कानकोरणी


वेळ सकाळची अर्थात गडबडीची (पक्षी बुडाला आग लागल्याची).......ओ बेखबर ओ बेखबर....(ही मोबाईलची रिंगटोन आहे).....फ़ोन कुठल्यातरी चिवित्र (हा शब्द डॉ. गिरीश ओकांच्या सौजन्यानं)अ‍ॅन्गलमध्ये कानाल चिकटतो.....गॅसवर काहीतरी भाजण्याची सीमा ओलांडत, करपण्याचा टप्पा गाठत जवळपास जळण्याची सम गाठण्याच्या तयारीत....पायाला लटकलेलं वयवर्षं दोन.समथिंग (२ पॉईंट समथिंग) आतून आई>>> आई गं.....ची आर्त आळ्वणी करणारं वय वर्षं आठ.समथिंग.....फ़ोनवरची सखी (कानकोरणं क्रमांक तीन -खालून वर असं मिस इंडियासारखं...)अरे सून नां......(न सुनून करते गं काय बयो तू सुरू हो)....वो कल टिचर ने क्या बोला? (आता सव्वा ते सव्वापाच टिचर काही ना काही बोलतच असते; पण म्हणून मी काय शब्दा शब्दाचा हिशोब मागायचा की माझ्या बाळीकडून? बिचारी वर्गात सगळं इमानदारीत लिहिते आणि टिचर सांगते ते हावभावासहित घरी आल्यावर बदबदा ओतते, म्हणून इतरांनी, म्हणजे ज्यांची पोरं वर्गात लक्श देत नाहीत त्या आयांनी माझा असा छळ मांडावा?)......मी गॆसवर ते मघासचं "काहीतरी" खसाखसा हलवत..."क्या बोला था?"...सखी- [काको ४ (लक्शात ठेवा काको म्हणजे कानकोरणं)]अरे कुछ स्टिकर लाने केलिए बोला था, कैसे स्टिकर? मी सानुला-काय गं बाई टिचरनी काय मागवलंय? सानू शांतपणानं-स्टिकर नाही गं आज न्यायचे. ते फ़्रायडेला. आज मराठीच्या पोएममधलं चित्र ड्रॊ करून न्यायचंय....जसाच्या तसा निरोप काकोला दिल्यावर अरे ये मेरा लडका देख नां हमेशा कुछ अलगही सुनके आता है.....एव्हाना तव्यातल्या पदार्थानं जळून खाक होण्याचं चरण गाठलेलं असतं, वैतागून पोरानं पायाशी फ़तकल मांडलेलं असतं, सानू समोर येऊन अगम्य हातवारे करत असते, माझ्या थोबाडावर प्रश्नचिन्ह वैताग चिड चिड यांची मिक्स फ़्रुट मस्तानी पसरलेली असते.....पलिकडून सखी बोलायची थांबायचं नाव घेत नसते....मी काकुळतीन, सुन...सुनो....अरे हां....सून नां....पण समोरची त्रस्त सखी तिचं बोलून झाल्याशिवाय फ़ोन कट करणार नसतेच. शाळेतल्या बाईनी साधी चित्रं काढायलाच सांगितलेली असतात; पण ही पार शाळेच्या शैक्शणिक धोरणावरही बोलून घेते. अखेर मीच मोबाईलवर दया दाखवत (कारण तो चिवित्र अ‍ॅंगलमध्ये कानाशी चिकटून असतो) गॅस बंद करून पोराला मांडीवर घेऊन सोफ़्यात बैठक मारते अणि तिला बोलून देते. सगळं झाल्यावर अखेरचं वाक्य ती अगदी घाई घाईत बोलते, अरे चल मैं अभी रखती हूं. चल अभी टाईम नहीं है. मेरी बाई आई है. चल रख. अभी बाद में बात करेंगे. तपशिलातला फ़रक सोडला तर आठवड्यातून जवळपास पाच दिवस तरी हे सगळं घडतं. म्हणजे कधी कसली स्टिकर आणायची म्हणून हिला प्रश्न तर कधी क्लास टेस्टला नक्की काय विचारणार आहेत याचं प्रश्नचिन्ह. बरं तोडून टाकणं जमत नाही म्हणून ऐकायचं तर किती?
परिहार-१ अरे मी काय चौकशी खिडकी आहे का? रोज रोज अगदी नेमानं असं फ़ोन करून कान खात बसणं हिला जमतं कसं? जरा पोराना लावावी की शिस्त बिस्त की काय ती.
२-आधी स्वत: फ़ोन करायचा आणि मग तो कट करताना आव असा आणायचा की जणू काही हिला जबरदस्तीनं फ़ोनवर बोलायला लावलं आहे. अपमान अपमान आहे हा नुसता.


रात्री साडे अकरा वगैरे असली खतरनाक वेळ.खतरनाक यासाठी की पोरं झोपवण्याच्या प्रयत्नात नुकतंच यश आलेलं असतं. आता जरा निवांतपणानं चार पानं वाचून निद्राधीन व्हावं म्हटलं तर अशा वेळेस मोबाईलची रींग वाजते. फ़ोनवरचं नाव कमालिचा ताप देणारं असतं. पण फ़ोन टाळणं जिवावर येतं. कारण तेच जुनं. मुखदूर्बळता. कितिही ठरवलं की नाही करायचे असले लोक एंटरटेन. तरिही ते जमतच नाही. मनात शिव्या मोजतच फ़ोन कानाला लावून हॅलो म्हटलं जातं. साडे अकरावाजता ही सखी (कानकोरणं क्रमांक दोन) कोणत्याही कारणासाठी फ़ोन करू शकते. म्हणजे आजवर अशा अपवेळी मी तिच्या घरातली भांडणं सोडविण्यापासून तिला डायपरसारखी जिवनावश्यक गोष्ट देण्यापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. कसं असतं नां की काही लोकांच्या बॉयोलॉजिकल घड्याळाचा पत्ता बेपत्ता असतो. म्हणजे ती रात्री बेरात्री कधिही वटवाघळासारखी भटकतात तर दिवसभर झोपा काढतात किंवा कधिही काहीही. कधी, काय, कोणती गोष्ट करावी याचं भान नसलेली ही लोकं आपल्यासारखीच इतरांना समजतात की काय कोण जाणे? म्हणजे अकरा ही हिच्यासाठी अत्यंत रम्य आणि छानसा फ़ेरफ़टका मारू गडे! अशी वेळ असली तरी इतर सामान्य म्हणजे, आमच्यासारख्या जीवजंतूंसाठी झोपेच्या आधीन होण्याची वेळ असते. हे हिला मान्यच नाही. म्हणून तर अकरा काय बारा काय एक काय आणि दोन काय रात्रीचा कोणताही प्रहर माझ्या मोबाईलची आणि घराची बेल वाजवण्यासाठी हिला निशिध्द नाही. बरं थेट बोलणं जमत नाही म्हणून आडून आडून सांगितलं तर वर पुन्हा अरे आप बहोत गुड गर्ल बनते हो. ग्यारा सोने का टाईम थोडेही है. मै आपकी वजह से गाली खाती हूं हे आणखी वर. बरं पुन्हा हिचे प्रश्न आणि समस्या इतक्या सुरस असतात की त्यावरची उत्तरं साक्षात ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही तिथे म्या पामराचा काय ठाव? पुन्हा गेले अनेक वर्षं हिच्या समस्या संपत नाहीत हे आणखी वेगळं दु:ख. सुरवातिच्या काळात नवर्‍याशी जमवून घेतानाचा ताप (तिला जितका तितका मला. कारण सतत कौन्सेलिंगचं काम सुरू). त्यानंतर मूल झाल्यावर त्या अनुषंगानं जितका ताप देता येईल तितका देऊन झाल्यावर मग अजून नवनवीन समस्या आहेतच. वेळ काळ न बघता कधिही येऊन कान खाण्याचा अधिकार स्वत:हून तिनं घेतल्यानं मी हताश, हतबल वगैरे. बरं पुन्हा तोंडी लावायला सासूच्या समस्या आहेतच (सगळ्याच सुनांच्या आपल्या सास्वांबद्दल तक्रारी असतात पण हिच्याइतकं वैविध्य मी आजवर पाहिलं नाही. उदा.- सासू पदरचे पैसे देऊन कोणालातरी हिच्यावर पाळत ठेवायला सांगते, सासू कसले कसले तंत्र मंत्र करते आणि असंच ब्ला ब्ला बरंच काही) तिकडे जरा खुट्ट झालं की ही आलीच पळत. बरं आली की तीन चार तासांची बेगमी. तिच्याशी बोलून बोलून आणि तिला समाजावून माझ्या तोंडाला फ़ेसच काय पण आणखिही बरंच काही येऊन जातं. पण ही म्हणजे दुखियारी बहू बेचारीचा चेहरा सोडायलाच तयार नाही. आजवर इतक्या समस्या असणारा जिवंत माणूसच मी पाहिलेला नाही. पुन्हा हिच्या समस्यांवर तोडगा सांगयचा की नाही हा एक वेगळाच प्रश्न. कारण कोणत्याही समस्येवरचा तोडगा हिच्या ट्रान्सपरंट मेंदूतून आरपार. म्हणजे कसं नां भोक पडलेल्या मडक्यात पाणी भरावं तसं. वरून कितिही बिसलेरीच्या बाटल्या का ओतेनात पण खालून पाणी छू मंतर. सुरवातीला मी तिच्या समस्यांनीच चकीत व्हायची (हबकायची हा शब्द जास्त अ‍ॅप. कारण कोणीतरी माझ्यावर मोहिनीमंत्र घातलाय असं तुम्हालाही कोणी सांगितलं तर तुमचं जे होईल तेच माझंही व्हायचं) म्हणून मग हातातलं काम सोडून मी तिच्या समस्यांशी झुंजायची. म्हणजे सीन कसा तर आधी दोन तीन तास ही सगळं ऐकवणार (त्यात पुन्हा शब्दात शब्द नाही म्हणजे आपणच साधारण सत्य ओळखून त्यावर तोडगा सुचवायचा) मग आपण (अर्थात मी) तिच्याशी संवाद साधत आणखी तासभर घालवणार आणि ती गेल्यावर पुन्हा तिच्याच विचारात पुढचे काही तास जाणार तर त्यानंतर ही मस्त टुणटुणीत भटकत असते आणि तिच्या समस्येची काळजी आपल्या चेहर्‍यावर. आता सरावानं किमान इतकं तरी समजलंय की तिच्या समस्याच मुळात फ़ार कानात घुसवायच्या नाहीत. पण त्या मुळातच इतक्या खतरनाक असतात की कानाला गिरमिट लागल्यासारखंच होतं.
परिहार-१-अरे का म्हणून आम्ही तुझ्या न संपणार्‍या समस्या सतत सतत ऐकायच्या. त्या संपवायच्या कशा हे तू पण शिक नां बयो. इतर अनेक कौशल्य जशी अंगात आहेत तसंच हे आणखी एक शिक बाई तेव्हढं.
२-एखादं माणूस इतक्या समस्या घेऊन जिवंत कसं राहू शकतं? मुळात हिच्याच आयुष्यात लोकं समस्या का निर्माण करतात? म्हणजे हिच्याच सासुला स्पायगिरी का कराविशी वाटते? किंवा असेच काही अचाट प्रसंग (जे साधारणपणे एकता कपूरच्या मालिकांत असतात) हिच्याच संसारात कसे?
३-आम्ही आपले संसार टुकिनं करण्याचे मर्ग शोधत असताना तुझ्या समस्यांनी आमचे कान का कोरून कोरून घ्यावेत. नाही म्हटलं तरी दुसरा पर्याय काय?

आता माझ्या आयुक्शातलं सर्वात वैतागवाणं कानकोरणं. एक आंटी, आपलं आयुश्य उमेदित घालवलेल्या घालवणार्‍या. असो बापडं. पण यांचा एक भयानक गैरसमज असा आहे की जी काय उमेद आहे ती यांच्याकडेच. जे काय छान छान गुण-कौशल्य आहेत ती यांच्याच अंगी. आम्ही सगळ्याजणी अगदी गरीब बिचार्‍या. आयुष्यात आनंद न पाहिलेल्या. अगदी अंडर प्रिव्हेज म्हणाव्यात अशा. पुन्हा हे सगळं त्यांचं त्यांनिच ठरवलेलं. म्हणजे समोरच्याला तोंड नावाचा अवयव असतो यावर त्यांचा अजिबात विश्र्वास नाही. (बहुदा) त्यांच्या मते ईश्र्वरानं देह बनविण्याचा कारखाना टाकला त्यावेळेस तोंड (विशेषत: बोलण्यासाठी जेंव्हा याचा वापर करायचा असतो) बसवलेला एकमेव पीस म्हणजे आंटी. त्यांच्यानंतर त्या वरच्याकडे तोंडच उरली नाहीत त्यामुळे सगळ्या जगाचं बोलण्याचं काम आंटीना करावं लागत असल्याचा एकूण अविर्भाव. एकदा का त्या सुरू झाल्या की कोणाच्या नाहीत. त्यांच्या मेंदूत किंवा जिथे शब्द तयार होतात तिथले सगळे शब्द, अक्षरं, काने, मात्रे, वेलांट्या, उकार संपल्याशिवाय त्या बोलायचं थांबतच नाहीत. समोरचा ऐकून ऐकून घामाघुम या बोलून बोलून घामाघुम पण यांचं आपलं सुरूच असतं. शिवाय ऐकून कान आणि मग डोकं तापतं ते वेगळंच. (मी विचार करतेय आता आंटी बोलायला लागल्या की कानात थंड पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळेच घालावेत सरळ) बरं बोलणं म्हणजे काय विचारावं. भारतीय संस्कती केवळ यांच्या जिवावर भिस्त ठेवून असल्यासारखी. हिंदी म्हणून नका इंग्लिश म्हणू नका आता आम्हालाच तामिळ येत नाही म्हणून नाहीतर त्याही भाषेतलं भाषण ऐकायची सक्ती झाली असती. आंटी म्हणजे अक्शरश: "व्हर्बल डायरिया" आहेत. आता यावरूनच त्यांच्या संभाषणाची भयानकता लक्शात यायला हरकत नाही. कोणी बोलल्यावर कानात गिरमिट फ़िरवल्यासारखं होतं, कोणी बोलताना कानात नकोसा डास घुंईं घुईं करत असल्याची ईरिटेटिंग भावना येते तर आंटी बोलायला लागल्या की पंचेद्रियांवर बुल्डोझर फ़िरवून सगळे सेन्स जमिनदोस्त केल्यासारखं बधिर व्हायला होतं. नशिब शब्दाच्या धबधब्यात जीव बिव जात नाही नाहीतर त्यांना एकांतवासात सक्तीनं घालवावं लागलं असतं.
परिहार-१-तुम्ही वयानं, अनुभवानं आणि सर्वार्थानं मोठ्या आहात हे अगदी मान्य. पण म्हणून आम्ही गरीब बिचारे कसे? बरं समजा असलो तरी आमच्या उध्दाराचं काम तुम्ही का म्हणून करावं?
२-आपण बोलल्यावर समोरच्यानं अगदी चुप बसून ऐकावं ही कोणती सक्ती? अशा माणसांनी आरशात बघून बोलावं म्हणजे त्यांना समजेल की ती किती बोलतात
३- त्यांनी बोलत असताना समोरच्यानं काहीही मत व्यक्त करायचं नाही अशीच जर सक्ती असेल तर किमान ते कागदावर तरी उतरवून हातात द्यावं म्हणजे किमान ते आपल्या सवडीनं वाचायची संधी तरी मिळेल.
४-बोलण्याची हौस वगैरे सगळं ठीक असलं तरी ऐकणार्‍याचा किमान माणूस म्हणून का विचार करू नये. आपल्या तोंडाला भलेही विश्रांती नको असेल पण ऐकणार्‍याच्या कानाला विश्रांती लागते ही नैसर्गिक अडचण त्यांना कधी समजणार?

जाता जाता हळूच- माझं एक प्रचंड लाड्कं स्वप्न आहे की या सगळ्यांनी एकदा तरी किमान तोंड बंद ठेवून समोरच्याचं फ़क्त ऐकावं. आणि कानकोरणं क्रमांक एकच्या बाबतीत तर एकदम किलर स्वप्न आहे, अख्खा दिवस यांना महाराष्ट्रीय संस्कृतीपासून मनात जे येईल ते सगळं ठणकावून सांगावं.