न्हाच्या तलखीत भाजून निघत असताना अचानकच गार वारा सुटतो.....पावसाचा गंध वाऱ्यावर बसून अलगद अंगणात उतरतो.....लहानपणी अशी हवा आली की वाऱ्यावर उडणारे भुरूभुरू केस आवरत आणि उगाचच फ़ुटणारं खुदुखुदु हसणं अंगणभर शिंपत, गोल गोल राणी म्हणत आम्ही अंगणात फ़ेर धरत असू तर वडिल माणसं आकाशाकडे मान वर करून बघत अंदाजानं एखादी दिशा पकडत आणि म्हणत, ’पाऊस पडलेला दिसतोय कुठेतरी’....आता अशी हवा गॅलरीतून हळूच टु बीचके च्या भिंतीमधून झुळझुळते आणि दुसऱ्याच क्षणाला वॉटस ऍपवर समजतं कोणत्या शहरातल्या कोणत्या गल्ल्यांमधून पाऊस कोसळतोय :) आजही अशीच पावसाळी हवेची गार संध्याकाळ अचानकच पसरली आणि इतकं छान वाटलं....घराबाहेर पडलं तर बहावा आपलं इंग्लीश नाव सार्थक करून समाधानानं डुलत होता....रस्ता भरून सोनेरी पाकळ्यांचा सडा पडलेला होता. निसर्गाचं किती बरं असतं नां, तो देतो त्या मापात पाप नसतं...भरभरून फ़क्त देणं आणि देणंच् त्याला माहित असतं.....आता रस्त्याच्या कडेनं सावलीची पालखी धरून उभा असलेला बहावा....रस्त्याच्या दोहोबाजूंनी उभ्या असणाऱ्या या झाडाचं नाव खरं तर अनेक वर्षं मला माहितही नव्हतं....बहावा माहित होता....त्याची माहिती होती पण वाटेत सोन्याच्या पायघड्या पडलेल्या असताना मात्र मी माझ्याच घड्याळाला बांधलेल्या कासऱ्यानं गरगर धावत होते आणि आज त्यानं माझ्या पावलांखाली हे सोनं उधळलं होतं.......आपले डोळे उघडतातच की कधीतरी....माझेही उघडले......किती वर्षं तुझ्याकडे न पहाताच धावले रे मी या सड्यावरून.... म्हणून मन कळवळून आलं......शांतपणानं समोर पहुडलेला रस्ता, त्याच्या दोहो बाजूंनी उभी बहाव्याची छत्री आणि त्यानं मनसोक्त शिंपलेला सडा....त्यानं आज नमवलंच अखेर.....सगळं विसरून मग रस्ताभर नुसतीच फ़िरून आले....तो ओला वारा, ती सोनेरी संध्याकाळ आणि मनात झिरपलेली शांतता.....थॅन्क्यु रे बहाव्या....! 
 

चवी ढवीच्या आठवणी

कोणी खाण्यासाठी जगतं तर कोणी जगण्यापुरतं खातं. खाणं कसंही असो एक गोष्ट मात्र कॉमन असते, खाण्याशी काही न काही आठवणी जोडलेल्या असतात. प्रत्येक रांधणारीचं आपलं असं एक रेसापीबुक असतं. अनेक पदार्थ कोठून  कोठून  शिकलेले असतात, कोणाकडून तरी शिकलेले असतात. करणाऱ्याच्या आणि खाणाऱ्याच्या डोक्यात सगळ्या आठवणींसहित तो पदार्थ  नोंद झालेला असातो. एखादा पदार्थ आपल्याला आवडायची कारणं अनेक असतात म्हणजे नुसताच तो चवीला चांगला झालाय म्हणून नाही आवडत तर तो खात असताना बरेचदा त्यावेळेसचं वातावरणही त्याला कारण असतं. कधीतरी धो धो पावसात चिंब भिजून जवळपास गारठून रात्रीच्यावेळेस घरी आल्यावर आईनं गरम गरम मऊ भात आणि कांदा घालून बनविलेली आमटी भुरकलेली असते. त्यानंतर दरवेळेस कांदा घातलेली आमटी आणि भात म्हटलं की मनात अलगद त्या दिवसाचा भात अवतरलेला असतो. म्हणूनच मग दरचवेळेस आमटी भात खाताना त्या दिवशीची ती मजा येतेच असं नाही. साधी पुरणपोळीचीच गोष्ट घ्या नां. होळीच्या दिवशी केलेल्या पुरणात आणि श्रावणी शुक्रवारी केलेल्या पुरणाच्या चवीत एक बारीकसा  फ़रक असतोच. श्रावणातल्या शुक्रवारच्या पुरणपोळीसोबत पुरणाच्या दिव्यांचा खमंग करपट वास सोबत करत असतोप. आईनं ज्या स्निग्धतेनं ओवाळलेलं असतं ती सय त्या दिवशी ताटातल्या पोळीवर पसरलेली असते. 
अशीच एक आठवण चकोल्यांची अगदी मनात खोल रूतून बसलेली आहे. मुळात गर्भारपणाचा काळ आणि डोहाळे हे एक अजब प्रकरण आहे. अमुक खावसं वाटणं आणि तमूक अजिबात न आवडणं सगळंच विचित्र. याला काही शास्त्रीय कारण असो नसो. हे होतं मात्र नक्की.  सानियाच्यावेळेस मी काहीच खायला नको गटात गेले होते. त्यातून आपण खात नसलो की लोकांना जोर चढतो. आग्रह कर करून खायला घालायचे आणि त्यानंतर माझा बराचवेळ ओक ओक कार्यक्रम चालू रहायचा. खाऊ घालणारा पापी तोंड करून बसायचा. कुठून हिला खाऊ घातलं असं त्याला व्हायचं. असो. तर नऊ महिने होता होता मला अमूक काही खा असं म्हणायचाच सगळ्यांनी धसका घेतलेला होता आणि अशातच सासर्यांच्या (बाबा) परिचयातल्या एकांनी रात्रीतल्या आवळेभोजनाचं आमंत्रण दिलं. आवळीभोजनही आणि डोहाळजेवणही. उत्साहात आमंत्रण स्विकारलं मात्र भीत भीतच आम्ही गेलो. काही मोजके लोक, छान सडा घातलेलं आंगण, मातीचा सुटलेला वास, येणारीला दिलेले मोगरीचे गजरे, टपोरलेलं चांदणं या सगळ्याचा मिळून एक छान आनंदानं भरलेला सुवास पसरला होता. माझे डोहाळे लक्षात घेऊन यजमानिणबाईंनी अगदी साधा बेत केला होता. चकोल्यांचा. (काहीजण याला वरणफ़ळं म्हणतात). नऊ महिन्यात जेवले नसल्यासारखी अधाश्यासारखी जेवले त्या रात्री. तशा चकोल्या त्यानंतर मी बर्याचदा बनवायचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही आणि मग नाद सोडून दिला. 
चना जोर गरम हा चटक मटक पदार्थही या डोहाळ्यांमुळेच ठाण मांडून बसला. त्यापूर्वी मी बऱ्याचदा रस्त्याच्याकडेला पसरट टोपलीत सुरेख ढीग रचून कडेने हिरवी मिरची, लालचुटुक टोमॅटो रचून उभे असलेले हे विक्रेते मी नेहमी बघायची, मात्र खाल्ला कधीच नव्हता. का ते माहित नाही. एक दिवस संध्याकाळी लक्ष्मी रस्त्यावरून जात असताना हुक्की आली आणि खाल्लाच तो चना जोर गरम. जीवाचं कैवल्य झालं! इतकी वर्षं या चटकदार पदार्थापासून स्वत:लाच दूर ठेवलं याबद्दल नाही म्हटलं तरी थोडा जीव चुकचुकलाच. त्यानंतर रतीब लावल्यासारखे आम्ही ऑफ़ीसमधून केवळ चना जोर गरम खाण्यासाठी लक्ष्मी रस्ता गाठायचो. 
                                                                                                      आणखी एक गोष्ट म्हणजे तसं पहायला गेलं तर अमुक एखादा पदार्थ कसा करायचा याची एक ठराविक पध्दतच असते मात्र तरिही काही जणांनी केलेले आयुष्यभर लक्षात रहातात. पुण्याचीच गोष्ट निघालीय म्हणून लगे हात सांगून टाकते, पुण्यातली एक अत्यंत म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मैत्रीण, संगीता. एखाद्याच्या हाताला चव असावी म्हणजे किती? या बाईनं पाण्याला फ़ोडणी दिली तरी तिचं अमृत बनावं अशी गत. तिला खाऊ घालायची हौस भारी आणि इतकं चांगलं चुंगलं मिळतंय म्हटल्यावर आम्ही जरा जास्तच लाडावलो. आजही तिच्या हाताची चव विसरणं केवळ अशक्य आहे. पुणं आणि खाणं म्हटलं की तिसरा शब्द संगीताच यावा ओठावर इतकं सगळं भारी प्रकरण.
तसंच नां, तिखट सांजा म्हटलं की आठवण येते आईच्या आईची म्हणजे आजीची आणि तिच्या  कराडातल्या त्या ऐसपैस स्वयंपाकघराची. चुलीतल्या खमंग निखार्याची, त्यावर तापत ठेवलेल्या दुधाचा वासाची एक खमंग चव त्या सांज्यात अल्लद मिसळून गेलेली असे.  म्हणून तर आजही  रवा भाजायला घेतला की मन वाड्यात गेलेलं असतं. तेच फ़ोडणीच्या दहीभाताचं. आमचं हटकेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर. लोक त्याला दहीभात लिंपायचे. शिवाय पिंड ही अशी भली मोठी, त्यामुळे दहीभात लागायचाही भरपूर. कोणाचाही भात लिंपायचा असला तरी आम्ही गाभाऱ्यात हजर रहायचो. पिंडीवर दहीभात लिंपण्याची ती कलाकुसर खूप नजरबंदीची असे. मग सगळं झाल्यावर गुरवकाका त्यातला आमचा वाटा स्टीलच्या डब्यात घालून किंवा पितळ्याच्या परातीत घालून वाड्यावर द्यायचे. आजी त्या भाताला फ़ोडणी घालायची आणि आम्हाला खायला द्यायची. काय चव असायची त्या दहीभाताची! 
केवळ आई आणि आज्याच सुगरणी असतात असं नाही हं! माझे वडिल, आम्ही त्यांना दादा म्हणत असू, तेही उत्तम स्वयंपाक करायचे आणि म्हणूनच आम्ही लहान वयात असताना आई गेली तरिही आमच्या पोटाचे हाल फ़ारसे झाले नाहीत. वांग्याच्या बारीक बारीक फ़ोडी घालून केले कांदे पोहे, दही घालून केलेली धिरडी, मिश्र भाज्या किसून त्याचा केलेला कुर्मा, घरात दही लावून बनविलेल्या चक्क्याचं श्रीखंड .....कितीतरी मोठी यादी. हे सगळं दादा एखाद्या सुगरणीला कॉम्प्लेक्स यावा इतकं ते भारी करायचे. मुळात त्यांना स्वत:ला उगाच थातुर मातुर खाल्लेलं आवडायचं नाही. ते स्वत: उत्तम रांधायचे आणि खायचेही. अगदी आई असतानाही अनेकदा रविवारी भरल्या वांग्यांच्या चमचमीत दादा स्पेशल बेत असायचा. त्यांचीच ही चांगलं चुंगलं खाण्याची आणि सतत काहीतरी नवीन प्रयोग करत रहाण्याची सवय माझ्यात आली असणार. शिवाय पदार्थ चांगला झाला नं तर काय  मनापासून दाद द्यायचे! मला स्वयंपाकही त्यांनीच शिकवला. सुरवातील फ़सायचा पण नंतर गाडी सुसाट सुटली. मुळात मला आईच़्या हाताची चव कमी आणि दादांच्या हातची चव जास्त लक्षात राहिलीय. म्हणून तर इतरांना जशी आईच्या हाताची चव जगभरातल्या चवी खाउन आल्यावरही हवी हवीशी वाटते तशी मला दादांच्या हातची चव वाटते. 
आज माझी मुलं जेंव्हा मला लाडात येऊन म्हणतात की आई अमूक एक भाजी तुझ्याइतकी कोणीच चांगली करत नाही तेंव्हा वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. माझ्या वडिलांवरून आठवलं माझ्या मुलांचा बाबाही काही काही पदार्थ त्याच्या पध्दतीनं बनवितो पण मुलांसाठी ते वर्ल्ड बेस्ट  असतात. उदाहरणार्थ मसाला कॉर्न. खरं तर तो काहीएक वेगळं करत नाही. मायक्रोवेव्हमध्ये उकडून त्यात मसाला घालतो पण मुलांनी सरळ सरळ शिक्का मारलाय ’आई बाबा तुझ्यापेक्षा भारी कॉर्न बनवतो’. मंडळाला मधूनच हुक्की येते आणि मला स्वयंपाकातून सुट्टी मिळते बाबा आणि गॅन्ग स्वयंपाकघरात धुमाकूळ घालत काय काय बनवते!कांदे घालून शाबुदाण्याच्या खिचडीपासून हाताला लागतील ते मसाले घालत बनवलेल्या अगम्य  भाज्या.  जेवताना अर्थातच कसं केलंय? हा प्रश्न आणि आई पेक्षा भारी हे उत्तर ठरलेलं. ही त्यांची गट्टी आणि मला एकटं पाडणं, लुटुपुटुची गटबाजी सगळं खूप खमंग असतं आणि मला खात्री आहे या सगळ्या पदार्थांची चव मुलांच़्या मेमरी कर्डात त्यांच्या बाबाच्या मायेसहित सेव्ह होणार आहे!!


 

दिल- दोस्ती-चहा आणि बरंच काही

र दुपारी कामात बुडून गेलेलं असताना मोबाईलवर कुठल्याशा खिडकीत टिंगतं आणि वाफाळता चहाचा कप पोस्ट करून कोणी व्हर्च्युअल चहाचं आमंत्रण देतं. वाफाळलेला चहा फोटोत बघूनही किती ताजं वाटतं म्हणून सांगू!
... एक कप चहा, दिवसाची सुरवात किक फ्रेश करतो आणि रेंगाळलेल्या दुपारची मरगळ झटकतो. आता जरी ग्रीन टी, हर्बल टी असे प्रकार फेसण बनले असले तरी खरे मुख्य प्रकार दोनच, घरचा आणि बाहेरचा. बाहेरच्या चहाचे आणखी काही पोटप्रकार, टपरिवारचा, हॉटेलातला, ईराण्याच्या हॉटेलातला, रेस्टॉरंटमधला, जरा उच्च हॉटेलातला, कुठे  काचेच्या ग्लासातला कुठे किणकिणत्या कपातला.
माझ्यापुरतं सांगायचं तर चहा घराचा असो की बाहेरचा, माझ्या अनेक चांगल्या आठवणी या चहाच्या कपाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अनेक जीवाभावाची मित्रमंडळीही :)
कॉलेजच्या दिवसातली सर्वात जास्त मिस होणारी गोष्ट म्हणजे टपरीवरचा चहा. एक कटिंग चारजणांत पिण्याची मजा परत आली नाही. आयुष्यात किती कप चहा प्यायला असेल, अगदी उडप्याच्या हॉटेलातल्या दुधाळ चहापासून ते तारांकीत हॉटेलमधल्या स्टाईलमारू चहापर्यंत.  गावोगावच्या टपऱ्यांवरच्या चायपासून रेल्वेतल्या चाय गरम पर्यंत. मात्र युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या अमऱ्याच्या टपरीवरच्या चहाची चव कुठेच सापडली नाही.
खरं तर मी काही चहाबाज गटातली नाही. तेंव्हा तर अजिबातच नव्हते. सकाळी डोळे उघडण्यासाठी म्हणून चहा आयुष्यात आला. त्याच्याविना कधी काही अडलंही नव्हतं. कॉलेजात जीवाभावाची मैत्रीण मिळाली, पक्की
चहाबाज, चहाचा आग्रह ईमानादारीत करणारी, कप भर चहा पिणं जीवावर यायचं मग तिच्याच कापातले दोन घोट मी  तीर्थासारखे भक्तिभावाने प्यायची. आजही कोणी ,'घे गं घोटभर चहा ' असा आग्रह केला की तिच्यासोबाताचे ते घोट घोट चहा हटकून आठवतात.
 मात्र चहा खरा अनुभवला युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या अमरच्या टपरीवर. काय व्हायचं नां की, तास तास भराची अगम्य भाषेतली लेक्चर्स ऐकून जीव मेटाकुटीला यायचा. त्यातून बरोबरीचे सगळे पक्के चहाबाज त्यामुळे लेक्चर संपलं आणि ब्रेक आली की जीवाच्या आकांतानं सगळे टपरी गाठायचे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रापण जायची अर्थात. मग एक घोट दोन घोट असा करत हा कटिंग आयुष्यात आला. या चहासोबत जी टिंगल टवाळी चालायची त्यामुळे तो अजून भारी लागायचा बहुतेक.

                         पुण्यात रहायला आल्यावर अमृततुल्य नावाचं बासुंदी चहा पाजणारं ठीकाण सापडलं. भर दुपारी उकाड्यात तिथल्या बेंचवर बसून तो दुधाळ वेलदोडायुक्त चहा म्हणजे महान गोष्ट होती. अखेर ते काही फार काळ झेपलं नाही आणि नाईलाजास्तव कॉफीपान सुरू झालं. या लोकमत स्पेशल कोफी ब्रेकनं प्रतिभा, आरती, पराग अशी तिकडी मिळाली.  पुन्हा या पेयानंही काही काळ झपाटलं. इतकं की एकदा तल्लफ आली तर सिंहगडावरही  प्रतिभा आणि चंद्रन  या वल्ली दोस्तांसोबत  काटक्या -  कुटक्या जमवून लुतुपुटुची चूल बनवून कॉफी बनवून प्यायाली एकदा.
पक्का चहाबाज नवरा आयुष्यात आल्यानं कॉफीला सोडचिठ्ठी देऊन चहाला आपलसं केलं. नवरा आणि चहा हे आणखी एक वेगळं सविस्तर लिहिण्यासारखं प्रकरण आहे. :) रीतसर संसारी वगैरे झाल्यावाराच्या मधल्या सुस्तावलेल्या काळात  आणखी एक चहा प्रेमी मैत्रीण मिळाली. सकाळचा- संध्याकाळचा चहा आणि त्यासोबतच्या धमाल गप्पा कितीतरी वर्षं आम्ही मनापासून एन्जॉय केल्या. माझी एक चमचा साखर आणि तिची दोन, माझा नुसता मग तर तिला कपासोबत बशीही! 'ग'  गोड गोड चहा आवडीनं पिणारी नावार्यानंतरची ही दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यातली !
खरं सांगायचं तर चहा काय आणि कॉफी काय, प्यायला सोबत असेल तरच खरी मजा. एकटीसाठी एक कप चहा उकळण कंटाळा आणतं. माझ्या तरी आयुष्यात चहा आणि मैत्री हे अतुट कोम्बिनेषन आहे.


ता.का.- आजची ही 'टी पोस्ट' हेरंब आणि तन्वीला अर्पण ;)

किमान आजच्यापुराती का होईना तुम्हा दोघांमुळे लिहिती झाले.  चियर्स !!!  :)छायाचित्र सौ.-गुगल