लाडके दोडके


"घे घे, त्यालाच जवळ घे. तोच तुझा लाडका. मला सारखा ओरडा....." हे चिडून बोलणारी लेक आणि तिला चिडलेलं पाहून आणखी आणखी कुशीत शिरणारं शेंडेफ़ळ.
"अगं काहीही काय, तुझेही इतकेच लाड केलेत हं मी. तू शमीइतकी असताना. तुला आठवत नाहीत त्याला मी काय करू? "
"नाही, पण तोच तुझा लाडका आहे. तू ज्या कारणांसाठी मला रागवतेस त्या कारणांवरून त्याला फ़क्त, शमी... असं करतात? असं म्हणतेस. हे काय रागवणं झालं? त्याच्यासारखे लाड नको करू माझे पण मग माझ्यासारखंच सेम त्यालाही ओरड"....याला सिबलिंग रायव्हलरी म्हणत असतील तर हे प्रकरण आमच्याकडे सध्या जरा जास्त संवेदनशिल आहे. पुन्हा गंमत अशी की बारकूला रागवायला लागलं तर ताईबाई येऊन मलाच , "तो लहान आहे गं, नको ओरडू. मी सांगते त्याला समजावून" असं म्हणून कोपर्‍यात जाऊन त्याला जवळ घेऊन,"शमी असं करतात पिल्लू?" असं म्हणून सुरू. मग पाच दहा मिनिटानी ही जोडगोळी समोर येऊन उभी रहाते. दबकत आलेली दुकल्ल, मागून ताई जा जा म्हणून खुणावत असते आणि धाकटे वीर हळू हळू जवळ येऊन पुटपुटल्या आवाजात,"सॉरी आई" असं म्हणते. कसं रागवणार आणि कशी शिस्त लावणार? सगळा राग बिग विरघळून कुठच्या कुठे जातो. हे चित्र उलटही असतं, सानू ओरडा खात असेल तर हे एव्हढसं पिल्लू छातीचा कोट का काय करून समोर उभं ठाकतं आणि म्हणतं,"आई, हे एक्स बॉक्स आहे" (एक्स बॉक्स = चूक)"तू सानूताईला ओरडते तेंव्हा मला व्हाईट (व्हाईट=वाईट) वाटतं. नको नां यार ओरडू" घ्या. आता काय बोलणार? म्हणजे सोयीनं यांची गट्टी आणि सोयीनं रायव्हलरी. असंच एकदा लुटूपूटुचं भांडण चालू होतं आणि मी सानूला म्हटलं की,"हो गं हो, तू दोडकी आणि हा लाडका, तुला पोळीचा तुकडा देऊन विकत घेतलीय मी" अरे देवा! यानंतर बयेनं जे रिंगण घातलं की विचारायची सोय नाही. पोळी देऊन घेतल्याचं जितकं वाईट वाटत होतं त्याहून जास्त वाईट एकच पोळी देऊन घेतल्याचं वाटत होतं बाईंना. समजावून सांगता सांगता पुरेवाट. ताईला पोळी देऊन आणलंय मग मला भाजी देऊन असणार हे भारी तर्कशास्त्र शमी लावून मोकळा. बरं पुन्हा त्याला प्रश्न की भाजी कोणती दिली असेल? विचार करून थकलं आणि मग मला येऊन म्हणतं कसं,"पनीर दिलंस की भेंडी" (भाजी म्हणजे पनीर किंवा भेंडीच असते बरं का!)सगळी धमाल नुसती.
मी लहान होते तेंव्हाही माझ्यात आणि भैय्यात अशीच सतत भांडणं असायची. आई म्हणायची मागच्या जन्मीचे वैरी सूड म्हणून माझ्या पोटाला आले की काय? त्यातही मी शेंडेफ़ळ मग विचारूच नका. त्याहीवेळेस आई भैय्याला म्हणायची,"तुला भाकरीचा तुकडा देऊन आणलाय" त्यावेळेस हे काही कळायचं नाही पण आई कोणाची? हा खेळ हिरीरीनं खेळायचो. आई सांगायची, मी बाळ होते तेंव्हा म्हणे घरी आलेले पाहुणे भैय्याला म्हणायचे,"बाळ घेऊन जातो आम्ही. छान आहे" तेंव्हा भैय्या भोकाड पसरायचा. मात्र तेच आई दादा माझे लाड करायला लागले की चिडचिड करत म्हणायचा देऊन टाक हिला. गंमत म्हणजे रितसर जेंव्हा नवर~यासोबत लग्न करून निघाले तेंव्हा रडरड रडला. पापड हा दोघांचाही विकपॉईंट. त्यातही मला रमतगमत खायची सवय तर याला पटपट खाऊन संपविण्याची घाई. हमखास याचा पापड खाऊन झाला की हा माझ्या ताटातला पापड उचलून गट्टम करायचा. मग हे भांडाभांडी. तो म्हणायचा खाऊन का टाकत नाहीस पटकन. तुझ्या ताटात पाहिला की मला खावासा वाटतो. भर लग्नाच्या पंगतीतही त्यानं यात खंड पाडला नाही. बाजूल बसला होता तर माझ्याच ताटातला पापड खाऊन संपवत होता. पुन्हा असं करायला मिळणार नाही म्हणाला.
हे तर काहीच नाही. आई त्याच्या हातात काहीतरी लाडू बिडू द्यायची आणि म्हणायची, जा एक तू खा आणि दुसरा तिला दे. हा दारातून नुसताच बाहेर गेल्यासारखा करायचा आणि आत जाऊन पुन्हा म्हणायचा,"आई, ती नको म्हणतेय" मग अर्थातच आई म्हणायची,"बरं, मग तू खाऊन टाक". त्याचा हा कावा अर्थात पकडला गेलाच पण तोवर किती लाडू खाऊन झाले होते काय माहित.
आज हे सगळं थोड्या फ़ार फ़रकानं माझ्याही घरात घडतंय. 
आत्ताही हा लेख लिहित असताना लेक मागून स्क्रीनमधे डोकावून गेली आणि,"लिही लिही, मी दोडकीच आहे तुझी. कळू दे सगळ्यांना"असं म्हणून फ़ुरंगटून गेली.

तरिही या सगळ्याची एक मज्जा पण वेगळी. बरं तर मंडळी, गेल्या अनेक वर्षांत हिच्या कौतुकभरल्या अनेक पोस्ट मी तुमच्या साक्षीनं लिहिल्यात. कधी लटका तर कधी खर्रा खुर्रा राग येतो ताईबाईंना. आईपणाच्या वेगळ्या वाटेवर सध्या धमाल चालूय. मूड ओळखून कधी आई, कधी मैत्रिण बनण्याची तारेवरची कसरत करतेय. जमतंय बरंच. जेंव्हा जमत नाही तेंव्हा गडबडगुंडा असतो.