"आई तुझ्याच ठायी"....अप्रतिम!

सध्या असं आहे की रोजचा पेपर वाचायलाही फ़ुरसत मिळत नाही तिथे अवांतर वाचन कुठून करणार? पण अचानकच मंगला गोडबोलेंचं "आई तुझ्याच ठायी" हातात पडलं आणि वाचावच लागलं. "बाई" "आई" होते म्हणजे नेमकं काय होतं याचं वर्णन त्यांनी इतकं अप्रतिम केलेलं आहे की. एकदा वाचायला सुरवात केल्यावर ठेववेनाच. आई आणि "मूल" (मंगला गोडबोलेंनी प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे मुलगा आणि मुलगी यांचं संयुक्त संबोधन) हे नातं रूजतं कसं, फ़ुलतं कसं आणि वर्षं सरतील तसं कोमेजत कसं जातं याचं वर्णन इतक्या चपखल शब्दात झालंय की ज्याचं नाव ते. ही पोस्ट लिहिताना त्यातले उतारे देण्याचा मोह आवरू म्हणता आवरता येत नाहीए; पण उतारा द्यायचाच तर कोणता? या संभ्रमापायी त्या वाटेला जात नाहीए. अख्खं पुस्तक, शब्दन शब्द इतका सुंदर अनुभव देतं की ते वाचणंच जास्त आनंद देणारं ठरेल. एक नितांतसुंदर अनुभव देणारं लिखाण वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक प्लिज वाचाच असा हट्ट मी धरेन. वाचाल नां? आणि हो वाचल्यानंतरच्या प्रतिक्रीया इथे शेअर करायला विसरू नका.
 

निवारा



कोसळणारा पाऊस, सुसाटलेला वारा
जीर्ण झाडाच्या ढोलीत पाखरांचा निवारा

झाड आता थकलंय
पानांविना उसासत
टिपं गाळत बसलंय
करकरणार्या फ़ांद्यांना, उसवलेल्या मुळांना
चुचकारत सांगतंय,
"बाबांनो, इतके पावसाळे साथ दिलीत भक्कम
आता कच खाऊ नका, इवलुशा या पिलांना उघडं पाडू नका"