पुन्हा एकदा ए फ़ॉर अ‍ॅपल

दोन तीन महिन्यांपूर्वी शमिनं उत आणला होता अगदी. घरभर पसरलेली खेळणी कमी पडत होती म्हणून आजोबांचा चष्मा, आजिची औषधं, ताईचा अभ्यास, सगळ्यांच्या चपला....अगदी दिसेल त्यावर तुटून पडत होते महाशय. सकाळी गुडबॉयसारखा सहाला वगैरेच उठून बसायचा मग तेंव्हापासून सगळ्यांना वात आणत सुटायचा. सगळं घर भिंतीवरचं घड्याळ विसरून गेलं होतं. याच्या मागे धावताना आम्ही सगळे आणि घड्याळाचे काटे यांची शर्यत लागत होती. अखेरीस सकाळ संध्याकाळच्या फ़ेर्‍यांनी त्रासलेल्या आजोबांनी,"आता याला अडकव बाई कोठेतरी" असं फ़र्मान काढलं. दुधात साखर म्हणजे सोसायटीतच असलेल्या शाळेत गोडोबा आवडीनं आपण आपले जात होते. एक दिवस पाहिलं तर चक्क दीडएक वर्षाची मुलगी शाळेत दिसली. मग त्याचदिवशी सगळे सोपस्कार पार पाडून अ‍ॅड्मिशन घेऊन आले. चार पाच दिवसात पिल्लू शाळेत जायला लागलं. एकच तासाची शाळा पण सगळेजण हुश्श म्हणून श्वास घ्यायला लागले. सुरवातिची रडारड संपल्यावर रितसर प्लेस्कूल सुरू झालं.....सानुच्यावेळेसही असाच संभ्रम पडला होता की शाळा कधी सुरू करावी? मग एक दिवस असंच अचानक जाऊन तिला शाळेत घातलं. पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडून आल्यावर मीच घळघळा रडले होते. सानु चार दोअन महिन्यांची असतानाच या नव्या शहरात रहायला आलेलो......आयुष्यात पहिल्यांदाच चोविस तास घरात बसायचं होतं.....घरकाम....इवलुसं बाळ.....सगळं आवरेपर्यंत कंटाळून जायला व्हायचं...अगदी एकटं वाटायचं कधी कधी....मग हळू हळू पिल्लू बोलायला लागलं, खेळायला लागलं...त्यानंतर कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला. दिवसरात्र आमची जोडगोळी सतत एकत्र असायची. तिला गोष्टी सांगताना, तिच्याशी खेळताना, मस्ती करताना दिवस भुर्रकन उडून गेले. दोन वर्षांपासून नव्या शहरात रहाताना तो इटुकला जीव माझा सख्खा सोबती कधी बनला समजलही नव्हतं. ज्या दिवशी ती माझं बोट सोडून शाळेत गेली त्या दिवशी ती खुष होती आणि माझ्याच आत तुटत होतं. काही दिवसांनी दोघिही रूळलो. तिची शाळा माझ्यासाठी पुन्हा नवा अनुभव घेऊन आली. तिच्यासाठी फ़्लॅशकार्डस बनवताना, गंमत खेळ बनवताना माझं बालपण पुन्हा एकदा नव्यानं मला अनुभवायला मिळत होतं. काय काय करत होतो आम्ही...गाणी म्हणत नाचायचो, दुकानातलं पुस्तक नको तू माझ्यासाठी मला हवं तसं पुस्तक बनव असा हट्ट केल्यावर खास तिच्यासाठी गोष्टींचं पुस्तक बनवलं तेंव्हा तर धमालच केली दोघिंनी. सानू, मी आणि आमची गोष्टीतली "दुरिया" आमची गट्टी अजुनही तशिच आहे, अगदी खास.....परवा सीडीवर एबीसी गाणं लागलं होतं आणि माझ्या पिल्लानं ’आई अ‍ॅप्प्पल’ असं बोट करून दाखवल्यावर लक्शात आलं की अरेच्चा! हे पिल्लुही झालं की मोठं. त्याची शाळा म्हणजे आजवर आमच्यासाठी फ़ारसं सिरियस अफ़ेयर नव्हतं. मात्र त्यानं अ‍ॅप्पल दाखवलं आणि तो "शाळेत" जातोय याची जाणिव झाली.
 

गेला पेशन्स कुणीकडे?

आईशप्पथ मला नां माझ्या आजीचं अलिकडे जाम कौतुक वाटायला लागलंय. माझ्या आजीला एक नाही दोन नाही, तर सगळी मिळून मोजून आठ मुलं. पुन्हा सगळी शिकली बिकली छान. एकापाठोपाठ एक आलेल्या पोरांना तिनं कसं काय वाढवून मोठं केलं असेल, याचं राहून राहून कौतुक वाटतंय. आमची इथे दोन पोरातच छप्पर उडायची वेळ आलीय. तर मंडळी या पोस्टचा विषय एव्हाना समजला असेलच. सकाळ जशी चढत जाते तसे चढत्या क्रमानं डोक्यावरचे केस अनुक्रमे वैतागानं, चिडचिडीनं आणि अखेरीस संतापानं ताठ उभे रहायची वेळ येते. आमचा हा मॉर्निंग शो शांतपणानं पहाणार्‍या सासुबाई कपालभाती करत करतच म्हणतात, "अगं किती वैतागता गं पोरांवर? पोरंच ती. ती असं वागणार नाहीत तर कोण? चिडू नये असं सारखं सारखं त्यांच्यावर. बरं तर बरं तुमच्या मदतीला निदान बायका तरी आहेत, आमच्यावेळेस आम्ही एका वर्षाचं अंतर असणारी तीन तीन मुलं कोणाच्याही मदतीविना कशी मोठी केली असतील? मुलं मोठी झाली आता नातवंडं आली तरी आम्ही अजून उभे आहोत. तुमचं आत्ताच असं मग आमच्याएव्हढं झाल्यावर कसं होणार? (आता संयमासाठी अनुलोम विलोम करण्याची वेळ माझी असते). जे सासुबाईंचं तेच माझ्याही घरच्यांचं. एकूण सगळ्यांच्या मते आजच्या पिढीत पक्षी माझ्यात (असं थेट बोलण्याची हिंमत कोण दाखवणार नाही का?)पेशन्स नावाची गोष्टच नाहीए. त्यामुळेच मला आजकाल प्रश्नच पडायला लागलाय, "हे पेशन्स म्हणजे काय असते रे भाऊ"? या प्रश्नाला जे उत्तर सापडलं त्याचा मतीतार्थ असा आहे,
१-घड्याळाचा काटा पटापट पुढे चालला असताना रजईत गुरफ़टून झोपलेल्या पिल्लांना शाळेसाठी दर अर्ध्या मिनिटानं एक हाक या रेटनं वेळेत उठवणं म्हणजे पेशन्स.

२-कपभर दूध, आपलं पातेलंभर रक्त आटवून त्यांना प्यायला लावणं म्हणजे पेशन्स.

३-आदल्या रात्रीसापासून घसा खरवडून सांगुनही स्कूल बॅग भरलेली नसताना अखेरच्या क्षणाला ती आपण चपळाईनं भरणं म्हणजे पेशन्स (बाय दी वे, पोरांची स्कूल बॅग भरणं ही सहासष्टावी किंवा सदुसष्ठावी कला म्हणून मान्यता देण्यात यावी असा माझा आग्रह आहे)

४-बारा वीस अशी अगदी ठोक्याला दारात उभी रहाणारी स्कूल बस तुमच्या नशिबात असेल तर किमान बारा एकोणीसला आपण पायर्‍या उतराव्यात या किमान अपेक्षेला फ़ाट्यावर मारणारी पोरं बसमध्ये नेऊन बसवणं म्हणजे पेशन्स.

५-वेणी घालायला बसल्यावर, "पण आई माझी ब्लॅक रिबिन काल हरवली" असं निष्पापपणानं सांगणार्‍या लेकीवर न खेकसणं म्हणजे पेशन्स

६-शनिवार रवीवार आरामात घालवल्यावर सोमवारी सकाळी सव्वाअकरावाजता शाळेत बाईनी अमूक प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितलाय असं थंडपणानं सांगणारी लेक आईला सुपरवुमन समजते यात तिचा काय दोष? पुन्हा हे प्रोजेक्ट म्हणजे अमकी स्टिकरं चिकटवा तमक्या प्रिंट मारा, क्लेपासून अमकं आणि ढमकं काहीतरी बनवा असले वेळखाऊ असतात. (हा मुद्दा जरा विस्तारानं सांगायचा मोह होतो आहे)(म्हणजे सिन कसा? तर सकाळी अचानकच लेकीला आठवतं की, रेसलर्सची माहिती आणि फ़ोटोग्राफ़्सचा प्रोजेक्ट सांगितलाय. [इकडॆ आपली वेळेशी कुस्ती सुरू होते]मग इकडे दप्तरात सगळं कोंब, तिकडे ते करत असतानाच नेट चालू करून गुगल्यावर माहिती शोध, ते करताना धाकटं पिल्लू चारवेळा बटनांवर हात मारून वैताग आणत असतं. मध्येच शाळेत जाणार्‍या लेकीला जेवायला वाढणं आणि ते ती पटापट खाईल हे पहाणं असलं अत्यंत कौशल्याचं कामही करावं लागतं. ती जेवत असतानाच तिच्या वेण्या घालतानाच धाकटं येऊन मागून ड्रेस ओढत, "आई च्ची च्ची" म्हणून दात काढून हसतं. अधीक माहितीसाठी- च्ची च्ची म्हणजे शी प्रकरण. तर तो उपक्रम पार पडल्यानंतर लगेचच भरपाई म्हणून त्याला खाऊ घालण्याचं काम, जे घरातून चारी ठिकाणी धावत करावं लागतं, अंगाशी येतं. इतकं होईपर्यंत ते प्रिंट ब्रिंट सगळं बदबदा टेबलवरून खाली आलेलं असतं. ते निटपणानं ठेवून शुज पासून रूमालापर्यंत सगळं शोधून काढून, अगदी ट्रेजर हंट खेळल्यासारखं,लेकीला तयार करून धाकट्याला काखोटीला मारून अखेरीस तिला बसमध्ये बसवून हात हलवून हुश्श करत परत यावं तर शु रॅकवर ती प्रोजेक्ट फ़ाईल तशीच बिचार्‍यासारखी पडलेली असते. की पुन्हा धावाधाव सुरू. हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते. बसवाल्याला गाठून फ़ाईल लेकीपर्यंत पोहोचवण्याचं काम पारपडेपर्यंत दिवस डोक्यावरून पुढे गेलेला असतो.) तर हे सगळं तोंडाचा पट्टा सुरू न करता शांतपणानं करणं म्हणजे पेशन्स.

७- शाळेचे शुज घातल्यानंतर त्याचा तुटलेला बेल्ट, क्लिप किंवा असलंच काही दुरूस्त करण्यासाठी बस येण्यापूर्वी दोन मिनिटं कोपर्‍यावरच्या कॉबलरकाकाकडे (हे लेकीनं दिलेलं नाव) धावत सुटणं आणि हे सगळं शांतपणानं पार पाडणं म्हणजे पेशन्स राखणं.

असो. तर मंडळी, माझ्यासारखाच थोड्याफ़ार फ़रकानं सगळ्यांचा पेशन्स कणाकणानं संपत असणार याची मला खात्री आहे. एकवेळ या यादीत भरच पडेल पण कमी नाही होणार. पुन्हा गंमत काय आहे माहितीय कां, या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. चुकून एखाद्या दिवशी तो असेल तर तोही वर आपल्यालाच सांगणार, "अगं किती चिडचिड करतीयस, हॅव सम पेशन्स" त्याला कळकळीनं सांगावसं वाटतं की मी ढीग हॅवींग रे पेशन्स पण ते आणायचे कुठून तो पत्ता सांग नां.