अलिकडे शब्दांशी तसं काही देणं घेणं राहिलं नाही
कोणी काही बोललं तरी टोचणं बोचणं उरलं नाही

ओशट ओशट मन आणि बोथट झाल्यात भावना
निसरड्या कानावरून शब्दांचे ओघळ नुसतेच घरंगळतात

--------------------------------------------------------------परवा अचानकच जुना गाव वाटेत भेटला
बालपणिचा काळ सुखाचा चटका लावून गेला
जुन्या गावातलं घर माझं आता बरंच पुराणं झालंय
सुरकुतलेल्या म्हातार्यागत डोळ्यात आस पकडून श्वास मोजतंय
जुनेपाणाचं पोतेरं अंगावर घेऊन
शेवाळलेल्या भिंतिंतून आठवणी गच्च पकडून
उभं आहे बिचारं अजुनही पाऊसवारा झेलत
 

.........रात्र पावसाचि

गोष्ट म्हटलं तर जुनी आहे पण खूप खूप नाही. तशी ताजी ताजीच, तर मुंबईच्या पावसाची नुकतीच तोंडओळख झालेली होती. अशाच धमाधम पावसात चिमणिचा पहिला वाढदिवस आला. घरून फ़ोनवरफ़ोन यायला लागले. तिकडे तुमच्या जास्त ओळखी आहेतच कोठे इकडेच करू पहिला वाढदिवस दणक्यात. हो नाही करता करता एक दिवस बंधुराज साक्षात प्रकट झाले. अखेरीस सामान सुमान भरावंच लागलं. बरं नवरा आणि बंधुराज म्हणजे दोन टोकं. एकाला प्लॆनिंग कशाशी खातात माहित नाही आणि दुसरा म्हणजे शिस्तीची शिट्टी सतत फ़ुरफ़ुररवणारा. जायचं कसं म्हणजे कशानं याचा मस्त घोळ घालून झाल्यावर दुसरया रात्रीची बसची तिकिटं काढली. सकाळी कुंकू ऒफ़िसला निघून गेलं आणि बंधुराज त्यांच्या कामांना उरकायला बाहेर पडले. अकरा सव्वाअकराच्या सुमारास बंधुराजांचा फ़ोन आला की आपण बसनं नाही दुपारीच त्याच्या मित्राच्या गाडीतून निघायचं आहे. हे सगळं नवरयाच्या कानावर घातल्यावर अपेक्शेप्रमाणे त्याचं उचकून वगैरे झालं, पण करतो काय बायकोचा भाऊ त्यातून सख्खा मित्र म्हटल्यावर आला चुपचाप रजा टाकून. आमच्या कुंड्लितला तो दिवस त्या घटकेपर्यंत साधा सरळ होता. त्यानंतर त्या सरळ दिवसाची जी वाट लागली ती आजही आठवली तरी हसायला येतं.
तर बंधुराजांनी सांगितलं की त्याचा मित्र अंधेरीतलं काम आटोपून दोन वाजेपर्यंत स्टेशनवर येणार होता, तिथे आम्ही त्याला भेटणार होतो आणि पुढे त्याच्या पनवेलच्या फ़्लॆटवर असणारी त्याची गाडी घेऊन सांगलीला जाणार होतो. हे सगळं अचानक ठरल्यानं आम्ही जमेल तेव्हढी घाई करून सामान सुमान घेऊन स्टेशन गाठलं. निघताना घरी फ़ोन करून रात्री जेवायला येत असल्याचं सांगितलं. साधारण पावणेदोन वाजता स्टेशनवर आम्ही पोहोचलो. दोनचे सव्वा दोन आणि अडीच झाले तरी मित्रवर्यांचा पत्ता नाही. तीनचे साडे तीन झाले तरी काही समजेना. मोबाईल करावा तर तो बंद. एव्हाना नवर्यानं माझ्याकडे रागानं, संतापानं आणि वैतगानं बघून गुरगुरून झालेलं होतं. स्टेशनवरच्या गर्दीनं पिल्लू वैतागलं आणि जमेल तितकं इरीटेट करायला लागलं. या सगळ्यात बंधुराज मात्र डोक्यावर बर्फ़ाची लादी ठेवून होते. अखेरीस नवर्यानं शक्य तितक्या शांतपणानं आणि ठामपणानं घरी परत जाण्याचा निर्णय सुनावला. दोन तास फ़ुकटचा टाईमपास करून आम्ही परत घरी आलो. रात्रीची तिकिटंही कॆन्सल केलेली असल्यानं आता काय करायचं? हा प्रश्न होता. अखेरीस आमच्या रामप्यारीतून जायचं ठरलं. सामान उचलून खाली आलो, डिक्कीत सामान भरलं, स्टार्टर मारला आणि लक्शात आलं की एकावर एक फ़्री असल्यासारखी दोन्ही चाकं पंक्चर आहेत. ती काढून आणेपर्यंत आणखी तासभर गेला. परत वर येऊन चहापाणी झालं आणि बंधुराजांचा फ़ोन खणखणला. पलिकडून त्याचा परमप्रिय मित्र उलटा आम्हालाच झापत होता की तो स्टेशनवर आम्हाला शोधत आहे आणि आम्ही घरी काय करतोय म्हणून? मग परत डिकितलं सामान काढलं आणि रिक्शात भरून स्टेशन गाठल. तिथून टॆक्सी पकडली आणि पनवेलकडे निघालो. बंधुराज आणि त्यांच्या मित्रात व्यवस्थित मिसकम्युनिकेशन झालेलं होतं. त्यानं सांगितलं होतं की दोन अडीच वाजता तो अंधेरीला जाणार आहे. असो. केवळ एक कप चहासाठी आणि गाडीचं पंक्चर काढण्यासाठी आम्ही घरी गेल्यासारखे झालं. आता तुम्ही म्हणाल की काढलंच होतं पंक्चर तर जायचं नां स्वत:च्या गाडीतून. तर त्याचं कारण असं की मित्रवर्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती आणि त्यातून जावईबापूंना घेऊन जायची सुर्सुरी दोघांना आलेली. टॆक्सीत बसलो तर तिथे दुसरंच नाटक. टॆक्सीत आम्ही चौघं आणि आमचं प्रचंड सामान कसंबसं कोंबलेलं होतं. टॆक्सी सुरू झाल्यावर समजलं की एका बाजुला काचच नव्हती. तणतणत वैतागत कसेबसे पनवेलला पोहोचलो. तिथून ती ब्रॆण्डन्यू कार घेऊन निघालो. साधारण अर्ध्या तासानं नवर्यानं बंधुराजांना विचारलं की अरे आपण नक्की कोणत्या मार्गे जातोय? त्यावर त्यानं नाही पण मित्रवर्यांनी सांगितलं की पेणच्या कॊलेजात त्यांना कसलंसं एक पार्सल द्यायचं होतं, जाता जाता तेव्हढं काम करून पुढे निघायचं होतं. गाडीतून न उतरता केवळ गेटवरच्या माणसाकडे ते पार्सल देऊन जायचं असल्यानं वाकडी वाट केल्यानं जितका वेळ लागणार होता तोच. एव्हाना सगळेजण गाडीत सेटल झालो होतो. अंधार झाला होता. मस्त जुनी गाणी लागल्यानं कधी पेण आलं समजलंच नाही. पेण आलं, कॊलेज आलं, कॊलेजचं गेट आलं पण ज्याच्याकडे पार्सल द्यायचं तो माणून सोडाच काळं कुत्रंही दिसेना. आता परत फ़ोनाफ़ोनी सुरू झाली. तो माणूस आमची वाट बघून निघून गेला होता. आता तो जिथं होता तिथं जाऊन पार्सल देणं भाग असल्यानं परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. त्यानं सांगितलेल्या खुणा म्हणजे मोठा निर्माल्यकुंड, बाजार वगैरे सगळं सापडलं पण तो माणूस काही सापडला नाही. सरळ सरळ जाऊन अखेरीस रस्ता संपला. तासभर अशी डोके आणि घसेफ़ोड केल्यानंतर भक्ककन उजेड पडला की तो माणूस पेणमधला पत्ता मुळी सांगतच नव्हता. तो जो पत्ता सांगत होता ते ठिकाण होतं अलिबागमध्ये. हे समजल्यावर हसावं की रडावं हेच समजेना. पार्सल देणं अगदी निकडीचं असल्यानं आणि आता एव्हाना उशिर झालेला असल्यानं ऐंशी तिथं पंच्याऐंशी असा विचार करून ब्रॆण्ड न्यू गाडीची चाकं अलिबागकडे वळवली. एव्हाना पाऊस चांगलाच कोसळायला लागला होता. सकाळी केलेलं जेवण आणि संध्याकाळचा चहा सोडला तर पोटात काही नव्हतं त्यामुळे कडकडून भूक लागली होती. अखेरीस एका घरगुती पध्दतीच्या हॊटेलात आम्ही वैतागत जेवण उरकलं(तसं बघायला गेलं तर त्या संबंध दिवसांत आम्ही तेव्हढी एकच गोष्ट शहाणपणाची केली होती). आता घड्याळ बघायचंच नाही असं ठरवल्यानं किती वाजलेत याला काही महत्व नव्हतं. त्यात पुन्हा गंमंत अशी झाली की एव्हाना तीनपैकी दोन मोबाईलनी बॆटरी संपल्याच्या नावाखाली माना टाकल्या आणि एका मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं आम्ही आमच्या घरच्यांच्या आणि एकुणच सगळ्यांच्या संपर्कातून गेलेलो होतो. अंदाजानं मघाशी सांगितलेल्या खाणाखुणांवरून आम्ही चक्क अलिबागला त्या सदगहस्थांना शोधलंच आणि ते ऐतिहासिक पार्सल त्यांच्या स्वाधिन केलं. त्यावेळेस रात्रीची किमान अकरा बिकरा तरी वाजून गेले असणार. पार्सल दिल्यावर सुटलो एकदाचे करत पुन्हा गाडीत बसलो. आता सांगली आल्याशिवाय थांबायचं नाही असं ठरवून किल्ली फ़िरवली. तिथून निघून पंधरावीस मिनिटंच झाली असतील आणि प्रचंड म्हणजे हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस कोसळायला लागला. समोरचं दिसणं मुश्किल झालं आम्ही एका रेल्वेच्या गेट समोरून गेलो आणि भावानं निरागस चेहर्यानं सांगितलं, किंवा विचारलं की, मघाशी येताना हे गेट नव्हतं, आता कुठून आलं? आल्या रस्त्यानंच परत फ़िरायला गेलो आणि मस्तपैकी वाट चुकलो. बरं इतक्या पावसात आणि तेदेखिल इतक्या रात्री वाट विचारायला आम्हाला भेटणार तरी कोण? अखेरीस तसेच अंदाजा अंदाजानं गाडी पुढे नेत राहिलो. कुठे आलो होतो आणि कुठे चाललो होतो, काही पत्ताच लागत नव्हता. बरोबर लहान मुलगी असल्यानं आणखिनच टेन्शन आलं. थांबायचं आणि सकाळी जायचं म्हटलं तरी सोय नाही, कारण आजुबाजुला डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं. रात्री झोपायला घरी जाणार होतो ते राहिलंच, पण सकाळच्या चहापर्यंत तरी पोहोचतोय की नाही याची शंका वाटायला लागली. मध्येच गाडी बंधुराजांनी चालवायला घेतली. अपरात्री कधीतरी त्याच्या अत्यानंदी आवाजानं तरतरी वाटली, त्यानं "खोपोलीकडे" असा बोर्ड वाचला. इतक्या तासांनंतर आम्ही ओळखिचं काहीतरी वाचलं होतं. काही नाही किमान आता खोपोली तरी गाठता येणार होतं. गरगर फ़िरून पहाटे कधीतरी आम्ही एक्सप्रेस हायवेला लागलो. जितक्या अकल्पितपणे रस्ता चुकला होता त्याच अकल्पितपणानं रस्त्यावरही आलो होतो. अजून हुश्श करून सुटलो एकदाचे म्हणतोय तर पुढचं संकट कपडे करून तयारच उभं होतं. रात्री झालेल्या अपघातामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली होती. त्यातून मुंगीच्या पावलानं निघायला प्रचंड वेळ लागला. असं करता करता सांगलीला घरी पोहोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजायला आले होते. आदल्या दिवशी अकरा वाजता यायला निघालेले आम्ही दुसर्या दिवशी अकरा वाजता पोहोचलो होतो. रात्री जेवायला येणार म्हणून जेवण तयार करून घरचे वाट बघत होते, पानं घेऊन तयार होती, गाद्या घालून तयार होत्या आणि आमचाच पत्ता नव्हता. त्यातून मोबाईल लागत नव्हते, बरोबर लहान मूल त्यामुळे घरचे जाम काळजीत होते. नवरा वैतागून अखेरीस म्हणालाच की चालत निघालो असतो तरी एव्हाना पोहोचलो असतो, पण करणार काय "एक तरफ़ खुदाई एक तरफ़ जोरूका भाई"....:)