आठवणितला गुलाबजाम


त्यावेळेस मी कॊलेजमध्ये जात होते. एका दसर्याला मी आणि भैय्यानं ठरवलं की गुलाबजाम करायचे. साधारण क्रुती (अरे यार, कोणीतरी मला हा प्रॊपर क्रु बरहात कसा टाईपायचा सांगा रे. दरवेळेस क्रुती लिहिताना क्रुर मधला क्रु होतो.) तर गुलाबजाम बनविण्याची साधारण क्रुती माहित होतीच. त्यानुसार सामानसुमान जमवून तयारीला लागलो. खव्याचे गोळे बिळे बनवून मस्त खरपूस तळून बिळून घेतले. साखरेचा पाक बिक बनवला आणि सगळं मुरायला ठेवलं. जेवायला बसल्यावर समजलं की गुलाबजाम ज्यात होते त्या पातेल्याचं आणि त्यात "रूतून" बसलेल्या डावाचं भलंतच प्रकरण जमलंय. अगदी दो जिस्म मगर एक जान है हम टाईप मामला झाला. पाकापासून डाव जुदा व्हायलाच तयार नव्हता. कसंबसं त्यांना एकमेकांपासून दूर केलं. जमेल तसे आणि जसे जमले होते तसे पुरीसोबत गुलाबजाम खाल्ले. जेवण बिवण झाल्यावर दादांनी पाकातले गुलाबजाम काडून वेगळ्या ताटलीत ठेवले साधारण दुसर्या दिवशी त्याची गुलाबजाम कॆंडी टाईप काहीतरी बनलं होतं. तेही आम्ही अर्थातच फ़स्त केले. शेवटचा गुलाबजाम खाताना दादा म्हणाले पुढच्यावेळेस पाक आणखी जरा जास्त "पुढे ने" म्हणजे गुलाबजाम कुरकुरीत तर होतीलच शिवाय खलबत्त्यानं फ़ोडून चूर्ण करून खाण्याचा आणखी एक ऒप्शन ओपन राहिल. पुढे नेटानं मी गुलाबजाम करतच राहिले आणि आज खाणार्यानं पुन्हा घ्यावेत इतपत भारी गुलाबजाम मला बनवायला येतात.
 

भुताटकी??????

आत्ताच डीडीचा ब्लॊग वाचला आणि त्यातल्या कोकणातल्या भुतांवरून मला आमच्या बाबतीत घडलेला काही वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला.
आम्हा सगळ्यांनाच कोकणाचं भयंकर आकर्षण आहे. ब्रेक हवाय, बोअर झालंय म्हटलं की फ़्रेश व्हायला कोकणासारखं दुसरं ठिकाण नाही. तर असेच एकदा भटकायला म्हणून सहकुटुंब आंबोलिला गेलो होतो. रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर निघायलं असं ठरलेलं असल्यानं रात्रीपुरती पथारी पसरायला हॊटेल शोधत होतो. एका बर्या अशा हॊटेलमध्ये एकच भलीमोठी खोली घेऊन राहिलो. गप्पांत रात्र घालवायची असल्यानं एका रात्रीसाठी कशाला दोन दोन खोल्या? असा इकॊनॊमी विचार करून त्या भल्या मोठ्या खोलित बॆगा भिरकावून पोरांना झोपवून आम्ही पाय पसरून मस्त गप्पा मारत बसलो. सकाळ झाल्यावर सगळं आवरून पटपट निघायच्या बेतात होतो. बंधुराज त्यांच्या युवराजांसमवेत प्रात:कालच्या भटकंतीला गेलेले होते. लेक स्वत:चे केस पिंजारून तिच्या बाहुलिचं आवरण्यात गुंग झालेली होती. बाकिचे आम्ही एका रात्रीतही सवयीनं भारंभार पसारा करून ठेवला होता तो एकमेकांवर डाफ़रत आवरत होतो, दादा खोलितच मॊर्निंग वॊक [:)]करत आम्हा मुलांना अजिबात शिस्त कशी नाही हे पुन्हा एकवार पटवून देत होते. हे सगळं कमी म्हणून टिव्हीवर काहीतरी ब्ला ब्ला चालुच होतं. काहीही मदत न करण्याचा निश्चय केलेला नवरा बेडवर पसरला होता, तो मध्येच म्हणाला,"काय गरम होतंय? कोण आहे रे तिकडे? महारांसाठी जरा फ़ॆन चालू करा" त्याच्या बोलण्यावर आम्ही अजून हसावं की चिडावं हे ठरवतोय तोवर खरोखरचं चांगला मोठ्ठा "खट्ट" आवाज होऊन खोलितला छताला टांगलेला पंखा आपोआपा सुरू झाला. पंखा कोणी सुरू केला याचा उलगडा होईना. कारण सगळी बटणं दाराजवळ होती आणि तिथे त्यावेळेस कोणिच नव्हतं. मग फ़ॆन चालू कोणी केला? सगळे तर्क करोन झाले पण उत्तर मिळालं नाही. सगळ्यांना संशयाच्या दायर्यात घेऊन झालं पण सगळे मासूम साबित झाले. मध्येच कोणितरी म्हणालं की, "कोकणात भुतं असतात". त्यावरून चर्चा रंगली आणि मंडळी गाडीत सामान सुमान टाकायला रवाना झाली. मात्र पंखा चालू कोणी केला हा माझ्या आणि राणिच्या डोक्यातला किडा काही जाईना. सगळे खाली गेल्यावर आम्ही चक्क बेड पुढे ओढून मागे बटनं आहेत का हे तपासलं (न जाणो बेडवर पसरलेल्या नवर्यानच आमची थट्ट करायची म्हणून हळूच बटन दाबलं असेल) पण सगळी भिंत स्वच्छ होती. दाराजवळची बटनं सोडली तर खोलित कसलंच बटण नव्हतं. नंतर राणिला आठवलं की रात्री माडीवर दोन खोल्या आहेत असं मॆनेजरनं सांगितलं होतं त्यावेळेस आम्हाला मागची खोली हवी होती तर यानं आग्रहानं पुढचीच खोली देऊ केली होती. त्यावेळेस त्याच्या या वागण्याचं काही वाटलं नव्हतं मात्र आता त्याचाही संशय यायला लागला. आमचं हे सगळं बोलणं चालू होतं आणि त्याचवेळेस सगळ्या खोलिची तपाणी करणंही चालू होतं. त्याचवेळेस एक रूमबॊय खोलीत आला, त्याला आम्ही पलिकडची खोली बंद का आहे याबाबत फ़िरवून फ़िरवून प्रश्न विचारले पहिल्यांदा त्यानं उत्तरं दिली नंतर तो (बहुदा आमच्याकडे संशयानं बघत) चक्क निघून गेला. गाडीत जाऊन बसल्यावर "इतका वेळ काय करत होता?" या प्रश्नावर आम्ही खरोखरच काय करत होतो हे सांगितलं. त्यावर "या बायका म्हणजे...." असं काहीतरी बोलून सगळे आमची टर उड्वायला लागले. पण खरंच सांगते "कोणितरी पंखा लावा रे" असं म्हटल्याबरोबर नेमका पंखा कसा सुरू झाला याचं गुढ आजही उकलेलं नाही.
 

टु इज कंपनीआपल्या आईबाबांच्यावेळेस प्रत्येक जोडप्याला सरासरी तीन मुलं असायचीच. गेला बाजार दोन मुलं तरी असायचीच, फ़ारच क्वचित एकच अपत्य असायचं. आता आपल्या पिढीत एकच मूल असण्याकडे कल वाढतोय. दुसरं मूल अजिबातच नको असणार्यांची संख्या बक्कळ आहे. मला स्वत:ला "एकाला एक" असणारा चौकोन जास्त आवडतो. मागे एकदा एकदा मिपावर यावर मस्त चर्चा झालेली होती. माझ्या ग्रुपमध्येही बरेचजण असे एकुलते एक होते. मात्र आम्ही आमच्या भावंडासोबत जे "शेअर" करायचो ते सगळं अशी एकुलती एक असणारी "मिस" करायची. दंगाधुडगुस आणि धिंगाणा घालायला आम्हाला "कंपनी" शोधावी लागायची नाही. मित्र मैत्रिणी आले गेले मात्र आम्ही भावंडं आजही एकमेकाचे कट्टर शत्रु आणि घट्ट मित्र आहोत. शत्रुत्व शब्दाशी ठेचकाळला नां? पण खरंच आहे लहानपणापासूनची "सिबलिंग रायव्हलरी" आजही अगदी इनटॆक्ट आहे. आम्हाला पोरं झाली तरी अजुनही आम्ही तू घरात जास्त लाडका होतास किंवा होतीस म्हणून चक्क ब्लेमगेम करत असतो. आपापल्या संसारातले आनंद आणि कटकटीही शेअर करायला एक भावंड लागतंच. म्हणून आजही नवरात्र संपतंय न संपतंय तोवरच सांगलीला जायचे वेध लागतात. दसरयाच्या शुभेच्छा देतानाच दिवाळीचं काय ठरलं हा प्रश्न असतोच. मीच काय दरवर्षी तिकडे यायचं आता यंदा तुम्ही सगळे इकडे या म्हणून तणतणताना न कळत तिकडे काय काय घेऊन जायचं याची यादीही मनात तयार होत असते. बॆगेतून नक्की काय निघाल्यावर मनुसाहेब खुश होतील आणि "आत्तीट" म्हणून अत्यानंदानं लाडात येतील याचे विचार सुरू होतात.
आपल्या आईवडिलांनी आपल्याला भावंड आणताना ाअपल्यानंतर एकमेकाला आधार होतील असा विचार करून कुटुंब विस्तारलं. आता आपल्या पिढीत मात्र हा विचारच लुप्त झालाय.
मागे एकदा एका सिनियर कलिगनं मुलं नसण्याचं किंवा होऊ न देण्याचं कारण सांगितलं होतं की, "आम्ही दोघंही कामानिमित्त सतत घराबाहेर असतो, आईवडिल कायमचे येऊन रहायला तयार नाहीत मग मूल कुठेतरी पाळणाघरवाल्यांवर सोपविण्यापेक्शा नसलेलंच बरं, कशाला ऊगाच पोरवड्यात अडकायचं" तिचं हे मत मला जोर का धक्का देणारंच होतं. आपल्या इच्छेनं मूल नको असणारं हे माझ्या पहाण्यातलं पहिलंच जोडपं होतं. त्यानंतर अर्थात असे बरेच "व्यस्त" लोक भेटले. मुलांना द्यायला वेळ नाही म्हणून, दोन मुलं वाढविण्यासाठी जितकी लागते तेव्हढी मानसिक तयारी नाही, त्या अनुषंगानं कराव्या लागणारया तडजोडी करण्याची तयारी नाही किंवा एकाच मूलावर बक्कळ पैसा खर्चून त्यालाच मोठ्ठ बनविण्याचा विचार करणारे आपण थोडेसे याबाबतीत स्वार्थी झालोत का? मुळात आजच्या मुलांना भावंडाची गरज आहे का? तुम्हाला काय वाटतं?


 

कसलं भारी!!!

Alice in Wonderland - If I had a World of my o...Image by Brandon Christopher Warren via Flickr


शुक्रवार म्हणजे लेकीच्या दप्तरातून घरी करण्यासाठी वर्कशिट येण्याचा दिवस. या शु्क्रर्वारी मशरूमचं चित्र होतं आणि नेहमीप्रमाणे ते रंगवून बिंगवून त्यासंदर्भातली पाच वाक्य लिहायची होती. कसंतरी करून तिच्या वयाला समजतील आणि पचतील इतपत चार वाक्यं सांगितली एक राहिलं होतं म्हणून म्हटलं की लिही, मला हे खायला खूप आवडतं. खल्लास! आमच्या अभ्यासाला ब्रेकच लागला. कन्यारत्न म्हणालं की,"मला मशरूम आवडत नाही मग मी असं कसं लिहिणार"? म्हटलं, "अगं लिहायचं असतं नुसतं." यावर क.र.-"असं कसं लिहिणार? मी कधी खाल्लेलच नाही तर ते आवडतं असं कसं लिहिणार आणि खोटं बोलायचं नाही असं मिस नेहमी सांगते, मी मिसला चीट नाही करू शकत"?(होय हो माझी लेक चक्क "शकत बिकत" असलं तुफ़ानी मराठी बोलते. म्हणजे मी खेळायला जाऊ? असला साधा सुधा प्रश्न ती "मी खेळायला जाऊ शकते का"? असा विचारते). मी-"मिसना काय माहित तू मशरूम खातेस की नाही? लिही पटपट आता", क.र.-"मिसला नाही पण मला माहित आहे नां" (मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़लं उचलणार नाही असाच बाणा अगदी) "मग तुला काय लिहायचं ते लिही" माझी शरणागती. कुठून मेल्या या मशरूमचा शोध लावला असं झालं.
पोरांच्या मेंदूत काय पाखरं भिरभिरत असतात काही सांगता येत नाही. मागे एकदा ओठांचा चंबू करून मन लावून चित्र रंगवत होती "काय गं काय रंगवतेयस" विचारल्यावर म्हणाली,"ऎप्पल" हातात खडू हिरव्या रंगाचा दिसत होता म्हणून विचारलं,"ऎप्पल रंगवतेयस मग हातात ग्रीन कलर कसा?" तर आता या आईचं करू काय अशा नजरेनं बघत तिनं शांतपणानं सांगितलं,"ऎप्पल अजून कच्चं आहे नां" म्हटलं बरोबर आहे माझे आई कच्च्या सफ़रचंदाचं चित्र काढू नये असा काही नियम नाही.
रोज झोपताना गोष्टिंचा रतीब घालाव तेंव्हा कुठी या बाईसाहेब डोळे मिटणार. रोज रोज गोष्टी सांगून सांगून कंटाळा आला एक दिवस लायब्ररीत चांदोबा दिसला आणि अगदी हौसेनं आणला. चला आता आठवडाभर तरी निश्चिंती असा विचार करून रात्री झोपताना त्यातली कोणती गोष्ट सांगू असं विचारलं, रंगीत चित्रं बित्रं बघून चिमणी भारीच खुष झालेली होती. पानं उलटवून बघून झाल्यावर त्यातली विक्रम वेताळाची गोष्ट सांगण्याची फ़र्माईश झाली. म्हटलं बघ हं भुताची गोष्ट रात्री झोपताना ऐकशिल आणि मग स्वप्न तसलंच पडेल. पण तिच गोष्ट ऐकायची तिची इच्छा बघून मी ती वाचायला सुरवात केली. एकच पान झालं असेल नसेल तर हिनं "आई ही नक्को दुसरी सांग" म्हणून भुणभुण सुरू केली. वाटलं घाबरली बिबरली की काय? म्हणून दुसरी एक गोष्ट वाचायला सुरवात केली. दोन मिनिटानं ही गोष्टही नको म्हणून पिरपिर चालू. आता मात्र वैतागच आला. म्हटलं ही नको ती, काय चाललंय काय? तर एव्हढुसं तोंड करून म्हणाली की,"आई हे मराठी मला समजतच नाहीय" मला ही गोष्ट "आपल्या मराठीत सांग" अक्शरश: मराठीतली गोष्ट मराठीतच भाषांतरीत करायची वेळ आली. तिचंही खरंच आहे म्हणा. आपणच म्हणजे माझ्या पिढीतले जवळपास सगळेच पालक शुध्द मराठी न बोलता त्यात हिंदी इंग्रजी शब्दांचा मुक्त वापर करतात. त्यात आता ही पोरं शाळेत इंग्रजी, मित्र मैत्रिणीत हिंदी आणि घरात मराठी बोलत असल्यानं सगळीच सरमिसळ. तेंव्हापासून मराठी पुस्तकं मराठीतच वाचायची आणि कठीण शब्द तिला समजणार्या भाषेत सांगायचे आम्ही ठरवलं आहे. त्यानिमित्तानं निदान मराठी शब्द कानावरून तरी जातील.
भाषेवरून आणखी एक गंमत आठवली. सोसायटीतली तमाम पटेल, अरोरा, अय्यर, शर्मा बच्चेमंडळी त्यांना मराठीत निबंध लिहून आणायचा झाला की आमच्या घराची बेल वाजवतातच आणि "आंटी प्लिज हेल्प करो नां" अशी गळ घालतात. मी एक नियम केलाय की मी सांगायचं आणि त्यांनी लिहायचं शिवाय झाल्यावर वाचून दाखवायचं.
रविवारी तीन विषय घेऊन ही भुतावळ आली. १- आजच्या जमान्यातलं स्त्रीचं स्थान,२-माझे आवडते प्रेक्शणिय स्थळ,३-अपंग व्यक्त आणि "मी"यातलं संभाषण. निबंध क्र.१ ची सुरवात "न स्त्री स्वातंत्र्य मर्हती"नं लफ़्फ़ेदार केली. पण वाचताना अरोरा कन्येची भलतीच तारांबळ उडाली. पुन्हा "च" चा उचार आपण दोन पध्दतीनी करतो तर हे एकाच. जे "च"च तेच "ज"चं. "ळ"ची भानगड तर विचारायलाच नको. पंजाबी उच्चारातनं आजच्या स्त्रीचं मराठीतून स्थान ऐकताना गंमतच वाटत होती. विषय क्र २- लिहिताना दक्शिणी कन्येनं पहिल्याच वाक्याला बल्ल्या घोळ घातला, माझे आवडते प्रेक्शणिय स्थळच्या ऐवजी, माझे प्रेक्शणिय स्थळ असं लिहून तिनं भलतंच मनोरंजन केलं. बरं पुन्हा यांच्या शाळेत काय म्हणे हे लिहून आणलेलं भर वर्गसमोर वाचूनही दाखवायचं असतं म्हणून लिहून काम भागत नाही तर "प्युअर मराठीत" लिहिलेलं कसं वाचायचं हेही शिकवावं लागतं. मला मजाच येते हा भाग वेगळा पण यांच्या मास्तरीणबाईंचीही हे सगळे निबंध ऐकताना जाम करमणूक होत असणार नाही?एक विशेष सूचना- १-लेखाला ड्कवलेल्या फ़ोटोचा संबंध लेखाशी असेलच असं नाही.
२-हे आपलं उगाचच सगळे म्हणतात की लेखासोबत फ़ोटू बिटू असला की जरा बरं वाटतं म्हणून.
३-"भुंग्या"नं त्याच्या ब्लोगवर झिमट्याची युक्ती सांगितलेली होती, म्हटलं चला यानिमित्तानं वापरून पाहू. तेंव्हा इथून पुढच्या लेखात विषयाशी फ़टकून असणारे फ़ोटे असतील तर बिचकू नका.

 

केकच्या.......ची टांग
मी काही अगदीच वाईट्ट सुगरण नाही (वाईट आणि सुगरण? वाक्यरचना फ़ारच वाईट झाली नाही! भावना महत्वाच्या त्या पोहोचल्या की झालं) हं तर मी काही अगदीच वाईट स्वयंपाक बनवत नाही. मुळात मला स्वयंपाकाची म्हणजे रोजच्या पोळी भाजीची नाही तर वेगवेगळे पदार्थ बनवण्याची दांडगी हौस आहे. या हौसेपायी मी झाडून सगळ्या चॆनेलवरचे आणि कोणत्याही भाषेतले रेसपी शो बघते. परवा काय झालं, झी बंगलीवर एक रेसपी बघत होते, नवरा काहीतरी सांगत होता त्याला म्हटलं एक मिनिट थांब रे ऐकू दे जरा तर तो चाटच पडला. मी बंगाली रेसपी शो "ऐकत" होते यावर त्याचा विश्वास बसला नाही की आता ही मराठी पोरगी बंगाली भाषेतला रेसपी शो बघून त्याच्या मराठी तोंडात कोणता पदार्थ घुसडेल याची त्याला धास्ती वाटली? कोण जाणे? असो. तर मुद्दा हा आहे की मला हे असं काही बाही (नवर्याच्याभाषेत सांगायचं तर "काहिच्या बाही")करून बघायला आवडतं. मागच्या एका लेखात मी सांगितलं होतंच त्याप्रमाणे सगळया पदार्थाना मी काबुत ठेवू शकते पण माझ्या पाककौशल्याच्या कुंडलीतल्या राहू केतू असणार्या ढोकळा आणि केक या दोन पदार्थांवर माझं काहीही कौशल्य चालत नाही. अनेकदा भिष्मप्रतिद्न्या करूनही हळूच हे पदार्थ करून बघण्याचा मोह टाळताही येत नाही हा आणखी एक वांधा.
बरेच दिवस झाले केकची उचकी लागली नव्हतीच. त्या दिवशी नेमकं काय झालं की सहजच बोलताना केकचा विषय निघाला. जाम उत्साही अ नं तिच्या नवर्याच्या वाढदिवसाला स्वत: केक करून वरून तो डेकोरेट वगैरे करून पेश केला होता. (हाऊ रोमॆंटिक). तर केक बनविण्याचा हा रोमॆंटिक कीडा सगळ्यांनाच चावला. एकेकीचा "घडणारा" केक बघून (उगाचच) आत्मविश्वास (फ़ाजिल) आला की, यावेळेस बहुदा आपल्यालाही केक जमेल. इस्टंट केक बनविण्याचं मिश्रण आणल्यामुळे तर आत्मविश्वासाचा पतंग जास्तच फ़डफ़डत होता. एरवी मी केक बिक बनवायचा असेल तर दुपारच्यावेळेस गुपचुप बनवून बघते. म्हणजे समजा बिघडला (समजायचं काय? तो बिघडतोच)तर त्याची वाट लावणं सोपं जातं शिवाय मी केक केला होता हे या कानाचं त्या कानाला समजत नाही. यावेळेस मला काहीच करायचं नव्हतं, केक मिश्रण बनविणार्या कंपनिनं तो सगळा व्याप आधीच करून ठेवलेला असल्यानं मला फ़क्त मिश्रण फ़ेसून मायक्रोमध्ये ठेवायचं होतं. त्यामुळे पहिल्यांदाच मी साक्शात केक बनविणार असल्याची जाहिरात करून ठेवली. यावेळेस केक बनविण्याची वेळ संध्याकाळची ठेवली, ऒफ़िसमधून थकून आलेल्या नवर्याला जरा खुश करावं हा हेतू. सगळं सामान व्यवस्थित जमवून पाकिटावर दिलेल्याप्रमाणे क्रुती केली. सोबत धीर देण्यासाठी आणि चियरअप करण्यासाठी मैत्रिणींची फ़ौज होतीच. सगळं केलं आणि केक मायक्रोमधे ठेवला. म्हटलं चला आत अवघ्या दहा मिनिटांनंतर स्वत:च्या हातनं बनविलेला गरमा गरम ताजा केक खायला मिळणार. दहा मिनिटांनी त्याला मोठ्या आशेनं बाहेर काढला तर साहेब अजून कच्चेच होते. मग परत दोन मिनिटं ठेवला, पुन्हा तेच. परत एखादा मिनिट ठेवला तरी तेच. बरं एव्हाना झालं काय होतं की केक वरून भाजलेला आणि आतून पातळढाण राहिला होता. त्यामुळे कितीवेळ ठेवायचा यावर एकमत होत नसल्यानं मिनिट लावून सारखा बाहेर काढून त्याच्यात सुरी खुपसून बघितलं जात होतं. बिचार्याला आम्ही इतक्यांदा भोसकलं की त्यामुळेच त्याला बहुदा आतून जाळी पडली असावी. त्यात परत कोणी म्हणत होतं की केक हलका झालाय तर कोणी म्हणत होतं तो बसलाय. असं करून अखेरीस कंटाळून जाऊदे आता जसा झालाय तसा खाऊ म्हणून केक बाहेर काढला. एव्हाना इतकी मेहनत झालेली होती की त्याला आयसिंगनं सजवायचा उत्साह ओसरला होता. त्यामुळे तो प्रोग्रॆम रहित करून नुसताच केक खायचं एकमतानं ठरवलं. केकचं भांडं बाहेर काढलावर पहिला धक्का बसला तो त्यानं बदललेल्या रंगामुळे. पाकिटावरच्या माहितीनुसार आमचा केक क्रीम रंगाचा व्हायला हवा होता. प्रत्यक्शात मात्र तो चॊकलेटी आणि काळ्याच्यामध्ये लटकला होता. आधी मेला स्वत:ला भाजून घ्यायला तयार नव्हता आणि आता मात्र....जाऊदे म्हणत दु:खाचा तो पहिला धक्का पचवत त्याला कापायल घेतला तर तो आतून इतका फ़ुसफ़ुशीत झाला होता की त्याला कापायचा कस हाच प्रश्न पडला. अखेर हातानच तुकडा तुकडा मोडत त्यातलं काय घडलंय काय बिघड्लंय यावार सधक बाधक चर्चा करत ते केक म्हणून जे काही होतं ते संपवलं. इतकं सगळं होईपर्यंत जेवणाची वेळ येऊन ठेपली होती आणि स्वयंपाक तयार नव्हता म्हणून बाहेरून मागवून जेवलो. परत एकदा फ़सलेल्या केकच्या नावानं बोटं मोडून झाली, नवर्यानं ढेकर देत सांत्वनपर चार शब्द बोलले, सगळं नेहमीप्रमाणेच झालं आणि परत म्हणून केकच्या वाट्याला जायचं नाही असं आणखी एकवार ठरवून टाकलं.(आमचा केक फ़ारच वाईट झाल्यानं त्याचं उट्ट म्हणून या लेखासाठी खास हा सुंदरसा फ़ोटो गुगल्याच्या सौजन्यानं शोधून काढला.)

Reblog this post [with Zemanta]
 

मंजुचा व्हर्च्युअल स्वाईन फ़्ल्यु

सध्या सगळ्यांचं सगळं बरं चाललं असलं तरी बाप्पा येण्याआधी काही दिवस चांगली तंतरली होती. का? म्हणून काय विचारताय? अहो तो छळू स्वाईन फ़्ल्यु नव्हता का पिसाळला!मे महिन्याची सुट्टी आनंदात गेली, उशिरानं का होईना आलेल्या पावसाचं भजी बिजी खाऊन सेलिब्रेशनही झालं. चला आता प्रतिवर्षाप्रमाणे वाहत्या नाकांच्या पोरांची सर्दी तापादी दुखणी काढायची म्हणून आयांनी पदर खोचला. तेव्हढ्यात अचानकच खुसखुफ़ुसत घेतलं जाणारं स्वाईन फ़्ल्युचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झालं. मुळात ही नक्की काय भानगड आहे हेच सामान्यांना माहित नव्हतं. ते असण्याचं काही कारणही नव्हतं. अशाच सामान्य जीवजंतुंपैकी एक आमची मंजू. मधले दोन चार दिवस ज्यावेळेस या तापानं ताप दिला होता त्याचवेळेस नेमका हिचा पोट्टा आधी दोनदा शिंकला आणि मग सक्काळी सक्काळी खोकलाही. या पोट्ट्याहून लहान आणखी एक पोट्टं घरात रांगत होतं त्यामुळे बाईसाहेबांची घाबरगुंडी उडाली नसती तरच नवल. त्यातून मंजुचं कॆरॆक्टर म्हणजे, साधं निरूपद्रवी डोकं जरी बारीक दुखायला लागलं तर थेट ब्रेन ट्युमरपर्यंत जाऊन पोहोचणारं. मग तब्बल दोनदा शिंका आणि तीन चारदा खोकला तिला टेन्शन द्यायला पुरेसा होता. त्याचवेळेस विविध वाहिन्यांवरून याबाबतच्या बातम्यांचा मारा चालला होता. पुण्यातल्या बातम्या तर "सेन्सेक्स"च्या धर्तीवर देत होते. घरातून बाहेर पडलो तर अगदी शंभर टक्के हा ताप आपल्याला घेरणार याबाबत तिची खात्रीच झाली. पण करणार काय? पोराला दवाखान्यात तर घेऊन जायलाच हवं होतं. मग तिनं एक शक्कल लढविली, दवाखाना अगदी बंद व्हायच्या वेळेस जायचं ठरवलं म्हणजे पेशंटची गर्दी नसेल (हो आपल्याला काही झालेलं नसायचं आणि तिथल्या गर्दीत कोणाला असलं काही झालेलं असेल तर? उगाच रीस्क नको) तिथे ती गेली मात्र तिला समजलं की अगदी सेम टू सेम शक्कल अनेकांनी लढवली असल्यानं दवाखान्यात बरीच गर्दी होती. तिथे बिनधास्त खोकणारी मंडळी पाहून तर तिला घामच फ़ुटला. अर्थात तिथले बहुतांश लोक मंजूसारखेच घाबरलेले असल्यानं सगळ्यांनी धरू की नको करत नाकावर रूमाल धरला होताच. अखेर मंजुची त्या वातावरणातून सुटका झाली. पोराला साधं निरूपद्रवी इन्फ़ेक्शन झालेलं होतं. काही दिवस औषधं घेतल्यावर ते बरं होणार होतं. डॊक्टरनी इतकं सांगुनही हिच्या मनातून शंका पूर्ण गेलेली नसल्यानं तिनं उच्च कोटीची काळजी घ्यायचं ठरवलं. आता काळजी म्हणजे किती घ्यावी? दिवसातून चार पाचदा धुण्याचं मशिन चालू झालं (याचा परिणाम अर्थातच या महिन्याच्या बिलावर लगेचच दिसला). तासा तासाला अंगावरचे कपडे मशिनमध्ये जायला लागले. डेटॊलच्या बाटल्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. मोबाईल, रिमोट, दारांची, हॆंडल क्लिनिकल स्पिरीटनं पुसणं सुरू झालं. दर वीस मिनिटांनी मोजून पंधरा सेकंद हात धुण्याचा प्रोग्रॆम सुरू झाला. घराची सफ़ाई म्हणू नका, धुलाई म्हणू नका, धुप म्हणू नका. तिनं स्वच्छतेचा झंजावातच आणला. हे सगळं कमी म्हणून तुळस घालून उकळलेलं पाणी पिण्याची सक्ती, च्यवनप्राश खाण्याची सक्ती या मुळे घरचे बेहाल झाले. यथावकाश पोराचा खोकला गेला मात्र सतत पाण्यात राहून आणि सतत धुळ झटकत राहून हिलाच शिंका यायला लागल्या. सगळ्यांनी समजावुनही तिच्या मनातला शंकासुर जाईना. अखेरीस गणपतीच्या सामान खरेदीनिमित्त घाबरत घाबरत ती घराबाहेर पडली, यथावकाश त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या दिमतीत हे सगळं विसरलीही आणि घरच्यांनी हुश्श केलं!
 

हंसी के फ़ुहारे

http://www.youtube.com/watch?v=Yo3F6ciKXuA
 

बायको जेंव्हा बायका बघायला सांगते


जनरली नवरा दुसर्या बाईकडे बघत असेल तर बायकोला राग येतो. सहाजिकच आहे म्हणा. पण असेही काही नवरे असतात ज्यांच्या बायकाच त्यांना दुसर्या बाईकडे "बघ" असं सांगतात. पण थांबा. इतक्यातच, किती भाग्यवान ते नवरे असं वाटून घेऊन हळहळू नका. चंदूची बायकोही अशाच बायकांपैकी आहे. घरात, दारात, रस्त्यावर कोठेही गेलं की ती समो्रून येणार्या बाईकडे चंदूला बघायला सांगते. तोही बिचारा अद्न्याधारकपणे बघतो. तसं बायकांकडे बघायला त्याची ना नसते, मात्र या सगळ्या बायका "७५ एम एम" फ़िगर बाळगणार्या असतात. (विशेष सूचना- जाड, जाड्या, ढब्या, लठ्ठ, अवाढव्य अशा सर्व प्रकारच्या फ़िगर्सबाबत मला व्यक्तिश: सहानुभुती आहे. त्यामुळे वाचकांपैकी कोणी या मापदंडात बसत असेल तर क्रुपया राग मानू नये. बच्चा समझके माफ़ करना :))तर चंदूचं लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभरानं म्हणजे त्याची चवळीची शेंग क्रमश: बदलत भोपळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिला जाणवलं की आपण जरा जास्तच सुटलो आहोत. सुटलो आहोत हे जरी समजलं असलं तरी कितपत सुटलोय याचा अंदाज तिला येत नसल्यानं तिनं चंदुचं मत अजमावायचं ठरवलं. "चंदू मी किती जाड आहे"? या प्रश्नाला चतुर नवरा जे उत्तर देईल तेच त्यानं दिलं,"छे गं, मला तर तू बारीकच वाटतेस". वरकरणी बायको खुश झालेली असली तरी "आपण जरा सुटलोयच" हा विचार तिच्या मनातून न गेल्यानं सोसायटीतल्या, ओळखितल्या, नात्यातल्या सगळ्या बायकांची नावं घेऊन मी तिच्याइतकी आहे की तिच्यापेक्शा जाड? की तिच्याहून बारीक अशी तोंडी परिक्शा घेऊन तिनं चंदुला हैराण केलं. बाहेर पडल्यावर समोरून साधारण सुटलेली बाई येताना दिसली की ती चंदुला विचारायची,"हिच्यापेक्शा मी किती जाड आहे"? आताशा तर कहरच झालाय, समोरून जाड बाई येताना दिसली की ती चंदुला कोपर रुतवून तिच्याकडे बघायला सांगते आणि डोळ्यानंच विचारते. एव्हाना चंदुलाही याची इतकी सवय झालीय की समोर जरा विस्तारीत फ़िगरवाली बाई दिसली रे दिसली की तो लगेच बायकोनं न विचारता ती त्या बाईच्या मागे आहे की पुढे हे सांगून टाकतो.
 

बाहुलि हरवलि


अलिकडे बाहुली म्हणजे बार्बी असंच समिकरण बनलंय. मला विचाराल तर मला बार्बी छोट्या मुलिंची बाहुली न वाटता मोठी बाईच वाटते. लांबसडक पाय, हात आणि आटोपशिर बांध्याची बार्बी मॊडेल भासते. आम्ही खेळलो त्या बाहुल्या म्हणजे गोबरया गालांच्या कुरळ्या केसांच्या गुटगुटीत, डोळ्यांची उघडझाप करणार्या असायच्या. दुकानातून अंगावर जो ड्रेस घालून यायच्या त्याच ड्रेसवर बिचार्या निमुट आमच्या भातुकलीत वर्षानु वर्ष खेळत असायच्या. बार्बीचं तसं नाही. या बाईसाहेबांचे नखरे तर विचारूच नका. यांच्या पायात उंच टाचेचे सॆंडल्स असतात, ओठांवर लिपस्टिक, अंगात तंग कपडे, हातात पर्स, मोबाईल, पेप्सी सगळं असतं. शिवाय यांचा अख्खा कपडेपटही विकत मिळतो. आमची बाहुली आमची बबडी असायची. तिला झोपवून, चुकवून आम्ही आईसारखे ऒफ़िसला जायचो. बार्बीशी खेळणारी लेक तिच्या सोबतिनं ्पार्टी पार्टी खेळते. बाहुलीच्या खेळातला निरागसपणा जाऊन आता तो स्टायलिश खेळ बनला आहे. भातुकलीतली गोबरी बाहुली हरवली आहे आणि तिची जागा या बार्बीनं घेतलीय याचं वाईट वाटून घ्यायचं की भातुकलीचा खेळही ब्रॆंडेड बनलाय याचं कौतुक करायचं हेच समजेनासं झालंय......