चाळ नावाची वाचाळ वस्ती…..

मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भागडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.






मुंबईची दुसरी आणि पक्की ओळख म्हणजे इथल्या चाळी. आम्हा सांगलीकरांना म्हणजे बच्चेकंपनीला चाळ हा प्रकारच माहित नव्हता. कारण सांगलीत एकतर सगळी बैठी घरं. कॉंक्रिटच्या गच्च्या आणि गुळगुळीत गिलावे असलेले बंगले किंवा उतरत्या मंगलोरी कौलांची एक दोन खोल्यांची घरं, गावभागात असणारे जुनेपुराणे वाडे आणि या वाड्यात पिढ्यानुपिढा रहाणारी भाडेकरू मंडळी. पण घर म्हणजे थोड्या फ़ार फ़रकाने असंच चित्र. बैठं. घरापुढे गुळगुळीत अंगण ज्यावर सकाळ संध्याकाळ सडा मारायची पध्दत होती आणि जितकी जागा असेल त्या प्रमाणात घराच्या चारी अंगांनी असणारी नारळ, पेरू आंब्याच्या झाडापासून पासून कण्हेरी, मोगरा, गुलाबाचे ताटवे आणि हो प्रत्येक घरात अगदी हटकून असणारी तुळस. मुंबईची मात्र तर्‍हाच निराळी. इथं बैठी घरं नसतातच असं त्यावेळेस वाटायचं एकतर वाड्या असतात किंवा चाळी आणि त्याही गंमतीशिर आडनावाच्या. आणि इथल्या घरांना मजले नाहीत तर “माळे” असतात आणि इथली घरं म्हणजे “खोली” किंवा “रूम” असते शिवाय तिला नंबरही असतो. असं सगळं अजबच होतं मुंबईचं प्रकरण.  खरं तर चाळी पुण्यातही होत्याच आणि हो, अगदी आमच्या सांगलीतही होत्या पण आम्हाला मात्र चाळ ही फ़क्त मुंबईतच असते असं तेंव्हा खात्रीनं वाटायचं.
आमचं मुंबई दर्शन बहुतेक करून मोठ्या काकांच्या किस्स्यांतूनच व्हायचं त्यामुळे काकांची मुंबई तीच खरी मुंबई असंच समिकरण कित्येक वर्षं होतं. काका भाड्यानं रहायचे आणि त्यांचे पत्तेही सतत बदलायचे. एखाद्या दुपारी पोस्टानं पिवळं कार्ड यायचं ज्यावर त्यांचा बदलेला पत्ता असायचा, तो पत्ता वाचताना मजा यायची कारण चाळीचं नाव. आम्ही तेंव्हा फ़ार कॉलरटाईट करायचो आणि दोस्तमंडळीत सांगायचो की आमचे मोठे काका मुंबईत अमूक चाळीत रहातात कारण तेंव्हा आजूबाजूच्या घरातून मुंबईला रहाणारं नातेवाईक कोणी नव्हतं. पुणं म्हणजेच एकदम भारी स्टेटस आणि मुंबई म्हणजे तर काय विचारायलाच नको आणि आमचे तर दोनही शहरात नातेवाईक विचार करा दोस्तमंडळीत काय रूबाब असेल , असो. तर मुंबईच्या या चाळी म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंतच्या मुंबईच्या अंगा खांद्यावर बागडणार्‍या चिमण्या होत्या. अखंड चिवचिवाट करणार्‍या, इथले सार्वजनिक उत्सव, लग्नं समारंभ आणि हो भांडणंही सगळंच सुरस. याचं जिवंत चित्रण करणारी चाळ नावाची वाचाळ वस्ती  ही मालिका तेंव्हा दूरदर्शनवर लागायची. या चाळ नावाच्या भानगडीनं मनात कधी घर केलं कळलंच नाही.
हळूहळू बदलत्या मुंबईनं कात टाकली आणि चाळकरी लोक चाळीतल्या खोल्या विकून दूर पार कल्याणच्या पलिकडे आणि विरार वगैरे भागाकडे ऐसपैस (चाळीच्या तुलनेत) ब्लॉक मधे रहायला जाऊ लागले. कॉमन संडास आणि कॉमन नळ, त्याला लावाव्या लागणार्‍या रांगा आणि त्यापायी होणारी युध्दं यापेक्षा आपल्याच स्वत:च्या घरात असणारं इंडियन टॉयलेट आणि स्वयंपाकघरातल्या नळाला भलेही दिवसातून ठराविक वेळ येणारं पाणी ही अक्षरश: सुखाची परिसीमा होती. हळूहळू बर्‍याचशा चाळी पाडून त्याठिकाणी सदनिका उभ्या करण्यात आल्या. आजही बर्‍याच चाळी तग धरून आहेत पण कशा? तर घरात एखादं म्हातारं माणूस असतं नां ऐंशीचा टप्पा ओलांडलेलं, सुरकुतलेलं शरीर, डोळ्यात आठवणी भरून शून्यात बघत बसलेलं, सगळ्यात गोतावळ्यात असूनही वेगळं भासणारं…तशा. आजूबाजूला उंचच टॉवरमधे आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या या चाळी बघितल्या की वाटतं कधी ना कधी, आज ना उद्या या भिंती पाडून इथेही आकाशात झेपावणारे टॉवर उभे रहातील….! काही चाळी आजही चांगल्या टणकपणानं उभ्या आहेत. आजूबाजूच्या नव्या जमान्याच्या टॉवरची पर्वा न करता मस्त टेचात. जेंव्हा जेंव्हा अशी एखादी चाळ दिसते तेंव्हा हात आपोआप कॅमेर्‍यावर जातो आणि हे चित्र बंदिस्त होतं.





 

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई .......



मिलच्या भोंग्यानी जागी होणारी मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारा, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणून उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं.


मुंबई म्हणजे जुहू बीच, मुंबई म्हणजे नरीमन पॉईंट, मुंबई म्हणजे चौपाटी, मुंबई म्हणजे गेट वे ऑफ़ इंडिया.....मुंबई म्हणजे बरंच काही आणि आता पूर्ण पुसली गेलेली ओळख म्हणजे गिरण्यांची मुंबई. कोणे एके काळी मुंबईत लहान मोठ्या शहरातून विशेषत: कोकणातून लोक मुंबईत गिरणी कामगार म्हणून यायचे. इथल्या मिलमधे कामगार बनायचे आणि गाववाल्यांसाठी "मुंबईकर पावने". अशा चाकरमान्याला गावाकडे ग्लॅमर असायचं. इथे घामट गर्दीत रहाणारा गाववाला मुंबईतून गावातल्या येष्टीतून उतरला की डोळ्यावर गॉगल चढवून बॉम्बेवाला व्हायचा. त्याचा रूबाबच वेगळा, पण मिलवाल्यांचं आयुष्यही फ़ार सुखाचं होतं असं नाही. त्यांचे वेतनाचे प्रश्न, बदली कामगारांचे प्र्श्न होतेच. तरिही मुंबईच्या मिल्स ही मुंबईची मुंबईबाहेरची मुख्य ओळख होती. मात्र ऐंशीचं दशक उजाडलं तेच मिलकामगारांसाठी अखेरचा अंक लिहिण्यासाठी. अगदी अचूक पणानं सांगायचं तर पस्तिस वर्षांपूर्वी या मिल्सना घरघर लागली आणि मुंबईची ही एक पक्की ओळख पुसट व्हायच्या पहिल्या अंकाचा प्रारंभ झाला.

मिलच्या भोंग्यानी जागी होणारी,  लूम्स आणि स्पिंडल्सची मुंबई शांत होत गेली. कामगारांना उध्वस्त करणारं, त्यांचे संसार उघड्यावर आणणारं हे दशक मुंबईच्या इतिहासात काळं दशक म्हणूनच बहुदा कायम उल्लेखलं जाईल. एक चालती बोलती व्यक्ती एखाद्या लहानशा अपघातात लुळी व्हावी आणि मग हळूहळू कोमात जाऊन मृत्यू यावा तसं झालं. निमित्त झालं दिवाळी बोनसचं आणि मग त्याचं स्वरूप विक्राळ होत जाऊन मिल कामगारांनी संप करून मिल  बंद पाडल्या. हा ऐतिहासिक संप मोडण्यासाठीचे प्रयत्नही तसेच ऐतिहासिक आहेत. या संपाला अनेक राजकिय पदरही आहेत मात्र यातली काळी बाजू ही की अखेर कामगार हरला,
आज बहुतांश मिल्सच्या जागी मॉल्स, कॉर्पोरेट ऑफ़िसेस किंवा टाऊनशिप उभ्या आहेत. या घरात रहाणार्‍या अनेकांना त्या जागेचं ऐतिहासिक महत्व कदाचित माहितही नसेल. कदाचित त्याच आवारात कधीकाळी कामगारांनी घोषणा दिल्या असतील, संप मोडून काढणार्‍यांनी साम, दाम, दंड भेदाचा वापर करत कदाचित त्याच आवारात एखाद्याला अडचणीत आणलं असेल. ते सगळं जमिनीत गाडून त्याजागी आज उभ्या आहेत वातानुकुलीत इमारती. इथे दु:खाला थारा नाही. सगळ कसं हाय प्रोफ़ाईल आणि एसीच्या हवेतलं थंडगार. विरोधाभास म्हणजे कोणे एकेकाळी ज्या जागेवर दीड दोनशे रूपये पगारवाढ करण्यासाठी आंदोलन झालं आणि ते विविध दबावतंत्रं वापरून चिरडलं गेलं त्याच जागेवर आज लाखो रूपये पगार घेणारे कर्मचारी काम करतात, करोडो रूपये मोजून सदनिका विकत घेतल्या जातात किंवा हजारो रूपये फ़ेकून देशी-परदेशी ब्रॅण्डची महागडी उत्पादनं विकली जातात/ विकत घेतली जातात. स्थान महात्म्य असतं म्हणतात नं? पण ते असं? म्हणूनच परळ भागात फ़िरताना उंचच इमारतींच्या कचकचाटातून जेंव्हा एखादी चिमणी नजरेला पडते तेंव्हा गलबलून येतं. अजूनही या टॉवर्सच्या गर्दीत आपलं अस्तित्व टिकवून असणारी चिमणी कदाचित त्या टाऊनशिपच्या सजावटीचा भाग बनेल पण याच इमारतींच्या पायात अनेक कामगारांच्या मोडक्या संसाराचे उसासे आहेत हे कसं विसरावं?
 

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई

रस्ते, गल्ल्या, हमरस्ते हे सगळं एखाद्या शहराची ओळख करून देणारं असतं. वाकडे तिकडे, सरळसोट, माणसांनी ओसंडून वाहणारे, गाड्यांनी भरलेले, दुतर्फ़ा नानाविविध गोष्टी विकणारे, कधी नुसतेच कंटाळवाणे पसरट झालेले तर कधी एखाद्या पॉश वसाहतीतून निर्विकारपणे निघून जाणारे. रात्री वेगळेच दिसणारे आणि दिवसा उजेडी वेगळेच भासणारे....
खूप लहानपणी मुंबईत रहाणार्‍या मोठ्या काकांकडून मुंबईची वर्णनं ऐकताना  अनेक गोष्टींनी आश्चर्याचे धक्के दिले होते. त्यातही सर्वात जास्त आश्चर्य वाटायचं ते  इथल्या मान उंच करून बघाव्या लागणार्‍या इमारतींविषयी . कारण एका छोट्याशा शहरात रहाणारी मी, फ़ार तर दोन मजली इमारतीच तोपर्यंत नजरेला पडलेल्या. मुळात आठ आठ दहा किंवा त्याहून उंच इमारती म्हणजे त्या वयात कायच्या काय वाटायाचं. त्यातही काका चाळीत रहायचे त्यामुळे तिथले किस्से ऐकताना हे एक वेगळंच जग आहे असं वाटायचं. लांबलचक चाळींची आणि उंचंच उंच इमारतींची वर्णनं ऐकली की, कशा काय बुवा इतक्या मोठ्या इमारती बांधत असतील आणि लोक कसे रहात असतील असा प्रश्न पडायचा.
    याची देहा मुंबई बघण्याचा योग खूप नंतर आला. मात्र लहानपणापासूनच मुंबई म्हणजे वेगळंच जग असावं असं वाटायचं, आणि  अर्थातच ते आहेही. आज परळ असो की गिरगाव, दादर असो की जुहू, वर्सोवा, इथल्या जुन्या इमारती (ज्या अजूनतरी अस्तित्व टिकवून आहेत) बघताना ऐंशीआणि आधिची मुंबई कशी असेल याची किंचितशी झलक मिळते.
टॉवर्सच्या विळख्यात, पॉश झालेली मुंबई तिची खरी ओळख, खरा चेहरा दिवसें दिवस हरवत चालली आहे. कोणे एकेकाळी व्यापार नावाच्या उन्हाळी खेळात एका चौकोनी तुकड्यावर अवतरलेली मुंबई हीच माझ्यासारख्या नॉन मुंबईकरची मुंबई. आताची मुंबई वेगळीच आहे. कात टाकून नवा चेहरा घेत असताना अजूनही कुठे कुठे या जुन्या खुणा जपलेले मुंबईतले रस्ते पॉश मुंबईपेक्षा जास्त जवळचे वाटतात. अगदी टिपिकल अशा चाळी. रंग उडालेल्या, वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत वाळलेलं काळपट शेवाळं अंगाखांद्यावर मिरवणार्‍या या चाळींच्या खिडक्यांतून वाळत पडलेले आणि खार्‍या दमट हवेवर अलगद उडत रहाणारे रंगीबेरंगी कपडे असोत की गॅलर्‍यांमधून पत्र्यांच्या डब्यातून रसरसून उगवलेली झाडं असोत. चाळीचं तिचं एक या सगळ्यासहित सौंदर्य आहे. कोणाला ते गचाळ चित्र वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही मात्र मुंबईचं चित्र गजबजलेल्या चाळींशिवाय आणि  कंपन्यांच्या  धूर ओकणार्‍या चिमण्यांशिवाय कोणे एकेकाळी अधुरं होतं. आज बहुतेक मिल्स बंद पडलेल्या आहे. शब्दश: नावापुरत्या या मिल्सचे कंपाऊंड राहिले आहेत आणि शेकडो कुटुंब चालविणार्‍या मिल्स पाडून त्याजागी उभे आहेत परदेशी ब्रॅण्डची उत्पादनं विकणारे चकचकीत मॉल्स किंवा कॉर्पोरेट ऑफ़िसेस.  मुंबईची ओळखच आता पुसली जाऊ लागली आहे. हे चूक की बरोबर हा विषयच नाही मात्र हळूहळू गायब होणार्‍या या चाळी आणि मिल्समुळे कुठेतरी आत काहीतरी हरवत चालल्याची भावना नक्कीच होते.
                       गेली अनेक वर्षं मुंबईच्या अगदी जवळ बगलेत राहूनही मुंबईशी तसा फ़ारसा संबंधच येत नव्हता. आता मात्र कामाच्यानिमित्तानं अनेक गल्लीबोळ फ़िरत असताना एक वेगळीच मेरीवाली मुंबई मला भेटते आहे. काम बिम हरवून या इमारती बघत भटकणं हा सध्याचा आवडता उद्योग झाला आहे. इथली जुनी मार्केटस, टिपिकल दुकानं, टिपिकल पारशी नावांनी उभी दुकानं, एक छान जुनाटपणा सगळं सगळं कसं प्रेमात पडावं असं. या गल्ल्यांमधून फ़िरताना, तेरा मुझसे है पेहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई....असं काहिसं होतंय. हे जुन्या इमारतींचं प्रेम आणि त्यांना फ़ोटोत बंदिस्त करणं आजूबाजूंच्यांसाठी हिचं काही खरं नाही असं वाटण्यासारखं असलं तरिही मला खात्री आहे, या गल्ल्यांशी, जुन्या इमारतींशी माझं नक्कीच काहीतरी नातं आहे.
जीपीएस नावाचं तंत्रद्न्यान आपल्याला आता कोणत्याही गल्लीतला पत्ता सहज शोधून देतं पण कधी कधी ते पत्ता शोधता शोधता अशाच एखाद्या अनोळख्या आणि अजिब गल्लीतूनही नेतं. मागे एकदा ताडदेवला जात असताना ड्रायव्हरनं सांगितलं की नेहमीच्या रस्त्यावर ट्रॅफ़िक दिसतंय. दुसरा रूट घेऊ का? जीपीएसवा सुंदरीनं रिकॅल्क्युलेट करत वेगळ्या रस्त्यावर नेलं. कधीतरी डोळे मिटले गेले आणि डुलकी लागली. डोळे उघडले तर कोणत्या तरी  गल्लीतून गाडी मुंगीच्या पावलानं चाललेली होती. मघाशी डोळे मिटण्यापूर्वी असलेला मोकळा ढाकळा रोड आता माणसांनी गजबजलेला होता. बहुतेक गर्दीनं बुरखे घातले होते किंवा दाढी वाढवून डोकं जाळीदार टोप्यांनी झाकलं होतं. अंगात टिपिकल  पठाणी ड्रेस होते. सर्वत्र उर्दू भाषेतले बोर्ड आणि परिचीत हिरवा रंग. कुठे आलोय


 काही कळेचना आणि मेंदूनं पटकन नोंद घेतली ती रस्त्याच्या बाजूनं असलेल्या प्रचंड मोठ्या ड्रायफ़्रूट विक्रीच्या होलसेल दुकानांनी. माझ्यासाठी ही नवलाईची गोष्टच होती. इतकी प्रचंड मोठी ड्रायफ़्रूट मार्केट माझ्या टप्प्यातल्या परिसरात होती आणि मी याबद्दल काहीच ऐकलेलं नसावं? दुकानांच्यावरच्या पाट्या वाचत परिसर कोणता आहे याचा अंदाज घेतला तर आम्ही मुहम्मद अली रस्त्यावर जीपीएस सुंदरीच्या कृपेनं अडकलो होतो. दुकानांच्या वरून नजर फ़िरत असतानाच सिग्नलला समोर आली ही ईमारत. हात आपसूक मोबाईलच्या कॅमेर्‍यावर गेला आणि ही फ़्रेम कैद झाली. हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. याहीआधी अनाहूतपणे अशा अनेक इमारतीनी फ़ोटो काढायला भाग पाडलं होतं. सुरवात कुठून झाली, पहिला फ़ोटो नेमका कोणता हे आता आठवतही नाही. मात्र परवा फ़ोटो गॅलरी स्वच्छ करताना पुन्हा एकदा या सगळ्यांवर नजर पडली. डिलिट करवेनात आणि त्यांचं काय करावं हेही सुचेना. या इमारती, या गल्ल्या काहीतरी सांगू पहातायत, त्यांच्यात एक गोष्ट दडलेली आहे असं नेहमी वाटत रहातं. कसं लिहायचंय आणि काय लिहायचंय काही ठरलं नाहीए , बघुया कसं कसं जमत जातंय. ये है बॉम्बे मेरी जान मालिकेतली ही पहिली इमारत, पहिला रस्ता. याल नां माझ्यासोबत या गल्ल्यांमधून भटकायला? बघुया कोणती मुंबई सापडते. :)