एका घराची गोष्ट

परवा काय झालं नां की, दुपारच्या वेळेत आमचा तुफ़ानी सैतान अगदी शांत होता. बराच वेळ झाला काही आवाज नाही म्हटला की ज्याप्रमाणे सगळ्याच आयांच्या मेंदुंचे सॆटेलाईट कार्यरत होतात तसे माझेही झाले आणि चाललंय तरी काय पहावं म्हणून हळूच तिच्या खोलीत डोकावले तर उपडं बसून जीभ बाहेर काढून मन लावून रंगकाम चाललं होतं. इतकं कसलं रंगकाम चाललंय म्हणून मागून जाऊन पाहिलं तर बरोबर त्रिकोणी आकाराच्या डोंगरांच्या रांगेमागून तळपणार्या सूर्यदेवाचं दर्शन झालं. डोंगरांच्या पायथ्याशी कौलारू घर चितारणं चाललं होतं. खूप वरर्षांपूर्वी घराचं चित्र काढायचं म्हटलं की आम्हीही अगदी असंच कौलारू घर चितारत असू. आता कौलारू घरं किमान मुंबईत तरी गायब झाली असताना घराची कल्पना आजही टुमदार कौलारू घराभोवतीच फ़िरतेय हे पाहून गंमतच वाटली. माझी चाहूल लागल्यावर मान वळवून लुकलुकत्या डोळ्यांनी आणि रंगलेल्या चेहर्यानं तिनं विचारलं,"कसं आलंय माझं होम" म्हटलं एकदम "स्वीट" . चित्रातल्या घरावर बेहद्द खुश झालेलं पिल्लू म्हणालं,"आई आपण ना सेम टू सेम असंच एक घर बांधुया." तिला म्हटलं "तुझ्या दादोबांचं घर अगदी असंच होतं".यावर चकीत होऊन ती म्हणाली, "हो? तू रहात होतीस तेंव्हा त्या घरात? कुठे होतं? मला सांग नां त्या घराची गोष्ट". तिनं विचारण्याआधीच मी आमच्या जुन्या घरात जाऊन पोहोचले होते.

.................आमच्या घराची गोष्ट मी पाच वर्षांची असताना सुरू झाली. कराडातल्या सोमवार पेठेतल्या ऐसपैस वाड्यात वावरलेल्या माझ्या आईला दोन खोल्यात रहाणं म्हणजे बांधल्यासारखं वाटायचं. त्यातून भाड्याच्या घरात शंभर बंधनं असायची ती वेगळीच. एक खिळा ठोकला तर आमचे घरमालक म्हणे धावत यायचे. दारासमोर फ़ुललेली बाग होती पण देवासाठी चार फ़ुलं तोडायची परवानगी नव्हती. बाथरूम तुंबतात म्हणून आठवड्यातून एकदाच केस धुण्याची अट तर घराच्या किल्ल्या देतानाच घातली होती हे सगळं कमी म्हणून आणखी एअ विचित्र अट घरमालकीण बाईंनी अगदी कडकपणानं घातली होती वर जर ही अट मान्य असेल तरच घर मिळेल म्हणून तंबिही दिली ती अट अशी होती की,"आमचं घर देव धर्म करणार्यातलं आहे. आम्ही कडक सोवळं ओवळं पाळतो म्हणून तर ब्राह्मणांशिवाय कोणाला वाड्याचा उंबरा चढू देत नाही त्यामुळे तुम्हाला या वास्तूत रहायचं तर सगळं सोवळं पाळायला पाहिजे. अगदी बाहेरचंही बसावं लागेल". असली विचित्र अट मान्य करण्यावाचून आईदादांपुढे पर्याय नव्हता कारण खिसा परवानगी देणारं हे एकच घर होतं. मला जसं समजायला लागलं तसं आईचं एअ वाक्य मला सतत ऐकायला यायचं,"अहो, काहीही करू पण जागा घेऊन किमान एक खोली तरी उभी करू. माझ्या जागेवरून कोणी मला ऊठ म्हणणार नाही अशी हक्काची जागा मला हवीय" आमची आई जाम हिकम्ती तर दादा कमालिचे संयमी. कोणतिही गोष्ट दहा बाजुंनी विचार करून पन्नास जणांसोबत मसलत केल्याशिवाय करत नसत. आई म्हणजे आधी कती मग विचार असा मामला. अखेर एक दिवस गावाबाहेर पाच हजार स्क्वे. फ़ु.ची जागा घ्यायला आईनं दादांना राजी केलं आणि नुसतं राजी केलं नाही तर जवळचं होतं नव्हतं ते सगळं सोनं त्या जागेपायी विकलं. गळ्यात काळी पोत आणि हातात काचेच्या बांगड्या अशी आई आनंदानं इतई फ़ुलली होती की तिचं दागिन्यांविना ओकंबोकं रूपही तितकच देखणं दिसत होतं. स्वत:चं हक्काचं घर होणार या गोष्टीचा तिला इतका आनंद झाला होता की त्यामुळे तिला पुढच्या अडचणी जाणवतच नव्हत्या. जवळचं होतं नव्हतं ते विकल्यानंतर पाया आढून झाल्यावर घराचं काम अर्थातच ठप्प झालं. मग जसे पैसे जमतील तसं घर उभं रहायला लागलं. जागा कुठच्या कुठे गावाबाहेर होती, पाणी वीज कसली म्हणून सोय नाही, रस्त्यांच्या पत्ताच नाही त्यात काळी जमिन त्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखल व्हायचा अशा ठिकाणी पैसा ओतला म्हणून आईदादांना सगळ्यांनिच अगदी वेड्यात काढलं. त्यावर आई म्हणायची,"असुदे कशिही असली तरी जागा, हक्काची आहे हे काय कमी आहे? उद्या तशिच वेळ आली तर चार पत्रे उभे करून राहिन". तिच्या हट्टापुढे कधिच कोणाचंच काही चाललं नव्हतं याहीवेळेस काही चाललं नाही. आमचं घर बांधायचं काम दिगंबरकाका नावाचे एक गवंडी करत होते. आमच्या खिशाचा अंदाज असलेले दिगंबरकाका त्याचा विचार करून त्याबेतानं विट न विट उभी करत होते. जवळच असलेल्या एका चुन्याच्या भट्टीतून चुना येत होता, विटा काकांच्य ओळखितून येत होत्या सगळं हळूहळू का होईना पण शिस्तीत चाललं होतं याचं कारण आईदादांची लोकांतली स्वच्छ प्रतिमा. अत्यंत गप्पिष्ट, मनमिळावू, अगत्यशिल असलेली आई पेशानं शिक्षिका होती त्यामुळे तिला सगळेच "बाई" म्हणत असत. एका पैशाचिही चौकशी न करता "बाईंच्या प्लॊटवर" सामान येत राहिलं. सामानची जुळवा जुळव झाली तरी हाताखालच्या मजुरांचे पगार थकवणं आईदादांनी कधिच केलं नाही पण हळू हळू दर शनिवारी त्यांचे पगार देण्यासाठी पैसे जमवणं जरा ओढीचं व्हायला लागलं. दिगंबर काकांनी आमचं घर उभं राहिल्यानंतरच त्यांचे पैसे एकदमच घ्यायचं ठामपणानं सांगितलेलं असलं तरी हाताखालच्या लोकांना पैसे देणं आवश्यक होतं. मग आईनच सांगितलं अगदी एक किंवा दोनच माणसं हाताखाली घ्या बाकीचं आम्ही बघू. आम्ही शाळासंपल्यानंतर दिवसभर घरात एकटेच असायचो तर आईनं एअ दिवस आम्हाला म्हणजे मला आणि भैय्याला बोलवून सांगितलं की उद्यापासून प्लॊटवर जायचं आणि बांधकामावर पाणी मारणं आणि इतर किरकोळ कामं करायची. म्हणजे अगदी घमेली उचलायला लागली नाहित पण विटांवर पाणी मारून ठेवणं वाळूचा ढीग करून ठेवणं अशी बारीक कामं आम्ही दोघं अरायला लागलो. आम्हाला काय उलट मजाच यायची. दुपारी जेवणाचे डबे घेऊन आम्ही दोघं सायकलवरून डबलसिट प्लॊटवर जायचो. तिथं पाणी मारायच्या निमित्तानं पाण्यात मनसोक्त खेळायचो. संध्याकाळी शाळेतून आई थेट तिकडेच यायची. काम कुठवर आलंय ते पहायची कौतुकानं लावलेल्या झाडांना पाणी घालायची मग सायकलच्या हॆंडलला पाण्याच्या पाईपचं भलं मोठं भेंडोळं, बादल्या आणि डबा लटकावून आम्ही तिघं चालत चालत घरी यायचो. असं काम थोडं थोडकं नाही तर वर्ष दीड वर्ष चाललं. मध्ये पैशाची अगदीच ओढ झाल्यानं बंदच पडलं. प्लॊटवर जायचा नेम मात्र तिनं स्वत: चुकवला नाही आणि आम्हालाही चुकवू दिला नाही. दरम्यान आम्ही लावलेलं झाड न झाड फ़ोफ़ावलं होतं. त्यांची निगा राखायला रोज जायलाच हवं असं तिचं म्हणणं होतं. आमच्या घराचं बांधकाम हा घरमालकांच्या चेष्टेचा विषय झाला नसता तरच नवल. आईची येता जाता कुजक्या शब्दात मालकीणबाई थट्टा करायच्या. मात्र आई न चिडता, संतापता त्यांचे वार परतवायची. अखेर एक दिव घरमालकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आणि घर सोडायला सांगितलं. आई तर पण करून बसली होती की हे भाड्याचं शेवटचं घर. आता जायचं ते स्वत:च्या घरात. ती जे बोलायची ते करायची हे पक्कं जाणून असणारे दादा दुहेरी काळजित पडले. घराचं अर्धं काम झालेलं होतं आणि तिथे रहाणं शक्य नव्हतं, लगोलग घर उभं करायचं तर दातावर मारायला पैसे नव्हते अशातच आमच्याचकडे रहाणार्या लहान मावशिच लग्न ठरल्यानं घरात ती घाई चालली होती. तिचं लग्न इतरत्र चार पैसे खर्च करायला उसंत देत नव्हतं. कसं करायचं या विवंचनेत आईदादा होते...........
 

2 comments:

Gouri said...

पुढे?

शिनु said...

या आठवड्यात नक्की.