आई नावाच्या बाईची गोष्ट


आई झाल्यावर बाईला काय काय होतं? तर अनेक गोष्टी पॆकेजडील सारख्या "एक" के साथ मुफ़्त म्हणून मिळतात. या सगळ्या मुफ़्त गोष्टींची ही गंमत.

बघा हं कल्पना करा की तुम्ही एक हिंदी सिनेमा बघताय. एक कशाला? आपण जोधा अकबरच बघुया नां. यात शहेनशाह ची एंट्री झाल्यावर काय होतं? म्हणजे पडद्यावर तो आला रे आला की मागे ढॆंटे ढॆंटे असं म्युझिक वाजतं. पण समजा असलं काही म्युझिक बिझिक न वाजता सरळ शांतपणानं तो आला तर? किंवा फ़ॊर दॆट मॆटर हिंदी सिनेमातून पार्श्वसंगीत नावाची गोष्ट गायब झाली तर? मग काय मजा? नाही का? बुटांचा ठाक ठाक आवाज न येता गब्बरसिंग आला तर तो गब्बर कसा वाटेल? पहाडीवर फ़िरायला आलेला टुरीस्ट नाही का वाटणार? तर या सगळ्याचा आणि आई होण्याचा संबंध काय? तर हिंदी सिनेमा बॆकग्राऊंड म्युझिकशिवाय अधुरा आहे आणि आई नावाची बाई "आई गं<<" या बॆकग्राऊंडशिवाय अधुरी आहे. आई झाल्यावर आणि मूल बोलायला लागल्यावर सतत कानात "आई" "आई<<" "आ<<ई<<" अशा विविध पट्ट्यातला जप घुमायला लागतो. सुरवातिला कौतुकानं बाळाच्या प्रत्येक "आई"ला लाडीक हो म्हणणारी आई नंतर नंतर बाळाचा "बाळ्या" होईपर्यंत प्रतिक्शिप्त क्रियेसारखी "ओ" म्हणायला लागते. नंतर म्हणजे बाळ्या किंवा बाळी सहा सात वर्षांची होईपर्यंत आई या जपाला इतकी "इम्युन" होऊन जाते की जवळपास आतून कान बंद करून घेण्याच्या दैवी चमत्कारापर्यंत पोहोचते. बालमानसशास्त्र सांगतं की मुलांच्या सगळ्या गोष्टी दरवेळेस मन लावून ऐका आणि त्याकडे खरोखरच लक्श द्या. इथे एक छोटासा प्रॊब्लेम हा आहे की, नेमका कुरीयरवाला आलेला असतो आणि कमोडवर इतकावेळ "शी होत नाहीए गं आई ऊठू कां" चा धोशा लावलेला बाळ्या/बाळी हाकांवर हाका मारायला लागतात. एक कुरीयर घेऊन त्याच्याकडच्या चिटोर्यावर सही "मारून" ते घेऊन हातभर अंतरावरच्या ड्रॊव्हरमध्ये ठेवून दार बंद करायला जितकी मिनिटं लागतात त्या तेव्हढ्या मिनिटांमध्ये "आई" "आई" असं सहस्त्रनाम परायण झालेलं असतं. आई नावाची बाई ते पाकिट ड्रॊव्हरमध्ये कोंबून धावत आत जाते तर बाळ्या/बाळी तिला अत्यानंदानं सांगतो,"मला होतेय शी, पण तू इथे थांब" (ते जे कोंबलेलं पाकिट असतं ना ते या आई नावाच्या बाईला रात्री आठ वाजता जाम मनस्ताप देतं. म्हणजे या बाईचा नवरा घरी आला की तो ड्रॊव्हर उघडतो ते पाकिट बघतो आणि बाईला म्हणतो ही पाकिट ठेवायची काय पध्दत झाली? यानंतर बाईचा फ़्युज उडतो आणि तो कसा उडतो हे विस्तारानं सांगायची गरज नाही)

महिन्याचं सामान भरायला बाई नावाची सवत्स धेनु जाते. आत गेल्याबरोबर सोबतची खोंड उधळतात. ही बिचारी हातातल्या यादीत बघत बघत सामान भराभर भरत असते आणि तिची खोंड ’आई’ "आई" करत दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. "आई बार्बी घेऊ"?,"आई माझी नोट बुक संपत आलीय घेऊ"?, "आई बेल्ट घेऊ"?,"आई योगर्ट घेऊ"?"आई ज्युस घेऊ"? असा दिसेल त्या गोष्टीचा हट्ट करायला लागतात. त्यावेळेस आई काय करत असते? तर मागून भुणभुण, पिरपिर, चिरचिर करणार्या पोरट्याकडे फ़ारसं लक्श न देता आणि समोरच्या रॆकवरचं लक्श जराही विचलित होऊ न देता पोरांना तंब्या देत असते. "कशाला हविय बार्बी? घरात ढिगानं आहेत ना? आधी त्या व्यवस्थित ठेवायला शिक", "नोट अजुन संपलेली नाहीए नां, ती आधी संपू दे मग बघू","योगर्ट नको. परवा खोकला झाला होता माहितिये नां". कधी धाकानं, कधी लाडानं आणि कधी समजवून ती पोरांना या मायापाशातून बाहेर काढते. विशेष म्हणजे या सगळ्याची रिपिट टेलिकास्ट दरच महिन्याला होतात. आई नावाच्या बाईची केव्हढी ही सहनशिलता. हेच चुकून बाबा नावाच्या माणसासोबत या खोंडांना नुसतं साधं दही आणायला पाठवलं तरी सोबतिला एक दोन बाहुल्या, मोटारी, पुस्तकं, कुकिज, केक असलं काय काय घरी येईल याचा नेम नसतो.असो. या विषयावर सविस्तर नंतर कधीतरी.

तर घरी, दारी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आईच्या कानात "आई" सतत घुमत रहातं. आई झाल्यावरच्या पॆकेजमध्ये हा सततच्या हाकांचा कधी हवा हवासा तर कधी जीव नको करणारा साऊंड ट्रॆक मोफ़त मिळतो.


आई नावाच्या बाईचा "व्हायवा"





मूल बोलेपर्यंत त्याच्या तोंडातले शब्द ऐकण्यासाठी आई अगदी आतुर होते. सुरवातिचे बोबलकांद्याचे दिवसही मौजेचे असतात नंतर सुरू होते आई नावाच्या बाईची आयुष्यभराची "व्हायवा" दगड मातीपासून अगदी कोणत्याही विषयातल्या प्रश्नांना उत्तर देणंयाची तिची तयारी अवासिच लागते. हा प्रकार कंपलसरी या प्रकारात आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीतली माहिती असो अथवा नसो उत्तरं द्याविच लागतात. त्यात सामाजिक, कौटुंबिक, साहित्यिक, भौगोलिक, रासायनिक, ऐतिहासिक अशा जगातल्या नव्हे या भुतलावरच्या यच्चयावत विषयांचा समावेश असतो.(आता समजलं का आईला, "आई माझा गुरू" का म्हणतात?) उदाहरणादाखल हे प्रश्न पहा,

-प्रुथ्विच्या आत काय असतं?
-ढगांच्या पलिकडे काय असतं?
-चिमणी पोळ्या कशा लाटते?
-सायकलचं चाक पंक्चर का होतं? आणि ते पंक्चर काढतात म्हणजे काय करतात?
-माणसं का मरतात?
-मेल्यावर माणसं कुठे जातात?
-तू कधी म्हातारी होणार नाहीस ना?
-आपल्या फ़ॆमिलतले सगळे म्हातारे झाल्यावर मरणार का?
हे तर सहज आठवले तसे सांगितलेले प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न कोणत्याही वेळेस दाणकन येतात आणि त्यांची संभाव्य धोक्यांची शक्यता लक्शात घेऊन उत्तरं द्यावी लागतात. म्हणजे कोणाचं तरी ऒपरेशन झाल्यावर जर "ऒपरेशन म्हणजे काय"? असा प्रश्न विचारला तर आपल्या घरात हाती असणार्या साहित्यानिशी असलं ऒपरेशन होणार नाही याची काळजी घेऊन नेमकीच माहिती द्यावी लागते. याशिवाय अनेक भयानक सेन्सॊर्ड प्रश्नांना बाळबोध उत्तरं देताना जी काय तारांबळ उडते ती फ़क्त आईलाच ठाऊक. बरं दटावून गप्प करावं तर आजकालच्या पोरट्यांचं तसं नाही नाही म्हटलं, टाळलं की जास्त चिकित्सा. त्यामुळे करता काय द्या उत्तरं द्या. आई व्हायची हौस होती फ़ार. बसा आता आयुष्यभरच्या तोंडी परिक्षेला. एका वाक्यात, सविस्तर, सुदाहरण सगळ्या प्रकारच्या प्रश्नातून जावं तेंव्हा आई माझा गुरू वचन घडतं. बाबा नावाचा माणूस मात्र या परिक्षेतून कायम एटीकेटी घेऊन पसार होतो. एकतर पोरं त्यांना फ़ार प्रश्न बिश्न विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यातून विचारलेच एकदोन प्रश्न तर उत्तर नीट मिळेल याची गॆरंटी बाप नावाच्या प्रोडक्टवर मिळत नसल्यानं पोरं तसली रिस्कच घेत नसावीत. दुसरा मुद्दा असा की मुलांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला हवं याचा प्रत्येक आईचा एक "युनिक" नियम असतो. गंमत म्हणजे बाबकडून तसं उत्तर दिलं जाईल याची गॆरंटी जगातल्या जवळपास सगळ्याच आयांना नसावी मग चुकिचं द्न्यान देण्यापेक्षा (आईच्यामते चुकिचं हं) नकोच ते असा साधारण पवित्रा. त्यामुळे घरात चित्र काय? तर आई माझा गुरू आणि पोरं-बाप उनाडलेले बॆंकबेंचर्स. बघा या सगळ्यांना चुचकारत फ़टकारत हाकणं म्हणजे कठीण आहे की नाही? तर आई नावाच्या बाईला पोरं झाली की साक्षात "जी के" बुक होण्याची संधी मिळते.


सध्यापुरतं थांबते. बाकिचं नंतर.





(citra sou.-greywolf)
 

गुगलणारी माणसं

माणसं काय गोष्टींसाठी "गुगलतील" याचा नेम नाही. मनात जरा शंका आली की गुगल्याच्या खिडकीत टायपायचं आणि शंका निरसन करायचं येड बर्याचजणां लागलं आहे. माझा ब्लॊग सर्च इंजिनमधून सापडलेल्या महाभागांनी काय काय शोधलंय हे पाहिलं आणि त्याचे रिझल्ट पाहोले की थक्कच व्हायला होतं. कोणीतरी "निवारा" बद्दल काही शोधत होतं तर माझ्या कवितेतल्या एका शब्दामुळे तो दिसत होताच पण त्याच्या जोडीला कुठल्यातरी गावातला "बस निवारा" कोसळला असं सांगणारं संकेतस्थळही दिसत होतं. मला नेहमी अशी मिसळ पाहिली की जाम उत्सुकता वाटत रहाते की ज्यांनं कोणी यासाठी सर्च टाकला असेल तो नक्की काय शोधत असेल? मागे एकदा मराठीतून कोणीतरी "तसल्या" संकेतस्थळाचा शोध घेत इथंपर्यंत पोहोचलं होतं. हाईट म्हणजे मी जी फ़सलेल्या गुलाबाजामाची पोस्ट टाकली होती तीसुध्दा अशीच कोणालातरी गुगलताना मिळाली असावी बहुदा कारण गुलाबजाम या शब्दाच्या संदर्भात येणारे सगळे रिझल्ट तिथे दिसत होते. मिनिटभर मला कल्पनेनच हसायला आलं की कोणितरी बिचारं गुलाबजाम कसे करावेत हे शोधत असेल आणि त्याला माझे फ़सलेले गुलाबजाम सापडावेत यासारखा भयंकर योगायोग नाही. रूम नं १६ च्या पोस्टच्या सोबतिला सर्चमध्ये स्वीट सिस्क्टिनही मौजुद होत्या. कोणीतरी "ममा" शोधत इकडे वाट चुकलं होतं. म्हणजे ना काही समजतच नाही की लोक नक्की काय बरं शोधत असतील? कधी कधी तर सर्चमध्ये ब्लॊग पाहिला तरी समजतच नाही की नक्की कोणत्या शब्दामुळे हा इथे आलाय? म्हणजे मुळात हा शब्द आपण वापरलाय हेच वसरायला होतं. जगभरातून माणसं काही बाही शोधत ब्लॊगवर भरकटलेली माणसं पाहिली की गंमतच वाटते. हे म्हणजे कसं वाटतं नां की,बनियन शोधायला जावं तर साडी हातात येते आणि मोजा शोधावा तर टोपी सापडते. कशाचा कशाला संबंधच नाही.
 

अडकलेली पिन

आज सकाळपासून म्हणजे, डोळे उघडल्याबरोबर बेडवरून उतरताना मनात "मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात" या गाण्याची ओळ आली. सकाळपासून नेहमिची कामं उरकताना गळ्यातून सतत त्या ओळी "वहात" आहेत. आता तुम्ही म्हणाल की, मग यात प्राॅब्लेम काय आहे? प्राॅब्लेम आत्ताचा नाही बराच जुना आहे, अगदी "क्रोनिक" म्हणण्यासारखा. म्हणजे काय आहे नां की, जवळपास रोजच दिवसभराच्या कोणत्यातरी प्रहरात एखादी ओळ ऐकली जाते मग ती मनात घुसते आणि ओठांवर सतत येत रहाते. पुन्हा संकट हे की, गाणं अख्खं माहितच नसतं, मग दिवसभर सतत तीच ओळ गुणगुणत राहिल्यानं आजुबाजुच्या सगळ्यांना वात येईपर्यंत ती ऐकावी लागते (तसे सगळे सहनशिल आहेत म्हणा). पण होतं काय की ,गुणगुणताना तंद्रीत असतानाच मधेच भलतेच शब्द बाहेर पडतात. आज किमान पन्नासएक वेळा तरी मी जाईच्या ऐवजी "गाईच्या" म्हटलं असेल 😂 बरंय म्हणा सध्या घरात पार्सल क्रमांक दोन शिवाय कोणी नसतं. त्याला त्याचंच बोललेलं समजत नाही तर माझं कुठून समजणार ? म्हणून तर गाई, वासरं, म्हशी, शेळ्या सगळं खपतंय. सानू मात्र तंद्री भंग करून म्हणाली असती,"अगं आई मघाशी तर जाई म्हणालिस आणि आता गाई कसं? हे राॅन्ग आहे", असो. मला तर कधी कधी शंकाच येते की, गळ्यात गाण्याच्या पिना अडकण्याचा कसला रोग बिग तर नाही नां मला? काॅलेजमधे असताना आमच्या ग्रुपमधल्या मैत्रिणी (लाडानं, कौतुकानं की भोचकपणानं कोण जाणे) मला गॅरंटी संपलेला ग्रामोफ़ोन म्हणायच्या. होतं काय नां की ,कामाला हात जुंपले की आपोआप प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तोंड चालू होतं. मग त्यातून कोणत्या गाण्याचं पीठ पक्षी पिट्ट्या पडेल काही सांगता येत नाही. लावणी, भारूड, पाॅप, भक्तीसंगीत, बालसंगीत अशा कोणत्याही प्रकारातलं मऊसूत पीठ भरभरा येत रहातं.
मागे एकदा घर आवरायला काढलं होत तर तोंडात सतत "जिवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे"च येत होतं. साधारण तासभर या दोनच ओळींच रिबिट कानाला बसल्यावर आमच्या "वैनीसाहेब" वैतागल्या आणि म्हणाल्या,"फ़ारच जड झालं असेल तर ठेव ते बोचकं बाजुला आणि आता माझे बये एकतर अख्खं गाणं म्हण नाहीतर गाण्याची सीडी तरी बदल". मला बिचारीला माहितच नव्हतं की मी फ़क्त एक तास दोनच ओळी म्हणत होते. 😜बरं, गाणं म्हणण्याची एखाद्या माणसाला हौस असावी म्हणजे किती? आवडली चाल की म्हण गाणं . असा सपाटा असल्यानं मी अजाणता अनेक तरल गाण्यांच्याही कत्तली केल्या आहेत. हे अर्थात कोणीतरी सांगितल्यावरच समजलं म्हणा. १९४२ मधलं रिमझिम  रूमझुम गाणं त्यावेळेस नुकतंच कानावर पडायला सुरवात झालेली होती. आता साधारण त्यावेळेपर्यंत पावसातलं नवं गाणं म्हणजे "फ़डकतं" असा समज पक्का झालेला होता. मग शब्दही तसेच ढींगचॅक असायचे. आता आम्हाला हे गाणं म्हणायची हौस फ़ुटली म्हटल्यावर शब्दांची वाट लागणार हे ओघानं आलंच. मी बजता है जलतरंग टीन के छ्त पे....च्या ऐवजी अक्षरश: जलता है ये बदन वगैरे सारखे भयानक शब्द पेरून वाट लावली गाण्याची. तरी बरं दोनच वेळा मी म्हटलं आणि सख्ख्या मैत्रिणीच्या ते ताबडतोब लक्षात येऊन तिनं मला सावरलं.
एकदा तर भर दुपारी ऑफ़िसमध्ये सगळेजण आपापल्या कामात  गुंग असताना मला जोरात "कुण्या गावाचं आलं पाखरू" म्हणायच्या कळा यायला लागल्या होत्या. मग मनातल्या मनात वरच्या पट्टीतला सूर लावून मनातल्या मनात गाणं म्हटलं, तरी हातांनी आणि मानेनं दगा दिलाच. टेबलवर बोटांनी ठेका धरला आणि मान तालात हलायला लागल्यावर आजुबाजुच्यांनी "बरंय नां सगळा?" असा लूक दिला, हे सांगणे न लगे. या सगळ्यातून जर काही चांगलं झालंच असेल तर ते म्हणजे माझे सूर पक्के वगैरे झालेत.
तर हे सगळं आठवायचं तत्कालिन कारण म्हणजे मागच्या रविवारी दिवसभर "मन शुध्द तुझं....तू चाल पुढं तुला गड्या भिती कुनाची, पर्वा भी कुनाची" वर पिन अडकली होती. आता रविवारी दिवसभर हे गाणं किंवा या दोनच ओळी कोणी म्हणायला लागलं तर काय होईल? (घाबरु नका, गडावर तशी शांतता आहे😛) तर जरा बारिक सीन झाला आणि नवरा वैतागला. त्यानं कट्टी केली. कसंबसं मान्य केलं की, होय बाबा तू बरोबर मी चूक. आता परत एकच गाणं दिवसभरात अज्जिबात गुणगुणायचं नाही असा पणही  केला. पण हे केल्याला अवघे अठ्ठेचाळीस तास उलटले नाहीत तर आज मन तळ्यात मळ्यात करत दिवसभर अडकून राहिलंय. देवा... माझं काहीच बरं होणार नाहीए का?
 

एक पावसाळी दिवस


एक पावसाळी दिवस, असा गारठलेला
लाडावलेल्या मुलासारखा रजईत गुरफ़टलेला

एक पावसाळी दिवस, असा गारठलेला
गोड गुलाबी उबेत रेंगाळलेला

एक पावसाळी दिवस असा गारठलेला
मऊ मऊ भातावरच्या वाफ़ा पहात पोटात शिरलेला

एक पावसाळी दिवस, अस्सा गारठलेला
कुरकुरणार्या सांध्यांना थरथर हातांनी बाम चोळणारा
 

होश्शियार...दात पडणार आहे!

एक दोन महिन्यांपूर्वी सानू शाळेतून घरी आली तीच मुळी गाल फ़ुगवून. हिचं एक कोणत्या गोष्टीवरून कधी काय बिनसेल याचा नेम नाही. दहा पाच वेळा विचारल्यावर अगदी इस्टेट लुटल्यागत आवाजात दीनवाणेपणा आणि डोळ्यात डबडब पाणी आणून तिनं सांगितलं,"आज विशालचासुध्दा दात पडला". मला वाटलं हिच्याच बाकावर बसणार्या हिच्या मित्राचा दात पडला म्हणून हिला प्रचंडसं दु:ख झालंय म्हणून मी आपली तिची समजूत घालत म्हटलं,"हात्त तिच्या. एव्हढंच नां, मग येईल की दुसरा दात. आता पडतातच अगं पहिले दुधाचे दात." माझ्या या समजुतीवर तिची कळी खुलण्याऐवजी आणखिनच भळभळा रडत ती म्हणाली,"अगं बाई मला माहितिय हे. टिचरनं ऑलरेडी सांगितलंय". आता वैतागण्याची माझी वेळ असल्यानं सहाजिकच मी कारवदून म्हटलं,"माहितिय नां माझे आई मग कशाला आल्यापासून इतका गळा काढलायस?" यावर दात पडलेल्यांची यादी वाचत तिनं रडवेल्या सुरात सांगितलं की,"सगळ्यांचे दात पडतायत आणि माझा मात्र अजुनही एकही दात पडला नाही." आत्ता माझ्या डोक्यात उजेड पडला. मानत म्हटलं अशी भानगड आहे होय? मग नव्यानं तिची समजुत काढत तिला सांगितलं की तुझाही पडेलच गं दात. यावर तास दोन तास "कधी"ची भुणभुण करून तिनं नाद सोडून दिला. त्यानंतर मी हे सगळं अर्थातच विसरून गेले आणि परवा शाळेतून येताना माझं बुचकुलं फ़ुदकत घरी आलं. आल्या आल्या खुशित दप्तर फ़ेकत, शुज सॊक्स काढत तिनं आरोळी ठोकली,"आई.......आज काय फ़नी गंमत झाली शाळेत"(हिच्या सगळ्या गमती फ़नी असतात बरं का). "विचार ना काय गंमत झाली ते, आई विचार नां" "बोला काय गंमत आहे?" "असं नाही आधी डोळे मीट....आता उघड" डोळे उघडले तर एका चुटुकल्या दाताला हलवत अगदी जग जिंकल्याच्या अविर्भावात लुकलुकत्या डोळ्यांनी ती उभी होती. हुश्श अखेरीस माझ्या पिल्लाचा पहिला वहिला दात हलायला लागला होता तर. तिला या हलणार्या दाताचा इतका प्रचंड अभिमान वाटत होता की येईल जाईल त्याला अगदी रद्दीवाल्यापासून, कोपर्यावरच्या होमडिलिव्हरी घेऊन येणार्या वाण्यापर्यंत सगळ्यांना कौतुकानं दात हलवून दाखवून झाला. दिवाळीत सांगलीला गेल्यावर तर जवळपास अख्ख्या गावाला समजलं की हिचा पहिलाच दात आता हलत आहे आणि लवकरच तो पडणार आहे. त्यात भर म्हणजे हिच्या बाबानं कौतुकानं हिला सांगितलं की हा दात पडल्यावर त्याजागी सोन्याचा दात येईल म्हणून. मग काय विचारता, कधी एकदा दात पडेल असं झालंय. मात्र या कौतुकातला संभाव्य धोका ओळखून तिला ताळ्यावर आणत सांगितलं की,"गोल्डन दात म्हणजे खरा खुरा सोन्याचा दात नाही काई, या दाताचं नाव कसं दुधाचे दात आहे तसंच नव्या दाताचं नाव गोल्डन टिथ आहे". काही का असेना माझं पिल्लू खुश आहे आणि येता जाता आरशात डोकावत डुलणारा दात कौतुकानं बघत तो पडायची वाट बघतंय. तो डुलणारा दात मला मात्र हेलावून टाकतोय कारण आत कुठेतरी तिचं मोठ्ठं होणं नव्यानं जाणवायला लागतंय. तिचा पहिला दात लुकलुकायला लागल्यावर झालेला आनंद अजून ताजा असताना त्याच दाताचं पडणं तिला नवलाचं तर मला चुटपुट लावणारं ठरतंय. असेच एकेक पाश सैलावत जाऊन माझं पिल्लू मोठ्ठं व्हायला लागलंय याचा आनंद होतोय की आत चुरचुरतंय हेच समजत नाहीए......