यांचं काय करावं?

काहीजण खरंच खुप हुशार असतात आणि काहीजण इतके हुशार असतात की कधी कधी त्यांची हुशारीच त्यांच्या मार्गात आडवी यायला लागते. बरं पुन्हा स्वत:बद्दल यांची मतं इतकी पक्की असतात की त्यांना जरा खाली खेचून जमिनिवर आणणंही शक्य असत नाही. अशा हुशार लोकांच्या मुलाखती घेण्याचं कर्मकठीण काम पत्रकाराला करावं लागतं तेंव्हा जी हालत होते ती "जावे त्याच्या वंशा" की कायसं त्याप्रमाणे असते.
पत्रकारीता करताना ज्या अनेक गोष्टी नशिबातून चुकत नाहीत त्यापैकी एक म्हणजे मुलाखत घेणे. बरं नामवंत व्यक्तीची किंवा खरोखरच काही भरीव काम केलेल्यांची मुलाखत घेताना एक प्रकारचा आनंद होतो मात्र बर्याचदा काही सेटिंगमुळे सोम्या गोम्याची मुलाखत घ्यायची वेळ आली की अगदी डोक्यावरचे केस उपटून घ्यायची वेळ येते. पत्रकार म्हणून काम करत असताना तर असे अनेक नमुने भेटत रहातात. पत्रकार ही एक व्यक्ती अशी असते की जिला सगळ्या विषयातलं सगळं समजतं किंवा बहुतेकवेळा किमान आव आणण्यापुरतं तरी प्रत्येक विषयातलं समजतं असं भासवावं लागतं. त्यातून एखाद्या व्यक्तीची मुलाखत "असाईनमेंट" म्हणून आपल्या कुंडलीत मांडलेली असेल तर विचारूच नका. अनोळखी माणसांच्या मुलाखती घेणं मला तरी जाम मनोरंजक आणि त्याचवेळेस काटा आणणारं काम वाटतं. अशा मुलाखती एकतर अगदी टाईमपास करणार्या होतात किंवा जाम पकाऊ. उमेदवारीच्या काळात तर अशा भन्नाट अनुभवांचा प्रचंड साठाच माझ्याजवळ जमा झाला. सुरवातिला मीं मुलाखत घ्यायला जायची म्हटल्यावर प्रामाणिकपणानं त्या व्यक्तीबद्दलची किमान माहिती काढून जायची पण नंतर नंतर लक्षात आलं की बर्याचदा या मुलाखती मार्केटिंगवाल्यांच्या सेटिंगमुळे घडवून आणल्या जातात.
विद्यार्थी पत्रकार म्हणून काम करत असताना एकदा अशिच चमालध झाली. तोपर्यंत मी साक्षात अशी मुलाखत कोणाचिच घेतली नव्हती. कार्यालयात आल्यावर नावापुढे असाईनमेंट होती की, "ह.भ.प. अमूक ढमूक यांची मुलाखत." विषयाचं वाटप करणार्यानं एका ओळीत विषय मिटवून टाकला असला तरी माझ्यापुढे प्रश्नांची जंत्री. मुळात हे ह.भ.प. कोण, त्यांचं वय काय, त्यांचं कार्य काय आणि त्यांची मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय? ते कुठे भेटतील आणि त्यांना काय विचारायचं हा तर खुपच दूरचा मुद्दा. आजुबाजुच्या चारजणांना विचारलं तर त्यांनी एक चमत्कारीक हसू देण्याव्यतिरीक्त काहीच मदत केली नाही. अखेरीस एक मार्केटिंगवालाच मदतिला धावला. त्याला ही व्यक्ती चक्क माहिती होती (असा त्याच्या बोलण्यावरून माझा समज झाला) त्याच्या बाईकवरून आम्ही ह.भ.प. महाशय भेटण्याच्या संभवित जागांवर जाऊन आलो.अर्धा एक तास भटकल्यानंतर अखेरीस गावात कुठेतरी पारायण सोहळा चालला होता तिथे ते भेटले. बरं मांडवातले सगळेच मला ह.भ.प. वाटत असल्यानं आम्हाला हवे असलेले कसे शोधायचे हा उपप्रश्न निर्माण झाला. अखेरीस एका व्यक्तीनं आम्हाला हव्या असणार्या ह.भ.प. ना भेटवलं. त्यांच्या समोर बसल्यावर मनात पहिला विचार आला की सुटले एकदाची आता पटपट प्रश्न विचारून आटपावं एकदाचं. सुरवात करावी म्हणून सरसावले आणि लक्षात आलं की नक्की काय विचारायचं यांना? आणि कशाबद्दल मुलाखत आहे? याचा पत्ताच नाहीए. बरं पारायण, किर्तन किंवा असल्या गोष्टींशी दूरचाही संबंध नसल्यानं मनात जरा भितीच होती की समजा समोर बसलेली व्यक्ती या क्षेत्रातली महान, आदरणिय व्यक्ती असायची आणि माझ्याकडून काही कमी जास्त विचारलं गेलं तर? मी आपली बिचकत बिचकत सुरवात केली. उगाच आपलं इकडचं तिकडचं बोलणं सुरू केलं. समोरून काहीही प्रतिसाद नाही. वाटलं आजोबा मनातल्या मनात नामस्मरण करतायत की काय. मी आणि मिस्टर मार्केटिंगवाले एकमेकाडे हैराण होऊन बघत असतानाच खोलीत एकजण चहा घेऊन आला तो भक्तीभावानं आम्हाला म्हणाला की,"आबांना ऐकाय जरा कमी येतंय तवा मोठ्यानी बोला" मी माझ्यापरीनं मोठ्यांदा बोलून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मिस्टर मार्केटिंगवाल्यानं प्रयत्न केले त्याला जरा जरा यश आलं कारण आता आजोबा किमान "अं"? असा प्रश्न विचारायला लागले पण पहिल्या दहापाच प्रश्नांना "अं"? हेच उत्तर मिळाल्यावर आमची उमेदच खचली. इतक्यात मघासचे चहावाले परत एकदा देवासारखे धावून आले. त्यांना मिस्टर मार्केटिंगवाल्यानं पकडलं आणि त्यालाच प्रश्न विचारले. ज्याची माहिती त्याला नव्हती ती त्यानं आबांच्या शब्दश: "कानपटिला" बसून विचारली. तासाभरानंतर मुलाखत संपली आणि आम्हाला समजलं की अखेरच्या दिवशी समिती आमच्या पेपरात अर्धपान जाहिरात देणार असल्यानं या मुलाखतिचा घाट घालण्यात आला होता. पत्रकारीता शिकत असताना "मुलाखतिचे तंत्र आणि मंत्र" यावर अखंड साठ मिनिटं भजन ऐकल्याचं तात्पर्य त्यादिवशी समजलं की ते सगळं मार्क मिळविण्यासाठी असलं तरी प्रत्यक्षात मुलाखत हे प्रकरण भलतंच असतं. कार्यालयात आल्यावर कितीतरीवेळ आधी हसायलाच येत होतं. एका वरिष्ठाला हा प्रकार सांगितल्यावर त्यानं दिलेलं बोधामत तर आणखिनच चविष्ठ होतं तो म्हणाला ह.भ.प. यांची मुलाखत घ्यायला गेलेली जगातली तू एकमेव पत्रकार असशिल. विषय बघून ठरवायचं की प्रत्यक्ष जायला हवं की फोनवर काम होईल. वर पुन्हा प्रत्यक्ष जायला कोणी सांगितलं म्हणून हजेरी घेतली ती वेगळीच.बरं आता जाऊन आलोच आहोत तर लिहावी चांगली दणदणीत मुलाखत म्हणून रंगवून रंगवून मुलाखत खरडून ट्रे मध्ये टाकली आणि दुसर्या दिवशी उत्सुकतेनं पेपर उघडला तर दोन कॊलमात विषय मिटवून टाकला होता. सुरवातिची काही वाक्य आणि अखेरचा टप्पा यातच ह.भ.प. यांची मुलाखत संपवून उपसंपादक महोदयांनी मुलाखतिचं चिज केलं. मुलाखत या प्रांतातला माझा हा पहिला आणि माझ्यामते तरी भन्नाट अनुभव म्हणून सांगितला. आणखी काही नमुनेदार मुलाखतींबाबत सांगितल्याशिवाय रहावत नाहीए पण असं धावत पळत सांगण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा त्यांच्याबद्दल जरा विस्तारानं नंतर.