नमकीन



काही काही सिनेमे कादंबरी वाचल्याचा फिल देतात. असाच छान अनुभव देणारा सिनेमा म्हणजे  १९८२ साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित "नमकीन". #namkeen

चित्रपटात मुख्य भूमिकांत वहिदा रेहमान,  शर्मिला टागोर, शबाना आझमी, किरण वैराळे आणि संजीव कुमार आहेत.

गुलजार यांच्या शायरीमधे नेहमी "भेटणारं" , दूर कहीं टिमटिमाती रोशनी से खामोश पहाडी गांव या गोष्टीत मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे.

यातली गोष्ट, यातली पात्रं आणि प्रसंग फिल्मी नाहीत. ती वास्तवात असूच शकतात म्हणून ही गोष्ट एक चूटपूट लावत मनात घर करते.

ही गोष्ट जिथे घडते ते एक छोटसं, शांत, निवांत पहाडी गाव आहे. इथले शेळ्या चरायला नेणारे लोक मनानं निरागस आहेत. डोक्यावर ओढणी असणाऱ्यां स्त्रिया असण्याचा  तो काळ.  आजच्यासारखा सहा पदरी हायवेंचा आधुनिक काळ नाही. तेंव्हा डोंगरातून नागमोडी वळणं घेत रस्ते गावं जोडत जात. अशाच एका रस्त्यावरचं हे गाव. रहदारीतला एक ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर  गेरूलाल (संजीव कुमार). रहायला घर शोधत या गावात येतो. सिनेमाची सुरवातच या शोधातून होते. त्याला घर दाखवणारा धनीराम त्याला म्हणतो,"कौन सा तुम शादी के लिए घर देखने जा रहे हो, चार दीवार खड़ी कर उस पर छत डालो, हो गया मकान तैयार।" त्याच्या अशा सांगण्याला कारण आहे ज्या घरात गेरूलाल रहाणार आहे त्या कुटुंबाची परिस्थिती. या कुटुंबात चार स्त्रियाच रहातात. एका जुनाट जीर्ण घरात ज्योती अम्मा (वहिदा) आणि तिच्या तीन तरूण मुली, निमकी, मिठ्ठू, चिनकी रहातात. कोणे एके काळी ज्योती नर्तकी असते आणि सारंगीवादकासोबत लग्न करून तीन मुली पदरात घेऊन  या पहाडी गावात गरिबीत रहात असते. तीन तीन तरूण मुली असणारी आई जशी असू शकते तशीच ती आहे. सगळा गाव या चार स्त्रियांच्या कुटुंबाला चोच मारायला टपलेला असताना धनीसारखा सज्जन मात्र त्यांच्या पोटपाण्यासाठी एखादा चांगला भाडेकरू शोधत असतो. योगायोगानं गेरूलाल या घरात येतो आणि हळूहळू या कुटुंबात मिसळून जातो.  त्याचं निमकीवर (शर्मिला) प्रेम जडतं मात्र वयानं आणि अनुभवानं वडील असलेली निमकी गेरूलालला मिठ्ठूशी (शबाना) लग्न करायचा सल्ला देते. बहिणीचं आयुष्य मार्गी लागावं आणि तिला आवडणारा मुलगा तिला मिळावा हा उद्देश. मात्र गेरूलाल याला मान्यता देत नाही आणि या कुटुंबाच्या आयुष्यातून, त्या गावातून निघून जातो. पुढे काही वर्षांनंतर एका नाटक मंडळीत त्याला नाचणारी चिनकी भेटते. ती आता वडिलांसोबत नाचून पैसा कमवत असते. तिच्याकडून उरलेल्या तिघींबाबत अर्धंमुर्धं कळल्यानं गेरूलाल पुन्हा एकदा त्या गावी जातो. त्या आणखिनच पडक्या झालेल्या जुनाट घरात आता उरलेली असते एकाकी निमकी. 


काळ बदलला असेल, वरवर बघता बर्‍याच सुधारणाही झालेल्या असतील मात्र आजही तीन तरूण पोरींच्या आईचा जिवाचा घोर तोच आहे. आजही अशा वय वाढलेल्या अविवाहित मुली समाजाला चोचा मारायला आवडतात. 

माझ्या आजीला सात मुली त्यामुळे तिचा तो घोर मला ज्योतीच्या जवळचा वाटतो. पटकथा, संवाद, गीतं आणि दिग्दर्शन गुलजार यांचंच आहे आणि त्याकाळी हा काळाच्या पुढचा सिनेमा होता. यातल्या चारही वुमनिया मनानं कणखर आहेत, विचारानं स्वतंत्र आहेत. स्त्रीमुक्तीचे ढोल न वाजवताही आयुष्यानं दिलेल्या अनुभवातून शिकत आपापल्या मार्गांवरून जाणाऱ्या आहेत.


सहसा पोस्टला पोस्टर लावायचा रिवाज असला तरिही मला गाणं जोडण्याचा मोह आवरता येत नाहिए. याचं कारण यातली गाणी खूप सुंदर आहेत आणि दुसरं म्हणजे पोस्टसोबतचं जे गाणं आहे त्यातला निरागस अस्सल ग्रामीण मूड मला फार आवडतो. तुम्हालाही. नक्की आवडेल.

https://youtu.be/slveXAZ4Jzc


#sharmila

#shabana

#kiranvairale

#sanjeevkumar

#gulzar



 

मेक्सिकन बिन राईस व्हाया पुणे

माझी धाकट जाऊ चवीचं खाणारी आणि कौतुक, हौस, प्रेमानं खाऊही घालणारी. सतत नविन काहीतरी करण्याची आवड असणारी. पूर्वी पुण्यात रहायची तर आमच्या सतत वाऱ्या होत. दर वारीत नविन काहीतरी पोटात जायला वाट बघत असे. अशाच एका वारीत हा राईस खाल्ला आणि वन मील डिशच्या माझ्या मेन्यूत कायमचा आला.  आठवणींच्या पानावर आज ही रेसपी अपनोंकी याद में





आपल्या राजमा चावलचा मेक्सिकन भौ असणारा हा भाताचा प्रकार अनेक कारणांसाठी मला आवडतो. एकतर यात तेलाचा वापर ना के बराबर, दुसरं कच्च्या भाज्या सढळ हातानं , तिसरं फार वाटणी घाटणी नाहीत आणि महत्वाचं म्हणजे (मला वाटतं म्हणून) पोटाला अगदी लाईट लाईट.

 यातले मुळात वापरले जाणारे एकदोन घटक मी बदलले आहेत.

 पदार्थात नाही पण पोस्टमधे नमनाला घडाभर तेल गेल्यावर मूळ मुद्द्यावर यायला हरकत नाही. तर, आधी शास्त्रानुसार साहित्य- सलाडसाठी- सर्व रंगांच्या सिमला मिर्च्या, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लेट्यूस, ओरेगॅनो.


चटणी/ कोथिंबीर/ सालसासाठी- दोन अवाकाडो (किंमत न बघता घ्यावीत, उगाचच बै गं किती महाग असं वाटायला नको) मल्टीपर्पझ सिझनिंग, कांदा हा उगंच मधेच येईल इतपत. त्याची चव आणि लुडबुड मर्यादित असायला हवी


भात- शक्यतो बारीक चणीचा तांदूळ (दिल्ली राईस वगैरे राक्षसी आकार नजाकत घालवतात), ऑलिव्ह किंवा सूर्यफूल तेल चमचाभर (हे आपलं उगाचंच हं.  खरंतर कोणतंही तेल चालेल. पण सध्या माझ्याकडे हे आहे हे एक आणि दुसरं रेसिपीला वजन यावं म्हणून) (तेल अज्जिबात नको म्हणणार्‍यांनी भात सुटा शिजवण्याचं कौशल्य आत्मसात करावं ) बाकी चवीत तेलाचा काहीही संबंध नाही.


राजमा साठी - मूळ रेसपीत फिकट पांढरट गुलाबी ताजा कोवळा राजमा वापरतात. तो सगळ्या सिझनमधे मिळत नाही म्हणून मग आपला पंजाब दा पुत्र लाल राजमा फार विचार न करता घ्यावा, तो भिजवावा आणि मग आटोपशीर शिजवावा. आपल्याला भातात राजमा "दिसायलाच" हवाय त्यामुळे भरमसाठ शिट्यांनी त्याचं पिठलं करण्याचा मोह टाळा.


क्रीम , जे मूळ रेसपीमधे आहे. मी त्याऐवजी आंबट नसलेलं घट्ट दही वापरते. तुम्ही काहीही वापरा.


सर्व घटकांत घालायला चवीपुरतं मीठ.


आता कृती जी अजिबातच कृतीसारखी नाही. पण सांगते.

तर सगळ्या शिमला मिरच्या एकदम बारीक चिरून घ्या. ज्यांच्याकडे कडरंग आहे त्यांनी त्याचा लाभ घ्या (कडरंग = चाॅपर), कोथिंबीरही बारिक चिरून घ्या,  हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्या. हे सगळं त्यात ओरैगॅनो घालून एकत्र करा.

अवोकाडोची साल काढा (हे फार सॅटिसफाईंग काम आहे. करून बघा. ) तो गर गरगटून त्यात कोथिंबीर ,मिरची, मीठ आणि खूप घट्ट असेल तर किंचीत पाणी घाला.


क्रिम किंवा दही जे असेल ते किंचित फेटून घ्या


भातात मीठ तेल घालून मोकळा शिजवा (मी राईस कुकर वापरते)


राजमा अंगाबरोबर शिजवा नंतर त्यातलं पाणी काढून टाकून त्यात मीठ घाला.


मूळ रेसपीमधे सर्व्ह करताना राजमा घातला जातो, मी तो शिजला की पाणी काढून शिजलेल्या भातात मिसळून टाकते.


सर्व्ह करणं ही याची खरी कृती आहे.

तर आधी भात त्यावर सलाड, अवोकाडो कोशिंबीर,  क्रीम/दही,  हिरव्या मिरच्या आणि सिझनिंग घालून सर्व करा.


ही झाली शास्त्र नी परंपरेनुसारची कृती. सोप्या भाषेत सांगायचं तर शिमला मिरची कोशिंबीर,  अवोकाडो कोशिंबीर, दही आणि राजमा चावलचा सिझनिंग शिंपडून गोपाळकाला करा.


वाचायला जितकी क्लिष्ट कंटाळवाणी रेसपी आहे तितकी करायला आणि खायला अजिबात नाही.


त.टी. (अत्यंत महत्त्वपूर्ण)

एकुणात कापाकापी, चिराचिरी बरीच असल्यानं साहित्यात ऑफिशियली उल्लेख नसलेला नवरा मदतीला घ्या. नमक स्वादानुसार चालीवर नवरा गरजेनुसार वाचा आणि कामाला लागा.


#मेक्सिकन_बिनराईस

#आठवणीतल्या_रेसपीज

#खमंग_किस्से

 

काऊ कोकताहे

 



कावळा ओरडला की कोणीतरी पाहुणा घरी येतो असं म्हणतात. अंगणात कावळा ओरडू लागला की आजी म्हणायची,'आता कुणाची वर्दी घेऊन आलास मेल्या'. पूर्वीच्या लोकांशी निसर्गाशी असा एक वेगळा संवाद आणि नातं होतं. म्हणजे सकाळी भारद्वाज दिसला तर दिवस शुभ, मुंगूस दिसलं की धनप्राप्ती वगैरे. काही नाती मात्र पनौती विभागात. जसं की, मांजर आडवं गेलं की काम होणार नाही, कुत्रं रडलं की अशुभ बातमी येणार वगैरे. पण कावळा एरवी गोष्टीत कितीही कावेबाज आणि कुजका रंगवला असला तरिही या पक्षाला काहीतरी मानाचं स्थान देऊन टाकलंय. मृत व्यक्ती आणि जीवंत माणसं यातला एक दिवसाचा दुवा म्हणजे कावळा. पिंडाला कावळा शिवणं हे फारच महत्वाचं. कावळा शिवला की गेलेल्याच्या इच्छा राहिल्या नाहीत (असं आपलं म्हणायचं). जसा माणसाच्या 'जाण्यात' याची महत्वाची भूमिके तसाच माणसांच्या 'येण्यातही' महत्वाचा. 

दाराशी येऊन काव काव करत पाहुण्यांचं आगमन अ‍ॅडव्हान्स मधे सांगणारा. हा कोकलून गेला की आपण अंदाज बांधायचे, कोण बरं येईल? आता फोन, वाॅटसएप आणि जास्तीचे एटिकेटस, मॅनर्स वगैरेमुळे अचानक कोणी पाहुणा येईल हे दूर्मिळच झालंय म्हणा पण तरिही कावळ्यानं कर्तव्य सोडलेलं नाही. आपले पाहुणे याला आधी समजतात आणि तो वर्दी द्यायला हजर होतो. आता तो इतका येतो दाराशी तर आपण पण मान द्यायलाच पाहिजे नं? हा मान देता देता एकदा फुकटच एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. म्हणजे ती तशीच आहे असं अर्थात वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोणातून सिध्द बिध्द झालेलं नाही. पण, फावल्या वेळेत मेंदू अती उत्साहात काम करतो तसं काहीसं झालं. तर हा कावळा जिथे येऊन ओरडतो साधारण त्या प्रकारचे पाहुणे येतात असं निरिक्षण नोंदवलं (बादरायण संबंध न काय). म्हणजे हाॅलला लागून असलेल्या टेरेसमधे ओरडला तर चहापाणी, गप्पावाले उभ्या उभ्या येणारे पाहुणे किंवा जे कोणी येणार ते दोन तीन तासात जाणार.  किचनच्या खिडकीत ओरडला तर जेवायला कोणीतरी येणार  आणि बेडरूमच्या खिडकीत ओरडला तर रहायला येणारं कोणीतरी. कावळ्यानं बिनकामाचा हा चाळाच दिला 


पुस्ती- खरं म्हणजे कावळ्याबद्दल सगळं सांगून झालं होतं पण मग अचानक आठवलं आणि अत्यंत महत्वाच्या कामाला अनुल्लेखानं मारलं असं व्हायला नको म्हणून ही पुस्ती. आता हा शब्दप्रयोग फार वापरला जात नसावा कारण तो वापरण्यासाठी जी गोष्ट करावी लागते ती (सुदैवानं) कालबाह्य होत चालली आहे. तर 'बायकांचं बाहेर बसणं' हे पूर्वी फार काटेकोरपणे पाळण्याची रीत होती. मग व्हायचं काय की, घरातल्या थोरांना बाजूला तांब्या दिसला की कळायचं पण लहानांना तेवढी अक्कल नसल्यानं कळायचं नाही. सवयीनं जेंव्हा लेकरं बाळं त्या 'बाहेर बसलेल्या' बाईला शिवायला जात तेंव्हा ती स्वतः किंवा कोणी घरातली इतर कारवदे, ' घोडे शिवू नको. तिला कावळा शिवलाय'. आम्ही अगाऊ नसल्यानं पुढे प्रश्न विचारायचो नाही पण कुतुहल नक्की वाटायचं. हा कावळा आपल्याला न कधी दिसतो न कधी शिवतो तो बरोबर मधेच येऊन आई, मावशी, आत्ता ताया यांना का आणि कसा शिवतो? (राम नगरकरांच्या रामनगरीमधे हे फार धमाल पध्दतीनं सांगितलं आहे) मुळात हे विचारायची सोय नव्हती आणि विचारलंच तर उत्तराऐवजी रपटा मिळायची शक्यता. एकदा भातुकली खेळताना मात्र माझी एक बहिण खेळातला कावळा शिवून बाहेर बसली. तिकडून जाणाऱ्या आजीनं पाहिलं, तिला कळलं आणि मग आजी फार जोरात पाठीवर शिवली तिला. जळ्ळे मेले खेळ. आयुष्य भर आहेच पुढे कावळा आत्ता धड खेळा म्हणाली. पूर्वीचं सोवळं ओवळं प्रकरण बघता तिची कळकळ बरोबरच होती. 

तर आता चार दिवस या बाईला कामं सांगायची नाहीत हा महत्वाचा संदेशही कावळाच द्यायचा.


#आठवणींचे_पिंपळपान

अलिकडे लाॅकडाऊन मधे हा गायबच झाला आहे. यालाही कळलंय वाटतं हे लाॅकडाऊन प्रकरण. कावळा हा हुशार असतो म्हणतात ते काय उगाच?😉


#काऊच्या_गोष्टी

 

रोचक रंजक सेरीज





गुप्तहेरांचं कार्य हा सामान्य जनतेसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. हिंदीमधे अजूनही टायगरछाप फिल्मी कथाच गुप्तहेरकथा म्हणून खपवल्या जातात, नाही म्हणायला राझीनं चांगला प्रयत्न केला होता पण तो अस्सल नव्हता वाटला,  कुठेतरी फिल्मी खोटेपणा जाणवत राहिला होता. #netflix वरची नवी miniseries  #thespy मात्र खराखुरा अनुभव देते. याची कारणं दोन, एकतर हे कथानक सत्यघटनांवर आधारित आहे आणि यातला हेर लेखकाच्या मेंदूतून आलेला  नाही, तर साठच्या दशकात मोसाद या जगप्रसिध्द संघटनेचा तो हेर होता ज्याच्या फाशीनं जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
साठच्या दशकातलं राजकारणही वेगळं होतं आणि परिस्थितीही. 
इस्त्राइली गुप्तहेर Eli Cohen ची ही सिरियामधल्या हेरगिरीची गोष्ट. मुळात ही कथा एका सामान्य कारकुनाची टाॅपचा गुप्तहेर बनण्याची (जो पुढे जाऊन इस्त्रएलचा नॅशनल हिरो बनला) तर आहेच पण गुप्तहेर बनल्या नंतर सिरियामधे ज्या पध्दतीचं काम त्यानं केलं, त्याची आहे. एखाद्या विशिष्ट ऑपरेशन पुरता मर्यादित नसल्यानं अनेक गोष्टी विस्तारानं येतात,म्हणूनच काही ठिकाणी पुनरावृत्ति वाटली आणि रेंगाळल्यासारखं वाटलं तरिही सेरीज पकड सोडत नाही . 
या सेरीजमधल्या अनेक घटना बातम्यांच्या रूपात तत्कालिन वृत्तपत्रातून जगभरात पोहोचल्या होत्याच त्या कथेतून समोर येतात तेंव्हा आणखिन थरारक वाटतं.
सेरीज एका विशिष्ट कालखंडातली असल्यानं ती मोनोक्रोममधे मांडली आहे.  त्या काळातलं रहाणीमान, घरं, शहरं, माणसांचं दिसणं वागणं हे खूपच  बारकाव्यानं मांडल्यानं ही कथा आपल्याला सहजपणे साठच्या दशकात घेऊन जाते .


सहा महिन्याचा तुटपुंज्या ट्रेनिंगआधारे Eli Cohen नं जो काही धुमाकूळ सिरियामधे घातला होता तो भल्या भल्यांना चकित करणारा आहे.
अजिबात चुकवू नये अशी ही सेरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
 

फसलेली ट्रीप


#सफरनामा

बरेचदा होतं काय, आपण खूप अपेक्षा ठेवून एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे पोहोचल्यावर, 'याचसाठी केला होता अट्टाहास?' असा प्रश्न पडतो.

अलिकडेच म्हणजे मे महिन्यात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून बाजूला रहात असलेला डलहौसी, मॅकलाॅडगंज आणि खज्जरचा प्लॅन केला.
हे करतच होतो तर लगे हात अमृतसर आणि चंदीगढही यात करून घेऊ ठरलं.

अमृतसरचं सुवर्ण मंदिर बाघा बोर्डर चांगलं झालं. हाॅटेलही छान होतं. पण पुढे सगळी ट्रीप हळूहळू घसरतच गेली.

डलहौसीचं रिसाॅर्ट एक नंबर होतं, पण तिथे आम्ही संध्याकाळी पोहोचलो . छान सोसेल इतका म्हणजे आपल्या महाबळेश्वरला  मे महिन्यात असतो तितकाच थंडावा होता. रात्री शेकोटी पेटल्यावर दहा पंधरा मिनिटं मजा आली पण (नेहमीप्रमाणे) एक मोठा गुजराती ग्रुप आलेला असल्यानं बाॅलिवुड डीज्जे ओढणी, पतंग आणि ए हालो...त  अडकला. सुरवातीला जे हात पाय हलवले तेवढेच मग डिनरहाॅल गाठावा लागला .
 तेवढी एकच रात्र राहून पुढे खज्जरला गेलो. (खरंतर इथे जास्त दिवस रहायला हवं होतं ही चूटपूट लागली) खज्जरला बघण्यासारखं गुगलवर जितकं आहे त्याहून 50% टक्केही प्रत्यक्षात नाही. दोन तीन तासात हा प्रकार आटपून धरमशालाकडे निघालो.( थंडीच्या कपड्यांची घडीही मोडावी लागली नाही. मुंबईतले उघडेबाघडे कपडे तिथे चालले इतपत उकाडा होता)
एव्हाना बर्फाचा एखादा तरी सुळका बघायला मिळावा म्हणून जीव तरसला होता. धरमशालामधे रिसार्ट जरा बरं असावं आणि ज्यासाठी आपण मुंबईहून हिमाचल गाठतो तो उद्देश्य सफल व्हावा असं वाटत होतं. पण हाय रे कर्मा! स्टाईलिश नावाचं हे हाॅटेल चक्क एका बंद पडलेल्या माॅलमधे होतं.  तरिही आशा न सोडता चेक इन करून खिडकीचा पडदा उघडला तर बाहेर चक्क कचकच गर्दीची ऑलमोस्ट बकाल वस्तीचा नजारा. मी आणि मुलं उदासपणे बसलेले बघून नवरा जाऊन मॅनेजरशी काही बोलून आला आणि मग दू......रवर एक सुळका दिसणारी खिडकी असणारी रूम मिळाली. फार बरा नजारा नव्हताच पण जे आहे ते आहे म्हणत रूम बदलली. या हाॅटेलमधलं उत्तम जेवण वगळता काहीही चांगलं नव्हतं. अगदीच फ्लाॅप शो. संध्याकाळी सहज चक्कर मारायला बाजारही (मालरोड) नसावा?
दुसर्या दिवशी बहुचरूचित मॅकलोडगंज गाठलं पण यानं चांगलीच निराशा केली.  दुसर्या दिवशी तिथली माॅनेस्ट्री बघितली. एकूण परिसर अस्वच्छ, घाणेरडे खरकटे वास असणारा होता. नाही म्हणायला एक टिपिकल तिबेटी खानपान मिळणारं कॅफे सापडलं आणि जिभेचे चोचले तरी शमले. शिवाय इथलं मार्केटही नेत्रसुखद होतं. तांबा, पितळं आणि पंचधातूच्या छान छान गोष्टी इथे होत्या.
त्यानंतर चंदीगढ गाठलं. पूर्वीही एकदा चंदीगढला आलेलो असल्यानं इथल्या मुक्कामाबद्दल खात्री होती. पण जसजसं गाडीनं गावठाणासारखे रस्ते धरायला सुरवात केली तसं अवसान गळायला  लागलं. शेवटी एकदाचं हाॅटेल आलं (नेहमीप्रमाणे चकाचक नाव आणि तारांकित असलेलं) चेक इन करताना स्विमिंगपूलची चौकशी केली (हॉटेलच्या वर्णनात ते होतं म्हणून) तर असं सांगण्यात आलं की स्विमिंगपूल गोव्यातल्या रिसाॅर्टमधे आहे इथे नाही. रूमचा ताबा घेतला, सवयीनं व्ह्यु पहायला पडदा उघडला आणि उरलं सुरलं अवसान गळलं. छोटू  तर अपेक्षाभंगानं रडायला लागला कारण खिडकीपलिकडे खाली चक्क माॅलमधली शोरूम्स दिसत होती. म्हणजे प्रायव्हसी बोंबललीच. कहर अपेक्षाभंग केला या फाईव्हस्टारनं. वर कळस म्हणजे अत्यंत उर्मट स्टाफ (मराठी माणसांकडे तुच्छतेनं बघणारा एक उत्तरभारतीय वर्ग असतो तो) सर्व्हिसचेही बारा वाजलेले. दुर्दैवाने ट्रीपचा सगळ्यात जास्त मुक्काम याच हाॅटेलमधे होता. कधी एकदा आपलं गाव गाठतो असं झालं होतं. (नंतर इथे येऊन खर्याखुर्या स्टार सर्विस देणार्या आणि खरोखरच चकाचक हाॅटेलमधे राहिल्यावर जरा बरं वाटलं)

कबुलीजबाब😁
-वर उल्लेखलेली सगळीच रिसाॅर्टस, हाॅटेल ट्रॅव्हलट्रीपवर आहेत.
-बुकिंग दरम्यान गळयापर्यंत कामात बुडलेलो असल्यानं एजंट आणि ट्रॅव्हलट्रीपवर विश्र्वास ठेवून केलेली बुकिंग भोवली  होती.
- स्टार हाॅटेल्स ही अंधश्रद्धा आहे की काय? असा प्रश्न पडावा अशी वेळ या ट्रीपदरम्यान आली.
-अमृतसरचं रॅडिसन ब्लु आणि डलहौसीचं grand view एक नंबर. ज्यांना इथे रहायचंय त्यांनी डोळे झाकून बुकिंग करा.
   बुकिंग  टीप्स_ डलहौसी grand view- हे डोंगर उतारावर तीन मजली आहे. तळमजल्यावरच्या रूम्स जास्त चांगल्या आहेत.

तुमचे आहेत असे फसलेले अनुभव? कमेण्टमधे जरूर शेअर करा.
 

गल्ली गणपती आणि सिनेमा



गणपतीसमोर फ़िल्मी गाणीच वाजवायचा तो काळ होता. आतासारखी एका गल्लीत दहा बारा मंडळं नसण्याचा तो काळ होता. अवाढव्य दहा दहाफ़ुटी गणेशमूर्ती हा केवळ काही मंडळांचाच मक्ता असण्याचा तो काळ होता. घरचे गणपती गेले की आप्तेष्ट, नातेवाईकांसोबत सार्वानिक मंडळांचे देखावे बघण्यासाठी प्लॅनिंग करुन रात्र रात्र पायपिट करत ते बघण्याचा सोहळा साजरा करण्याचा तो काळ होता. दुपारी निवडणं टिपणं करत वाड्यातल्या बायका आणि संध्याकाळी ऑफ़िसहून आल्यावर चहा घेत गप्पा मारत शेजारपाजारच्या काकांचा देखाव्यांच्या चर्चेचा तो काळ होता. वर्गणी मागायला आलेल्या दादा लोकांना वडिल हटकून विचारत,”यंदा काय देखावा?” त्यावर दादालोक उत्साहानं माहिती पुरवत आणि वडिल लोक त्यांना तितक्याच उत्साहानं सल्ले देत. घरच्या बायापड्यांचा आणि चिल्लरपार्टिचा जिव्हाळ्याचा प्रश्न असायचा,” यावेळेस पिक्चर कोणते दाखवणार” यावर दादालोक कॉलर जरा ताठ करत यादी देत मग ती नावं ऐकून वर्गणी देणार्‍या गृहिणीच्या डोळ्यात चमक यायची.एका वर्गणीत चारपाच सिनेमे बघायला मिळणं ही चैनच होती.
गणपतीचं हे एक मेगा आकर्षण असायचं. गल्लीत व्हिसीआर वर दाखविले जाणारे सिनेमे. तेंव्हा चर्चेत असणारे, नविन आलेले पिक्चर बघायला मिळणं तेही फ़ुकटात ही सुखाची परमावधी असायची. दुसर्‍या दिवशी शाळेत पेंगुळल्या डोळ्यानं गेलं तरिही डबा खायच्या सुट्टीत, काल आमच्या गल्लीत अमूक पिक्चर दाखवला, आज तमूक पिक्चर आहे , अशा गप्पा रंगायच्या. काही गल्लीत अगदी लेटेस्ट पिक्चर असायचे तर काही गल्लीत जरा जुने. लेटेस्टवाले जरा हवेत असायचे, कॉलर टाईट करुन तर जुनेवाले बिचारे.पण एक होतं,कोणिही कोणाच्याही गल्लीत जाऊन पिक्चर बघू शकत असे. किंबहुना,  पाच दिवसातल्या गल्ली बोळातल्या सिनेमांचं टाईम टेबल बघून कोणत्या दिवशी कोणत्या गल्लीत पिक्चर बघायला जायचं याचं प्लॅनिंग व्हायचं. साधारण नऊ वाजता जेवणं खाणं पटापट आवरुन आधी आम्ही पोरं टोरं सतरज्या, तरट असं काखोटीला मारुन गल्लीत जाऊन मोक्याची जागा पटकावून बसायचो. मागून झांकपाककरुन येणार्‍या आया, मावशा,काकवांची जागा धरुन ठेवणं हा एक मोठा पराक्रम करावा लागायचा, तो वेगळाच. कारण एकतर या बायका कधीच वेळेत यायच्या नाहीत आणि मग दुसरी एखादि काकू येऊ बसायला लागली की,” ओ काकी आमच्या आईची जागा पकडलीय तिथं” असं सांगितलं की ती काकू हमखास चार शब्द सुनवायची. झेपेल तितका डिफ़ेन्स करुन शक्य होईल तितकी ही जागा पकडून ठेवणं हे फ़ारच मोठं पराक्रम करण्यासारखं काम होतं. सिनेमा जस्ट सुरु झाला की या बायका घाईत येऊन गर्दीत जागा करुन बसता बसता विचारायच्या,” कधी झाला गं पिक्चर चालू?” मग मघासची ती आपण जिच्याशी वादी प्रतिवादी खेळून दमलेलो असायचो ती काकू जरा सरकल्यासारखं करत आईला जागा देत म्हणायची,” फ़ार काय नाही, आताच पाट्या पडल्यात’ पण कधी कधी सिनेमा बराच पुढे गेल्यावर जर आई आली तर मात्र तिला आधीची स्टोरी कुजबुजत्या आवाजात सांगितलि जायची,” ही व्हिलनची बाई आहे बरं का… ती झिन्तमान आता येईल बघ… अमिताभच्चनची आई म्हणजे ती निरुपाराय आहे… असं धावतं वर्णन केलं जायचं.
एखादी कोणी आली नसेल तर दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेत भाज्या निवडता निवडता, दुपारची शिवणा टिपणाची कामं करता करता स्टोरी सांगितली जायची. या दुपारच्या स्टोरी टेलिंगची एक मस्त आठवण आहे. झालं काय होतं की, सांगलीत तेंव्हा स्वरुप टॉकीज नव्यानं चालू झाल होतं. त्याकाळातलं ते टकाटक टॉकीज (टाकी) होतं. याचा लाल चुटूक मखमलीचा पडदा सिनेमा चालू होण्या आधी अलगद गोल गोल चुण्या होत वर जायचा आणि सिनेमा संपला की खाली यायचा.सिनेमापेक्षा त्या पडद्याचं आकर्षण जास्त असायचं त्यामुळे आम्हाला तो वर जाण्याआधी खुर्चीवर जाऊन बसायचं आणि तो जमिनीला टेकला की मगच खुर्चिवरुन उठायच असायचं. तर अशा या स्वरुपला लावारीस सिनेमा लागला होता आणि घरी दादांना न सांगताच आई मला घेऊन तो सिनेमा बघायला गेली होती. दादांकडे लुब्रेपणा करशिल तर बघ, अशी ताकीद दिल्यानं मी गप्प राहिले होते पण दादांना सगळं सांगायची सवय असल्यानं मी शेवटी म्हणलंच की, दादा आज आम्ही सिनेमा बघितला पण आईनं तुम्हाला सांगायचं नाही असं सांगितलंय (मुलं निरासग असतात, देवाघरची फ़ुलं असतात वगैरे ) झालं. दादांचे चष्म्यामागचे वटारलेले डोळे आणि आईचे खाली झुकलेले पण नंतर माझ्याकडे खाऊ की गिळू असं बघणारे डोळे मी कधीच विसरु शकणार नाही. दुसर्‍या दिवशी दुपारी अर्थातच लावारिसची स्टोरी हा बायकांचा टॉक ऑफ़ द डे. माझी आई प्रचंड भारी स्टोरी टेलर होती. तिची स्टोरी ऐकली की सिनेमा बघायचीच गरज रहायची नाही. (तेंव्हा स्पॉयलर वगैरे काही मानलं जायचं नाही, कारण मुळात बहुतेकांना सरसकट सिनेमे बघायला जमायचं नाही त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवली जायची) तिनं स्टोरी सांगायला सुरवात केली… अमताभच्चन हा जिव्हाळ्याचा विषय असल्यानं बायका हातातले गहू निवडायचे विसरून देहभान हरपून स्टोरी ऐकत होत्या… स्टोरी सुरू झाली आणि मी,” आई… ते सांग नं”…असं हळूच म्हणलं, माझ्याकडे दूर्लक्ष करत आईनं स्टोरी चालूच ठेवली…मी अधून मधून नेटानं, आई… ते सांग नं… असं म्हणत राहिले. शेवटी वैतागून आईनं विचारलंच, “काय?” मी उत्साहात (आईनं हे सांगितलं नाही पण माझ्या लक्शात होतं या रुबाबात) सांगितलं की,” अगं तो पडदा असा…खाली आला… ते राहिलंच नं सांगायचं?” यावर काल आईनं खाऊ का गिळू केलेले डोळे आज गुणाकार होत दहा बारा झाले होते. मला अजूनही कळलं नाहीए की आईसकट सगळ्या काकवांना का बरं त्या दिवशी माझा राग आला होता? तर ते एक असो. बॅक टू गणपतीतले पिक्चर, मिस्टर नटवरलाल पासून सदमा पर्यंतचे सगळे सिनेमे त्या छोट्या पडद्यावर आणि रस्त्यावर तरट पसरुन बघितलेत. ना महागड्या पॉपकॉर्नची फ़ुकटची ऐश न एसीतली गुबगुबीत खुर्ची. उलट बरेचदा गणपतीत थंडी असायची कारण त्यावेळेस ठरलेल्या नक्षत्रांना पाऊस पडायचा. आतासारखा अवेळी आणि उतावळा नसायचा तो. मग थंडी असली की घरुन चादर घेऊन जाऊन ती लपेटून तरटावर बसून नेटानं बघितलेले प्यार झुकता नहीं, परिंदा असे सिनेमे आठवले की आता गंमत वाटते. सिनेमा गल्लित आल्यावर लहानपणी गल्लीत पाहिलेले सिनेमे आठवले आणि लिहिल्यावचून रहावलं नाही

#random_cinematic_memories


 

सिनेमातलं गाव

बरेली की बर्फ़ी,  बद्री की दुल्हनिया, शुभमंगल सावधान, तन्नू वेडस मन्नू, मेरे ब्रदर की दुल्हन, शुध्द देसी रोमान्स या सगळ्या सिनेमात किंवा दिल्ली ६, बेवकुफ़ियां,  वेक अप सिद,  सत्या, मेरी प्यारी सुलू, कहानी  या सगळ्या सिनेमात काही साम्य वाटतंय का तुम्हाला? जरा नीट विचार केला तर लक्षात येईल की, या सगळ्या सिनेमांच्या कथानकातलं शहरही एक "कॅरेक्टर" आहे. महत्वाची भूमिका बजावणारं. त्या त्या शहराच्या लहेजासहित अवतरणारी पात्रं आणि म्हणून पडद्यावर साकारत जाणारं कथानक प्रेक्षक "रिलेट" करायला लागतात. गंमत म्हणजे शहरं त्यांची ओळख दाखवत कथानकात आली ती अगदी अलिकडे. नेमकेपणानं सांगायचं तर नव्वदीच्या दशकानंतर. आत तुम्ही म्हणाल वरच्या उदाहरणातला सत्या तर नव्वदमधलाच आहे. पण अपवाद वगळे तर सिनेमाची गोष्ट ही साधारणपणानं एखाद्या "आटपाट नगरात" घडायची. त्या गावाला, शहराला नाव नसायचं त्याही आधी म्हणजे साधारण सत्तरच्या दशकात तर ठरलेला साचा होता. सिनेमातला "गांव" हा उत्तरभारतीय पेहरावातला असायचा, पात्रांची भाषा उत्तरभारतीय हिंदीशी साधर्म्य दाखवणारी असायची. घागरा चोलीतली नायिका तर हिंदी सिनेमाचं प्रतिक बनली होती. गांव की गोरी म्हणलं की म्हणूनच आजही डोळ्यासमोर येते ती पत्थर के सनम मधली वहिदा, कारवांतली आशा किंवा मधुमतीमधली वैजयंती.
ऐंशीच्या दशकात गांव की गोरी शहरी बनली मात्र तरिही गोष्ट कोणत्या गावार, शहरात घडतेय हे गुलदस्त्यातच राहिलं.  यशचोप्रांचे सिनेमेही एखाद्या ला ला ला लॅण्डमधे घडायचे. (अजूनही त्याच्याच स्कूलमधे तयार झालेल्या करण जोहरचे सिनेमेही असेच अगम्य शहरात घड्त असतात. )  गाण्यातून, कथानकातून कश्मिर, शिमला, स्वित्झरलॅण्ड दिसायच मात्र ते केवळ एखाद्या चित्राची पार्श्वभूमी असावी असं. त्याचा कथानकाशी बरेचदा काही संबंध नसायचा.
नव्वदच्या दशकात तर सगळंच फ़ॅण्टासीलॅण्डमधे घडायला लागलं होतं. मागे एकदा एका मुलाखतीत मसानचा लेखक वरून ग्रोव्हरनं खूप छान सांगितलं होतं, की नव्वदीच्या दशकात बाहेरच्या शहरातून मुंबईत लेखक आले. याआधीही जे होते ते एकतर पार्टीशनच्या काळात आलेले होते, जे डिनायल मोडवरच होते. ज्यांना घडलेल्या घटनाच विसरायच्या होत्या. म्हणून त्यांनी काल्पनिक शहरं उभी केली जिथं बहुतांश सिनेमाची कथानकं घडली. नव्वद सरताना मात्र मुंबईबाहेरचा आणि आपल्या स्थानिक जाणिवा असणारा लेखकवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईच्या सिनेमा क्षेत्रात आला आणि येताना आपल्या कथानकांतून तिथली शहरं, तिथलं वातावरण, संस्कृती घेऊन आला. म्हणूनच सुधीर मिश्रा, अनुराग कश्यपचे रांगडे सिनेमे एकदम वेगळे दिसले, विशाल भारद्वाजच्या सिनेमांनी लक्ष वेधून घेतलं. कारण यांच्या कथानकातली गावं ही नावापुरती नव्हती तर ती एक चेहरा घेऊन कथानकांसोबत चालली.
उदाहरणच द्यायचं तर बरेली की बर्फ़ी मधे उत्तर भारतातली घरं, गल्ल्या, तिथले स्थानिक लोक आणि अगदी गाड्यांवर विकले जाणारे पदार्थही सिनेमाच्या रंगात भर घालणारे होते. तर कहानी मधे विद्या बागची कोलकत्त्यात मिशनसाठी येऊन पोहोचते आणि ट्राम पासून मेट्रोपर्यंतचं, दुर्गापूजेसाठी सज्ज असलेलं कोलकता बघताना कथानकाची ऑथेण्टिसिटी वाढवतं.
कथानक नेमकं कुठे घडतंय हे दिसणं फ़ार महत्वाचं आहे. सेटवरच्या बंदिस्तपणापेक्षा जिवंत लोकेशन्सवरचं कथानक जास्ती खुलून येतं. म्हणूनच आजा नच ले मधला नायिकेचा संघर्ष बेगडी वाटतो. कारण असं गावच रिलेट करता येत नाही. माधुरीसारखा हुकमी एक्का असूनही चित्रपट पडण्यामागे जी अनेक कारण आहेत त्यातलं हे एक आहे, कारण संपूर्ण कथानक ज्या गोष्टीभोवती घडतं ते गाव आणि त्यातलं सांस्कृतिक केंद्रच खोटं वाटत रहातं.
तलाशमधली रेडलाईट मुंबई खरी खुरी मुंबई वाटते आणि म्हणूनच तिथल्या मुलिंचं आयुष्यही अंगावर येतं. वेक अप सिद मधे मुंबईत लाईफ़ बन जाएगी असं स्वप्न घेऊन बाहेरचे आणि त्यांच्या नजरेतून दिसणारी मुंबई इतकी सुंदर दिसते की आपल्याच शहराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला होतं.
दिल्ली, मुंबई असो की वाराणसी, बनारस, लखनौ हिंदी सिनेमात ही शहरं, इथल्या  गजबजलेल्या जिवंत गल्ल्या, गर्चीचा भाग असणारे चेहरे, लोकांची बोलायची, जगायची पध्दत सगळं प्रतिबिंबीत होतंय. आठवा तुम्हारी सुलू मधल्या सुलूचं  मुंबईच्या उपनगरातलं अगदी टिपिकल मध्यमवर्गीय घर. छोट्याशा बाल्कनीत झोपाळ्यापासून कुंडितल्या बगिच्यापर्यंतची पूर्ण केलेली हौस. सेफ़्टी डोअरपासून कुकरपर्यंत सगळं कथानकाची पार्श्वभूमी देणारं आणि म्हणूच सुलूचं मध्यमवर्गीयपण ओघात येत जातं आणि पटतंही. एरवी मधल्या काळात एकता कपूरनं मध्यमवर्गियांची संकल्पनाच बदलून टाकली होती.
तर थोडक्यात काय तर आजचा सिनेमा अधिकाधिक लोकांच्या जवळ जाणारा होत चाललाय. एकिकडे यश चोप्रा, करण जोहर सारखे निर्माते ला ला लॅण्डवर वर्चस्व राखून आहेत तर दुसरीकडे वास्तव शहरं मोठ्या प्रमाणात कथानकांतून दिसायला लागली आहेत.