प्रपंच

झी मराठीचा सुरवातीचा काळ. झी आणि ई अशा दोनच मराठी वाहिन्या त्यावेळेस फ़ॉर्मात होत्या, स्टारचा तारा म्हणावा तसा चमकत नव्हता. ईवरच्या मालिका किंचित बटबटीतपणाकडे झुकणार्या, मेलोड्रामा असणार्या होत्या तर झीवरच्या मराठी मध्यमवर्गाची नस पकडणार्या.

आयुष्यभराचं गारूड करणारी मालिका प्रपंच.  ज्यानी ज्यानी बघितलीय त्यांना ती कधिही विसरता येणं शक्य नाही. यातलं कुटुंब हे मागच्या शतकातलं प्रातिनिधिक होतं. आज  जी चिटकू पिटकू मंडळी आहेत म्हणजे माझ्या पिढीची मुलं त्यांना एकत्र कुटुंब ही एक कवी कल्पना वाटावी अशी परिस्थिती आहे. माझी पिढी मात्र सुदैवी होती. बर्‍याचजणांनी एकत्र कुटुंबाचा अनुभव घेतला. काही कुरबुरी, काही रूसवे फ़ुगवे मात्र एकत्र असण्यातली धमाल माझ्या पिढीनं अनुभवलीय. मोबाईल नसण्याचा आणि टेलिव्हिजन हा दिवसभरात केवळ दोन मालिका आणि सात आणि साडे नऊच्या बातम्या बघण्यापुरताच होता. बुधवारचं छायागीत, रविवारची रंगोली, शनिवारचं विक्रम वेताळ, हमलोग पुरतं टिव्हीपुढं बसणारी माझी पिढी. बाकिचा वेळ अभ्यास आणि भावंडं, मित्र मैत्रीणींसोबत विट्टीदांडू पासून गल्लीभर चालणार्‍या लपंडावानं भरगच्च. हा सगळा फ़िल देणारी, "प्रपंच". १९९९. माया कम्युनिकेशन्सची निर्मिती आणि प्रतिमाताई कुलकर्णींचं दिग्दर्शन.
एक छान एकत्र कुटुंब आणि त्या कुटुंबातल्या छोट्या मोठ्या घटनांची गोष्ट म्हणजे प्रपंच. डोळे ताणून बघावे लागणारे ढिंकचाक सिन नाहीत. कानठळ्या बसणावं संगीत नाही की आक्रस्ताळेपणा करणारी पात्रं नाहीत.  सगळी पात्रं छान पॉझिटिव्ह तरिही अधून मधून होणार्‍या कुरबुरी.  अण्णा देशमुख (सुधिर जोशी) हे कुटुंब प्रमुख,  त्यांची पत्नी माई (प्रेमा साखरदांडे) या दोघांची दोन मुलं प्रभाकर देशमुख (संजय मोने) त्याची बायको  प्रमिला (सुहास जोशी) , बाळ देशमुख (बाळ कर्वे) आणि त्याची बायको शालिनी (अमिता खोपकर) अण्णांची आई - अक्का (रेखा कामत) आणि मुलं- प्रशांत (सुनिल बर्वे), अलका (रसिका जोशी), आनंद (भरत जाधव),  लतिका (सोनाली पंडीत),  कलिका (शर्वरी पाटणकर), भार्गवी चिरमुले , आनंद इंगळे

यातली बरीच मंडळी तेंव्हा तशी नविनच. पण नंतर छोट्या मोठ्या पडद्यावर गाजलेली.

करेक्ट कास्टिंग हे या मालिकेचं वैशिष्ट्य.  पेटी ओढून गाणं म्हणणारा काका, कुरबुर करणारा काका, ओल्या नारळाच्या करंज्या करणारी काकू. सख्खं-चुलत न मानणारी मुलं. कोणी हुशार तर कोणी ऍव्हरेज. खरंतर तसं या घरात खूप काही नाट्यमय घडत होतं असं नाही. अगदी तुमच्या माझ्या घरातलीच गोष्ट पण तरिही या मालिकेनं पकडून ठेवलं होत> कदाचित याचं कारण हे असेल की माझी पिढी विशीत असतानाच हळूहळू एकत्र कुटुंब विभक्त होत चालली होती. एकत्र रहाण्यातली मजा जशी होती तशीच स्वत:ची "स्पेस" न मिळण्याची घुसमट लक्षात येत वाढत चालली होती. अमेरिकेची दारं खुली झाली होती. एकाडएक घरातला तरूण मुलगा सॉफ़्टवेअर क्षेत्रात डिग्री घेऊन एचवन मिळवून चालता झाला होता. तिकडच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारांची हवा इकडे जोरात पसरू लागली होती. प्रत्येकाला अगदी भाजी कोणती करायची ते आर्थिक निर्णयांपर्यंतचे स्वातंत्र्य हवे होते. एक पाय उंबर्‍याबाहेर पडला असला तरिही मागे काहीतरी बंध शिल्लक राहिले होते. पुढचं दिसत असताना, खुणावत असताना मागचं विसरता येत नाही अशी काहीतरी विचित्र गोची झाली होती. म्हणूनच तुमची माझी भावनिक गोची या मालिकेनं मांडली आणि ती खूप लाडकी झाली. त्यावेळेस टीआरपी नावाचा राक्षस अजून आला नव्हता म्हणून कथानकावर भर देत मालिका बनत आणि सांगायची गोष्ट संपली की मालिका चुटपूट लावत निरोपही घेत.
प्रपंचमधेही लतिकाला अमेरिकेचा नवरा मिळतो. मोठा मुलगा प्रशांतही त्या वाटेने निघतो. अलका घरच्याना एनएसडीमधे जाण्यासाठी मनवते. एक एक मूल घराबाहेर पडतं. देशमुखांचं घरही त्यावेळच्या रितिला धरून रिडेव्हलप करण्याचा निर्णय घेतला जातो आणि मग एका गुडीपाडव्याला गुडी उभी करून देशमुख कुटुंबियानी घराचा आणि प्रेक्षकांचा भरलेल्या डोळ्यानं निरोप घेतला.

या मालिकेतला मला सगळ्यात आवडणारा भाग म्हणजे, कलाकारांचं प्रचंडच सहज भूमिका करणं.  अगदी आपल्या घरातलंच समोर घडतंय असं वाटायचं.

दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे देशमुखांचं बैठं घर. अप्रतिम. ती वास्तूच सुंदर होती. मागच्या दारानं बाहेर पडलं की थेट समुद्रकिनार्‍यावर जाता यायचं. देशमुखांची मुलं या छोट्या दाराशी बसून कधी गंभीरपणे तर कधी मजा करत गप्पा मारायची.

आता अशी मालिका बनणं जवळपास अशक्य आहे. कारण काहीच मेलोड्रामा नसणारी मालिका अलिकडे प्रेक्षकच नाकारतात मग बनवेल तरी कोण? कशाला?

म्हणूनच आता केवळ आठवणीतच राहिलेली "प्रपंच".
दुर्दैवानं इतक्या सुंदर आणि सुपरहिट मालिकेचे भाग आता इंटरनेटवर उपलब्ध नाहीत (मला तरी मिळाले नाहीत. कोणाला माहित असतील तर जरूर शेअर करा)केवळ टायटल ट्रॅक युट्युबच्या कृपेनं मिळाला तोच या पोस्टसोबत शेअर करते.  हे म्हणजे दुधाची तहान ताकावर आहे पण नाईलाज आहे.

त.टी.- तुम्हीही माझ्यासारखे या मालिकांचे चाहते असाल. तर तुमच्या आठवणी कमेण्टमधे जरूर शेअर करा.

 

5 comments:

Sangita haval said...

मस्त👌

शिनु said...

धन्यवाद संगीता

ब्लाॅगवर

प्रवीण said...

��

शिनु said...

👌👌 यासाठी धन्यवाद प्रविण 😀
ब्लाॅगवर स्वागत.

रवि said...

प्रपंच पाहिली नाही पण प्रतिमा कुलकर्णींची ४०५ आनंदवन प्रचंड आवडली होती.