बायामाणसांचं ब्युटी पार्लर

माणूस नावाच्या प्राण्याला अन्न,वस्र, निवारा गरजेचा असतो तर बाईमाणूस नावाच्या प्राण्याला त्यासोबत ब्युटी पार्लर नावाची additional  असते. अर्थात याला अपवाद असतीलही पण हे सर्वसामान्य बाईमाणसांबद्दल आहे.
असो, तर ब्युटी पार्लरचं आपलं एक भारी जग असतं.
व्हरायटी तर किती? अगदी गल्लीबोळातल्या बटबटीत पार्लर्स  पासून हायफाय  ब्युटी सलोन पर्यंत. ध्येय एकच, खुर्चीतल्या स्त्रीला  यथाशक्ती मिस इंडिया, मिस युनिव्हर्स काहीच नाही जमलं तर मिस गल्ली बनवायचं. 
गल्लीवाल्या पार्लरचा मामला म्हणजे हात दाखवा बस थांबवा. अपॉईंटमेंट वगैरेचे नखरे नाहीत. डायरेक्ट आत घुसायचं मग आतली एखादी कोरीव भुवयावाली गालावर पिंपल असलेली मुलगी नखरा दाखवत विचारते,"क्या करने का है" (हे मुंबईतलं पार्लर त्यामुळे चिरफ़ाड राष्ट्र भाषेची...बाकी शहरात त्यांच्या त्यांच्या हेलमधल्या भाषा) मग आपण अगदी लाचारीनं सांगायचं सिर्फ़ आयब्रो...वॅक्सिंग..."वेट करना पडेगा. ये कस्टमरका अभी है फ़िर आपका" आपण- "कितना टाईम लगेगा" कोरीव भुवया आणि पिंपलवाली"कुछ बोल नहीं सकते...ये देखो ये आंटी का टच अप है फ़िर इनका आईब्रो फ़िर इनका हेअर कट है....ए कांचन तू लेती क्या रे? कितना टाईम है तेरेको" कांचन पडद्या आडून वसकन "मुझे टाईम लगेगा अभी ये दीदी का पेडिक्युअर भी है" मग कोरिव भुवया आणि पिंपलवाली आपल्याला सांगते,"अभी कम से कम आधा घंटा तो रूकना पडेगा" मग आपण त्या नऊ बाय नऊ मधे इतर आंट्या, म्यॅडमा आणि दीद्यांसोबत वेट करत स्वेटत बसायचं. यथावकाश आपला नंबर येतो. आईब्रोज करायला बसल्या बसल्या ती आपल्याला म्हणते,"दीदी लाश्ट टाईम किधर से करवाया, शेप बिगड गया" पूर्वी या वाक्याला मी घाबरायची आता सरावले आहे. आता सांगते बिनधास्त. तुझ्याचकडून तर केल्या. मग ती सटपटते आणि आठवायला लागते. मग आपण द्यायचं बिनधास्त ठोकून की, अगं नाही का रविवारी खूप कस्टमर होते तेंव्हा उभ्या उभ्या येऊन गेले. मग ती चुपचाप आपल्या आईब्रो दोर्‍यानं कोरायला लागते. मात्र जर तुम्ही माझ्यासारखे सरावलेले नसाल आणि भाबडेपणानं लाश्ट टाईम आईब्रो किधर से केले हे सागितलं की तुम्हाला ती बिघडलेल्या आकारातला केस न केस हिशेब करून दाखवणार म्हणून समजा.
इकडे ब्लिचिंग, फ़ेशियलला गेलं की धमाल असते. सुरवातीला उडप्याच्या हॉटेलसारखा मेन्यु तोंडीच फ़ाडफ़ाड  सांगतात. अमूक ब्लिच तमूक ब्लिच आणि मग अगदी त्वचातज्द्न्य झक मारेल अशा गंभीर थाटात आपल्य त्वचेला सध्या कोणत्या ब्लिचची आणि फ़ेशियलची गरज आहे हे सांगतात. जनरली हे ब्लिच किंवा फ़ेशियल त्या पार्लरमधे नवं आलेलं आणि खपवायचं असल्यानं किंवा महाग असलेलं असतं. आपण त्यांना बळी न पडता  आपल्याला हवं ते निवडलं की नंतर आपल्या स्किनचा पोस्ट मॉर्टेम ऐकावा लागतो. दीदी स्किन कितनी टॅन हो गयी है...दीदी स्किन बहुत ड्राय हो गयी है...दीदी डार्क स्पॉट कितने है...आणि जर त्यांच्या मर्जीनुसार निवड केली तर दीदी देखा स्किन कितनी ग्लो कर रही है हे दहा दहा वेळा ऐकावं लागतं. असो. तर आपलं फ़ेशिय होईपर्यंत त्या निर्मला, विमला, कांचन, प्रिती यांच्या गॉसिप गप्पा ऐकायच्या....त्यात दुपारच्या जेवणानंतर गेलं तर या गप्पांना  त्यांच्या ढेकरांच्या पार्श्वसंगीचा वेगळाच साज चढवलेला असतो. त्यांच्या घरातले प्रॉब्लेम, पार्लरवाल्या मालकिणीचा जाच, आजूबाजूच्या दुकानदारांची लफ़डी....हे सगळं ऐकता ऐकता डोळा लागला तर उत्तम नाही तर तुका म्हणे करत ऐकायचं सगळं...बरं दुसरीकडे एफ़  एम सुंदरी आपली आपणच एकटीच कोकलत असते, जमतील तशी बकवास गाणी लावत असते...कधी कधी आपल्यासोब आणखी एकदोन कस्टमर चेहरे घासून घ्यायला आलेले असतात. त्या दोघी मैत्रिणी असतील तर मग त्यांच्या सोसायटीतल्या माता का जगराता पासून झुंबा क्लासपर्यंतच्या गप्पा ऐकाव्या लागतात.  तासा दोन तासाच्या घासाफ़ुसीनंतर आपण ऐश्वर्या काय दिसेल इतक्या सुंदर होऊन बाहेर पडतो. साधारण हजारच्या आसपास बिल होतं आणि पार्लरबाहेर आल्यावर काळं कुत्रंही हिंग लावून विचारत नाही.