अस्वस्थ मी : नशा कशाची?

आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात....काही मनात झिरपतात, काही नाही...काहींनी विचार करायला होतं तर काहींनी बेचैनी जाणवायला लागते....अस्वस्थ व्हायला होतं....अशीच एक घटना नुकतीच मुंबईच्या एका कोपर्‍यात घडली....रितीनुसार त्याची बातमी झाली आणि सध्याच्या परंपरेला साजेसा व्हिडिओही व्हायरल झाला....मग त्यावर साधक बाधक चर्चा करणंही ओघानंच आलंच....कसं आहे नां, भारतातल्या लोकांना सध्या दोनच कामं उरलीत  व्हॉटसऍपवर पुचाट मेसेजच्या ओट्या भरणं आणि फ़ेसबुक/ट्विटरवर परस्परांवर राजकीय/अराजकीय विषयांवरून पिंका थुंकणं....आपल्याला द्न्यान असो अथवा नसो....विषयातलं गम्य असो अथवा नसो...प्रत्येक विषयावर प्रत्येकवेळेस मत मांडणं हा जणू संविधनात्मक हक्क बनलाय....असो. तर आत्ता निमित्त झालं (बहुतेक) दारूनं  झिंगून दंगा केलेल्या या मुलिच्या व्हिडिओचं....
 दारूच्या नशेत बेभान झालेली ही पहिलीच अशी केस आहे अशातला भाग नाही. आजपर्यंत कमी बातम्या आल्या नाहीत. अगदी  गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशा घटना वरचेवर घडत असतात. दारूच्या आणि कशाकशाच्या नशेत सुसाट गाड्या पळवत आजूबाजूच्या जिवांचा विचार न करत चिरडून टाकणारे बातम्यात झळकतात.... मिडियावाले चघळून चघळून बातम्या दाखवतात आणि मग नवी सनसनी आली की बातम्यावाले आणि लोकही या घटनांना विसरतात....  एका बाजूला प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची अतीघाई असण्याची अतीसंवेदनशिलता आणि या घटना ताबडतोब विसरण्याची संवेदनहिनता असं विरोधाभासी वातावर झालंय....  विशेषत: या ज्या नशेत गाड्या  आणि माणसं उडवणारे असतात, यात बड्या बापांचे बेटे आणि बेट्या त्यांच्या महागड्या गाड्या असतात तशीच सामान्य घरातली मुलंही असतात...म्हणजे मग इथे तसं बघायला गेलं तर सामाजिक समानताच आहे म्हणायची. नशेत गाडी चालवून रस्त्यावरच्यांना चिरडायची मक्तेदारी काय फ़क्त श्रीमंतांचीच असावी?  असो. तर हे जे नशेत वहावणं आहे ते मला अस्वस्थ करतं.
दारू पिणार्‍या (मर्यादीत आणि अमर्यादीत) कित्येकांशी बोलल्यावरही लोक दारू नेमकी का आणि कशासाठी पितात याचं समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. अनेकजण सांगतात की लिमिटमधे प्यायली की काही होत नाही. मला या लिमिटच्या भानगडीचं एक कळत नाही. खरं सांगायचं तर  लिमिटमधे दारू पिणं याहून भयानक विनोद तर आजपर्यंतच्या आयुष्यात ऐकला नाही. लिमिट म्हणजे नेमकं काय? ती कोणी ठरवयाची? मुळात जर दारू पिण्याचा हेतू (परमानंदी समाधी अवस्था) साध्यच होणार नसेल तर मग दारू प्यायचीच का?   असे आपले माझे बाळबोध प्रश्न आहेत. या प्रश्नांना उत्तरं देत या विषयातले जाणकार माझं द्न्यान वाढवायचा वेळोवेळी प्रयत्न करतात, त्यातलं सर्वात लाडकं विधान म्हणजे बियर आणि ब्रिझर हे पाण्यासारखेच असतात . हो का? सिरियसली? मग असं असेल तर एखाद दिवस पाणीटंचाई आहे म्हणून मुलांच्या शाळेच्या वॉटरबॉटलमधे बियर द्यावी का? असा चिडका प्रश्नही मनात येतो.....पिणार्‍यांकडे प्यायची हजार कारणं असतात. कोई गम में तो कोई खुशी में तो कोई एंवेही....यातल्या कोणत्याच कारणासाठी आजवर दारू प्याविशी न वाटल्यानं याचं तर्कशास्त्र माझ्यातरी समजण्यापलिकडचं आहे.
माझ्या लहानपणी आणि मी ज्या प्रकारच्या मध्यमवर्गिय संस्कारात आणि घरात वाढले तिथे दारू ही वाईटच आणि दारू पिणारेही वाईट हे ऐकवलं जायचं. म्हणून मग दारूला ग्लोरिफ़ाय करणं आजही जरा जडच जातं. यापैकी  वयाच्या पस्तिशीपर्यंत गळ्यात कसंबसं उतरलं की दारू पिणारे सगळेच वाईट नसतात. तरिही अजून तरी दारू चांगली असावी असं मत बनलं नाही...  भविष्यात बनेल याची शक्यताही नाही. काळ झपाट्यानं बदलतोय.,...जग बदलतंय....पुण्या मुंबईसारखी शहरं तर कायच्या काय बदललीत...सांस्कृतिक ...सामाजिक...आर्थिक सगळ्याच बाजूनं.....आता सोशल ड्रिंकिंग सर्वसामान्य आणि सर्वमान्य झालं आहे....अनेक सोकॉल्ड मध्यमवर्गीयांच्या घरातही बार असतात....मुलं आई वडिल दोघांना मजेत पिताना बघत लहानाची मोठी होतात...मग ही मुलं पुढे जाऊन पिण्याबाबत हाच कूल ऍटिट्युड बाळगून असतात....दारू पिणं वाईट की चांगलं हा मुद्दाच आता राहिला नाही....ओकेजनल ड्रिंकिग, सोशल ड्रिकिंग, लिमिटेड ड्रिंकिग या नव्या संकल्पना जन्माला आल्यानं दारूवरचा वाईट हा शिक्का पुसट झाला आहे. मला अस्वस्थता या गोष्टीनं येते की मुळात अजाणत्या वयातल्या या मुलांना ग्लास हातात धरावासा वाटतो याला जबाबदार कोण? पुन्हा हा ग्लास  हातात धरल्यानंतरची जबाबदारी, त्याचं भान यांना कोण देणार? प्यायल्यानंतर कसं वागायचं असतं याचे संकेत काय असावेत याचं शिक्षण द्यायची जबाबदारी कोणाची? आज आपण ज्या सहजतेनं आईवडिलांनी सेक्सएज्युकेशन मुलांना द्यावं म्हणतो त्या सहजतेनं या नशेबाजीबद्दल बोलावं असं म्हणतो का?  प्रत्येक पिणार्‍या आणि न पिणार्‍या पालकानी मुलांना समोर बसवून याबाबतचं योग्य ते मार्गदर्शन (?) करायला नको? आज न पिणार्‍या घरातली मुलं उद्या बाहेर जाऊन पिणार नाहीतच याचिही खात्री नाही. त्यामुळे हा प्रत्येकाचाच प्रश्न बनला पाहिजे. दारू पिण्याला हरकत नसणार्‍या पालकांनी मुलांना,  बाबानो प्या काय प्यायची ती,  पण पिऊन गाड्या चालवू नका, स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याचा तुम्हाला अधिकार नाही  हे सांगायला नको? स्वतंत्र्याच्या भलत्या संकल्पनांपायी मुलांना स्वैर सोडल्यानंतर ही बेभान मुलं रस्त्यावरच्या इतरांसाठी धोका होतात याची जबाबदारी कोण घेणार?  आई-वडिल म्हणून या सगळ्यात  तुमची काय जबाबदारी असायला हवी?  आता त्याहून महत्वाचं,  नशेची किक बसण्यासाठी मुलं दारूहून वेगळं काही ट्राय करू पहायला लागली तर ती जबाबदारी कोणाची? अंमली पदार्थांचं सेवनही कूल असतं का?
न पिणार्‍या आणि मुलांनिही याच्या वाटेला नाही गेलं तरच बरं असं वाटणार्‍या पालकांचा स्ट्रेस आणखिनच वेगळा. काय आणि कसं सांगितलं म्हणजे मुलं या वाटेवरही जांणार नाहीत याची मनात सतत सजग उजळणी. पिअर प्रेशर हा न पिणार्‍या पालकांसाठी आणखि एक चिंतेचा विषय...आपल्या मुलांनी पिणार्‍यांच्या आग्रहाला बळी न पडावं यासाठी काय करावं ही चिंता....
क्रेझ म्हणून....आनंद मिळावा म्हणून.,...जस्ट फ़ॉर फ़न....कूल वाटावं म्हणून.....उच्चभ्रू असल्याचा भास व्हावा म्हणून....ग्लास उंचावणारे पाहिले की काळजीच वाटते.... समाज कुठे चाललाय....आपण कुठे आहोत?...जिथे आहोत तिथे असणं चांगलं की वाईट हे आजच्या पुरोगामी समाजात कळेनासंच झालंय.....
हे सगळे या मुलिच्या निमित्तानं मनात आलेले विस्कळीत अर्धवट विचार आहेत...कोणला बुरसट वाटतील, कोणाला मध्यमवर्गिय तर कोणाला आणखि कसे पण दारू म्हणलं की हे सगळं मनात येतंच.... सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं, काही असो, बरं- वाईट काहीच न कळण्याच्या धुसर वयातल्या या मुलांना जपायला हवं इतकंच कळवळून वाटतं.....
# अस्वस्थ मी

आपल्या सगळ्यांनाच ही अस्वस्थता, बेचैनी कोणत्या ना कोणत्या बाबतीत जाणवत असते. विचार डोक्यात सतत घुटमळत रहातात. दोन्हीबाजूंकडचे विचार आपण एकटेच सतत करत रहातो. मला वाटतं आता हे विचार एकमेकांसोबत शेअर करूया. सुरवात मी करतेय पण हे अस्वस्थपण पुढे सरकवत राहू. तुम्हाला ज्या गोष्टीनं अस्वस्थ व्हायला होतं त्यावर जरूर लिहा आणि मग पुढे अशाच कोणा "अस्वस्थ मी" ला टॅग करा. कराल नां?
आणि हो, ही तळटीप लेखाली चिकटवायची विसरू नका.

माझा खो तन्वीला.