सिनेमाच्या आठवणींची आठवण

आपल्याला सिनेमा (मला मराठीतही याला सिनेमाच म्हणायला आवडतं कसं आपलं तुपलं वाटतं चित्रपट म्हटलं की....जाऊ दे)दोन कारणांनी लक्षात रहातो एक तर त्या सिनेमामुळेच आणि दुसरा म्हणजे त्या सिनेमाच्यासंदर्भात किंवा त्या त्या वेळेस बनलेल्या काही खास आठवणींमुळे. आजची ही पोस्ट अशाच आठवणींना पोस्त देण्यासाठी.....
सर्वात पहिली आठवण इथे अगदी समयोचीत वगैरे म्हणतात तशी आहे कारण आठवण आहे सिनेमाच्या पडद्याची आणि कोणत्याही नाटक सिनेमाची सुरवातही पडदा उघडूनच होते नाही का? माझ्या पिढीला (माझी पिढी म्हटल्यावर डोळ्यासमोर आजीबाईचा बटवा वगैरे आणाल तर खबरदार. माझी पिढी म्हणजे सिंगल स्क्रीन सिनेमावर पोसलेली आणि आजची पिढी म्हणजे पॉपकॉर्न चावत मल्टिप्लेक्समध्ये सिनेमे बघणारी) सिनेमा बघायला मिळायचा (त्यावेळेस सिनेमा सुरू झाला असं म्हणत नसत तर पाट्या पडल्या असं म्हणत)तो त्याच्या समोरचा पडदा दूर झाल्यावर (खरं तर त्याहीनंतर नाही. कारण विकोनं दात घासल्याशिवाय, लिरीलनं धबधब्याखाली न्हाऊन माखून झाल्याशिवाय, नाकाला/ छातीला विक्स लावल्याशिवाय, ड्युक्स किंवा तसलंच काही लिमका बिमका प्यायल्याशिवाय, इंदिरा गांधींची देशाच्या प्रगतीविषयीचं भाषण ऐकल्याशिवाय सिनेमा सुरू म्हणून व्हायचाच नाही. जाता जाता जरा विषयांतर करायची परवानगी मागते हं कधिचं मनात होतं लिहावं. आता संधी आहे तर लिहून घेते. ते सिनेमाच्या आधी दातानं आक्रोड फ़ोडणारे आजोबा आहेत नां, ते आमच्या लहानपणापासून अस्सेच दातानं आक्रोड फ़ोडतायत, आम्ही मारे अमिताभ बच्चन बघायला जावं तर हे आक्रोड फ़ोडत बसलेत. इतकी वर्षं झाली पण त्यांचा हा उद्योग अजून संपला नाही. धन्य आहे विको वज्रदंतीची! या अजोबांना कोणीतरी सांगा रे की, आताशा फ़ोडलेलेच काय पण बारीक तुकडे केलेले आक्रोडही बाजारात मिळतात कशाला उगाच म्हातारपणी असले भलते स्टंट करावेत म्हणते मी. उगाच काय एखादा दात बीत तुटला किंवा पडलाच तर काय विकोवाले भरून देणारेत? मग नंतर आज्जीचे रपटे मिळतील ते वेगळेच. असो तर आता मूळ विषयाकडे कंसाबाहेर) तर त्यावेळेस सांगलीत स्वरूप नावाचं नवं कोरं त्या काळातलं चकाचक थिएटर बनलं होतं आणि तिथे पहिलाच सिनेमा लागला होता लावारीस. दुपारी आईच्या महिलामंडळाचं अचानकच सिनेमा बघायला जायचं प्लॅनिंग बनलं अणि गाड्याबरोबर नळ्याची यात्रा या न्यायानं अस्मादिकही गेले. बरं सिनेमातलं ओ की ठो कळायचं नाही (त्यावेळेस तर अमिताभ आणि झिनत अमान ही दोनच नावं माहित होती त्यामुळे सिनेमा कोणताही पाहिला तरी त्यात हे दोघेच असतात असा माझा ठाम समज होता) शिवाय ते ढिशुंम ढिशुम बघायला लागलं की जीव घाबरा व्हायचा ते वेगळंच. तिकडे बच्चन दे दणादण हाणतोय आणि इकडे मी हंबरडा फ़ोडतेय हा सीन कॉमन असायचाच. तर या सिनेमाला जाताना आईनं तंबी दिली की खरदार चोंबडेपणा करून ऑफ़िसमधून आल्या आल्या दादांना (वडिलांना) सिनेमा बघितलेला सांगशिल तर. जे काय सांगायचं ते मी सांगेन. संध्याकाळी दादा घरी आले, चहा पाणी खाणं झालं तरी सिनेमाचा विषय काही निघेना, मला तर जाम डुचमळायला लागलेलं की कधी एकदा सिनेमाच्या पडद्याची गम्मत दादांन सांगेन म्हणून. पण आई सांगायचं नाव घेईना म्हटल्यावर मी तोंडाचं कुलुप उघडलंच,"दादा, आम्ही नां आज नां दुपारी नां एक गम्मत पाहिली. तो अमिताभ आहे ना तो पहायला गेलो तर आधी पडदा कित्ती छान वर जात होता अस्सा (बोटानं अर्धगोल हवेत रेखाटत) आणि माहितीय सिनेमा संपल्यावरही तो अस्साच खाली आला (पुन्हा बोटानं हवेत अर्ध गोल रेखाटत) पण ना आईनं सांगितलंय की आम्ही सिनेमा बघितला हे सागायचं नाही म्हणून ते मी नाही सांगत, हो नां गं आई"? यानंतर आईची माझ्याकडे फ़ेकलेली नजर अजूनही आठवते आणि तिनं दादांना काही सांगायचं म्हणून सुरवात केली तर दादांनी फ़क्त कडक शब्दात "समजलं" असं सांगितलं. त्यानंतर अनेक वर्षं ही आठवण मला प्रत्येकानं सांगून बेजार केलेलं आहे.
दुसरी आठवण आहे भालू या मराठी सिनेमाची. हा सिनेमा बघायला मी आणि आई दोघीच गेलोलो होतो. सिनेमा सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मला आणि आईला समजलं की हे बघणं मला झेपणार नाही. आईनं युक्ती सांगितली की तिच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून झोप. मी तसं केलं पण डोळे हळूच किलकिले होतच होते आणि कान कसे बंद करणार, ते सगळं ऐकत होते. त्यामुळे बघितला नाही तरी सिनेमा समजलाच. मात्र झालं काय की शेवटी शेवटी जरा झोप लागलीच. सिनेमा संपला तसं आईनं उठवलं. समोर पाहिलं तर अंधार गुडुप मी जे भोकाड पसरलं की काही विचारू नका. हमसून हमसून रडतेय म्हटल्यावर आईला वाटलं की अंधारात काही चावलं बिवलं की काय? तिनं चार पाच वेळा काय झालंय विचारल्यावर मी त्याच सुरात विचारलं "भालू कुठ्ठाय"? सुरवातिला आईनं पेशन्स राखत लॉजिकल उत्तर दिलं. नंतर मात्र ती वैतागली आणि म्हणाली "गप गं भालू गेला पडद्यामागे भाकरी खायला". आई शप्पथ त्यावेळेपासून मला त्या थिएटरच्या बाहेरचं प्रत्येक कुत्रं भालूच वाटायचं.
तिसरी मस्त धमाल आठवण माझी नाही तर बंधुराजांची आहे. एव्हाना शक्य असेल त्यावेळेस पोरांना घरीच ठेवायचं सिनेमाला न्यायचं नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला होता. मात्र एका दिवाळीच्या सुट्टीत जरा मोठी भावंडं आत्यांसोबत जंजीर बघायला गेली. तिकीटं काढून मंडळी आत गेली या मंडळात बिचारा माझा भैय्याच काय तो वयानं सर्वात लहान होता. त्याला धड सांगताही येईना की त्याला सिनेमा बघायची भिती वाटतेय म्हणून. त्यात आतून क्लायमॅक्सचं ढिशांव ढिशुम ऐकायला यायला लागल्यावर तर त्याचा निर्णय पक्काच झाला. मस्त एक आईस्क्रीम खाऊन झालं, हातात वेफ़र्सचं पाकीट घेतलं आता आत जायची वेळ आली म्हटल्यावर हा पठ्ठ्या जागून हलेचना. सीन कसा तर हा मागे रेटतोय आणि बाकीची भावंडं याचे हात ओढत याला चल रे काही होत नाही म्हणत पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. अखेर यानं भोकाड पसरलं आणि धमकी दिली की अजून जोरात ओढाल तर आणखी रडेन. झालं बाकीच्यांना आणखी चेव चढला. आत जाणार्‍यांना हा प्रकार जास्त मनोरंजक वाटल्यानं सगळे गंमत बघत उभे राहिले. अखेर आत्यांनी जरा मोठ्या चुलत भावाला भैय्याला घरी सोडून मग पुन्हा सिनेमाला यायला सांगितलं. उर्वरीत आम्ही मंडळी घरी काचाकवड्या खेळत असतानाच भैय्यामहाराजांचं बोचकं मोठ्या भावानं दणकन आत ढकलंलं आणि तो निघून गेला. त्यानंतर आम्हाला भैय्यानं आव आणून गोष्ट सांगितली आणि बाकीची मंडळी घरी आल्यावर सत्य की हकीकत समजली.
लहानपणाच्या आठवणींतून बाहेर येण्याआधी त्यावेळेस पडणारा एक गमतप्रश्न आणि त्याचं माझ्यापरीनं मी शोधलेलं उत्तर, त्यावेळेस म्हणजे जिंतेंद्रनं श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यासोबत दक्षीणछापातले सिनेमे काढण्याचा सपाटा लावला होता त्यावेळे एका गाण्यात नायक आणि नायिका असंख्य कपडे बदलतात असं दिसायचं. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे लोक गाणं गाता गाता, नाचता नाचता असे फ़टाफ़ट कपडे कसे बदलतात? नायकाचं एकवेळ ठीक आहे की त्याला काय शर्ट पॆंटच घालायची आहे पण हिरोईन इतक्या झटपट साड्या बदलून पुन्हा मॅचिंगचं सगळं घालून पुढची ओळ म्हणायला कशी काय हजर असते? मला वाटायचं की गाणं म्हणायला बागेत जाताना हे लोक बहुदा कपड्यांची बॅग सोबत घेऊन जात असतील.
सिनेमाशी संबंधीत सर्वात जास्त धमाल आठवणी असतात त्या तरूणपणातच असं आपलं माझं मत आहे. म्हणजे या वयात पाहिलेले सगळे सिनेमे गाण्यांमुळे, कथेमुळे लक्शात रहाण्यापेक्षा त्या त्या वेळेस घडलेल्या काही ना काही प्रसंगांमुळेच लक्षात राहिले आहेत. कॉलेजमध्ये गेल्यावर सर्वात पहिला बंक मारून पाहिलेला सिनेमा परिंदे(दुसर्‍यांदा लागलेला). गाव तसं लहान त्यामुळे हे अ‍ॅडव्हेंचर आम्ही घरी पोहोचण्याआधीच समजलं होतं आणि आम्हाला शिस्त लावण्याची सर्व जबाबदारी भैय्यामहाराजांच्या खांद्यावर असल्यानं त्यांनी घराबाहेरच उभं केलं. बरं तर बरं अंगठे वगैरे धरून उभी रहा असं काही त्यानं सांगितलं नाही. ते काही बरं नसतं दिसलं. असो. बंधुराजांचा नियम काय? तर म्हणे, आधी तो स्वत: सिनेमा बघणार आणि मग मी तो बघण्यासारखा असेल तर परवानगी देणार. म्हणजे या उद्योगामुळे हा स्वत: झाडून सगळे सिनेमा बघणार हा त्याचा कावा माझ्या वेळीस लक्षात आला म्हणून बरं. नंतर नंतर त्यानं ही सेन्सॉरशिप काढून टाकली पण यामुळे सौदागरसारखा पानपत्ती सिनेमाही (बाय दी वे त्यातला विवेक मुश्रम क्युट हं)लपून पहावा लागला.
साजन लागला त्यावेळेसची धमाल तर विचारूच नका. एकतर कॉलेजचं नव्हाळीचं वर्ष, साजनला जायचं ठरलं, मी माझी एक मैत्रीण आणि आमच्यासोबत माझी मावशी असं जुगाड ठरलं. तिकीटं काढून झाल्यावर पाहिलं तर अजून अर्धा तास हातात होता. मग मावशीबाईनी फ़र्मान काढलं की चला तोपर्यंत पलिकडच्या मंडईतून भाजी घेऊन येऊ. म्हटलं चला (न चलून करता काय स्पॉन्सरशिप होती ना) भाजी घेऊन आलो तर सिनेमा सुरू झालेला होता. अंधारात धडपडत बाल्कनिच्या पायर्‍या चढू लागलो, बॅटरी पुढे, त्याच्यामागे मावशी आणि तिच्या मागे आम्ही दोघी अशी यात्रा एक एक पायरी वर चढत होती. मध्येच कधितरी या दोघी सुळकन आपल्या खुर्चीत जाऊन बसल्या आणि मी माधुरीकडे वळून पहाण्याच्या नादात पाय अडकले आणि धमकन अर्धी मुर्धी आडवी झाले. आता हे फ़ारसं कोणाला समजलं नसतं पण मावशीनं तिकडून विचारलं,"शिल्पे कार्टे धडपडलीस काय"? आता मावशिचाच आवाज तो, मस्त खणखणीत. अख्ख्या बाल्कनीत खसखस पिकली. असो तर जागेवर जाऊन पुढ्चा सिनेमा शांतपणानं पाहिला आणि इंटर्व्हल झाल्यावर आजुबाजुला बघितल्यावर असली लाज वाटली, अर्धं कॉलेज बाल्कनीत समावलं होतं. काय झालं असेल शरमून ते विचारूच नका. त्यानंतर मावशीनं कितिही उदारपणानं तिकीटं काढली तरिही तिच्यासोबत सिनेमा बघायचाच नाही हा पण केला.
डर सिनेमा बघेपर्यंत आम्ही रितसर बंक करून सिनेमा बघण्याइतके सरावलो होतो. एका रविवारी चक्क इमानदारीत डर बघितला. मात्र झालं काय की या सिनेमाच्यावेळेस बजेट जरा पातळ होतं म्हणून मग खालची तिकीटं काढली. माझी एक मैत्रीण मस्त मांडी घालून सिनेमा बघत होती. इंटरव्हल झाल्यावर चपला घालायला म्हणून पाय खाली केले तर चप्पलच नाहीत. देवळातून चपला चोरीला जातात हे माहीत होतं पण थिएटरमधून? खुर्ची खाली गेल्या असतील, इकडे तिकडे असतील म्हणून शोधल्या, अखेरीस बॅटरीलाही बोलावलं पण चप्पल मिळाल्याच नाहीत. पुढचा अर्धा सिनेमा असा तसाच घालमेलीत बघितला कारण उरलेला पूर्ण वेळ आता काय करायचं याचा खल करण्यातच गेला. सिनेमा झाल्यावर उरलेल्या पैशातून तिच्यासाठी निळ्या पट्याच्या पांढर्‍या स्लिपर्स घेतल्या आणि चुपचाप घरी आलो. रस्ताभर तिच्या स्लिपर्सकडे पाहून पाहून सगळे हसत होतो. आजही मला एक प्रश्न सातवतो की हिच्या पायाखालच्या चपला गेल्याचं हिला समजलं कसं नसेल?
दोन सिनेमांच्या आठवणी तर कायमस्वरूपी मेंदुच्या मेमरीतून फ़ॉरमॅट करता येतील तर बरं अशा आहेत
पैकी पहिल्या सिनेमाचं नाव आहे "कॅप्टन प्रभाकर" आणि दुसरा आहे "कालापानी".
दिवसभरात दोन चार क्लासेस असायचे त्यामुळे दिवसभर इकडून तिकडे धावणं सुरू असायचं. सर्वात शेवटचा क्लास अकांऊंटसाचा. त्याची लेजर्स वाहून न्यायची म्हणजे एखादं लहान पोर मागे बसल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी माझी सायकल नव्हती म्हणून मग आमची सगळ्यांच्या वह्या एकीच्या सायकलवर आणि आम्ही ड्बलसीट असे चाललो होतो. वाटेत अंतर पडलं, दिवस पावसाळ्याचे होते, अचानकच धुमधुम पाऊस पडायला लागला. आम्हाला थांबायला आडोसाच सापडेना, इतक्यात कडेकडेने चालत आम्ही एका थिएटरच्या समोर जाऊन थांबलो. बराचवेळ झाला तरी पाऊस थांबायची लक्षणं दिसेनात एव्हाना आता क्लासही चुकल्यातच जमा होता. काय करावं बरं असा विचार चाललेला असतानाच मैत्रीणीनं सुचवलं की इथे उभंरहाण्यापेक्षा आत जाऊन एखादा सिनेमा बघू तोपर्यंत पाऊसही थांबेल. कल्पना वाईट न वाटल्यानं आम्ही कोणता सिनेमा लागलाय हे पाहिलं तर "कॅप्टन प्र्भाकर". योगायोगानं याच सिनेमाविषयी भावाच्या एका मित्रानं दोनच दिवसांपूर्वी अरे मस्त आहे असा शेरा दिल्यानं बिनधास्त तिकीटं काढली. अवघ्या पाच मिनिटात काय पाप केलंय हे लक्षात आलं आणि थोड्या वेळानं इंटरव्हल झाल्यावर आजुबाजुला पाहिलं तर अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही दोनच कन्या होतो.सगळे आमच्याकडे बघतायत... जी धुम ठोकली बाहेर, विचारायची सोय नाही. भर पावसात घाम फ़ुटला. घरी गेलो. दुसर्‍या दिवशी क्लासमध्ये आणखीनच गोंधळ. काल आम्ही नव्हतो मात्र आमच्या जागा पकडून आमच्या वह्या तासभर इमानदारीत बसल्या होत्या. त्यामुळे सरांनी विचारलं कुठे होता काल? (काय सांगता कप्पाळ?) त्याच दिवशी संध्याकाळी ज्यानं उत्तम चित्रपटाचा शेरा दिला होता तो वाघ भेटला. त्याला म्हटलं काय रे कसला सिनेमा आहे टुकार तर म्हणाला? तुम्ही पाहिला? आम्ही हो म्हटल्यावर तर हसून आडवा पडायचा बाकी राहिला होता. वर म्हणतो कसा, मी हा सिनेमा पाहिला आणि जाम पकलो म्हणून ठरवलंच होतं कोणालातरी हा बघायला लावायचाच. कालापानीची आठवण तर काळ्यापाण्यासारखीच भयानक आहे. कोल्हापूरमधली गोष्ट. तिथे दोन थिएटर आहेत जी पाठीला पाठ लावून आहेत. म्हणजे इकडे सिनेम बघायचा आणि तिकडे दुसर्‍या थिएटरमधून बाहेर पडायचं (अर्थात हे सुरवातिला माहितच नव्हतं). एका रविवारी मी आणि माझी रूमपार्टनर कालापानी बघायला गेलो, बाहेर पडताना मागच्या थिएटरमधून बाहेर आलो आणि सहज वर बघितलं तर मागच्या थिएटरमध्ये एकदम "ई’ ग्रेड सिनेमाचं पोस्टर, त्यात भर म्हणजे अगदी समोर रस्त्यावर दोनचार ओळखिचे चेहरे, बाप रे! आता यांना वाटणार आम्ही हा असला सिनेमा बघितला की काय? पुन्हा आता त्यांना ओळखिचं हसू द्यायचं की असंच हळूच सटकून जायचं हे समजेना. कसलं काय अन फ़ाटक्यात पाय असला प्रकार सगळा.
तर अशा या सिनेमाच्या आठवणी त्या त्या वेळेस नाही म्हटलं तरी तापदायकच ठरलेल्या मात्र आता मस्त हसवणार्‍या.
 

चॊकलेट क्रीमी नटी कप


आजपासून हा विषयही लिहणं सोडायचा नाही असं ठरवलंय. कारण खाणं कोणाला चुकलंय सांगा? अखेर माणूस जगतो का? तर खातो म्हणूनच ना? मग खायचंच तर चवीचं का नाही? हे माझं साधं सोपं तत्व आहे. (खाण्यावरून आठवलं बरेचजण पॅसिव्ह स्मोकींग असतं तसं पॅसिव्ह खाणं (खरं तर हादडणं) असतंच की. अशा विषयाला वाहिलेले ब्लॉग, साईट फ़ोटोबिटोसहित सजवलेल्या थाळीसारखे समोर येतात तेंव्हा वजन वाढतं का?)असो. तर असे बघितलेले पदार्थ जसेच्या तसे न करण्याची खोड असल्यानं हा एक सततचा उद्योग सुरूच असतो. घरात हौसेनं खाणारी आहेत म्हणून हा उद्योग अजुनतरी सुरू आहे. मग विचार केला की चला ही हौस इथेही पुरवून घेऊच. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरवात गोडानं करतात मग "भरपेट" लेबलाची सुरवातही गोडानं.

चॊकलेट क्रीमी नटी कप
मूळ पदार्थ संजीव कपूर यांच्या एका शोमध्ये बघितला होता त्यात त्यानी केवळ हे कप कसे करायचे दाखवले आणि हे कप पूर्णपणे चॉकलेटनं भरण्याचा पर्याय सुचवला होता. मी थोडा बदल करून त्याला नटी-क्रिमी बनविला. यातला कोणताही पदार्थ तापदायक नाही म्हणजे प्रमाण कमी झालं जास्त झालं तर पदार्थ बिघडेल अशी एक धास्ती असते ती इथे अजिबात नाही त्यामुळे बिनधास्त प्रयोग करून पहा. अगदीच सगळंच बिघडलं तरी "लिक्विड क्रीमी नटी चॊकलेट" या नावाखाली चॉकलेटचं पिठलं बिनधास्त खपवता येतं याची गॅरंटी आहे. चला मग किचनमध्ये-
साहित्य-चॉकलेट बार (हव्वे तितके), आक्रोड-बदामकाप-काजूकाप (हव्वे तितके), व्हॅनिला क्रीम (पिल्सबरीच रेडीमेड मिळतं. ज्यांना इसेन्स वगैरे घालून बनविण्याइतका उत्साह आणि उरका असेल त्यांनी तसं बनवावं), पिठी साखर (जसे गोड खाणारे असाल तितकी)
इतर साधनं- काचेचा जाड बाऊल, पाणी, प्लॅस्टिकचे छोटे ग्लास (वापरून फ़ेकून द्यायचे असतात ते) किंवा कॅण्डी कप.
कृती-काचेच्या बाऊलमध्ये चॉकलेट बारचे तुकडे करून घाला आणि हा बाऊल एका दुसर्‍या मोठ्या भांड्यात ठेवा या मोठ्या भांड्यात कडेनं हळू हळू पाणी ओता आणि ते गॅसवर ठेवा. आता हळू हळू काचेच्या बाऊलमधलं चॉकलेट वितळू लागेल ते सत चमच्यानं हलक्या हातानं हलवत रहा. पूर्ण वितळलं की गॅस बंद करा आणि बाऊल बाहेर काढून घ्या. ते थोंड साधारण तापमाना येऊ द्या, आता प्लॅस्टिकच्या ग्लासला वरच्या बाजुनं कट मारा आणि त्यात चॊकलेट ओता आता जास्तीचं चॊकलेट चमच्यानं बाहेर काढा आणि एका ट्रेमध्ये ठेवून द्या. हे कप बनविण्याची दुसरी सोपी पध्दत म्हणजे कपमध्ये१/३ चॉकलेट भरायचं आणि मग स्वच्छ पेंटब्रश घेऊन त्यानं कपला चक्क चॉकलेट पेंटसारखं लावायचं मात्र असं करताना ते एकसारखं लागेल याची काळजी घ्यायची. असे हवे तितके कप बनवून घ्या आणि ते फ़्रीजमध्ये सेट करायला ठेवा. अर्धात तास ते एकतासात छान सेट होतील. आता दुसर्‍या बाऊलमध्ये व्हॅनिला क्रीम, साखर, सगळे ड्रायफ़्रुट एकत्र करा. चॉकलेटचे कप बाहेर काढा आणि त्याच्या आतला प्लॅस्टिकचा ग्लास फ़ाडून बाहेर काढून टाका आता या चॉकलेटच्या कपमध्ये क्रीम भरा आणि पुन्हा एकदा फ़्रीजमध्ये थोडावेळ सेट होण्यासाठी ठेवा. खायला देताना बटरपेपरवर ठेवून द्या.
जास्तिच्या सूचना-व्हॅनिला क्रीमाइवजी चॉकलेट क्रीमही वापरा येतं किंवा संजीव कपूर यांच्या सुचनेनुसार ते पूर्ण चॊकलेटनं भरता येतं.
-कोणत्याही फ़्वेवरचं क्रीम भरून वैविध्य आणता येतं.
-वितळवलेलं चॉकलेट बटरपेपरव पातळ पसरवा आणि त्याच्या पट्ट्या कापा. क्रीमवर सजविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
-मी एकदा यात चॉकलेट नटी आईस्क्रीम भरलं होतं तेदेखिल धमाल लागतं.
-वाढदिवला (अर्थात लहान मुलांच्या) आलेल्यांना चॉकलेट देण्याची पध्दत आहे त्यावेळेस हे छोटे कप ड्रायफ़ुट कॆरेमलाईज करून घालून भरावेत आणि द्यावेत पोरं खुष. आया खुष (काहीतरी पौष्टिक खाल्लं म्हणून)

सर्वात महत्वाची सूचना-आत्ता पोस्ट लिहिताना हे मी केलेले नाहीत म्हणून त्याचा फ़ोटो साभार आहे. उगाच फ़ोटो पाहून माझ्या फ़ोटोग्राफ़ीकौशल्याच्या प्रेमात पडू नका.
सगळ्या सूचना संपल्या. आता नक्की करा हं चॉकलेट आणि इथे परतून नक्की सांगा कसं बनलं.
 

मनातल्या मनात


आपल्या प्रत्येकाच्या आत एक गलगल्या असतोच असतो, अखंड बकबक करणारा, या विषयावरून त्या विषयावर माकडासारख्या उड्या मारत भटकणारा, उडाणटप्पू, गुंड, गोड, निष्पाप, विचारी, अविचारी इत्यादी इत्यादी. "व्हाय वुमन...."मध्ये वाचलं होतं की म्हणे, बायका दिवसाकाठी वीसहजार शब्द किमान बोलल्याखेरीज तोंड बंद करत नाहीत (श्शी फ़क्त?) तर हे झालं प्रकट शब्दांचं अकाऊंट पण मनातल्या मनात जे अखंडीत चालू असतं त्याचं काय? असो. विषय उगाच गंभीर होण्याआधी पुन्हा आपल्या मूळ पदावर यावं झालं. तर मुद्दा काय? की मनातल्या मनात बोलण्याचा. या बोलण्याला नां कसला काही ताळच नसतो. कुठून विचार सुरू होतात आणि कुठे फ़िरत, भटकत जातात...सगळंच गमतिचं. कधी कधी वाटतं या मनातल्या संवादाची फ़ोटोकॉपी काढता आली तर दुसरं विनोदी लिखाण वाचण्याची गरजच नाही. तसं कशाला? हा एक मासलाच घ्या नां, उगाच आपलं नमनाला घडा कशाला? नाही का?
चला मग गलगले निघाले.......
गलगले थांबा. निघालात काय असे गडबडीनं. वाचकांना संदर्भसुची नको का द्यायला? त्यांना काय समजणार हे सगळं काय चाललंय ते? तर नमुना म्हणून दर शनीवारची मुलीला शाळेत सोडून येईपर्यंतची तीस मिनिटं इथे दिलेली आहेत. तसं सगळंच डिट्टोसेम लिहिलेलं नाही, जरा एडिटिंग केलेलं आहे (गलगले मनातल्या मनात झालेल्या संभाषणाचं कसलं आलंय डोंबलाचं एडिटिंग?) तर गलगले कंसातून बाहेर आलेले आहेत आणि गलगल्यांनी सूचना संपविल्या आहेत.......

चला आवरा आवरा धावा...उशिर झाला, गाडी अजिबात सुरू नाही होत...झाली झाली चला आता सुसाट....आली कुत्री आडवी आलीच लगेच. मनेकाला काय सांगायला होतं कुत्री बिचारी असतात म्हणून इथे अंगावर धावून येतात तेंव्हा पाय वर घेऊन गाडी चालवायची वेळ येते त्याचं काय?.....परवा अशी आली धावत गाडीकडे....घाबरून पाय पोटाशी घेतले आणि मग लक्शात आलं की अरेच्चा, आपण तर कारमध्ये आहोत आणि काचा वर आहेत. पण श्र्वास थांबला नां सेकंदभर, त्याचं काय?......ओढणी बांधलीय नां मागे? नाहीतर अडकायची कुठेतरी.....अरे हा रस्त्याकडेचा पत्रा काढला की, आत केव्हढी दाट झाडी आहे....झाडं का तोडतात?.....अरे देवा, आता इथेही ट्रॅफ़ीक जॅम....चल बाबा लवकर पुढे, ये बाईकवाल्या तुलाही आत्ताच मध्ये तडमडायचं होतं?....हं सुटलो एकदाचे, पाच मिनिटाच्या रस्त्यावर पंधरा मिनिटाचा प्रवास....रस्ते काय उकरतात सारखे, पुन्हा खड्डे बुजवतही नाहीत.....आता वळायचंच की उजवीकडे....हा पॅच बाकी मस्त आहे. शांत, थंड. व्वा, काय बरं वाटतंय मनाला. तसा काही फ़ार उशिर नाही झालेला..... आज आता पुस्तक वाचून संपवायलाच हवं घरी जाऊन मस्तपैकी संपवून टाकू, काम बिम राहिलं बाजुला. कित्ती दिवस झाले असे निवांत घालवून....आई गं काय मस्त ड्रेस आहे. तिला छान दिसतोय....आला आणखी एक खड्डा आला. किती वर्षं झाली हा खड्डा इथेच आहे.....आता गाडी कुठे लावावी? कधीच का जागा मिळत नाही इथे? कसे लावतात लोक गाड्या? फ़टकवायला हवं सगळ्यांना.....भाजीपण घ्यायचीय जाता जाता....कोणती भाजी घ्यावी बरं? पालेभाजीच घ्यावी एखादी......मिळाली की जागा पार्किंगला.... चला सुटले बाई एकदाचे.......आई गं...घरातून निघाल्यापासून किती बोलले मनातल्या मनात. यावर एकदा लिहायला हवं. किती दिवस झाले ब्लॉग लिहून.किती विषय नुसतेच सुरू करून सेव्ह करून सोडून दिलेत. ते काही नाही आता ते सगळे विषय पूर्ण करायचेच. होतं काय की असं काहीतरी लिहायचं सुचतं आणि मग सुचतच जातं पण त्यावेळेस ब्लॉग लिहिण्याइतका वेळ नसतो आणि लिहिण्यासाठी आवर्जून बसलं की हे इतकं सगळं सुचत नाही. आजकाल जरा कंटाळाच येतोय नाही पण? पूर्वी नियमानं लिहिलं जायचं...आता का असं झालंय?तसं तर तो पण विषय राहूनच गेलाय लिहायचा, तो फ़सवणुकीचा, मग तो ढापूगिरीचा, ती घरसाजवटीची एक लिंक शेअर करायची होती तीपण राहिली. काय मस्त होतं पण ते बाथरूम, काय मस्त फ़ील होता, रोजवालीचं इंटिरीयरपण मस्त आहे नाही? शांत आणि थंडावा देणारं. प्रभानं या आठवड्यात बाथरूम घासून घेतलं नाही का? उद्या नक्की विचारायला पाहिजे. प्रभा बरी आहे. टिकली आहे कामावर. काम ठीक ठीक करते पण नियमीत तर आहे. कामवाल्या बायका हा पण एक स्ट्रेस ट्रिगर आहे हं. असल्या तरी वैताग नसल्या तरी. स्ट्रेसवरचं ते आर्टिकलपण भारी होतं. त्यावरपण लिहायचं राहिलंच की. उत्साहानं लिहायला घेतलं तर इंटरनेटनं दगा दिला. कॊम्प्युटरवाल्याला आता घरी बोलावून एकदा काय ते बघायलाच हवं. अ‍ॅण्टीव्हायरसपण संपलाय...ई हे म्हणजे घरातली साखर संपलीय असं म्हटल्यासारखं वाटलं. अग्गं बाई खरंच की घरातली साखर संपलीय आता जाता जाता घेऊनच जाऊ. काय करावं ईडनमध्ये घ्यावी का? की डी मार्टमध्ये एखादी चक्कर टाकावी? नकोच डीमार्टमध्ये गेलं तर आणखी दहा गोष्टी घेण्याचा मोह होणार. नकोच. किंवा सरळ संध्याकाळी मोअरमध्ये चक्कर मारावी नाहीतरी परवा लॉक न लॉकचे डबे घ्यायचे राहिलेच होते. जरा वेळ काढून जावं म्हणजे निवांतपणानं बघता येईल. कोणी सोबत येतंय का विचारावं का? तेव्हढाच टाईमपास.....अरे देवा या सगळ्यात गेलं ना ईडन मागे जाऊ दे आता घरूनच मागवावं...घराची किल्ली घेतली ना मघाशी गडबडी? आई गं..घरातून निघताना गॅस बंद केला होता नां? आता घरी गेल्यावर काय दिसणार आहे कोणास ठाऊक? नाही नाही केला होता वाटतं बंद.....बघा आजपण वॉचमन गायब आहे मस्त गेट उघडं टाकून. कोणी आत घुसलं, काही झालं तर काय करणार? आई गं काय ऊन अर्ध्या तासात झीट निघाली नुसती. व्वा. लॉबीत आल्यावर कसं मस्त थंडगार वाटतंय......

हुश्श...आता बास झालं. मनातल्या मनात बोलायचा कंटाळा नाही येत पण बोटं वैतागली बटनं बडवून.

अरे हो जाता जाता सांगायचंच राहिलं. उपरोक्त मनोगताला कसलेही साहित्यिक नियम लावू नका. ही एक चम्मतग आहे. वाचा सोडून द्या. नाही समजली तर आणखिनच गम्मत. शिवाय नेहमीप्रमाणेच मनालाही लावून नका घेऊ.