुटुंब बसून गप्पा मारणारा हॉल, डायनिंग टेबल, स्वयंपाकघर, चौसोपीतला हातपंप, कॉमन बाथरूम, खालच्या मजल्यावरच्या दादा दादी, इंदर-राधा, इलेश-दीशा यांच्या खोल्या, वरच्या मजल्यावरच्या सुहाना-इशान, बडी मां, राधा, अलोक-रानो, इशिताच्या खोल्या, त्याच्या बाजूला आसणारी प्रशस्त गच्ची आणि हे दोन्ही मजले जोडणारा लालचुटूक गेरूचा जिना. घराचा प्रत्येक कोपरा कथानकात वापरला गेला. इतका सहजपणानं की तो स्क्रिनप्लेचा भागही न वाटावा. प्रत्येक कोपर्यातून कॅमेरा इतक्या सफ़ाईनं फ़िरला की दोन वर्षं प्रेक्षक आपल्याच घरात वावर्ल्यासारखे या खोल्यांमधून वावरले.  बहुतेक सिन मधे, फ़्रेममधे चार चार पाच पात्रं आणि त्यांच्या सततच्या हालचाली यानं फ़्रेम जिवंत वाटायच्या, इतर मालिकांत असायचे तसे डिशक्यॅंव टाईट क्लोज अप चे चेहरे बघण्याचं  टॉर्चर या मालिकेनं कधीच माथी मारलं नाही.


सुहाना बडे घर की बिगडी, नकचढी मुलगी दिल्लीच्या उच्चभ्रू वसाहतीत रहाणारी पण योगायोगानं लग्न करून ईशान   कश्यपच्या चावडी बाजारच्या अगदी टिपिकल मध्यमवर्गिय एकत्र कुटुंबात येते. ईशान पहिल्याच भेटीत सुहानाच्या प्रेमात पडलाय, सुहानाच्या वडिलांना कश्यप कुटुंब प्रचंड आवडलंय. पण सुहानाला मात्र हे घर आणि लग्न दोन्हीतून सुटका हवीय. अगदी पहिल्याच रात्री ती ईशानला सगळं खरं सांगून टाकते. समंजस ईशानही तिला नात्यातून मुक्त करतो. मात्र घटनाच अशा घडत जातात की सुहानाला या घरात थांबावच लागतं. हळूहळू सुहाना कश्यप कुटुंबात रूळते. ती या कुटुंबाच्या आणि विशेषत: बडी मांच्या प्रेमात पडते. ईशानवर प्रेम नसूनही ती या घरात रहाते. हळूहळू बडी मां आणि दादाजी तिला तिच्याही नकळत तिचं ईशानच्या प्रेमात पडलेलं असणं दाखवून देतात. हे सगळं करताना सुहानाला नात्यांची नव्यानं ओळख होते. ती आधी कुटुंबाच्या प्रेमात पडते आणि मग ईशानच्या. लग्नानंतर तब्बल एक वर्षानं ती ईशानजवळ प्रेमाची कबुली देऊन खर्या अर्थानं सुहाना ईशान कश्यप बनते. 
इथंपर्यंत मालिकेचा सिझन एक होता. जो बहुतेक ओरिजिनल कथेचा प्लॉट असावा.
इथून प्रवास सुरू होतो सुहाना आणि ईशानच्या संसाराच्या आणि मग त्यात येणार्या चढ उतारांचा. मग सुहानाचा ब्रेन ट्युमर, त्यातून तिचं बाहेर येणं आणि ईशानचा अपघात त्यात त्याची स्मृती जाणं. त्यानं केवळ सुहाना सोडून बाकी सगळ्यांना ओळखणं आणि सुहानाचं शशीकला बनून त्या घरात रहाणं पुन्हा नव्यानं ईशानच्या प्रेमात पडणं आणि यावेळेस ईशानला सुहानावरचं प्रेम ओळखायला कुटुंबियानी मदत करणं.
हा होता मालिकेचा सिझन टू
मालिकेनं इथंपर्यंत पकड ठेवली होती. आणि लोकप्रियतेच्या कळसावर होती. अर्थात बंद करण्यात काहीच अर्थ नव्हता. मोह आवरता न आल्यानं मग सुहाना आणि ईशानला मुंबईत कामानिमित्त आणणं. एकत्र कुटुंबाची सवय झालेल्या सुहानाचं मुंबईतलं एकटेपण आणि मग यथावकाश पुन्हा दिल्लीला आपल्या कुटुंबात जाणं. त्यानंतर तिचं हिंदी मालिकेची नायिका बनणं आणि एका मध्यमवर्गिय घरातली सून जर या वरवर ग्लॅमरस दिसणार्या क्षेत्रात आली तर काय काय होऊ शकतं याची गोष्ट सांगणारा सिझन तीन आणि मालिकेचा शेवट.
प्रेमापोटी चाहत्यानी हा सिझनही पाहिला असला तरिही पहिल्या दोन सिझननंतर हळूहळू सिरियलची पकड ढीली होत चालली होतीच. मात्र एक कौतुकाची गोष्ट ही की अती न करता सिरियलनं निरोप घेणं. शेवटच्या सिनमधे अलोक म्हणतो की,"चलो जी कहानी खतम. अंत तो अच्छाही हुवा " यावर  शैलजा म्हणजेच बडी मां म्हणते, "नहीं अलोक, जब तक जीवन है, कहानी खतम नहीं होती. जब जब हालात करवट बदलते है, जीवन में नयी कहानियां जनम लेती है, कहानी अभी खतम नहीं हुई" तिच्या या शेवटच्या संवादामुळे ही मालिका नवा सिझन आणि नवा ट्रॅक घेऊन येणार याची खात्री होती. मात्र आज पाच वर्षं उलटली तरिही या मालिकेचा नवा सिझन आला नाहीए. अजूनही या सिरियलचे चाहते (माझ्यासारखे) हॉटस्टारवर ही सिरियल भक्तीभावानं बघतात. अजूनही वाटतं की एखाद्या दिवशी या मालिकेच्या नव्या सिझनची घोषणा होईल. रागिनी खन्नाला इस्टावर अजूनही चाहते या सिरियलविषयी विचारत असतात. मध्यंतरी ती गुरगावच्या निमित्तानं लाईव्ह आली होती त्याहीवेळेस चाहत्यांनी हाच प्रश्नं वारंवार विचारला होता. तसंही सध्या जुन्या मालिकांचे नवे सिझन यायचा सिझन चालू आहे, तर, फ़िंगर्स क्रॉस फ़ॉर ससूराल गेंदा फ़ूल 


 

...तो क्या हुवा था कल रात को?



एखाद्या जुन्या सिनेमाचा रिमेक आला की जुन्यापेक्षा नवा वेगळा आहे का? जमलाय की फसलाय? ही तुलना अनिवार्य असते.
1969 च्या इत्तेफाक चा रिमेक येणार म्हटल्यावर उत्सुकता हीच होती की नेमका काय बदल असेल नव्यात?
69 मधे नायिका ग्रे शेडमधे दाखविण्याचं धाडस यश चोप्रानी दाखवलं हेच खूप. शिवाय ज्या काळात सिनेमातली गाणी जास्त गाजत त्या काळात गाणं विरहीत कथानक सादर करणंही धाडसाचंच होतं.
सर्वात मोठं धाडस म्हणजे या हटके कथानकासाठी निवडलेली स्टारकास्ट.
आता एव्हाना अशी कथानकं, ग्रे शेड असणार्या नायिका/नायक, अॅण्टिहिरो सगळं लोकमान्य झालंय. त्यामुळे प्रेक्षकाना धक्के देणं सोपं राहिलं नाही.
नविन इत्तेफाकबद्दल सांगायचं तर, अशा प्रकारच्या सिनेमाचं कथानक जर आधीपासूनच माहित असेल तर आणखिनच कठीण परिक्षा.
आणि या सगळ्या परिक्षांत नवा इत्तेफाक अव्वल गुण घेत पास झालाय.
कथानक माहित असूनही कथेत आपण गुंतत जातो हे सगळ्यात जास्त कौतुकास्पद आहे.
69 चा काळ आणि 2017 मधे प्रचंड फरक आहे. सामाजिक, आर्थिक, तांत्रिक अनेक बाबतीत बदल झालेत या सगळ्याचं प्रतिबिंब नव्या सिनेमात आहे.
अट्टाहासानं जुनं धरून न ठेवता त्यात जे आवश्यक ते बदल केलेत, कथानकाच्या गाभ्याला न हलवता हे जे बदल केले आहेत त्यानं नाविन्य आलंय.
इस कहानी के तीन पेहेलू है... हा जुन्या इत्तेफाक मधला संवाद नव्यात आहे . पण इथे अक्षय बाजी मारतो.
जुन्यात इफ्तेकारला किंचीत वायाच घालवलाय असं अक्षयचा नवा पोलिस अधिकारी बघताना वाटतं.
नवा जास्त क्रिस्प बनलाय, अधिक तर्किक वाटतो. उदा. जुन्यामधे वेड्यांच्या हाॅस्पिटलमधला डाॅक्टर नेमका नायिकेच्या ओळखिचा (का? याचं उत्तरही नाही) , नायक नेमका तिच्या घरात घुसतो. (का चं उत्तर नाही) असे अनेक सुटलेले धागे नव्या कथानकात मस्त गुंफलेत आणि आपण त्यात अडकत जातो.
जुन्यामधे क्लायमॅक्सला या सगळ्या इत्तफाकचं वर्णन नायक करतो
तसाच नव्यातही करतो पण नव्यातल्या नायकाचं ऐकताना सॅल्यूटच ठोकायला होतं.
अर्थात नव्यातही काही गडबडगुंडे झालेत पण ते दूर्लक्ष करता येतात.
अक्षय खन्नाचा पोलिस अधिकारी आणि सिध्दार्थचा नायक यांच्यासाठी बघायलाच पाहिजे असा सिनेमा.
#ittefaq
 

फ़णसाचे गरे

लहानपणी झोपायच्या आधी रोज दादां सोबत (वडिल) मी आणि भैया जरा मस्ती करायचो. दिवसभरातला अहवाल देऊन झाला की मग घोड्याला पाणी घाल किंवा बटोबटो सारखे खेळ खेळायचो. तेल लावू तूप लावू करत दादा जेंव्हा हात हातात घेऊन त्यावरून त्यांचे हात फ़िरवायचे तेंव्हा हात छान रगडून निघायचे. त्या आनंदात बटुला म्हणजे मला फ़णसाचे गरे खायलाच मिळायचे नाहीत हे लक्षातच यायचं नाही (बादवे, जाता जाता, हे बटू प्रत्यक्षात भटू असावं का?)  मुळात फ़णसाचे गरे मला फ़ारसे आवडायचे नाहीत त्यामुळे असावं कदाचित, पण गरे न मिळाल्याचं दु:ख कधी झालंच नाही...

कट टू-
२०१७



वेळ रात्रीची.
गोष्टी बिश्टी सांगायची.
जरा हलकी दांडगाई करायची
काल मूड आला बटूबटू खेळायचा. मधे एक दोन वर्षं हा खेळ खेळलोच नव्हतो.
आधी खेळायचो तर शेवटी,'तुम्ही खा सालपट' म्हणलं की नाकाचा शेंडा आणि ओठाचा चंबू एक व्हायचा. 'कट्टी' म्हणून निषेध व्हायचा. मग बट्टी करायला बटूला पुन्हा कोकणात पाठवावं लागायचं. यावेळेस बटू फणसासोबत आंबेही आणायचा आणि हे दोन्ही शमी एकटा खायचा. आईला टुकटुक. सगळं खोटंखोटं पण रूसवा आणि नंतरचं खट्याळ हसणं अगदी खरं ...
तर खूप दिवसानी बटू कोकणातून फणस घेऊन आला. रितीप्रमाणं सगळ्यांना गरे वाटून झाले आणि शर्मनला सालं मिळाली.
पुन्हा एकदा नाकाचा शेंडा गोलगोल झाला. पण यावेळेस ओठाचा चंबू न करता खणखणीत जाब विचारला गेला,' वा गं. एक तर इतक्या मेहनतीनं मी फणस आणला आणि मलाच गरे नाहीत?'
'बरं मग पुन्हा आण फणस'
'मी नाही जाणार आता'
'का?, जा की. यावेळेसचा फणस तू एकटा सगळा खा'
'पेट्रोल वेस्ट होईल. नेक्स्ट टाईम खातो आता'


मी नेहमीप्रमाणेच स्पिचलेस आई.  आणि रिश्ता वोही सोच नयी वगैरे.😀
 

गोष्ट मला सांग आई भुताची

आई नावाच्या बाईला सर्वगुण संपन्न असावच लागतं. नसलं तरिही तसं असल्याचं भासवावं लागतं. गोष्टी सांगणे हा आईच्या सिलॅबस कंपलसरी भाग आहे. हरतर्हेच्या गोष्टी याव्याच लागतात. 



वेळ रात्रीची
गोष्टी बिश्टी सांगायची
'आई आज भूताची गोष्ट सांग'
'कशी सांगू?'
'एकदम स्पायसी 6D'
(स्पायसी 6D= एकदम ड्रामासहित म्हणजे तोंडानं डरावने आवाज आणि भिती वाटतील असे हातवारे, हावभाव करत
मिडियम= नुसतेच डरावने आवाज
साधी= नुसतीच गोष्ट सांगायची. भीती वाटता कामा नये)
मी- नको रे साधीच सांगते आज
शमी- नाही एकदम डरावनी सांग ना प्लिज
मी-(मनातल्या मनात)- लेकरा आधीच हा वादळी पाऊस, त्यात शूरवीर बाबा घरी नाही तुला गोष्ट सांगू कशी? कारण मीच घाबरलीय (वरकरणी) - नको रे उद्या बाबा आला की सांगते नं. आज साधी ऐक
शमी- नाही नं मला आजच ऐकायचीय
मी आपली मन घट्ट करून गोष्ट सुरू करते .... आणि.... इतक्यात.... मेली लाईट जाते...वैताग इन्व्हर्टरही बंद पडतो....वातावरण एकदमच entertaining होतं....आणि मग.....
मग काय नाही मी दामटून रामायणातली गोष्ट सांगून आई असल्याचा गैरफायदा घेत दामटवून झोपवते.
.....
पोर पाच मिनिटात घोरायला लागतं...
पण आता मनातल्या मनात तयार केलेली ती स्पायसी भयानक डरावनी गोष्ट चलत् चित्र बनून माझ्याच डोळ्यासमोरून सरकायला लागलेली असते.. .
फिलिंग रामरामरामरामराम वगैरे 😀😉
 

गोष्ट छोटी, अम्माच्या संसाराची: तिची डायरी

म्हणलं तर साधीच गोष्ट, पण ती टोचायला लागली की ... किती छोटी मागणी होती माझी की, घरातला जुना झालेला सोफ़ा बदलून नवा घेऊया. पण रामायण-महाभारत केलं अम्मानी. का? तर म्हणे भाईनी, म्हणजे माझ्या सासर्‍यांनी, त्यांच्या पहिल्या पगारात घेतलेला तो सोफ़ा होता. ठीक आहे त्यामागे त्यांच्या इमोशन्स वगैरे आहेत पण मग माझ्या संसारात मी नविन काही घ्यायचंच नाही? खरंतर किती जुना झालाय तो सोफ़ा आणि अगदी ओल्ड फ़ॅशनचा वाटतो. आमच्या फ़्लॅटला तर अगदीच न साजेसा आहे. अम्मांच्या गावच्या बंगल्यात तो खपून जायचा पण इथे, मुंबईत?  अवाढव्य वाटतो तो.  शंतनू म्हणजे माझा नवरा मुंबईत शिकायला म्हणून आला आणि भाई अचानक हार्ट अटॅकनं गेले. अम्मानी फ़क्त बंगला ठेवला आणि गावची शेतीवाडी सगळं विकून इथं मुंबईत फ़्लॅट घेतला. सगळं विकलं असलं तरिही किचन आणि हा सोफ़ा मात्र अम्मांच्यासोबतच ट्र्कमधून मुंबईत आले. त्यांच्या सुरवातीच्या वनबीएचके मधेही हा सोफ़ा अर्धा हॉल अडवून होता. मी शंतनूसोबत पहिल्यांदा त्याच्या घरी गेले होते तेंव्हाही तो मला खटकला होता. मग आमचं लग्न झालं, आम्ही तो फ़्लॅट सोडून या मोठ्या फ़्लॅटमधे आलो तरिही अम्मांचं किचन आणि सोपा ट्रकमधून आलेच. खरंतर मला या नव्या घरात माझ्या मनासारखं फ़र्निचर करायचं होतं. पण अम्मानी इतका इमोशनल ड्रामा केला की शंतनू मला म्हणाला एक सोफ़ा तर आहे. काय फ़रक पडतो? मला आतून रडायलाच येत होतं. म्हणावसं वाटत होतं की. शंतनू फ़रक पडतो. खूप फ़रक पडतो. माझं अस्तित्वच मला या घरात जाणवत नाही. अम्मांचा टिव्ही, अम्मांचा सोफ़ा, अम्मांच्या कढया आणि झारे...मी कुठं आहे? माझ्या आवडीचा चमचाही नाही या घरात..आणि आमच्या घरी येणारा प्रत्येकजण अम्मांचं तोंड भरून कौतुक करतो,"अम्मा तुम्ही तुमचा सगळा संसार सूनेच्या हातात दिलाय. आपल्या वस्तूतली आशा काढून सुनेच्या हातात वापरायला द्यायला खूप मोठं मन लागतं" कोणी असं म्हणलं की अम्मांच्या चेहर्यावर जिंकल्याचं एक तुपकट स्माईल येतं. ते बघून तर आणखिनच चिडचिड होते. म्हणून म्हणलं नं की, गोष्ट तशी छोटीच आहे, साधीच आहे, पण त्रास होतो....खूप त्रास होतो.


#तिच्या डायरीतलं पान.



 

ऐ मुंबई की बारिश

सोच रही हूं इस साल मुंबई की बारिश का मजा ले लूं
इससे दोस्ती नहीं थी
कमसे कम हाय हॅलो ही कर लूं
बारिश मेरे गांव की याद अब तक आती है
आंगन में पानी और कागज की कश्तियों की यादे उमड आती है
आंगन की तपी मिट्टी पर बारिश यूं छम से गिरती थी
वो सौंधी सी खुशबू
अब तक दिलों दिमाग में है

छत से गिरता दौडता बारिश का पानी
खिडकी से गुजरता हुवा बगिचे में भागता
गुलाब का झुमझुमकर भिगना अभी भी याद आता है

उसे देखते घंटो गुजर जाते थे
अद्रकवाली चाय मां के हाथ की
और प्यारी सी खामोशी
अब भी याद आती है

गांव छुटा तो लगा साल में अब दो ही मौसम आते है
बारिश पिछे छुट गयी
अब आसमां से पानी बरसता है

ऐ मुंबई की बारिश तू मुझे पसंद तो नहीं
लेकिन सोच रही हूं
इस साल तुझसे दोस्ती कर ही लूं
क्या पता तू भी शायद प्यारी लगे
गांव जितनी नहीं थोडी तो अपनी लगे
ऐ मुंबई की बारिश !

- नेहा
 

गृहित

आपण कुठेतरी बाहेर जाण्यासाठी अगदी छान वेळ घेऊन तयार झालेलो असतो. बर्‍याच दिवसांनी आरशासमोर वेळ घालवलेला असतो, कपाट उघडून एरवी हाताला येईल तो ड्रेस घालणं सोडून आज कपाटात शिरून आवडीची, बरेच दिवसांत न नेसलेली साडी आपण काढतो. मायेनं त्या इस्त्रीत घट्ट बसलेल्या मऊ घडीवरून हात फ़िरवतो. मॅचिंगचं ब्लाऊज आणि गळ्यातलं घालून अगदी तब्येतीत तयार होतो. डोळ्यात काजळाची स्टिक फ़िरवत असतानाच डोअरबेल वाजते. घाईत जाऊन दार उघडतो तर बाहेर पाहुणे उभे असतात.
“काय येऊ का?” कृत्रिम आपुलकीनं कोलगेटचे दात विचकत केलेलं एक स्माईल आपल्याला सेफ़्टी डोअरच्या डिझाईन पलिकडे दिसतं
आपण सेफ़्टी दार उघडून त्यांना आत घेतो. मघासचा तयार होतानाचा फ़सफ़सलेला मूड आता किंचीत डाऊन झालेला असतो
पाहुणा सोफ़्यात रूतून बसतो त्यावरूनच आपण अंदाज लावतो की किमान तासभर तरी इथे जाणार आहे.
“अगं इकडून चाललो होतो, म्हणलं चक्कर टाकावी तुझ्याकडे”
“कशाला? आणि येण्याआधी किमान फ़ोन तरी करायचा” असं काहिसं कुजकट बोलायचा आपला मनापासून मूड असतो मात्र तरिही वरवर बुळबुळीत हसत आपण कसंनुसं म्हणतो,
“हो का? चांगलं झालं की”
“अगं मी मुद्दामच फ़ोन नाही केला. म्हणलं तू काय घरीच असतेस, तुझी गाठ पडणारच”
आपण घरात असतो हा आपण सोडून इतर सगळ्यांसाठी नेहमीच सोयीचा आणि गहित धरण्याचा मुद्दा असतो. नोकरदार माणसाकडे अचानक टपकता येत नाही कारण दाराला कुलूप दिसण्याच्या शक्यता असतात. घरीच रहाणीरीकडे तसं नसतं नं.
आपण घरात रहातो याचा अर्थ पाहुणेरावळे, आप्तेष्ट आणि कुटुंब या सगळ्यांनी आपला चोवीसच्या चोवीस तासांचा वेळ गृहितच धरावा असं असतं का? घरात रहाणारीला तिचे म्हणून काही उद्योग नसतात?
आपणा छान तयार झोलोय याचा अर्थ आपली बाहेर जायची तयारी चालू आहे, हे सरळ दूर्लक्ष करत समोरचा ऑर्डर सोडतो,
“मस्त आलं घालून चहा कर. बरेच दिवसांत तुझ्या हातचा चहा नाही प्यायलो.”
आपण किचनमधे जाऊन चहा करतो आणि मनातून कितिही चरफ़डलो असलो तरिही गृहिणीधर्माला, अतिथीधर्माला जागत बिस्किटांसोबत चहाचा वाफ़ाळता कप समोर आणून ठेवतो.


चिक्कार डोकं खाणारी मिटिंग करून आपलं डोकं ठणकत असतं आणि बसमधल्या कलकलाटात आपण डोळे मिटून डोक्याला आराम देण्याचा प्रयत्न करत असतो. जरा बरं वाटावं असं फ़िलिंग येतच असतं की फ़ोन वाजतो. घरचा नंबर बघून आपण तात्काळ उचलतो कारण पिल्लं घरात सोडून कामं करणारीचं अर्धं लक्ष घरात असतंच. फ़ोन टाळणं सिस्टिममधेच नसतं कारण नेमका टाळलेला फ़ोनच काहीतरी इमर्जन्सी सांगणारा निघालेला असतो कधीतरी. आपण फ़ोन घेतो,
“आई गं, येताना माझं उद्याचं प्रोजेक्टचं सामान आणशिल?”
या प्रश्नाला उत्तर होच असतं.
मात्र तो होकार देताना आपली चिडचिड होते कारण एक स्टॉप आधी उतरून स्टेशनरीचं दुकान गाठावं लागणार असतं. मग आता आलोच आहोत तर म्हणत घरात संपलेल्या भाज्या वगैरे घेतलं जातंच. बरं अंतर इतकं अडनिडं की रिक्षावाले यायला सहजी तयार होत नसतात. आपण ठणकतं डोकं आणि हातातल्या पिशव्या सांभाळात रस्त्यावर रिक्षा शोधत फ़िरत रहातो. खरं तर या क्षणाला आपल्याला घरी जाऊन एक कप कडक चहाची आणि उशीवर डोकं टेकायची फ़ार गरज असते.

लग्न ठरलेलं असतं, आपण रजा वगैरेचं प्लॅनिंग करतो. नवे दिवस असतात. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला पटकन नकार  देता येत नाहीत. रूटीन सुरू झालेलं असतं. आपणा ऑफ़िसच्या गडबडीत आवरत असतो आणि आपली सासू आपल्याला सहजपणानं येऊन सांगते,
संध्याकाळी जरा लवकर ये. माझ्या भजनीमंडळातल्या बायका घरी बोलवल्यात मी. घरातच खायचं करायचं म्हणतेय, जरा मदतीला ये
खरं तर अशा सवलती आता ऑफ़िसमधे मागायचिही चोरी झालेली असते कारण ऑलरेडी लग्नाच्या शॉपिंगच्यावेळेस, होणार्‍या नवर्‍याला भेटायचं म्हणून बरेचदा या सवलती घेऊन झालेल्या असतात. आता खरं तर जास्त वेळ थांबून ते कॉम्पेनसेट करायची वेळ आलेली असते. पण आपण हे काही बोलू शकत नाही. चरफ़डत, शेलक्या नजरा झेलत ऑफ़िसमधून निघतो आणि घरी येऊन धुसफ़ुसत सासूच्या हाताखाली कामं करायला लागतो.

मैत्रिणीसोबत मुव्ही प्लॅन होत असतो. मुलांची सोय बघत, सगळ्या लेकुरवाळ्यांना सोयीची पडेल अशी एक वेळ अगदी मुश्किलीनं निवडलेली असते. प्रचंड ऍडजेस्टमेंट करत आपण हे सगळं जमवून आणतो. संध्याकाळच्या शोला जाण्यासाठी दुपारपासून घरच्यांच्या खाण्याची व्यवस्था किचनमधे करत असतो आणि नवर्‍याचा फ़ोन येतो.
“अगं भूषण आलाय ऑस्ट्रेलियाहून. आज यायचं म्हणतोय घरी. एक काम कर भाज्या अआणि बिर्याणी घरातच कर. मी पोळ्या आणि स्वीट बाहेरून घेऊन येतो”
भराभर प्लॅनिंग केलेल्या नवर्‍याला आपण आपल्या मुव्हीप्लॅनची आठवण करून देण्याचा क्षीण प्रयत्न करतो. त्यावर तो सहजच म्हणतो
“आज जाणार होता नाही का तुम्ही? माझ्या डोक्यातूनच गेलं बघ. काय करूया आता? मी तर त्याला ये म्हणून बसलोय. तू जा, आम्ही बाहेरच भेटतो डिनरला कुठेतरी”
हा पर्याय मनापासून दिलेला नाहीए हे कळण्याइतके आपण संसारात मुरलेलो असतो. शिवाय हा डिनरला गेला तर मुलं घरात एकटीच रहाणार असतात. सगळा विचार करून आपण म्हणतो
“असूदेत. मी परत कधीतरी जाईन तू बोलवलयंस तर असूदे. तो काय रोज रोज येतो का?”

अचानक एक दिवस एखादा फ़ोन येतो फ़लाण्या नातेवाईकाचा
सुरवातीला अगदी गोड शब्दात आपली विचारपूस होते. काहीही कारण नसताना कौतुक होतं.
“ऐक नां, शिशिरला अगं तिकडे एण्टर्नशिप मिळतेय. सहा आठ महिने आहे. आणि जर सगळां नीट झालं तर तिथेच जॉब लागण्याचिही शक्यता आहे. मी म्हणलं परक्या शहरात एकटा नको राहूस. मावशी आहे आपली. तिच्याकडेच रहा. तुझ्याकडे तो असला की मला काळजी नाही गं”
या विचारण्यात आपल्या नकाराची शक्यताही गृहित धरलेली नसतेच हे उघडच असतं. शिवाय हे सहा आठ महिने वर्षं दोन वर्षं होण्याच्या शक्यता आपल्याला ठळकपणानं दिसत असतात. आपली चिडचिड होते. घरातले मात्र आपलीच समजूत घालतात.
“असूदेत गं. उद्या आपली मुलं अशी कुठे पाठवायची वेळ आली तर?”
“मी नाही माझ्या मुलांना कोणत्याही नातेवाईकाकडे ठेवणार. त्यांनी त्यांची सोय स्वत:च केली पाहिजे. टक्के टोणपे नाही खाल्ले तर तयार कशी होतील?”
“हो, अगं पण हे तुझे विचार झाले. प्रत्येकाचे तसे नसतात आणि मोठा मुलगा आहे. तुला काय करायचं आहे त्याचं? जास्तीच्या चार पोळ्या फ़क्त”
जास्तीच्या चार पोळ्यांचा प्रश्न असतो का फ़क्त?आणि मुळात पोळ्या वगैरे करावं लागणं हा मुद्दाच नाहीए. त्या जास्तीच्या चार पोळ्या लाटायची माझी तयारी आहेच हे तुम्ही गृहित धरता त्याचा जास्त त्रास होतोय हे दिसत नाहीए का तुम्हाला?

किती अनावधानांन आणि बरेचदा कळून सरून न कळल्यासारखं दाखवत लोक आपल्याला गृहित धरत जातात. पूर्वी म्हणजे वीशी पंचविशीत असताना याचा खूप त्रास व्हायचा. “मला होकार नकाराचं स्वातंत्र्य आहे की नाही?” असं ओरडून विचारावसं वाटायचं. पण पस्तिशीच्या अलिकडं पलिकडं, चार पावसाळे वगैरे बघितल्यावर आता या गृहित धरण्याचा त्रास बोथट मात्र झालाय. पूर्वी होणारी तडतड, मनातल्या मनात शेकडो वेळा केलेली चिडचिड, त्रागा आता थंडावलाय हे खरं! वायानुरूप येणारी समज म्हणायचं, समंजसपणा म्हणायचा की, कशाचंच काही न वाटण्याचा बधिरपणा? की, आपल्याला गृहित धरलं जातंय, जाणारच हे आपणही आता गृहित धरायला शिकलोय?



 

अबोला

"तुला माझं काही ऐकायचंच नसतं"
"याला काय अर्थ आहे?"
"सगळ्यात अर्थच काढत बैस तू"
"आता हे काय, कुठून कुठे विषत नेतेस"
"मी?"
"नाहीतर कोण? मी?"
"मग काय प्रश्नच मिटला"
"नेमका काय प्रश्न आहे?"
"हे ही मीच सांगयचं?"
"नाहीतर मला कळणार कसं?"
"कळत नाहीए तेच बरंय"
"नेमकं काय हवंय तुला? मला कळायला हवंय की नको?"
"तुझ्याशी  बोलणं म्हणजे नं..."
"काय?"
"काही नाही"
"असं कसं काही नाही? मग मघासपासून चाललं होतं ते काय होतं?"
"तेही मीच सांगू?"
"मग कोण सांगणार?"
"शी: मला नं,कंटाळाच आलाय आता"
"तुला कंटाळा आलाय, तर मला काय उत्साह फ़ुटलाय?"
"सोड नां...जाऊ दे"
"असं कसं सोड?"
"जसं जमेल तसं सोड"
"हे बरंय तुझं...मी सोडलं की परत म्हणशिल तुला काही कळतच नाही"
"नाही म्हणणार...आता काहीच नाही म्हणणार...कधीच...बास?"
"बघ हे असं असतं...मी एक म्हणतो, तू दुसरंच ऐकतेस आणि तिसरंच समजतेस.."
"मी?"
"हो."
"बरं."
"काय?"
"...."
"...कॉफ़ी घेणार?..."
"..."
"तुला आवडते तशी करतो...कडक"
"..."
"घेणार का? घे थोडी "
"..."
"बघ मग पुन्हा म्हणाशिल की ..."
"..."
"अच्छा म्हणजे आता तू काहीच बोलणार नाहीएस का?"
"..."
"नक्की?....मग जाऊ मी?..."
"..."
"ओके देन,...बाय..."
....

 

निरोप

"आठवतं अजून तुला?"
"न आठवायला काय झालं?"
"मला वाटलं एव्हाना तू विसरली असशिल"
"हम्म......"
"आता या दीर्घ हम्म....आणि त्या नंतरच्या या पॉजचं मी काय करायचं?"
"...."
"जाऊ दे, तेंव्हाही हा हम्म् आणि दीर्घ पॉज जीवघेणा वाटायचा....इतक्या वर्षांनंतरही....तेच...तसंच...."
"तेही आठवतं तुला?"
"सगळंच..."
"सगळं?"
"अगदी सगळं"
"अगदी सगळं...?"
"हो"
"आता वाटतं ते दिवस किती छान होते...."
"....हम्म .... होते"
"हम्म ....होते...मग, बाकी?"
"शून्य...असं म्हणायला आवडलं असतं, पण...."
"पण काय?...."
"काही नाही...."
"खरंच?....आता काहीच नाही?.....बाकी?...."
"नसावं...नाहीच....म्हणजे नसायलाच हवं नं....."
"नसावं असं तुला वाटतं....वाटतं?...अजूनही?...का हसलास असा?"
"आता दीर्घ पॉज माझा....निरोपाचा...."
 

गोष्ट तशी जुनी, सिनेमा शिकण्याच्या दिवसातली

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आतासारखं इंटरनेट आणि गुगल नावाची हुकमी हत्यारं सोबत नसण्याचा नव्वदीचा काळ. पत्रकारिता आणि संवादशास्त्र असं भारदस्त नाव असणारा पीजी कोर्स करत असण्याचा काळ. अनेक विषयांतून एक स्पेशल सब्जेक्ट निवडायचा होता. तोपर्यंत जनसंपर्क आणि जाहिरात हेच आपल्याला आवडतं हे ठामपणानं माहित होतं आणि त्यातच स्पेशलायझेशनही करायचं होतं. मात्र, पहिल्या वर्षी हळूच हा सिनेमा नावाचा विषयही आला. हळूहळू यात गोडी वाटायला लागली. सिनेमा शिकायचा असतो, जे दिसतं त्यापलिकडेही सिनेमात बरंच काही असतं जे आवर्जून शिकलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग जनसंपर्क मागे पडून स्पेशलायझेशनला फ़िल्म घेतलं. सुरवातीचे रोमॅंटिक दिवस लगेचच उतरले कारण या विषयावर भरपूर काही शिकवतील अशी पुस्तकं मराठीत नव्हती आणि त्या काळात आपल्याला इंग्रजी झेपतच नाही असा ठाम न्यूनगंड होता. आमच्या डिपार्टमेंटचा जीवही तसा छोटाच होता आणि सिनेमा शिकणारे विद्यार्थी तर त्याहून कमी. पहिल्या वर्षी चारजणं होतो आणि मास्टर्सला तर मी एकटीच. तोकडे संदर्भ आणि मर्यादित लायब्ररी या बळावर सिनेमा शिकताना थकायला व्हायला लागलं आणि खरं सांगायचं तर गंमतही वाटत होती. एक असा विषय जो खरं तर आयुष्याचा जवळपास अविभाज्य भाग होता पण तो शिकायला संदर्भच नव्हते पुरेसे. पहिल्या वर्षी तर फ़िल्म शिकविणार्‍या फ़ॅकल्टिचाही आनंदच होता. एकतर बरेच आठवडे कोणी नव्हतंच. मग एक सर येऊ लागले. शिकवणं कमी आणि गप्पा जास्त होत्या. हळूहळू कळलं की सरांनी जॉकी नावाच्या एका मराठी मालिकेत एक्स्ट्राचं काम केल्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मग लक्षात आलं की आता इथून पुढे आपलं आपल्यालाच या विषयाला भिडलं पाहिजे. जिथून जे मिळेल ते वाचण्याचा सपाटा लावला. पुढच्या वर्षी मात्र कुंडलीतले ग्रह चांगले जोरावर होते. अनुभवी, अभ्यासू नारकर सर फ़ॅकल्टी म्हणून मिळाले. खरं सिनेमा शिकणं इथून सुरू झालं. तुलनेनं छोटा आवाका असणार्‍या छोट्या शहरातल्या एका छोट्या डिपार्टमेंटमधल्या एकुलता एक विद्यार्थी असणार्‍या या वर्गाला सुरवात झाली. अंधार्‍या खोलीतल्या पडद्यावर दुनियाभरातल्या सिनेमांचे तुकडे दाखवत सर सिनेमाची भाषा शिकवायला लागले. ही नवी वर्णमाला खूपच अमेझिंग होती. आतापर्यंत जे शिकलो त्याहून वेगळं काहीतरी शिकतोय आणि असं काहीतरी शिकणारे आपण इथे तरी एकमेव आहोत हे जाणवून लई भारीवालं फ़िलिंग यायचं. 😉 
सत्यजीत रेंचे सिनेमे पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी लागायचे ते त्या वयात बहुतेकदा रटाळ वाटुनही पाहिले होते. एकाच संथ लयीत चालणारे ते सिनेमे कधी संपणारच नाहीत असं वाटत असायचं. कळायचं तर ओ की ठो नाही. पण मोठ्यांच्य बोलण्यातून रेंच्या बद्दलचा आदर ऐकून वाटायचं आपण नक्कीच काहीतरी वेगळं आणि ग्रेट बघतोय. मला समोर जे चाललंय त्यातलं काहीएक कळत नाहीए हे सांगायला संकोच वाटायचा आणि मग तास न तास नुसतेच डोळे रुतवून त्या छोट्या पडद्याकडे बघत बसण्यावाचून पर्याय नसायचा.
आता आमच्या या दगडी भक्कम इमारत असणार्‍या या ह्युमॅनिटी डिपार्टमेंटमधल्या दुसर्‍या मजल्यावरच्या त्या थंड अंधार्‍या वर्गात बसून पुन्हा रेंचे सिनेमे बघताना नजर बदलली होती. हळूहळू सिनेमा कसा बघायचा, हे कळत चाललं होतं आणि लहानपणी रटाळ वाटलेला तोच सिनेमा आता काहीतरी वेगळीच अनुभूती देत होता. सिनेमा चालू असताना मधेच तो पॉज करून सर बोलायला लागयचे. प्रत्येक फ़्रेम समजावून सांगत अमूक असंच का आणि तमूक तसंच का, हे स्पष्ट करायचे. सरांच्या तासाला बेल नव्हती हे एक बरं होतं, कारण बोलत राहिले की सर बोलतच रहायचे. मग मधेच भानावर येत, "अंम, चला पुढे", असं म्हणत पॉज मोकळा करायचे.



सिनेमा शिकायचे दिवस भाग एक
 

प्रिय बापास

बाप म्हणजे बाप असतो
कधी हळवा, कधी डोक्याला ताप असतो
कोणाचा डॅडी तर कोणाचा बाबा असतो
असा काय न तसा काय
सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम असतो

आपण मागावे पैसे तर हा बचतीचं लेक्चर देणार
गप्प बसावं तरीही  उगंच संशय घेणार
कधी दोस्त असतो तर कधी हिटलर असतो
सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम असतो

ऑफिसमधून आला की त्रासलेला असतो
काही बोलायची सोय नसते
कारण, आटा फूल सरकलेला असतो
रविवारी मात्र जाम खुशित असतो
तुमचा आमचा सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम असतो

बघता बघता आपण मोठे होतो आणि बाप वठत जातो
फणसाचा काटा बोचेनासा होतो
आपण घराबाहेर तर हा घरात असतो
आपल्या घरी यायच्यावेळी
कारणं काढून जागा रहातो, बघून आपल्याला विनाकारणच हळवा बिळवा होतो

बोट अजूनही हातात असतं
फक्त आता त्यानं नाही, मी त्याचं पकडलेलं असतं
उन्हाळे पावसाळे सोसून टणक झालेला बाप आपल्यापाशी पोर होतो
तुमचा आमचा सगळ्यांचा ऑलमोस्ट सेम असतो

-नेहा कुलकर्णी
 

अबक आणि अकरा पन्नास

अबक ही एक टीम आहे. यांची वेळ पडेल तशी कॉम्बिनेशन्स बनतात म्हणजे कधी ब आणि क यांची टीम अ ला हैराण करते, म्हणजे खरं तर नेहमीच. कधी अ आणि ब मिळून क चा क्लास घेतात तर कधी रितसर रॅगिंग घेत मनोरंजन करवून घेतात. कधी अ आणि क ची टीम असते, (ब च्या मते हीच खरी टीम आहे ज्याबद्दल ब च्या मनात रितसर खुन्नस आहे बरं का!) अरे हो, अबक कोण ? सांगायचं राहिलं नां, तर मंडळी म्हणजे साक्षात अस्मादिक, अर्थात आई नावाची बाई, म्हणजे बेबी अर्थात थोरली पाती. शब्दश: पाती कारण आम्ही सध्या टीन एजर टीन एजर खेळतोय त्यामुळे हार्मोन्स यथेच्छ धुमाकुळ घालतायत. कधी लाडात येत बच्चा बच्चा खेळायचा मूड तर कधी, कमॉन आय एम यंग ऍडल्ड नाऊ असं सुनावलं जातंय. म्हणजे धाकलं पातं ज्याला इतरजण लाडानं कळकुटं म्हणतात. बारिक बारिक काड्या करत रहाणं हा आवडता छंद असणारं. सध्या पेशवा सिरियल डोक्यात असल्यानं श्रीमंत चिमणाजी शर्मन सरकार आहेत. 
              तर या श्रीमंतगिरीमुळे परवा झालेला किस्सा, श्रीमंतांची स्कूलला जायची वेळ झालेली होती. साडे अकराची घातक वेळ होती.....नेमका ऑगी कॉक्रोच टिव्हीवर अवतरलेला.....अजून शूज पॉलिश राहिलंय....जेवण राहिलंय....बॅग अर्धीच भरलीय.....जेवण समोर वाट बघतंय...आणि श्रीमंत मणी मोजत जेवतायत....बारा दहा चा शाळेच्या बससाठी खाली उतरायचा मुहूर्त आहे....आई नावाच्या बाईची नेहमीची संवांदाची फ़ैर सुरू झालेली आहे....."हे बघ उशिर झाला तर मी स्कूलमधे सोडायला येणार नाही. बुडव आज स्कूल मग उद्या नोट लिहून देते टिचरला की शर्मन ऑगी बघत होता म्हणून बस चुकली आणि म्हणून स्कूलला आला नाही....चालेल का?  (पोरगं माझ्याकडे दूर्लक्ष करून ऑगी काय म्हणतोय हे तोंडाचा आ करून ऐकत असतं) ......अरे आवर की.....रोज पळापळ करतच जायचं का शाळेत? आवर...सानू टिव्ही बंद कर तो...कितीवेळा सांगितलं शाळेच्या वेळात टिव्ही लावत जाऊ नको....बंद कर तो डबा आधी....(एकूण चार कानांवरून   वारं जातं. नेहमीसारखं माझं ऐकलेलं नसतं त्यांनी. काय करतील बिचारी रोजच दिवसातून पंचवीसएकवेळा आई जर तेच ते बोलत असेल तर त्या बिचार्‍या पोरांनी तरी कितीवेळा मन लावून ऐकायचं, नाही का?),,,,काय चाललंय हे? मी वेडी आहे का एकटीच बडबडायला?" आवाज टीपेला गेल्यावर चार डोळे माझ्याकडे  प्रश्नचिन्ह घेऊन बघतात.  शेवटी मीच जाऊन खटकन टिव्ही बंद करते आणि इतर दोन पात्रं आपापलं ओरिजिनल काम करायला लागतात. म्हणजे ताटाकडे बघत जेवायला लागतात. आता त्यांना मागच्या अर्ध्या तासात न समजलेलं समजायला लागतं,
"काय गं हे? आजही पालेभाजीच? शी बाबा किती बोअर आहेस तू."- बेबी
"तेच तर नां. कालही पालेभाजीच होती आजही. ताई, आई सारखी सारखी हीच भाजी का करते?" -श्रीमंत
"रोज रोज कुठे? काल सकाळी भेंडी नव्हती का केली? आणि रविवारी पनीर कोणी खाल्लं रे?"- बिचारी आई
"मग काय झालं? आज बटाट्याची भाजी करायची नां"-बेबी
"हे बघ जे केलंय ते गपचूप खायचं. सगळं जीभेसाठी नाही, कधीतरी काहीतरी तब्येतीसाठीही खायचं असतं" बिचारी आणि वैतागलेली आई. यानंतर अर्थात एक पॉज. मग मधेच दोन घासांनतर श्रीमंत शांतता भंग करतात,
"सानूताई बाबा किती लकी आहे नां"- श्रीमंत
आई आणि ताईला कळतच नाही की आता बाबा का बरं लक्की? आईच्या उरात बारीक धडकी, आता बहुतेक हा म्हणणार की आई बाबाला भाज्या खाण्यावरून कधीच रागवत नाही पण हे सांगून थांबणार नाही पुढे कोणत्या कारणांवरून रागवते याची यादी ऐकवणार. म्हणून आई सावध होत त्याला विचारते
"का रे? बाबा का लकी?"
"मग काय तर. तो सारखा सारखा ऑफ़िसच्यासाठी मिटिंग असतात तेंव्हा हॉटेलमधे जेवतो आणि सारखा पनीर खातो. मी ही मोठा झाल्यावर बाबासारखा बनणार"
आईला मनातून गार वाटतं . की , चला पोरगा बाबासारखं बनणार म्हणतोय आणि आमचा बाबा तसा गुणी पोर आहे. पण हे गार वाटणं अर्धा सेकंद टिकतं कारण पोर पुढे बोलतं,
"मी मोठा झालो की बाबासारखा बनणार म्हणजे मग मीही ऑफ़िसमधे जाणार आणि असंच मिटिंगला गेल्यावर रोSSSSSSSSSज पनीर खाणार"
यावर बेबी डोळ्याच्या कोपर्‍यातून हसत माझी रिऍक्शन बघत असते, श्रीमंत शांतपणानं पोळीचा तुकडा भाजी पोळीला लागणार नाही याची काळजी घेत अगदी अलगद भाजीत बुडवतात आणि तोंडात टाकून रवंथाला बसतात. मी त्यांच्याकडे रागा्नं बघते आणि दूर्लक्ष करून पुढच्या कामाला लागते. आई इतकी शांतपणानं कामाला लागलेली अर्थातच ब ला मान्य नसतं. ती हळूच काडी सरकवते,
"बरं का शमी तू पण लकीच आहेस....माझ्यापेक्षा"
"का? मी का लकी? "-श्रीमंत
"बघ नां, हे असं मी केलं असतं तर आईनं मला मोठं लेक्चर दिलं असतं. तुला ती फ़ारतर ओरडते पण मारत नाही. तुझ्याएव्हढी मी होते नां तेंव्हा आईनं मला खूप मारलंय....ती तुझी स्केल आहे नां त्यानंही......तुला बघ एकदाही मारलं नाही...."
श्रीमंतांना पुन्हा एकदा नव्यानं धक्का बसलेला असतो. खरंतर ताईबाईंनी हा गळा बरेचदा काढून झालाय तरिही सोयीनं त्यांना धक्के बसतात. माता नं तू वैरिणी असे भाव डोळ्यात आणून ताईची कड घेत श्रीमंत व्याकूळपणे बोलतात,
"आई....व्हेरी बॅड....तू का गं सानूताईला मारलंस? बिचारी"
आता घड्याळ्याच्या काट्यानं अकरा पन्नास वाजवून टाकलेले असतात. घटिका जवळ आलेली असते आणि आई नावाच्या बाईच्या डोक्यावरची बर्फ़ाची लादी वितळायला लागलेली असते.
ती श्रीमंतांच्या बाजूला जाऊन उभी रहाते आणि करारीपणानं म्हणाते,
"हो नां. ताई म्हणतेय ते बरोबरच आहे. तू खूप लकी आहेस. कधीच धपाटा खाल्ला नाहीस नां? पण आज बहुतेक लकी असण्याचा शेवटचा दिवस आहे कारण अजून बरोबर पाच मिनिटांनी तुलाही मार पडणार आहे."
ही धमकी बरोबर लागू पडते आणि बरोबर बाराच्या ठोक्याला श्रीमंत पाठीवर दप्तर लटकवून तयार असतात.
सकाळ सत्र इथे संपतं मात्र अबक तिघांच्याही मनात एक एक प्रश्न ठेवून.
अ- सकाळपासून घसा खरवडून आवरा आवरा म्हणलं तरी आवरत नाही आणि नेमकं शेवटच्या दहा मिनिटांतच रोजच ,सगळं कसं काय पटकन आवरलं जातं?
ब- हा रोजच आईच्या मारापासून कसा काय वाचतो? आईला त्याचं बोलणं गोड आणि कुचीकुची का वाटतं? हा आईचा मार खाणार तरी कधी?
क-मी रोजच वेळेतच आवरून स्कूलमधे जातो तरिही आई मला ऑगी का बघून देत नाही? आणि मुख्य म्हणजे रोजच पनीर का करत नाही?

 

जिंदादिल मुंबई

मुंबईकर नसणार्‍याला मुंबईचं फ़ारच कवतिक. या शहराचा आब वेगळाच आणि एकाच मुंबईत कितीतरी छोट्या मोठ्या मुंबई सामावल्या आहेत. चाळींची मुंबई, गिरण्यांची मुंबई, झोपडपट्यांची बजबजलेली मुंबई, पावसाच्या पाण्यानं तुंबणारी तरिही न थांबता धावणारी मुंबई, बॉम्बस्फ़ोटानं हादरणारी मुंबई आणि चोवीस तासात पूर्वपदावर येणारी मुंबई, बॉलिवुडची मुंबई, तोर्‍यात फ़टकून वागणारी साऊथ बॉम्बे मुंबई, ट्रॅफ़िकनं गच्च भरलेली मुंबई, फ़्रीवेवरून सुसाट धावणारी मुंबई.....ज्याला जशी बघायची तशी मुंबई!
जुनी ओळख अंगाखांद्यावर मिरवत असतानाच नवी कात टाकत शांघाय बनू पहाणारी मुंबई. हिचं जुनं रूप जितकं लोभस तितकंच नवं चकचकीत रूपही बघत रहावं असं.
मुंबईच्या बाहेर रहाणार्‍या मला मुंबईतली जुहू, अंधेरी ही नावं पेपरमधल्या बातम्यांत ऐकून माहित होती. वीस पंचवीस वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की कधीतरी याच रस्त्यांवरून तू सराईतासारखी फ़िरशील तर ते अगदीच अशक्य वाटलं असतं. याची कारणं दोन, एकतर त्यावेळेस माझा स्वभाव आजच्या अगदीच उलट म्हणजे मुखदुर्बळ होता त्यामुळे मुळात मी जर्नलिझमच्या वाटेला जाईन हेच कोणाला पटलं नसतं आणि दुसरं म्हणजे गड्या आपला गाव बरा अशा मनोवृत्तीमुळे फ़ारच लांब म्हणजे पुण्यापर्यंतची धावच मी घेऊ शकले असते. पण कसं असतं नं, आपला प्रवास आधीच कोणीतरी ठरवून ठेवलेला असतो आपण फ़क्त वेळ आली की त्या त्या गाडीत जाऊन बसतो. तसंच काहिसं झालं आणि मी बातम्यांच्या हेडिंडमधे भेटणार्‍या आणि तेव्हढीच ओळख असणार्‍या या मुंबईत पाऊल ठेवलं. मुंबईच्या बगलेत राहून कामाच्या निमित्तानं मुंबई भटकताना एक वेगळीच ओळख या शहराशी झाली आणि वेगळीच गट्टीही.
अनेकजण इथल्या प्रदुषणाला नावं ठेवतात, अनेकजण इथल्या घामट हवेची तक्रार करतात, अनेकांना लोकलला लटकणार्‍यांचा त्रास होते तर अनेकांना पावसानं तुंबणार्‍या रस्त्यांचा. मला मात्र हे शहर वंडरलॅंडसारखं वाटतं. कमालिचं जिंदादिल! तुम्ही देशाच्याच काय जगाच्याही कोणत्याही कोपर्‍यातून इथे या, हे शहर तुम्हाला आपलसं करतं. तुसडेपणा या शहराच्या स्वभावातच नाही. बारा ते चारची सक्तीची विश्रांती नाही की सातनंतरची बाहेर पडायची असुरक्षितता नाही. अहोरात्र जागं असणारं हे शहर. दिवसा जितकं छान दिसतं तितकंच रात्रीही लोभस दिसतं. म्हणूनच जाता जाता अचानक कुठेतरी एखाद्या चौकात आय लव्ह मुंबई दिसतं आणि आपोआप फ़ोटो गॅलरीत भर पडते.

 

चाळ नावाची वाचाळ वस्ती…..

मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भागडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.






मुंबईची दुसरी आणि पक्की ओळख म्हणजे इथल्या चाळी. आम्हा सांगलीकरांना म्हणजे बच्चेकंपनीला चाळ हा प्रकारच माहित नव्हता. कारण सांगलीत एकतर सगळी बैठी घरं. कॉंक्रिटच्या गच्च्या आणि गुळगुळीत गिलावे असलेले बंगले किंवा उतरत्या मंगलोरी कौलांची एक दोन खोल्यांची घरं, गावभागात असणारे जुनेपुराणे वाडे आणि या वाड्यात पिढ्यानुपिढा रहाणारी भाडेकरू मंडळी. पण घर म्हणजे थोड्या फ़ार फ़रकाने असंच चित्र. बैठं. घरापुढे गुळगुळीत अंगण ज्यावर सकाळ संध्याकाळ सडा मारायची पध्दत होती आणि जितकी जागा असेल त्या प्रमाणात घराच्या चारी अंगांनी असणारी नारळ, पेरू आंब्याच्या झाडापासून पासून कण्हेरी, मोगरा, गुलाबाचे ताटवे आणि हो प्रत्येक घरात अगदी हटकून असणारी तुळस. मुंबईची मात्र तर्‍हाच निराळी. इथं बैठी घरं नसतातच असं त्यावेळेस वाटायचं एकतर वाड्या असतात किंवा चाळी आणि त्याही गंमतीशिर आडनावाच्या. आणि इथल्या घरांना मजले नाहीत तर “माळे” असतात आणि इथली घरं म्हणजे “खोली” किंवा “रूम” असते शिवाय तिला नंबरही असतो. असं सगळं अजबच होतं मुंबईचं प्रकरण.  खरं तर चाळी पुण्यातही होत्याच आणि हो, अगदी आमच्या सांगलीतही होत्या पण आम्हाला मात्र चाळ ही फ़क्त मुंबईतच असते असं तेंव्हा खात्रीनं वाटायचं.
आमचं मुंबई दर्शन बहुतेक करून मोठ्या काकांच्या किस्स्यांतूनच व्हायचं त्यामुळे काकांची मुंबई तीच खरी मुंबई असंच समिकरण कित्येक वर्षं होतं. काका भाड्यानं रहायचे आणि त्यांचे पत्तेही सतत बदलायचे. एखाद्या दुपारी पोस्टानं पिवळं कार्ड यायचं ज्यावर त्यांचा बदलेला पत्ता असायचा, तो पत्ता वाचताना मजा यायची कारण चाळीचं नाव. आम्ही तेंव्हा फ़ार कॉलरटाईट करायचो आणि दोस्तमंडळीत सांगायचो की आमचे मोठे काका मुंबईत अमूक चाळीत रहातात कारण तेंव्हा आजूबाजूच्या घरातून मुंबईला रहाणारं नातेवाईक कोणी नव्हतं. पुणं म्हणजेच एकदम भारी स्टेटस आणि मुंबई म्हणजे तर काय विचारायलाच नको आणि आमचे तर दोनही शहरात नातेवाईक विचार करा दोस्तमंडळीत काय रूबाब असेल , असो. तर मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भानगडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.
हळूहळू बदलत्या मुंबईनं कात टाकली आणि चाळकरी लोक चाळीतल्या खोल्या विकून दूर पार कल्याणच्या पलिकडे आणि विरार वगैरे भागाकडे ऐसपैस (चाळीच्या तुलनेत) ब्लॉक मधे रहायला जाऊ लागले. कॉमन संडास आणि कॉमन नळ, त्याला लावाव्या लागणार्‍या रांगा आणि त्यापायी होणारी युध्दं यापेक्षा आपल्याच स्वत:च्या घरात असणारं इंडियन टॉयलेट आणि स्वयंपाकघरातल्या नळाला भलेही दिवसातून ठराविक वेळ येणारं पाणी ही अक्षरश: सुखाची परिसीमा होती. हळूहळू बर्‍याचशा चाळी पाडून त्याठिकाणी सदनिका उभ्या करण्यात आल्या. आजही बर्‍याच चाळी तग धरून आहेत पण कशा? तर घरात एखादं म्हातारं माणूस असतं नां ऐंशीचा टप्पा ओलांडलेलं, सुरकुतलेलं शरीर, डोळ्यात आठवणी भरून शून्यात बघत बसलेलं, सगळ्यात गोतावळ्यात असूनही वेगळं भासणारं…तशा. आजूबाजूला उंचच टॉवरमधे आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या या चाळी बघितल्या की वाटतं कधी ना कधी, आज ना उद्या या भिंती पाडून इथेही आकाशात झेपावणारे टॉवर उभे रहातील….! काही चाळी आजही चांगल्या टणकपणानं उभ्या आहेत. आजूबाजूच्या नव्या जमान्याच्या टॉवरची पर्वा न करता मस्त टेचात. जेंव्हा जेंव्हा अशी एखादी चाळ दिसते तेंव्हा हात आपोआप कॅमेर्‍यावर जातो आणि हे चित्र बंदिस्त होतं.





 

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई .......



मिलच्या भोंग्यानी जागी होणारी मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारा, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणून उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं.


मुंबई म्हणजे जुहू बीच, मुंबई म्हणजे नरीमन पॉईंट, मुंबई म्हणजे चौपाटी, मुंबई म्हणजे गेट वे ऑफ़ इंडिया.....मुंबई म्हणजे बरंच काही आणि आता पूर्ण पुसली गेलेली ओळख म्हणजे गिरण्यांची मुंबई. कोणे एके काळी मुंबईत लहान मोठ्या शहरातून विशेषत: कोकणातून लोक मुंबईत गिरणी कामगार म्हणून यायचे. इथल्या मिलमधे कामगार बनायचे आणि गाववाल्यांसाठी "मुंबईकर पावने". अशा चाकरमान्याला गावाकडे ग्लॅमर असायचं. इथे घामट गर्दीत रहाणारा गाववाला मुंबईतून गावातल्या येष्टीतून उतरला की डोळ्यावर गॉगल चढवून बॉम्बेवाला व्हायचा. त्याचा रूबाबच वेगळा, पण मिलवाल्यांचं आयुष्यही फ़ार सुखाचं होतं असं नाही. त्यांचे वेतनाचे प्रश्न, बदली कामगारांचे प्र्श्न होतेच. तरिही मुंबईच्या मिल्स ही मुंबईची मुंबईबाहेरची मुख्य ओळख होती. मात्र ऐंशीचं दशक उजाडलं तेच मिलकामगारांसाठी अखेरचा अंक लिहिण्यासाठी. अगदी अचूक पणानं सांगायचं तर पस्तिस वर्षांपूर्वी या मिल्सना घरघर लागली आणि मुंबईची ही एक पक्की ओळख पुसट व्हायच्या पहिल्या अंकाचा प्रारंभ झाला.

मिलच्या भोंग्यानी जागी होणारी,  लूम्स आणि स्पिंडल्सची मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारं, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणूनच बहुदा कायम उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं. निमित्त झालं दिवाळी बोनसचं आणि मग त्याचं स्वरूप विक्राळ होत जाऊन मिल कामगारांनी संप करून मिल  बंद पाडल्या. हा ऐतिहासिक संप मोडण्यासाठीचे प्रयत्नही तसेच ऐतिहासिक आहेत. या संपाला अनेक राजकिय पदरही आहेत मात्र यातली काळी बाजू ही की अखेर कामगार हरला,
आज बहुतांश मिल्सच्या जागी मॉल्स, कॉर्पोरेट ऑफ़िसेस किंवा टाऊनशिप उभ्या आहेत. या घरात रहाणार्‍या अनेकांना त्या जागेचं ऐतिहासिक महत्व कदाचित माहितही नसेल. कदाचित त्याच आवारात कधीकाळी कामगारांनी घोषणा दिल्या असतील, संप मोडून काढणार्‍यांनी साम, दाम, दंड भेदाचा वापर करत कदाचित त्याच आवारात एखाद्याला अडचणीत आणलं असेल. ते सगळं जमिनीत गाडून त्याजागी आज उभ्या आहेत वातानुकुलीत इमारती. इथे दु:खाला थारा नाही. सगळ कसं हाय प्रोफ़ाईल आणि एसीच्या हवेतलं थंडगार. विरोधाभास म्हणजे कोणे एकेकाळी ज्या जागेवर दीड दोनशे रूपये पगारवाढ करण्यासाठी आंदोलन झालं आणि ते विविध दबावतंत्रं वापरून चिरडलं गेलं त्याच जागेवर आज लाखो रूपये पगार घेणारे कर्मचारी काम करतात, करोडो रूपये मोजून सदनिका विकत घेतल्या जातात किंवा हजारो रूपये फ़ेकून देशी-परदेशी ब्रॅण्डची महागडी उत्पादनं विकली जातात/ विकत घेतली जातात. स्थान महात्म्य असतं म्हणतात नं? पण ते असं? म्हणूनच परळ भागात फ़िरताना उंचच इमारतींच्या कचकचाटातून जेंव्हा एखादी चिमणी नजरेला पडते तेंव्हा गलबलून येतं. अजूनही या टॉवर्सच्या गर्दीत आपलं अस्तित्व टिकवून असणारी चिमणी कदाचित त्या टाऊनशिपच्या सजावटीचा भाग बनेल पण याच इमारतींच्या पायात अनेक कामगारांच्या मोडक्या संसाराचे उसासे आहेत हे कसं विसरावं?
 

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

रस्ते, गल्ल्या, हमरस्ते हे सगळं एखाद्या शहराची ओळख करून देणारं असतं. वाकडे तिकडे, सरळसोट, माणसांनी ओसंडून वाहणारे, गाड्यांनी भरलेले, दुतर्फ़ा नानाविविध गोष्टी विकणारे, कधी नुसतेच कंटाळवाणे पसरट झालेले तर कधी एखाद्या पॉश वसाहतीतून निर्विकारपणे निघून जाणारे. रात्री वेगळेच दिसणारे आणि दिवसा उजेडी वेगळेच भासणारे....
खूप लहानपणी मुंबईत रहाणार्‍या मोठ्या काकांकडून मुंबईची वर्णनं ऐकताना  अनेक गोष्टींनी आश्चर्याचे धक्के दिले होते. त्यातही सर्वात जास्त आश्चर्य वाटायचं ते  इथल्या मान उंच करून बघाव्या लागणार्‍या इमारतींविषयी . कारण एका छोट्याशा शहरात रहाणारी मी, फ़ार तर दोन मजली इमारतीच तोपर्यंत नजरेला पडलेल्या. मुळात आठ आठ दहा किंवा त्याहून उंच इमारती म्हणजे त्या वयात कायच्या काय वाटायाचं. त्यातही काका चाळीत रहायचे त्यामुळे तिथले किस्से ऐकताना हे एक वेगळंच जग आहे असं वाटायचं. लांबलचक चाळींची आणि उंचंच उंच इमारतींची वर्णनं ऐकली की, कशा काय बुवा इतक्या मोठ्या इमारती बांधत असतील आणि लोक कसे रहात असतील असा प्रश्न पडायचा.
    याची देहा मुंबई बघण्याचा योग खूप नंतर आला. मात्र लहानपणापासूनच मुंबई म्हणजे वेगळंच जग असावं असं वाटायचं, आणि  अर्थातच ते आहेही. आज परळ असो की गिरगाव, दादर असो की जुहू, वर्सोवा, इथल्या जुन्या इमारती (ज्या अजूनतरी अस्तित्व टिकवून आहेत) बघताना ऐंशीआणि आधिची मुंबई कशी असेल याची किंचितशी झलक मिळते.
टॉवर्सच्या विळख्यात, पॉश झालेली मुंबई तिची खरी ओळख, खरा चेहरा दिवसें दिवस हरवत चालली आहे. कोणे एकेकाळी व्यापार नावाच्या उन्हाळी खेळात एका चौकोनी तुकड्यावर अवतरलेली मुंबई हीच माझ्यासारख्या नॉन मुंबईकरची मुंबई. आताची मुंबई वेगळीच आहे. कात टाकून नवा चेहरा घेत असताना अजूनही कुठे कुठे या जुन्या खुणा जपलेले मुंबईतले रस्ते पॉश मुंबईपेक्षा जास्त जवळचे वाटतात. अगदी टिपिकल अशा चाळी. रंग उडालेल्या, वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत वाळलेलं काळपट शेवाळं अंगाखांद्यावर मिरवणार्‍या या चाळींच्या खिडक्यांतून वाळत पडलेले आणि खार्‍या दमट हवेवर अलगद उडत रहाणारे रंगीबेरंगी कपडे असोत की गॅलर्‍यांमधून पत्र्यांच्या डब्यातून रसरसून उगवलेली झाडं असोत. चाळीचं तिचं एक या सगळ्यासहित सौंदर्य आहे. कोणाला ते गचाळ चित्र वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही मात्र मुंबईचं चित्र गजबजलेल्या चाळींशिवाय आणि  कंपन्यांच्या  धूर ओकणार्‍या चिमण्यांशिवाय कोणे एकेकाळी अधुरं होतं. आज बहुतेक मिल्स बंद पडलेल्या आहे. शब्दश: नावापुरत्या या मिल्सचे कंपाऊंड राहिले आहेत आणि शेकडो कुटुंब चालविणार्‍या मिल्स पाडून त्याजागी उभे आहेत परदेशी ब्रॅण्डची उत्पादनं विकणारे चकचकीत मॉल्स किंवा कॉर्पोरेट ऑफ़िसेस.  मुंबईची ओळखच आता पुसली जाऊ लागली आहे. हे चूक की बरोबर हा विषयच नाही मात्र हळूहळू गायब होणार्‍या या चाळी आणि मिल्समुळे कुठेतरी आत काहीतरी हरवत चालल्याची भावना नक्कीच होते.
                       गेली अनेक वर्षं मुंबईच्या अगदी जवळ बगलेत राहूनही मुंबईशी तसा फ़ारसा संबंधच येत नव्हता. आता मात्र कामाच्यानिमित्तानं अनेक गल्लीबोळ फ़िरत असताना एक वेगळीच मेरीवाली मुंबई मला भेटते आहे. काम बिम हरवून या इमारती बघत भटकणं हा सध्याचा आवडता उद्योग झाला आहे. इथली जुनी मार्केटस, टिपिकल दुकानं, टिपिकल पारशी नावांनी उभी दुकानं, एक छान जुनाटपणा सगळं सगळं कसं प्रेमात पडावं असं. या गल्ल्यांमधून फ़िरताना, तेरा मुझसे है पेहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई....असं काहिसं होतंय. हे जुन्या इमारतींचं प्रेम आणि त्यांना फ़ोटोत बंदिस्त करणं आजूबाजूंच्यांसाठी हिचं काही खरं नाही असं वाटण्यासारखं असलं तरिही मला खात्री आहे, या गल्ल्यांशी, जुन्या इमारतींशी माझं नक्कीच काहीतरी नातं आहे.
जीपीएस नावाचं तंत्रद्न्यान आपल्याला आता कोणत्याही गल्लीतला पत्ता सहज शोधून देतं पण कधी कधी ते पत्ता शोधता शोधता अशाच एखाद्या अनोळख्या आणि अजिब गल्लीतूनही नेतं. मागे एकदा ताडदेवला जात असताना ड्रायव्हरनं सांगितलं की नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफ़िक दिसतंय. दुसरा रूट घेऊ का? जीपीएसवा सुंदरीनं रिकॅल्क्युलेट करत वेगळ्या रस्त्यावर नेलं. कधीतरी डोळे मिटले गेले आणि डुलकी लागली. डोळे उघडले तर कोणत्या तरी  गल्लीतून गाडी मुंगीच्या पावलानं चाललेली होती. मघाशी डोळे मिटण्यापूर्वी असलेला मोकळा ढाकळा रोड आता माणसांनी गजबजलेला होता. बहुतेक गर्दीनं बुरखे घातले होते किंवा दाढी वाढवून डोकं जाळीदार टोप्यांनी झाकलं होतं. अंगात टिपिकल  पठाणी ड्रेस होते. सर्वत्र उर्दू भाषेतले बोर्ड आणि परिचीत हिरवा रंग. कुठे आलोय


 काही कळेचना आणि मेंदूनं पटकन नोंद घेतली ती रस्त्याच्या बाजूनं असलेल्या प्रचंड मोठ्या ड्रायफ़्रूट विक्रीच्या होलसेल दुकानांनी. माझ्यासाठी ही नवलाईची गोष्टच होती. इतकी प्रचंड मोठी ड्रायफ़्रूट मार्केट माझ्या टप्प्यातल्या परिसरात होती आणि मी याबद्दल काहीच ऐकलेलं नसावं? दुकानांच्यावरच्या पाट्या वाचत परिसर कोणता आहे याचा अंदाज घेतला तर आम्ही मुहम्मद अली रस्त्यावर जीपीएस सुंदरीच्या कृपेनं अडकलो होतो. दुकानांच्या वरून नजर फ़िरत असतानाच सिग्नलला समोर आली ही ईमारत. हात आपसूक मोबाईलच्या कॅमेर्‍यावर गेला आणि ही फ़्रेम कैद झाली. हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. याहीआधी अनाहूतपणे अशा अनेक इमारतीनी फ़ोटो काढायला भाग पाडलं होतं. सुरवात कुठून झाली, पहिला फ़ोटो नेमका कोणता हे आता आठवतही नाही. मात्र परवा फ़ोटो गॅलरी स्वच्छ करताना पुन्हा एकदा या सगळ्यांवर नजर पडली. डिलिट करवेनात आणि त्यांचं काय करावं हेही सुचेना. या इमारती, या गल्ल्या काहीतरी सांगू पहातायत, त्यांच्यात एक गोष्ट दडलेली आहे असं नेहमी वाटत रहातं. कसं लिहायचंय आणि काय लिहायचंय काही ठरलं नाहीए , बघुया कसं कसं जमत जातंय. ये है बॉम्बे मेरी जान मालिकेतली ही पहिली इमारत, पहिला रस्ता. याल नां माझ्यासोबत या गल्ल्यांमधून भटकायला? बघुया कोणती मुंबई सापडते. :)