कानकोरणी


वेळ सकाळची अर्थात गडबडीची (पक्षी बुडाला आग लागल्याची).......ओ बेखबर ओ बेखबर....(ही मोबाईलची रिंगटोन आहे).....फ़ोन कुठल्यातरी चिवित्र (हा शब्द डॉ. गिरीश ओकांच्या सौजन्यानं)अ‍ॅन्गलमध्ये कानाल चिकटतो.....गॅसवर काहीतरी भाजण्याची सीमा ओलांडत, करपण्याचा टप्पा गाठत जवळपास जळण्याची सम गाठण्याच्या तयारीत....पायाला लटकलेलं वयवर्षं दोन.समथिंग (२ पॉईंट समथिंग) आतून आई>>> आई गं.....ची आर्त आळ्वणी करणारं वय वर्षं आठ.समथिंग.....फ़ोनवरची सखी (कानकोरणं क्रमांक तीन -खालून वर असं मिस इंडियासारखं...)अरे सून नां......(न सुनून करते गं काय बयो तू सुरू हो)....वो कल टिचर ने क्या बोला? (आता सव्वा ते सव्वापाच टिचर काही ना काही बोलतच असते; पण म्हणून मी काय शब्दा शब्दाचा हिशोब मागायचा की माझ्या बाळीकडून? बिचारी वर्गात सगळं इमानदारीत लिहिते आणि टिचर सांगते ते हावभावासहित घरी आल्यावर बदबदा ओतते, म्हणून इतरांनी, म्हणजे ज्यांची पोरं वर्गात लक्श देत नाहीत त्या आयांनी माझा असा छळ मांडावा?)......मी गॆसवर ते मघासचं "काहीतरी" खसाखसा हलवत..."क्या बोला था?"...सखी- [काको ४ (लक्शात ठेवा काको म्हणजे कानकोरणं)]अरे कुछ स्टिकर लाने केलिए बोला था, कैसे स्टिकर? मी सानुला-काय गं बाई टिचरनी काय मागवलंय? सानू शांतपणानं-स्टिकर नाही गं आज न्यायचे. ते फ़्रायडेला. आज मराठीच्या पोएममधलं चित्र ड्रॊ करून न्यायचंय....जसाच्या तसा निरोप काकोला दिल्यावर अरे ये मेरा लडका देख नां हमेशा कुछ अलगही सुनके आता है.....एव्हाना तव्यातल्या पदार्थानं जळून खाक होण्याचं चरण गाठलेलं असतं, वैतागून पोरानं पायाशी फ़तकल मांडलेलं असतं, सानू समोर येऊन अगम्य हातवारे करत असते, माझ्या थोबाडावर प्रश्नचिन्ह वैताग चिड चिड यांची मिक्स फ़्रुट मस्तानी पसरलेली असते.....पलिकडून सखी बोलायची थांबायचं नाव घेत नसते....मी काकुळतीन, सुन...सुनो....अरे हां....सून नां....पण समोरची त्रस्त सखी तिचं बोलून झाल्याशिवाय फ़ोन कट करणार नसतेच. शाळेतल्या बाईनी साधी चित्रं काढायलाच सांगितलेली असतात; पण ही पार शाळेच्या शैक्शणिक धोरणावरही बोलून घेते. अखेर मीच मोबाईलवर दया दाखवत (कारण तो चिवित्र अ‍ॅंगलमध्ये कानाशी चिकटून असतो) गॅस बंद करून पोराला मांडीवर घेऊन सोफ़्यात बैठक मारते अणि तिला बोलून देते. सगळं झाल्यावर अखेरचं वाक्य ती अगदी घाई घाईत बोलते, अरे चल मैं अभी रखती हूं. चल अभी टाईम नहीं है. मेरी बाई आई है. चल रख. अभी बाद में बात करेंगे. तपशिलातला फ़रक सोडला तर आठवड्यातून जवळपास पाच दिवस तरी हे सगळं घडतं. म्हणजे कधी कसली स्टिकर आणायची म्हणून हिला प्रश्न तर कधी क्लास टेस्टला नक्की काय विचारणार आहेत याचं प्रश्नचिन्ह. बरं तोडून टाकणं जमत नाही म्हणून ऐकायचं तर किती?
परिहार-१ अरे मी काय चौकशी खिडकी आहे का? रोज रोज अगदी नेमानं असं फ़ोन करून कान खात बसणं हिला जमतं कसं? जरा पोराना लावावी की शिस्त बिस्त की काय ती.
२-आधी स्वत: फ़ोन करायचा आणि मग तो कट करताना आव असा आणायचा की जणू काही हिला जबरदस्तीनं फ़ोनवर बोलायला लावलं आहे. अपमान अपमान आहे हा नुसता.


रात्री साडे अकरा वगैरे असली खतरनाक वेळ.खतरनाक यासाठी की पोरं झोपवण्याच्या प्रयत्नात नुकतंच यश आलेलं असतं. आता जरा निवांतपणानं चार पानं वाचून निद्राधीन व्हावं म्हटलं तर अशा वेळेस मोबाईलची रींग वाजते. फ़ोनवरचं नाव कमालिचा ताप देणारं असतं. पण फ़ोन टाळणं जिवावर येतं. कारण तेच जुनं. मुखदूर्बळता. कितिही ठरवलं की नाही करायचे असले लोक एंटरटेन. तरिही ते जमतच नाही. मनात शिव्या मोजतच फ़ोन कानाला लावून हॅलो म्हटलं जातं. साडे अकरावाजता ही सखी (कानकोरणं क्रमांक दोन) कोणत्याही कारणासाठी फ़ोन करू शकते. म्हणजे आजवर अशा अपवेळी मी तिच्या घरातली भांडणं सोडविण्यापासून तिला डायपरसारखी जिवनावश्यक गोष्ट देण्यापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत. कसं असतं नां की काही लोकांच्या बॉयोलॉजिकल घड्याळाचा पत्ता बेपत्ता असतो. म्हणजे ती रात्री बेरात्री कधिही वटवाघळासारखी भटकतात तर दिवसभर झोपा काढतात किंवा कधिही काहीही. कधी, काय, कोणती गोष्ट करावी याचं भान नसलेली ही लोकं आपल्यासारखीच इतरांना समजतात की काय कोण जाणे? म्हणजे अकरा ही हिच्यासाठी अत्यंत रम्य आणि छानसा फ़ेरफ़टका मारू गडे! अशी वेळ असली तरी इतर सामान्य म्हणजे, आमच्यासारख्या जीवजंतूंसाठी झोपेच्या आधीन होण्याची वेळ असते. हे हिला मान्यच नाही. म्हणून तर अकरा काय बारा काय एक काय आणि दोन काय रात्रीचा कोणताही प्रहर माझ्या मोबाईलची आणि घराची बेल वाजवण्यासाठी हिला निशिध्द नाही. बरं थेट बोलणं जमत नाही म्हणून आडून आडून सांगितलं तर वर पुन्हा अरे आप बहोत गुड गर्ल बनते हो. ग्यारा सोने का टाईम थोडेही है. मै आपकी वजह से गाली खाती हूं हे आणखी वर. बरं पुन्हा हिचे प्रश्न आणि समस्या इतक्या सुरस असतात की त्यावरची उत्तरं साक्षात ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही तिथे म्या पामराचा काय ठाव? पुन्हा गेले अनेक वर्षं हिच्या समस्या संपत नाहीत हे आणखी वेगळं दु:ख. सुरवातिच्या काळात नवर्‍याशी जमवून घेतानाचा ताप (तिला जितका तितका मला. कारण सतत कौन्सेलिंगचं काम सुरू). त्यानंतर मूल झाल्यावर त्या अनुषंगानं जितका ताप देता येईल तितका देऊन झाल्यावर मग अजून नवनवीन समस्या आहेतच. वेळ काळ न बघता कधिही येऊन कान खाण्याचा अधिकार स्वत:हून तिनं घेतल्यानं मी हताश, हतबल वगैरे. बरं पुन्हा तोंडी लावायला सासूच्या समस्या आहेतच (सगळ्याच सुनांच्या आपल्या सास्वांबद्दल तक्रारी असतात पण हिच्याइतकं वैविध्य मी आजवर पाहिलं नाही. उदा.- सासू पदरचे पैसे देऊन कोणालातरी हिच्यावर पाळत ठेवायला सांगते, सासू कसले कसले तंत्र मंत्र करते आणि असंच ब्ला ब्ला बरंच काही) तिकडे जरा खुट्ट झालं की ही आलीच पळत. बरं आली की तीन चार तासांची बेगमी. तिच्याशी बोलून बोलून आणि तिला समाजावून माझ्या तोंडाला फ़ेसच काय पण आणखिही बरंच काही येऊन जातं. पण ही म्हणजे दुखियारी बहू बेचारीचा चेहरा सोडायलाच तयार नाही. आजवर इतक्या समस्या असणारा जिवंत माणूसच मी पाहिलेला नाही. पुन्हा हिच्या समस्यांवर तोडगा सांगयचा की नाही हा एक वेगळाच प्रश्न. कारण कोणत्याही समस्येवरचा तोडगा हिच्या ट्रान्सपरंट मेंदूतून आरपार. म्हणजे कसं नां भोक पडलेल्या मडक्यात पाणी भरावं तसं. वरून कितिही बिसलेरीच्या बाटल्या का ओतेनात पण खालून पाणी छू मंतर. सुरवातीला मी तिच्या समस्यांनीच चकीत व्हायची (हबकायची हा शब्द जास्त अ‍ॅप. कारण कोणीतरी माझ्यावर मोहिनीमंत्र घातलाय असं तुम्हालाही कोणी सांगितलं तर तुमचं जे होईल तेच माझंही व्हायचं) म्हणून मग हातातलं काम सोडून मी तिच्या समस्यांशी झुंजायची. म्हणजे सीन कसा तर आधी दोन तीन तास ही सगळं ऐकवणार (त्यात पुन्हा शब्दात शब्द नाही म्हणजे आपणच साधारण सत्य ओळखून त्यावर तोडगा सुचवायचा) मग आपण (अर्थात मी) तिच्याशी संवाद साधत आणखी तासभर घालवणार आणि ती गेल्यावर पुन्हा तिच्याच विचारात पुढचे काही तास जाणार तर त्यानंतर ही मस्त टुणटुणीत भटकत असते आणि तिच्या समस्येची काळजी आपल्या चेहर्‍यावर. आता सरावानं किमान इतकं तरी समजलंय की तिच्या समस्याच मुळात फ़ार कानात घुसवायच्या नाहीत. पण त्या मुळातच इतक्या खतरनाक असतात की कानाला गिरमिट लागल्यासारखंच होतं.
परिहार-१-अरे का म्हणून आम्ही तुझ्या न संपणार्‍या समस्या सतत सतत ऐकायच्या. त्या संपवायच्या कशा हे तू पण शिक नां बयो. इतर अनेक कौशल्य जशी अंगात आहेत तसंच हे आणखी एक शिक बाई तेव्हढं.
२-एखादं माणूस इतक्या समस्या घेऊन जिवंत कसं राहू शकतं? मुळात हिच्याच आयुष्यात लोकं समस्या का निर्माण करतात? म्हणजे हिच्याच सासुला स्पायगिरी का कराविशी वाटते? किंवा असेच काही अचाट प्रसंग (जे साधारणपणे एकता कपूरच्या मालिकांत असतात) हिच्याच संसारात कसे?
३-आम्ही आपले संसार टुकिनं करण्याचे मर्ग शोधत असताना तुझ्या समस्यांनी आमचे कान का कोरून कोरून घ्यावेत. नाही म्हटलं तरी दुसरा पर्याय काय?

आता माझ्या आयुक्शातलं सर्वात वैतागवाणं कानकोरणं. एक आंटी, आपलं आयुश्य उमेदित घालवलेल्या घालवणार्‍या. असो बापडं. पण यांचा एक भयानक गैरसमज असा आहे की जी काय उमेद आहे ती यांच्याकडेच. जे काय छान छान गुण-कौशल्य आहेत ती यांच्याच अंगी. आम्ही सगळ्याजणी अगदी गरीब बिचार्‍या. आयुष्यात आनंद न पाहिलेल्या. अगदी अंडर प्रिव्हेज म्हणाव्यात अशा. पुन्हा हे सगळं त्यांचं त्यांनिच ठरवलेलं. म्हणजे समोरच्याला तोंड नावाचा अवयव असतो यावर त्यांचा अजिबात विश्र्वास नाही. (बहुदा) त्यांच्या मते ईश्र्वरानं देह बनविण्याचा कारखाना टाकला त्यावेळेस तोंड (विशेषत: बोलण्यासाठी जेंव्हा याचा वापर करायचा असतो) बसवलेला एकमेव पीस म्हणजे आंटी. त्यांच्यानंतर त्या वरच्याकडे तोंडच उरली नाहीत त्यामुळे सगळ्या जगाचं बोलण्याचं काम आंटीना करावं लागत असल्याचा एकूण अविर्भाव. एकदा का त्या सुरू झाल्या की कोणाच्या नाहीत. त्यांच्या मेंदूत किंवा जिथे शब्द तयार होतात तिथले सगळे शब्द, अक्षरं, काने, मात्रे, वेलांट्या, उकार संपल्याशिवाय त्या बोलायचं थांबतच नाहीत. समोरचा ऐकून ऐकून घामाघुम या बोलून बोलून घामाघुम पण यांचं आपलं सुरूच असतं. शिवाय ऐकून कान आणि मग डोकं तापतं ते वेगळंच. (मी विचार करतेय आता आंटी बोलायला लागल्या की कानात थंड पाण्यात बुडवलेले कापसाचे बोळेच घालावेत सरळ) बरं बोलणं म्हणजे काय विचारावं. भारतीय संस्कती केवळ यांच्या जिवावर भिस्त ठेवून असल्यासारखी. हिंदी म्हणून नका इंग्लिश म्हणू नका आता आम्हालाच तामिळ येत नाही म्हणून नाहीतर त्याही भाषेतलं भाषण ऐकायची सक्ती झाली असती. आंटी म्हणजे अक्शरश: "व्हर्बल डायरिया" आहेत. आता यावरूनच त्यांच्या संभाषणाची भयानकता लक्शात यायला हरकत नाही. कोणी बोलल्यावर कानात गिरमिट फ़िरवल्यासारखं होतं, कोणी बोलताना कानात नकोसा डास घुंईं घुईं करत असल्याची ईरिटेटिंग भावना येते तर आंटी बोलायला लागल्या की पंचेद्रियांवर बुल्डोझर फ़िरवून सगळे सेन्स जमिनदोस्त केल्यासारखं बधिर व्हायला होतं. नशिब शब्दाच्या धबधब्यात जीव बिव जात नाही नाहीतर त्यांना एकांतवासात सक्तीनं घालवावं लागलं असतं.
परिहार-१-तुम्ही वयानं, अनुभवानं आणि सर्वार्थानं मोठ्या आहात हे अगदी मान्य. पण म्हणून आम्ही गरीब बिचारे कसे? बरं समजा असलो तरी आमच्या उध्दाराचं काम तुम्ही का म्हणून करावं?
२-आपण बोलल्यावर समोरच्यानं अगदी चुप बसून ऐकावं ही कोणती सक्ती? अशा माणसांनी आरशात बघून बोलावं म्हणजे त्यांना समजेल की ती किती बोलतात
३- त्यांनी बोलत असताना समोरच्यानं काहीही मत व्यक्त करायचं नाही अशीच जर सक्ती असेल तर किमान ते कागदावर तरी उतरवून हातात द्यावं म्हणजे किमान ते आपल्या सवडीनं वाचायची संधी तरी मिळेल.
४-बोलण्याची हौस वगैरे सगळं ठीक असलं तरी ऐकणार्‍याचा किमान माणूस म्हणून का विचार करू नये. आपल्या तोंडाला भलेही विश्रांती नको असेल पण ऐकणार्‍याच्या कानाला विश्रांती लागते ही नैसर्गिक अडचण त्यांना कधी समजणार?

जाता जाता हळूच- माझं एक प्रचंड लाड्कं स्वप्न आहे की या सगळ्यांनी एकदा तरी किमान तोंड बंद ठेवून समोरच्याचं फ़क्त ऐकावं. आणि कानकोरणं क्रमांक एकच्या बाबतीत तर एकदम किलर स्वप्न आहे, अख्खा दिवस यांना महाराष्ट्रीय संस्कृतीपासून मनात जे येईल ते सगळं ठणकावून सांगावं.
 

"मे"ची भाषा

"बाबा बाबा पोई पोई क्क...बाबा क्क...बाबा क्क्क न्नां"...."ओरे पिल्लू आत्ता पोली नाय कलायची, आई पोली करेल हं"...."बाबा पोई<<<<" हा संवाद साधारण पाच सहावेळेस रिपिट झाल्यावर पिल्लाचं शहनाईवादन सुरू आणि बाबाची सपशेल हार. मी कामात आणि कान माझ्या दोन आणि सासुबाईंच्या एका पोराकडे. पिल्लू नंबर दोन बाबाला रिबिट मारत असतं आणि मोठ्ठं पिल्लू बाबाची गंमत ऐकत फ़िदी फ़िदी हसत असतं. अनुभवानं तिलाही माहित झालंय की या दोघांत पडायचं नसतं. नुसती गंमत बघायची. अखेर बाबा मला शरण येतो (तो येणारच असतो, चोवीस तासातून साडे चार तास पोर सांभाळून ते काय बोलतंय हे समजणार नसतंच),"ए, अगं हा काय म्हणतोय? याला भूक लागलीय का? तो पोळी मागतोय"....."अरे बाबा त्याला पोळी नकोय, तो म्हणतोय की रोली पोली गाणं म्हण", "ह्हे क्काय तरीच, कशावरून?" म्हटलं बघ तो हात असा गोल गोल फ़िरवतोय म्हणजे रोली पोली आणि पोळी हवी असेल तर तो आत येऊन डिश दाखवून पोली दे म्हणेल. त्याचं काय झालंय की पिल्लू आता जाम बोलायला लागलंय, इतकं की तिन दुणे सहा कान दुखायला लागलेत (अर्थात माणशी दोन कान) सकाळी डोळे उघडले की जे पिटपिटायला सुरवात होते ती झोपल्यावरच शांत. एरवी अखंड बडबड सुरू. (कधी कधी याच्या अखंड बडबडीला सानू वैतागते तेंव्हा माझ्याकडे येऊन म्हणते की आई याचं बोलायचं बटन जरा बंद कर नां गं, म्हटलं बयो असं बटन असतं तर आधी तुझं नसतं का बंद केलं? आणि बाबानं माझं बटन बंद करून वर ते फ़ेकून दिलं असतं. घरात कशी शांतता नांदली असती) नव्वद टक्के ओ की ठो समजत नाही, बाकी अंदाज मेरा मस्ताना...म्हणजे अंदाजानं समजून घ्यायचं. परवा बाहेर जेवायला गेलो होतो. सगळं झाल्यावर "एक्स्युज मी असं म्हणून बिल मागवलं" त्यानंतर हा अखंड काहीतरी ओरडत होता. खुर्चीवरून उठायलाही तयार नाही, त्याला काय म्हणायचं आम्हाला समजत नव्हतं तर आता यांना कसं समजावू असं त्याला झालेलं होतं. पाच दहा मिनिटांनी डोक्यात उजेड पडला की तो "एक्स्युज मी बिल लाव" असं म्हणत होता. पुरता बोबडकांदा असल्यानं त्याचं ऐकताना धमाल येते, सानुच्यावेळेस रिपिट टेलिकास्ट सुरू असल्यासारखं. एखादा शब्द यानं पहिल्यांदा उच्चारला की (म्हणजे तो आधिपासूनच उच्चारत असतो पण एखाद्या दिवशी आम्हालाच साक्षात्कार होतो की अरे याला हे म्हणायचं होतं होय?). मला लहान मुलांची ही स्टेज खुपच आवडते, म्हणजे नुकतीच तोंड फ़ुटल्यानंतरची. त्यांनी आपल्याला काहीतरी म्हणायचं आणि आपण "ओळखा पाहू बरे" चा खेळ खेळत रहायचं. सानुची "बोबलकांदा डिक्सनरी" बनवल्यानंतर आता शर्मनची बनविण्याचं काम सुरू आहे. "मे कूल जातो"- म्हणजे शर्मन स्कूलमध्ये जातो (मे= शर्मन) "आई क घे"- म्हणजे आई कडेवर घे (क=कडेवर) दादा च्च- म्हणजे "ताई" चल (ताई=दादा, मात्र हे केवळ सानुच्याच बाबतीत) मेंगा- मेघना चिचु- चिनू नॅन- स्वयम घू- ध्रुवल भेबे- बैरवी मुन्ना- मुद्रा श्याऊं- सानू पुहा-स्पृहा कोका- किल्ली का फ़ास्ट- गाडी फ़ास्ट चालव गो गो बसव - म्हणजे वर बसव (गोगो- वर) आई मी तु थ्ली पाच- म्हणजे मला एक पेन आणि कागद दे त्यावर मला वन टू थ्री लिहायचं आहे. मी बात्त ग्यातो बेबा- म्हणजे मी बॊटल घेतो मी बाबा बोनाई- मी बाबाशी बोलणार नाही गुडीत- म्हणजे गुडनाईट. गुम्मा- गुड मॉर्निंग बेव्वर- बेडवर आजोबा- अगं (महत प्रयासानं सध्याच आजोबा व्हाया आबा अशी प्रगती आम्ही साधली आहे) कोम्बाटी कोम्बाटी- कॊम्प्युटर (दोन इटुकले हाताचे पंजे छातीवर समोरच्या दिशेनं सरळ धरून डोळे मोठ्ठे करून)घाब्बं- म्हणजे मी घाबरलो चन्ना- चल नां मी सध्या खुष आहे, कधी कधी त्याच्या तापदायक वाटणार्‍या खोड्यांसहीत. त्याच्यासोबत ब्ला ब्ला बॅकशिप म्हणताना, नॊनी म्हणजे जॉनी जॉनी किंवा चांदोबा चांदोबा म्हणताना त्याला सरळ बोल शिकवताना त्याचे बोबडे बोल बोलावेसे वाटतात. त्याच्या सुरात सूर मिसळवून नानी तेरी मोन्नी को चोन ले गये म्हणताना त्याच्या इतकाच आनंद मलाही होत असतो.
 

मस्त दिवस

....आज सकाळी उठायचा कंटाळा आला होता. तरिही हिय्या करून उठले आणि पंधरा मिनिटात आवरून टेरेसवर धूम ठोकली. (अलिकडे आम्ही टेरेसवरच विकएंड योगा क्लास सुरू केला आहे. एक गुरूजी येऊन शिकवतात आणि अधून मधूनजोक बिकही सांगतात. सक्काळी सक्काळी तेव्हढीच मजा.) तर वर गेले आणि दुसर्‍याच सेकंदाला उठतानाचा कंटाळा गायब झाला. आज चक्क धुकं पसरलं होतं. एरवी डोंगरावरची झाडं, दूरवरचे हायटेन्शनचे टॉवर आणि बाजुच्या रोहाऊसेसची रांग अगदी चित्रासारखी ठळक दिसते आज सगळी मंडळी धुक्याच्या दाटसर कॅंडी फ़्लॉसमध्ये गायब झाली होती. टेरेसवर पाय ठेवला आणि तो ओलसर श्र्वास नाकपुड्यातून थेट मनात आणि डोळ्यातून सगळीकडे पसरत गेला. तोंडातून अगदी सहजणानं आलं,"वॉव्व, चक्क धुकं" (थॅन्कु नवरोजी दामटून उठवून क्लासला पाठवणी केल्याबद्दल. लोळत पडले असते तर दिवसाची ही अशी मस्त सुरवात कशी झाली असती?) सहाजिकच क्लास मस्त झाला. शवासन तर ग्रेट (गुरूजी हे फ़ारच छान करवतात, जवळपास संमोहित अवस्थेत [सेल्फ़ हिप्नॉटिझम] मनातले विचार बाजुला होऊन जो एक नवेपणा मिळतो तो झकास) डोळे उघडल्यावर पुन्हा एकदा तोच नजारा समोर आल्यानं शवासनातली शांतता मनात उतरली. घरी येईपर्यंत तसा उशिरच झालेला होता, आज डब्बा प्रकरण नसल्यानं रमाबाईंनी साहेबांच्या फ़र्माईशीवरून कांदेपोहे अगदी मूडमध्ये येऊन केले होते. त्याचा दरवळ दाराबाहेरच नाकात शिरला, क्या बात है, मिसेस कुलकर्णी तुमचा आजचा दिवस बाप्पाजिंनी अगदी "डिझायनर" करून टाकलेला दिसतोय.....शनिवारची सुट्टी पोरं गाढ झोपेत हसत साजरी करत होती....एरवी ऊठा ऊठाची भुपाळी म्हणत तासभर त्यांना जागवण्यात जातो, आज विचार केला जाने दो, एंजॉय करने दो. माझा मनसोक्त पेपर वाचून झाला आणि मग छोटा हूड रॉबिन दारातून खिदळत बाहेर आला. झोपेतून आज स्वारी न रडता बाहेर म्हणजे झोप झकास झाल्याचं लक्षण.....मग त्याच्या दादासोबत आत जाऊन भरपेट मस्ती (बाय दी वे माझा मुलगा माझ्या मुलिला अजुनही दादाच म्हणतो) करून मंडळी दिवसभर पिडायला फ़ुल्ल चार्ज झाली. सानू सायकल धुवायला खाली गेली तर शमु पण तिचं शेपूट धरून खाली जाण्यासाठी तयार झाला. एरवी अशा धांदलिच्या वेळेत तो खाली जायचा हट्ट धरून बसला की मला जाम वैताग येतो पण आजच्या दिवसाची गोष्टच वेगळी होती. विचार केला की चला आज आपणही खाली जाऊ. सगळा जामा निमा करून आम्ही सायकली धुवायला खाली उतरलो. पोरांनी काय एंजॉय केलं सगळं. शर्मनसाठी तर चक्क सरप्राईजच होतं. एरवी आई पाण्यात खेळू नको म्हणून ओरडत असते आणि आज चक्क पाण्यात खेळायला मुभा मिळाली म्हटल्यावर त्यानंही मापात पाप न करता मनसोक्त सायकल धुवून काढली. थोड्यावेळानं मलाही गंमत वाटून सुरवातिला त्याला मदत म्हणून आणि नंतर त्यात मजा यायला लागली म्हणून सायकल घासून पुसून लख्ख केली. काय मजा आली म्हणून सांगू! कित्ती वर्षांनी सायकल बियकल धुतली!......गेले काही दिवस एकेठिकाणी जरा ठणकावून नकार द्यायचा होता.....नको तिथे मुखदूर्बळपणा दाखवल्यानं नेहमी मी गोत्यात येते....आजच्या दिवसाच्या एनर्जिनं तो नकारही ठामपणानं कळवला आणि वाटलं, अरे कित्ती सोप्पं होतं हे, मी आपली उगाचच धड इकडे ना तिकडे करत हेलपाटत होते. गुड "नकाराचं सामर्थ्य यायला हवं" असले मथळे देऊन छापलेले लेख आठवले आणि नर्मदेतला पाषाण आपण आहोत हे समजलं.....असो. तर आजचा दिवसच इतका छान होता की वाटलं मी आज जे मनात आणेन ते करून दाखवेन.....संध्याकाळी याच मस्त मुडमध्ये चक्क आपणहून पोट्टेकंपनिला मॅगीचे नुडल्स खाऊ घातले. एरवी नुडल्स म्हटले की चवताळणारी मी आज आपणहून ते खाऊ घालतेय म्हटल्यावर पहिल्यांदा सानू जरा बिचकली (माझी आपली शिक्षेची पध्दत आहे, एखादी खुपवेळा सांगुनही नाही ऐकली तर मग आपणही तसंच वागायचं. ही मात्रा बर्‍याचदा लागू पडते) मग मात्र कंपनी तुटून पडली. खाताना म्हणाली की,"ओह, आई आज सॅटरडे ट्रीट म्हणून तू मॅगी केलीस"? (आमच्यात करार झालाय की आठवड्यातले पाच दिवस तिनं मी जी करेन ती भाजी चुपचाप खायची आणि शनिवार, रविवारी तिच्या आवडीच्या भाज्या आणि पदार्थ करायचे).....त्याच आनंदाच्या झटक्यात चक्क मुलांच्या बांबा न मागता चहाही मिळाला. तो पण आश्चर्यचकीत झाला.
 

खिडक्या


............रात्री झोपता झोपता विषय सुचला म्हणून सक्काळी सकाळी लिहायला घेतला तर आता सुरवात कुठून करायची हेच समजेनासं झालंय. कित्ती विचार दाटीवाटीनं उभे आहेत....मी आधी, नाही मी आधी असं चाललंय सगळं........निमित्त कशाचं? तर रात्री झोपताना खिडकी बंद करताना नेहमीप्रमाणे नजर समोरच्या वॉचमनच्या केबिनकडे गेली, तिथे जाग दिसली आणि रोजच्या निश्चिंत मनानं झोपायला गेले.....आणि विचार आला की केवळ त्या खिडकीतून येणार्‍या उजेडाची ही कसली सुरक्षितता?....पण वाटतं खरं निश्चिंत. मग वाटलं की समजा आपल्या घराला खिडकी नसतीच एकही तर??? तर काय झालं असतं? शी, किती बंद बंद कोंडून ठेवल्यासारखं वाटलं असतं.....कित्ती साधी गोष्ट, आपण घर घेतानाही पहिल्यांदा काय बघतो तर खिडक्यांमधला "व्ह्यु"....खिडकी म्हणजे काय आहे मग? तर मोकळा श्र्वास.....खुलेपणाचा मोकळा ढाकळा अनुभव....नाहीतर सगळं बंद बंद असल्यासारखंच वाटलं असतं....आपल्या नेहमिच्या कामातूनच अगदी सेकंदभाराची नजर बाहेर टाकली तरी कित्ती बरं वाटतं, आयुष्य वहातं असल्यासारखं....खरं तर खिडकीतून रोज काही ग्रेट दिसत नसतं...रोजचाच नजारा सगळा... पहाटे येणार्‍या दुधाच्या व्हॅन, त्यांच्यानंतर गाड्या पुसायला येणार्‍या मुलांची लगबग....त्यांचे अगदी ठरलेले कपडे, डोक्याला बांधलेले उलटे रूमाल.....पेपरवाले, दूधवाले, कामवाल्या बायकांची इकडून तिकडे चाललेली धावपळ, चहाच्या कपासोबत, ताज्या वर्तमानपत्रासोबत, भाजी चिरताना, डबा भरताना हात कामात आणि नजर सवयीनं अधून मधून बाहेर......मग सुरू होते शाळेच्या बसची ये-जा.... अगदी मिनिटाच्या हिशोबावर घड्याळाचा काटा सांभाळत येणार्‍या बस आणि त्यात चढणारी मुलं....काही बस येतात आणि निघतात तर काही कर्कश्श हॉर्न वाजवत ताटकळत उभ्या.....वेळेत येणारी बस आणि उशिरा पोहोचणारी तीच मुलं.....हे असंच दहावीपर्यंत चालणार बहुतेक.....नेहमिच्यातला एखादा चेहरा आणि त्याला सोडायला येणारी आई दिसली नाही की डोळे आणि मन नोंद घेऊन ठेवतं.....काय झालं बरं? आज शाळेला का दांडी?....ऑफ़िससाठी धावत पळत बस गाठणारे नेहमिचे "तसे ओळखिचे" चेहरे....सकाळ चढत जाऊन बारा साडेबारापर्यंत सुस्तावते....थोडावेळापुरता तुरळक बसचा, रिक्षांचा आवाज...एखादा खडखडत जाणारा ट्र्क, रिक्षा बोलवण्यासाठी वॉचमनची वाजलेली शिट्टी....चार वाजून दिवस उतरायला लागला की परत परतिची सुस्त धांदल....बसमधून मळलेले, चुरगळलेले युनिफ़ॉर्म घालून उड्या मारून बाहेर पडणारी खिदळती मुलं....हातात भाज्यांच्या पिशव्या सांभाळत त्यांना न्यायला आलेल्या आया.....बसमधून, रिक्षामधून परतणारी ऑफ़िसवाली मंडळी.....खेळायला बाहेर आलेली सुळसुळणारी छोटी छोटी पोट्टे मंडळी.......सायकल, फ़ूटबॉल....हसण्याचे, गप्पांचे आवाज, गाड्यांचे बाईकचे इकडून तिकडे, तिकडून इकडे सततचे येणे जाणे......अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत असणारी वर्दळ......हे सगळं डोळ्यातून मनापर्यंत पोहोचतं खिडकीच्या माध्यमातून.....अशी सतत बाहेरच्या जिवंत जगाशी बांधून ठेवणारी ही खिडकीच नसती तर?......
....अशिच आणखी एक बांधून ठेवणारी खिडकी......कॉम्प्युटरवर काम करता करता नजर खालच्या खिडकीत जाते.....कोणी ना कोणी या खिडकीत अधून मधून डोकावत असतं....अगदी भिंतीपलिकडे असणार्‍या मैत्रिणीपासून सातासमुद्रापलिकडच्या मैत्रिणीपर्यंत.....जुन्या शाळुसोबत्यांपासून भावंडांपर्यंत.....मामा, काकांपासून नेटवर ओळख जालेल्या "चिल्लर पिल्लर" पर्यंत.....कोणी ना कोणी घंटी वाजवून हाय हॅलो करत असतं.....कधी मजा मस्ती, कधी हवापाण्याच्या गोष्टी तर कधी अगदी आतला संवाद.....या सगळ्यांशी गप्पा मारता मारता काम कसं युं संपून जातं....काम संपल्यावरही गप्पांचा फ़ड इतका रंगुन जातो की खिडकी बंद करणं अगदी जिवावर येतं.......सगळं मित्रमंडळ एका टिचकीच्या अंतरावर ठेवणारी ही खिडकी कट्टा गप्पांचा फ़ड मस्त रंगवून ठेवते.....रात्री अपरात्री काम करतानाचा एकटेपणा चुटकीत घालवणारं हे मंडळ असं खिडकीतून डोकावत रहातं आणि घड्याळाचा काटा कुठे चाललाय याच्याशी देणं घेणं रहात नाही.....कधी कधी मात्र या खिडकीत कोणी डोकावतच नाही....आलं तरी गप्पा जमत नाहीत.....खिडकी उघडीच असते....सगळे आपल्या कामात व्यग्र असतात....अशावेळेस मिनिटा मिनिटाला कोणी आलं कां म्हणून खिडकीवर टिचकी पडते.....या दोन खिडक्यांत डोकावणं हा दैनंदिनिचा भाग बनलाय......या पोस्टचा अखेर काय असावा म्हणून कधिची विचार करतेय....मग विचार केला की ज्याची सुरवातच नाही केली त्याचा शेवट तरी कशाला? अखेर हा काही ललित लेख वगैरे नाही....मनात डोकावलेले विचार उतरवावेसे वाटले इतकंच......
 

अ से अभ्यास

आजही इतक्या वर्षांनी जानेवारी महिना उजाडला की नकळत कापरं भरतं. स्वप्नात यायला लागतं की, इकोनॉमिक्सचा पेपर आहे आणि आदल्यादिवशीही आपल्याकडे (पक्षी माझ्याकडे) नोटसच्या नावाखाली चिटोरंही नाही. किंवा वर्षभरात ओसीचं पुस्तक आणयाचंच राहून गेलेलं आहे. पेपर लिहायला बसल्यावर काही म्हणजे काही जाम आठवतच नाहीए आणि या सगळ्यावर वरताण स्वप्न म्हणजे काही वर्षांपूर्वी मला जे वाटलं होतं नां की मी पास बिस झालेय ते खरं नाहीच. अजून पिक्चर बाकी आहे. हे सगळं कमी म्हणून की काय असली सगळी हॉरर स्वप्नं मला पहाटेच पडतात. (पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात नां, माझा तसा काही विश्वास नाही पण...विशाची परिक्शा सांगितलिय कोणी नाही का?) स्वप्न पडून झोपेचं वाट्टोळं झाल्यावर दरदरून घाम येतो, प्रथम डोळे नुसतेच उघडतात मग हळूहळू जाणिव व्हायला लागते आधी स्वत:च्या शरीराची आणि मग आजुबाजुला पसरलेल्या अस्ताव्यस्त तीन शरीरांची. ही जाणिव झाल्यावर स्वत:लाच मग बाजावते की नाही नाही हे सगळं स्वप्न होतं आणि ते संपलं. वास्तव समोर पांघरूणात पसरलं आहे. (हे वास्तव/ वास्तवं, जागं/जागी झालं/झाली की चटाचट चटके. धरो तो चावेगा छोडो तो भागेगा समदाच लोच्या म्हणजे डोळे मिटून परत झोपावं तर उरलेला पेपर लिहावा लागणार आणि जागच रहावं तर आणखि एक छळकुटा दिवस असा फ़िदी फ़िदी हसत पहाटेपासून समोर उभा). तरिही स्वत:च्या टक्क उघड्या डोळ्यांवर जरासुध्दा विश्र्वास न ठेवता मी दूरवर पसरलेल्या नवर्‍याला गदागदा हलवून जागं करते (बिचारा हा इमानदार प्राणी इमानदारीत डिग्रीधारक झालाय तरीसुध्दा माझ्या स्वप्नांचा जाच सहन करतोय) गाढ झोपलेल्या नवर्‍याला जागं करणं हे महापातक असलं तरी ते करून जीव मुठीत घेऊन मी त्याला मला वाईट स्वप्न पडल्याचं सांगते. पूर्वी माझा भेदरलेला चेहरा पाहून तो बिचारा टकटकीत जागा व्हायचा आणि माझी समजूत घालून झोपवायचा. आता इतक्या वर्षांनंतर त्यालाही माझं हे दरवर्षी येणारं स्वप्न माहित झालंय. मी जग बुडल्यासारखं त्याला गदागदा हलवून जागं करते आणि मग तो हं असा हुंकार भरून काय झालं विचारून झोपुनही जातो. (मला भितीयुक्त शंका आहे की, आणखी एखाद दोन वर्षांनी तो, "झोप गं आता उद्या नोटस आणून देतो" असं सांगेल की काय?) आता हे सगळं आजच आठवायचं कारण काय? तर काल टिव्हीवर पारले जी, जी माने जिनियसच्या बिस्कुटांची जाहिरात पाहिली. ती पोट्टं खायला (गिळायला म्हणू?) तरास देतं ती नव्हे, दुसरी, रात्री रात्री जागून अभ्यास केलेली. तर ती जाहिरात आणि आम्ही डिट्टो म्हणजे अगदी सेम टू सेम. जून ते डिसेंबर हे महिने "अ‍ॅकॅडमिक कॅलेंडर"मधून आम्ही स्वच्छेनं हद्दपार केले होते. जे काय असेल ते जानेवारी उजाडल्यानंतर. नवं कॅलेंडर लागलं रे लागलं की आता अभ्यास सुरू हं, टीपी बास झाला असं एकमेकिंना बजावायचो. ग्रुप म्हणाल तर सहाजणिंचा. पण घट्ट मैत्री म्हणाल माझी आणि माझ्या एका जिवलग मैत्रिणिची. तर जानेवारी महिना सिरियसनेसचं बेअरींग घेण्यातच उलटायचा. फ़ेब्रुवारीत वह्या पुस्तकं साफ़सुफ़ व्हायची. फ़ेब्रुवारी संपत आला की कधितरी परिक्षांची चाहूल लागायची. मग चौफ़ेर वारू उधळायचा. नोटस जमव, पुस्तकात डोकं घालून महत्वाची टिपणं काढ, आणखि उत्साह असेल तर ती लिहून काढ असले लघुउद्योग सुरू व्हायचे. खरी गंमत यायची ती टाईमटेबल लागल्यावर. कोणाच्या घरी अभ्यासासाठी रात्री जमायचं यावर तासदोन तास खल केल्यावर एखादा निर्णय लागायचा आणि जेवणं बिवणं आवरून रात्री आपापली वह्या पुस्तकं घेऊन आम्ही जमायचो. आता जमल्या जमल्या लगेचच अभ्यासाला कसं लागणार? मग जरा गप्पा टप्पा झाल्यावर चहा घेऊन अभ्यासाला सुरूवात व्हायची. तोवर घड्याळानं दुसर्‍या दिवसावर टुककन उडी मारलेली असायची. जरा तास दोन तास जातायत तोवर कोणितरी पेंगायला लागायचं, मग पुन्हा एकदा चहा सोबतिला ऑल इंडियावरची जुनी गाणी, हळू आवाजातल्या गप्पा आणि खिदळणं झालं की कोणितरी एक दटावायची की पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं जायचं. जरा अर्धा तास सरला की कोणितरी मावळा धारातिर्थी पडलेलं असायचं. पुस्तक नाकावर घेऊन सपशेल आपटी. मग वातावरण निर्मिती व्हायची आणि एक एकजण हत्यारं खाली टाकून निद्रादेविला शरण जायची. सकाळी हळूच आपल्याला कोणी बघत नाहीए असं पाहून अंथरूणातच पुस्तकात डोकं खुपसून बसलं की नंतर उठणारीला वाटायचं बाप रे! ही रात्रभर जागीच आहे की काय? हे असं सगळं परिक्षेच्या दिवसापर्यंत चालायचं.प्रत्येक विषयासाठी सहा सहा दिवस केलेली विभागणी प्रत्येक विषयासाठी सहा तास या गतीवर यायची. परिक्षा सुरू झाली की आणखिनच धमाल. तीन गाड्यांवर सहाजणी जायचो तेंव्हाही गाडीवर मागे बसलेली एकजण जाता जाता महत्वाचं काही तरी वाचून दाखवायची. जिनं जिनं ते आधिच वाचलेलं असेल त्या मनात उजळणी करायच्या आणि ज्यांनी ते यापूर्वी नजरेखालून देखिल घातलेलं नसेल त्यांच्या पायाखाली ढुम्म्म!!! मग अगदी महत्वाचे दोन तीन मुद्दे उजळले जायचे. (हे मुद्दे लक्षात ठेवण्याचे आमचे असे काही युनिक मार्ग होते. त्यात मूळ मुद्दा बाजुला असायचा आणि भलत्याच उपमांनी तो लक्षात रहायचा. मला अजूनही एक मॉडेल आठवतं ज्याची डायग्राम कशी आहे हे सांगताना माझ्या बहाद्दर मैत्रिणिनं सांगितलं की, बियरचा ग्लास खिडकीत ठेवला तर कसं दिसेल? तशिच आहे डायग्राम. भले हो! इथे कोणाच्या बापसानं बियरचा ग्लास भरून खिडकीत ठेवला होता? पण इमॅजिनेशन असलं जबरी की विचारूच नका. तर त्यावर कडी म्हणजे हिच डायग्राम त्या दिवशी पेपरात विचारली. योगायोगानं आमची आडनावं एकाच अद्याक्षरापासून सुरू झालेली असल्यानं ही महान मैत्रिण माझ्याच वर्गात होती. पेपर वाचल्या वाचल्या तिन एक्सायटेड होऊन मला ग्लास ग्लास असं कुजबुजत्या स्वरात सांगितलं. तिची ही कुजबुज जवळपास अर्ध्या वर्गानं ऐकली आणि नंतरचा एपिसोड मी सांगायलाच नको. असो. तर मुद्दा काय की अभ्यास वगैरे लक्षात ठेवायची आमची आपली एक पध्दत होती) अशा पध्दतिनं इकॉनॉमिक्स म्हणू नका, अकाऊंटस म्हणू नका, ओसी म्हणू नका सगळ्या पाचच्या पाच वर्षांच्या विषयांची आपल्या परीनं वाट लावल्यावर आता अशी स्वप्न यावीत म्हणजे काय? असली स्वप्नं पडली की मला सकाळी सकाळी गाणं म्हणावसं वाटतं, "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा......"


असो. आता पोस्टमध्ये न बसलेला मुद्दा जो सांगितल्यावाचून दी एंड होणं शक्यच नाही.-एका वर्षी इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या आदल्या दिवशी दिव्या भारतीनं उडी मारून जीव दिला आणि आम्ही अख्खी रात्र तिला श्रध्दांजली देत बसलो. पहाटे पहाटे कोणितरी दु:खद धक्क्यातून सावरलं आणि दहा वाजता पेपर द्यायला जाण्याची आठवण करून दिली. त्यानंतर आमचं जे रॉकेट झालेलं होतं ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.

मुद्दा क्रमांक दोन- या पोस्टसाठी "कोई लौटा दे...."चा टॅग चिकटवला असला तरी मला हे असले दिवस परत फ़िरून अजिब्बात नकोयत. हां त्यावेळेसची धमाल चालेल पण बाकिचं आता परत नको.
 

पुन्हा एकदा ए फ़ॉर अ‍ॅपल

दोन तीन महिन्यांपूर्वी शमिनं उत आणला होता अगदी. घरभर पसरलेली खेळणी कमी पडत होती म्हणून आजोबांचा चष्मा, आजिची औषधं, ताईचा अभ्यास, सगळ्यांच्या चपला....अगदी दिसेल त्यावर तुटून पडत होते महाशय. सकाळी गुडबॉयसारखा सहाला वगैरेच उठून बसायचा मग तेंव्हापासून सगळ्यांना वात आणत सुटायचा. सगळं घर भिंतीवरचं घड्याळ विसरून गेलं होतं. याच्या मागे धावताना आम्ही सगळे आणि घड्याळाचे काटे यांची शर्यत लागत होती. अखेरीस सकाळ संध्याकाळच्या फ़ेर्‍यांनी त्रासलेल्या आजोबांनी,"आता याला अडकव बाई कोठेतरी" असं फ़र्मान काढलं. दुधात साखर म्हणजे सोसायटीतच असलेल्या शाळेत गोडोबा आवडीनं आपण आपले जात होते. एक दिवस पाहिलं तर चक्क दीडएक वर्षाची मुलगी शाळेत दिसली. मग त्याचदिवशी सगळे सोपस्कार पार पाडून अ‍ॅड्मिशन घेऊन आले. चार पाच दिवसात पिल्लू शाळेत जायला लागलं. एकच तासाची शाळा पण सगळेजण हुश्श म्हणून श्वास घ्यायला लागले. सुरवातिची रडारड संपल्यावर रितसर प्लेस्कूल सुरू झालं.....सानुच्यावेळेसही असाच संभ्रम पडला होता की शाळा कधी सुरू करावी? मग एक दिवस असंच अचानक जाऊन तिला शाळेत घातलं. पहिल्या दिवशी तिला शाळेत सोडून आल्यावर मीच घळघळा रडले होते. सानु चार दोअन महिन्यांची असतानाच या नव्या शहरात रहायला आलेलो......आयुष्यात पहिल्यांदाच चोविस तास घरात बसायचं होतं.....घरकाम....इवलुसं बाळ.....सगळं आवरेपर्यंत कंटाळून जायला व्हायचं...अगदी एकटं वाटायचं कधी कधी....मग हळू हळू पिल्लू बोलायला लागलं, खेळायला लागलं...त्यानंतर कंटाळा कुठच्या कुठे पळून गेला. दिवसरात्र आमची जोडगोळी सतत एकत्र असायची. तिला गोष्टी सांगताना, तिच्याशी खेळताना, मस्ती करताना दिवस भुर्रकन उडून गेले. दोन वर्षांपासून नव्या शहरात रहाताना तो इटुकला जीव माझा सख्खा सोबती कधी बनला समजलही नव्हतं. ज्या दिवशी ती माझं बोट सोडून शाळेत गेली त्या दिवशी ती खुष होती आणि माझ्याच आत तुटत होतं. काही दिवसांनी दोघिही रूळलो. तिची शाळा माझ्यासाठी पुन्हा नवा अनुभव घेऊन आली. तिच्यासाठी फ़्लॅशकार्डस बनवताना, गंमत खेळ बनवताना माझं बालपण पुन्हा एकदा नव्यानं मला अनुभवायला मिळत होतं. काय काय करत होतो आम्ही...गाणी म्हणत नाचायचो, दुकानातलं पुस्तक नको तू माझ्यासाठी मला हवं तसं पुस्तक बनव असा हट्ट केल्यावर खास तिच्यासाठी गोष्टींचं पुस्तक बनवलं तेंव्हा तर धमालच केली दोघिंनी. सानू, मी आणि आमची गोष्टीतली "दुरिया" आमची गट्टी अजुनही तशिच आहे, अगदी खास.....परवा सीडीवर एबीसी गाणं लागलं होतं आणि माझ्या पिल्लानं ’आई अ‍ॅप्प्पल’ असं बोट करून दाखवल्यावर लक्शात आलं की अरेच्चा! हे पिल्लुही झालं की मोठं. त्याची शाळा म्हणजे आजवर आमच्यासाठी फ़ारसं सिरियस अफ़ेयर नव्हतं. मात्र त्यानं अ‍ॅप्पल दाखवलं आणि तो "शाळेत" जातोय याची जाणिव झाली.
 

गेला पेशन्स कुणीकडे?

आईशप्पथ मला नां माझ्या आजीचं अलिकडे जाम कौतुक वाटायला लागलंय. माझ्या आजीला एक नाही दोन नाही, तर सगळी मिळून मोजून आठ मुलं. पुन्हा सगळी शिकली बिकली छान. एकापाठोपाठ एक आलेल्या पोरांना तिनं कसं काय वाढवून मोठं केलं असेल, याचं राहून राहून कौतुक वाटतंय. आमची इथे दोन पोरातच छप्पर उडायची वेळ आलीय. तर मंडळी या पोस्टचा विषय एव्हाना समजला असेलच. सकाळ जशी चढत जाते तसे चढत्या क्रमानं डोक्यावरचे केस अनुक्रमे वैतागानं, चिडचिडीनं आणि अखेरीस संतापानं ताठ उभे रहायची वेळ येते. आमचा हा मॉर्निंग शो शांतपणानं पहाणार्‍या सासुबाई कपालभाती करत करतच म्हणतात, "अगं किती वैतागता गं पोरांवर? पोरंच ती. ती असं वागणार नाहीत तर कोण? चिडू नये असं सारखं सारखं त्यांच्यावर. बरं तर बरं तुमच्या मदतीला निदान बायका तरी आहेत, आमच्यावेळेस आम्ही एका वर्षाचं अंतर असणारी तीन तीन मुलं कोणाच्याही मदतीविना कशी मोठी केली असतील? मुलं मोठी झाली आता नातवंडं आली तरी आम्ही अजून उभे आहोत. तुमचं आत्ताच असं मग आमच्याएव्हढं झाल्यावर कसं होणार? (आता संयमासाठी अनुलोम विलोम करण्याची वेळ माझी असते). जे सासुबाईंचं तेच माझ्याही घरच्यांचं. एकूण सगळ्यांच्या मते आजच्या पिढीत पक्षी माझ्यात (असं थेट बोलण्याची हिंमत कोण दाखवणार नाही का?)पेशन्स नावाची गोष्टच नाहीए. त्यामुळेच मला आजकाल प्रश्नच पडायला लागलाय, "हे पेशन्स म्हणजे काय असते रे भाऊ"? या प्रश्नाला जे उत्तर सापडलं त्याचा मतीतार्थ असा आहे,
१-घड्याळाचा काटा पटापट पुढे चालला असताना रजईत गुरफ़टून झोपलेल्या पिल्लांना शाळेसाठी दर अर्ध्या मिनिटानं एक हाक या रेटनं वेळेत उठवणं म्हणजे पेशन्स.

२-कपभर दूध, आपलं पातेलंभर रक्त आटवून त्यांना प्यायला लावणं म्हणजे पेशन्स.

३-आदल्या रात्रीसापासून घसा खरवडून सांगुनही स्कूल बॅग भरलेली नसताना अखेरच्या क्षणाला ती आपण चपळाईनं भरणं म्हणजे पेशन्स (बाय दी वे, पोरांची स्कूल बॅग भरणं ही सहासष्टावी किंवा सदुसष्ठावी कला म्हणून मान्यता देण्यात यावी असा माझा आग्रह आहे)

४-बारा वीस अशी अगदी ठोक्याला दारात उभी रहाणारी स्कूल बस तुमच्या नशिबात असेल तर किमान बारा एकोणीसला आपण पायर्‍या उतराव्यात या किमान अपेक्षेला फ़ाट्यावर मारणारी पोरं बसमध्ये नेऊन बसवणं म्हणजे पेशन्स.

५-वेणी घालायला बसल्यावर, "पण आई माझी ब्लॅक रिबिन काल हरवली" असं निष्पापपणानं सांगणार्‍या लेकीवर न खेकसणं म्हणजे पेशन्स

६-शनिवार रवीवार आरामात घालवल्यावर सोमवारी सकाळी सव्वाअकरावाजता शाळेत बाईनी अमूक प्रोजेक्ट बनवून आणायला सांगितलाय असं थंडपणानं सांगणारी लेक आईला सुपरवुमन समजते यात तिचा काय दोष? पुन्हा हे प्रोजेक्ट म्हणजे अमकी स्टिकरं चिकटवा तमक्या प्रिंट मारा, क्लेपासून अमकं आणि ढमकं काहीतरी बनवा असले वेळखाऊ असतात. (हा मुद्दा जरा विस्तारानं सांगायचा मोह होतो आहे)(म्हणजे सिन कसा? तर सकाळी अचानकच लेकीला आठवतं की, रेसलर्सची माहिती आणि फ़ोटोग्राफ़्सचा प्रोजेक्ट सांगितलाय. [इकडॆ आपली वेळेशी कुस्ती सुरू होते]मग इकडे दप्तरात सगळं कोंब, तिकडे ते करत असतानाच नेट चालू करून गुगल्यावर माहिती शोध, ते करताना धाकटं पिल्लू चारवेळा बटनांवर हात मारून वैताग आणत असतं. मध्येच शाळेत जाणार्‍या लेकीला जेवायला वाढणं आणि ते ती पटापट खाईल हे पहाणं असलं अत्यंत कौशल्याचं कामही करावं लागतं. ती जेवत असतानाच तिच्या वेण्या घालतानाच धाकटं येऊन मागून ड्रेस ओढत, "आई च्ची च्ची" म्हणून दात काढून हसतं. अधीक माहितीसाठी- च्ची च्ची म्हणजे शी प्रकरण. तर तो उपक्रम पार पडल्यानंतर लगेचच भरपाई म्हणून त्याला खाऊ घालण्याचं काम, जे घरातून चारी ठिकाणी धावत करावं लागतं, अंगाशी येतं. इतकं होईपर्यंत ते प्रिंट ब्रिंट सगळं बदबदा टेबलवरून खाली आलेलं असतं. ते निटपणानं ठेवून शुज पासून रूमालापर्यंत सगळं शोधून काढून, अगदी ट्रेजर हंट खेळल्यासारखं,लेकीला तयार करून धाकट्याला काखोटीला मारून अखेरीस तिला बसमध्ये बसवून हात हलवून हुश्श करत परत यावं तर शु रॅकवर ती प्रोजेक्ट फ़ाईल तशीच बिचार्‍यासारखी पडलेली असते. की पुन्हा धावाधाव सुरू. हाताला येईल ती पॅंट आणि त्यावर हाताला येईल ते टॉपसारखं घालून शाळेकडे गाडी पिटाळावी लागते. बसवाल्याला गाठून फ़ाईल लेकीपर्यंत पोहोचवण्याचं काम पारपडेपर्यंत दिवस डोक्यावरून पुढे गेलेला असतो.) तर हे सगळं तोंडाचा पट्टा सुरू न करता शांतपणानं करणं म्हणजे पेशन्स.

७- शाळेचे शुज घातल्यानंतर त्याचा तुटलेला बेल्ट, क्लिप किंवा असलंच काही दुरूस्त करण्यासाठी बस येण्यापूर्वी दोन मिनिटं कोपर्‍यावरच्या कॉबलरकाकाकडे (हे लेकीनं दिलेलं नाव) धावत सुटणं आणि हे सगळं शांतपणानं पार पाडणं म्हणजे पेशन्स राखणं.

असो. तर मंडळी, माझ्यासारखाच थोड्याफ़ार फ़रकानं सगळ्यांचा पेशन्स कणाकणानं संपत असणार याची मला खात्री आहे. एकवेळ या यादीत भरच पडेल पण कमी नाही होणार. पुन्हा गंमत काय आहे माहितीय कां, या सगळ्या घडामोडीत नवरा कधीच मोडत नाही. चुकून एखाद्या दिवशी तो असेल तर तोही वर आपल्यालाच सांगणार, "अगं किती चिडचिड करतीयस, हॅव सम पेशन्स" त्याला कळकळीनं सांगावसं वाटतं की मी ढीग हॅवींग रे पेशन्स पण ते आणायचे कुठून तो पत्ता सांग नां.