सोमणकाका


भुकेल्यावेळेला गरमा गरम अन्न समोर यावं याहून दुसरं सुख नाही, ते अन्न प्रचंड रूचकर असावं हा तर कळस आणि असं अन्न कोणीतरी पाटावर बसवून आयतं आग्रह करकरून वाढावं हा तर सुखाचा परमावधी. बायकांच्याबाबतीत तर अगदी "होय्योहोय्यो"च. दरवर्षी सुट्टीसाठी सांगलीला गेलं की हे सुख अवघ्या हाकेच्या अंतरावर उभं असतं. नरसोबाच्या वाडीला दत्तदर्शनला जायाचं जायाचं म्हणत जाण्याचं आणखी एक कारण आहे इथलं "सोमण भोजनालय". देवदर्शन झालं की सोमणांकडच्या पंगतीला जाऊन बसायचं हे एक रूटिन झालंय. कसलाही बडेजाव नाही की चकचकीत भांड्यांचा देखावा नाही. साध्या ताटांमधून अगदी घरगुती पध्दतीचं सात्विक जेवण मात्र अगदी वाफ़ाळतं ही सोमणांची खासियत आहे. दहाच्या पहिल्या पंगतीला जा नाहीतर दोनच्या शेवटच्या, प्रत्येक पंगतीत वाफ़ाळता वरणभात आणि तव्यावरचीच गरम पोळी ताटात येते. रोज घरात जेवतो तेच वरण भात, आमटी, भाजी, पोळी कोशिंबिरीचं जेवण पण त्याला चव अगदी खास माहेरच्या घरातली. (यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, म्हणजे माहेरच्या पाण्यातच अशी चव की आई, आजी, मावशी कोणिही पाण्याला फ़ोडणी घातली तरी खाणार्‍यानं ओरपून खाल्लं पाहिजे [ विशेष सूचना-नवरेमंडळींनी याच्याशी सहमत असलंच पाहिजे, पुढच्यावेळेस वाटीतल्या पाण्यात डाळ असावी अशी इच्छा असेल तर]) वाडीला जायचं आणि स्वीट डिश म्हणून इतर काही खायचं याला काही अर्थ नाही. इथे गोड या शब्दाला समानार्थी शब्द आहे, बासुंदी/खवा. वाटी उपडी केल्यावरही क्शणभर विचारकरून ताटात पडते अशी घट्ट बासुंदी....अहाहा महाराजा जिभेचं कैवल्य हो! दुसरं म्हणणं नाही. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काही नाही सगळ्या घरगुती खानावळीत असंच घरगुती जेवण मिळतं. पण थांबा इतरत्र आणि सोमणकाकांचं भोजनालय यात एक मोठ्ठा फ़रक आहे.स्वत: सोमण जातीनं ताटं वाढत असतात आणि अगदी आगत्यानं जेवू घालतात. आग्रह करकरून जेवायला वाढणारा हॉटेलवाला मी तरी अजुनही कोठेही पाहिलेला नाही. (हे जर अनप्रोफ़ेशनल वागणं असेल तर मी म्हणेन काका तुम्ही असेच अनप्रोफ़ेशन रहा)खरं तर त्यांना हॉटेलवाला किंवा खानावळवाला म्हणणंच चुकीचं आहे. ते फ़क्त "वाडीचे सोमणकाका" आहेत. अर्थात काका या शब्दावर जाऊ नका तसे काका म्हणण्याइतके ते वयस्कर नाहीत पण हे प्रेमाचं संबोधन आहे.
गेल्या गेल्या दारातच "तुमची किती माणसं" असं चेहर्‍यावर हसू आणून विचारतात आणि मग सांगतात,"दर्शन झालं? नाही नां, मग दर्शन करून या तोवर तुमची पानं तयार ठेवतो." हे ही वेटिंगच पण सांगण्याची पध्दत किती घरगुती! लोकंही इकडे तिकडे न बघता, त्यांच्या दारातल्या कट्ट्यावरच मस्त गप्पा जमवून बसतात. आपला नंबर आला की पुन्हा स्वत: सोमण आपल्याला बोलवायला येतात. पानावर माणसं बसली की स्वत: वाफ़ाळता भात वाढत प्रत्येकाला आवर्जून पोटभर जेवायची "तंबी" देतात. "काका पोटभर जेवा. आधीच उशिर झालाय आता निवांत खाऊन घ्या", "ताई आजच्या दिवस डाएटिंग विसरायचं काय?","मावशी अहो ती बासुंदीची वाटी ताटाबाहेर काय ठेवलीय? घ्या ती ताटात. एका वाटीनं काही शुगर बिगर वाढत नाही. डॉक्टरला सांगू नका पाहिजेतर." "ए छोट्या दंगा बंद आता ताटात लक्श. आईला जेवून द्यायचं आणि ताटात काही टाकायचं नाही. आवडलेलं न लाजता मागून घ्यायचं" हे असं आग्र्ह करकरून ते शेवटच्या घासापर्यंत वाढत असतात. अखेर मन आणि पोट रल्यावर ढेकरासोबत "अन्नदाता सुखी भव"चा आशिर्वाद नकळत येतो. आजपर्यंत शेकडो, हजारोंनी दिलेल्या या पोटभर आशिर्वादामुळे सोमणांच्या दारापुढची रांग कधिही गेलं तरी कमी झालेली दिसत नाही.

तळ टीप- १-सगळं लक्ष जेवणात असल्यामुळे फ़ोटो काढायचा राहून गेला.
२-लेखाला समर्पक फ़ोटो न सापडल्यानं हा लावला आहे.
३-फ़ोटोवरून गैरसमज नसावा. लेखात वर्णन केलेलं जेवण प्रत्यक्षात जेवून आले आहे.
४-प्रकाशचित्र सौ.-one hot stove
 

टू इज (पसारा) कंपनीसुट्टी म्हटलं की "आई आता काय करू" आणि "आई भूक" या दोन राक्शसांचा सामना करणं आलं. जरा पंधरावीस मिनिटं एखाद्या खेळात रमतील तर ते नाही. बरं यांचे खेळ म्हणजे ढीगभर पसारा. तो नंतर आवरता आवरेना असा प्रकार होतो. दिवसच्या दिवस पोरं घरात म्हणजे उच्छाद नुसता. त्यांचा तरी काय दोष म्हणा. आपणच त्यांना ढीगभर अटी घालतो, उन्हात खेळायचं नाही, सतत टीव्ही बघायचा नाही, दुपारच्यावेळेत उगाच कोणाच्या घरात घुसून दंगा करत बसायचं नाही मग सतत घरात बसून त्या बिचार्‍यांनी तरी काय करावं म्हणा. मग सुरू होते उचका पाचकी. हे उचक ते उचक असं करत खेळ रंगतात त्यानंतरचा तो पसाराआवरताना चिड चिड होते खरी, पण पोरं डोकेबाजपणानं खेळताना बघितली तरी काय मज्जा येते म्हणून सांगू. त्यातून पोरांना जन्माला घालताना "त्यानं" जणू काही क्रिएटिव्हीटीच्या नळाखालीच उभी केली होती, इतकी यांची डोकी चालतात. आपण दिलेल्या एका खेळातून पोरं जे विविध डोकेबाज खेळ खेळतात त्याला तोड नाही. आता हेच बघा नां सानू-शमुचं "फ़ार्म विले" किती रंगात आलंय. ताईबाईंच्या बरोबरीनं शमुडीसुध्दा कामाला लागलीय. समजत तर काही नाही पण हे उचक ते उचक करत अख्खी खोली खेळण्यानं भरून टाकून किती मदत करतोय बिचारा.


मॅकॅनोमधले ठोकळे वापरून ताईनं बैलगाडी बनवलीय. खेळण्यात बैलोबा नसल्यानं बिचार्‍या गाईला गाडीला जुंपलंय. एरवी कोल्ह्यांपासून शेताचं रक्शण करावं लागतं पण आमच्या शेतात मात्र कोल्हा, गाढव ही दोस्तमंडळी आहेत.
बैलगा्डीी सैर करायला शेतकरीणबाईंबरोबर त्यांचं बाळसुध्दा चालंलय. शेतकरीणबाई म्हणजे ताई (पुढे गाडी हाकणारी) आहे आणि मागे लंगोट घालून पहुडलेलं बाळ म्हणजे शमु आहे. गाडीत जो चाराआहे तो आंब्याच्या पेटीतून आणून आईला (पक्षी अस्मादिकांना)कामाला लावून भारा बांधलेला आहे.
इथंपर्यंतचा खेळ सौहार्दपूर्ण वातावरणात चालला होता पण शमुलाही खेळावसं वाटलं आणि ताईची बैलगाडी (नव्हे गायगाडी) अशी टांगा वर करून पडली. तिचा गोंधळ आणि याचं टाळ्या पिटत तिच्याकडे खिदळत बघणं यात फ़ार्मविले संपलं (एकदाचं आणि हुश्श)