"मे"ची भाषा

"बाबा बाबा पोई पोई क्क...बाबा क्क...बाबा क्क्क न्नां"...."ओरे पिल्लू आत्ता पोली नाय कलायची, आई पोली करेल हं"...."बाबा पोई<<<<" हा संवाद साधारण पाच सहावेळेस रिपिट झाल्यावर पिल्लाचं शहनाईवादन सुरू आणि बाबाची सपशेल हार. मी कामात आणि कान माझ्या दोन आणि सासुबाईंच्या एका पोराकडे. पिल्लू नंबर दोन बाबाला रिबिट मारत असतं आणि मोठ्ठं पिल्लू बाबाची गंमत ऐकत फ़िदी फ़िदी हसत असतं. अनुभवानं तिलाही माहित झालंय की या दोघांत पडायचं नसतं. नुसती गंमत बघायची. अखेर बाबा मला शरण येतो (तो येणारच असतो, चोवीस तासातून साडे चार तास पोर सांभाळून ते काय बोलतंय हे समजणार नसतंच),"ए, अगं हा काय म्हणतोय? याला भूक लागलीय का? तो पोळी मागतोय"....."अरे बाबा त्याला पोळी नकोय, तो म्हणतोय की रोली पोली गाणं म्हण", "ह्हे क्काय तरीच, कशावरून?" म्हटलं बघ तो हात असा गोल गोल फ़िरवतोय म्हणजे रोली पोली आणि पोळी हवी असेल तर तो आत येऊन डिश दाखवून पोली दे म्हणेल. त्याचं काय झालंय की पिल्लू आता जाम बोलायला लागलंय, इतकं की तिन दुणे सहा कान दुखायला लागलेत (अर्थात माणशी दोन कान) सकाळी डोळे उघडले की जे पिटपिटायला सुरवात होते ती झोपल्यावरच शांत. एरवी अखंड बडबड सुरू. (कधी कधी याच्या अखंड बडबडीला सानू वैतागते तेंव्हा माझ्याकडे येऊन म्हणते की आई याचं बोलायचं बटन जरा बंद कर नां गं, म्हटलं बयो असं बटन असतं तर आधी तुझं नसतं का बंद केलं? आणि बाबानं माझं बटन बंद करून वर ते फ़ेकून दिलं असतं. घरात कशी शांतता नांदली असती) नव्वद टक्के ओ की ठो समजत नाही, बाकी अंदाज मेरा मस्ताना...म्हणजे अंदाजानं समजून घ्यायचं. परवा बाहेर जेवायला गेलो होतो. सगळं झाल्यावर "एक्स्युज मी असं म्हणून बिल मागवलं" त्यानंतर हा अखंड काहीतरी ओरडत होता. खुर्चीवरून उठायलाही तयार नाही, त्याला काय म्हणायचं आम्हाला समजत नव्हतं तर आता यांना कसं समजावू असं त्याला झालेलं होतं. पाच दहा मिनिटांनी डोक्यात उजेड पडला की तो "एक्स्युज मी बिल लाव" असं म्हणत होता. पुरता बोबडकांदा असल्यानं त्याचं ऐकताना धमाल येते, सानुच्यावेळेस रिपिट टेलिकास्ट सुरू असल्यासारखं. एखादा शब्द यानं पहिल्यांदा उच्चारला की (म्हणजे तो आधिपासूनच उच्चारत असतो पण एखाद्या दिवशी आम्हालाच साक्षात्कार होतो की अरे याला हे म्हणायचं होतं होय?). मला लहान मुलांची ही स्टेज खुपच आवडते, म्हणजे नुकतीच तोंड फ़ुटल्यानंतरची. त्यांनी आपल्याला काहीतरी म्हणायचं आणि आपण "ओळखा पाहू बरे" चा खेळ खेळत रहायचं. सानुची "बोबलकांदा डिक्सनरी" बनवल्यानंतर आता शर्मनची बनविण्याचं काम सुरू आहे. "मे कूल जातो"- म्हणजे शर्मन स्कूलमध्ये जातो (मे= शर्मन) "आई क घे"- म्हणजे आई कडेवर घे (क=कडेवर) दादा च्च- म्हणजे "ताई" चल (ताई=दादा, मात्र हे केवळ सानुच्याच बाबतीत) मेंगा- मेघना चिचु- चिनू नॅन- स्वयम घू- ध्रुवल भेबे- बैरवी मुन्ना- मुद्रा श्याऊं- सानू पुहा-स्पृहा कोका- किल्ली का फ़ास्ट- गाडी फ़ास्ट चालव गो गो बसव - म्हणजे वर बसव (गोगो- वर) आई मी तु थ्ली पाच- म्हणजे मला एक पेन आणि कागद दे त्यावर मला वन टू थ्री लिहायचं आहे. मी बात्त ग्यातो बेबा- म्हणजे मी बॊटल घेतो मी बाबा बोनाई- मी बाबाशी बोलणार नाही गुडीत- म्हणजे गुडनाईट. गुम्मा- गुड मॉर्निंग बेव्वर- बेडवर आजोबा- अगं (महत प्रयासानं सध्याच आजोबा व्हाया आबा अशी प्रगती आम्ही साधली आहे) कोम्बाटी कोम्बाटी- कॊम्प्युटर (दोन इटुकले हाताचे पंजे छातीवर समोरच्या दिशेनं सरळ धरून डोळे मोठ्ठे करून)घाब्बं- म्हणजे मी घाबरलो चन्ना- चल नां मी सध्या खुष आहे, कधी कधी त्याच्या तापदायक वाटणार्‍या खोड्यांसहीत. त्याच्यासोबत ब्ला ब्ला बॅकशिप म्हणताना, नॊनी म्हणजे जॉनी जॉनी किंवा चांदोबा चांदोबा म्हणताना त्याला सरळ बोल शिकवताना त्याचे बोबडे बोल बोलावेसे वाटतात. त्याच्या सुरात सूर मिसळवून नानी तेरी मोन्नी को चोन ले गये म्हणताना त्याच्या इतकाच आनंद मलाही होत असतो.