
... एक कप चहा, दिवसाची सुरवात किक फ्रेश करतो आणि रेंगाळलेल्या दुपारची मरगळ झटकतो. आता जरी ग्रीन टी, हर्बल टी असे प्रकार फेसण बनले असले तरी खरे मुख्य प्रकार दोनच, घरचा आणि बाहेरचा. बाहेरच्या चहाचे आणखी काही पोटप्रकार, टपरिवारचा, हॉटेलातला, ईराण्याच्या हॉटेलातला, रेस्टॉरंटमधला, जरा उच्च हॉटेलातला, कुठे काचेच्या ग्लासातला कुठे किणकिणत्या कपातला.
माझ्यापुरतं सांगायचं तर चहा घराचा असो की बाहेरचा, माझ्या अनेक चांगल्या आठवणी या चहाच्या कपाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अनेक जीवाभावाची मित्रमंडळीही :)
कॉलेजच्या दिवसातली सर्वात जास्त मिस होणारी गोष्ट म्हणजे टपरीवरचा चहा. एक कटिंग चारजणांत पिण्याची मजा परत आली नाही. आयुष्यात किती कप चहा प्यायला असेल, अगदी उडप्याच्या हॉटेलातल्या दुधाळ चहापासून ते तारांकीत हॉटेलमधल्या स्टाईलमारू चहापर्यंत. गावोगावच्या टपऱ्यांवरच्या चायपासून रेल्वेतल्या चाय गरम पर्यंत. मात्र युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या अमऱ्याच्या टपरीवरच्या चहाची चव कुठेच सापडली नाही.
खरं तर मी काही चहाबाज गटातली नाही. तेंव्हा तर अजिबातच नव्हते. सकाळी डोळे उघडण्यासाठी म्हणून चहा आयुष्यात आला. त्याच्याविना कधी काही अडलंही नव्हतं. कॉलेजात जीवाभावाची मैत्रीण मिळाली, पक्की
चहाबाज, चहाचा आग्रह ईमानादारीत करणारी, कप भर चहा पिणं जीवावर यायचं मग तिच्याच कापातले दोन घोट मी तीर्थासारखे भक्तिभावाने प्यायची. आजही कोणी ,'घे गं घोटभर चहा ' असा आग्रह केला की तिच्यासोबाताचे ते घोट घोट चहा हटकून आठवतात.
मात्र चहा खरा अनुभवला युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या अमरच्या टपरीवर. काय व्हायचं नां की, तास तास भराची अगम्य भाषेतली लेक्चर्स ऐकून जीव मेटाकुटीला यायचा. त्यातून बरोबरीचे सगळे पक्के चहाबाज त्यामुळे लेक्चर संपलं आणि ब्रेक आली की जीवाच्या आकांतानं सगळे टपरी गाठायचे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रापण जायची अर्थात. मग एक घोट दोन घोट असा करत हा कटिंग आयुष्यात आला. या चहासोबत जी टिंगल टवाळी चालायची त्यामुळे तो अजून भारी लागायचा बहुतेक.
पुण्यात रहायला आल्यावर अमृततुल्य नावाचं बासुंदी चहा पाजणारं ठीकाण सापडलं. भर दुपारी उकाड्यात तिथल्या बेंचवर बसून तो दुधाळ वेलदोडायुक्त चहा म्हणजे महान गोष्ट होती. अखेर ते काही फार काळ झेपलं नाही आणि नाईलाजास्तव कॉफीपान सुरू झालं. या लोकमत स्पेशल कोफी ब्रेकनं प्रतिभा, आरती, पराग अशी तिकडी मिळाली. पुन्हा या पेयानंही काही काळ झपाटलं. इतकं की एकदा तल्लफ आली तर सिंहगडावरही प्रतिभा आणि चंद्रन या वल्ली दोस्तांसोबत काटक्या - कुटक्या जमवून लुतुपुटुची चूल बनवून कॉफी बनवून प्यायाली एकदा.
पक्का चहाबाज नवरा आयुष्यात आल्यानं कॉफीला सोडचिठ्ठी देऊन चहाला आपलसं केलं. नवरा आणि चहा हे आणखी एक वेगळं सविस्तर लिहिण्यासारखं प्रकरण आहे. :) रीतसर संसारी वगैरे झाल्यावाराच्या मधल्या सुस्तावलेल्या काळात आणखी एक चहा प्रेमी मैत्रीण मिळाली. सकाळचा- संध्याकाळचा चहा आणि त्यासोबतच्या धमाल गप्पा कितीतरी वर्षं आम्ही मनापासून एन्जॉय केल्या. माझी एक चमचा साखर आणि तिची दोन, माझा नुसता मग तर तिला कपासोबत बशीही! 'ग' गोड गोड चहा आवडीनं पिणारी नावार्यानंतरची ही दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यातली !
खरं सांगायचं तर चहा काय आणि कॉफी काय, प्यायला सोबत असेल तरच खरी मजा. एकटीसाठी एक कप चहा उकळण कंटाळा आणतं. माझ्या तरी आयुष्यात चहा आणि मैत्री हे अतुट कोम्बिनेषन आहे.
ता.का.- आजची ही 'टी पोस्ट' हेरंब आणि तन्वीला अर्पण ;)
किमान आजच्यापुराती का होईना तुम्हा दोघांमुळे लिहिती झाले. चियर्स !!! :)
छायाचित्र सौ.-गुगल
5 comments:
भारीच गं बाय.... लिहीत रहा आता नेमाने :)
:-) chaan !
dhanyawad
इश्श. माझे मेले कसले आभार ;)..
बऱ्याचचचचचच दिवसांनी तुला लिहितं बघून आनंद झाला.. कीप ऑन !
@ हेरंब
हा हा हा
बऱ्याचचचचचच दिवसांनी तुझी कॉमेंट....भारी वाटलं हं!
Post a Comment