आंबाआख्यान





काल झी वर लिमयेकाका आंब्यापासून घरी बनवायच्या रेसपिज दाखवत होते. "आंबा स्पेशल" एपिसोड असल्यानं हाताला लागेल ते पदार्थ आणि आंब्याची पेटी घेऊन आंबा स्पेशल सुरू झाली. पहिल्याचपदार्थात घालायला आपल्या हापूस सोबत ग्लासभर (छोटासाच ग्लास बरं का, ते पटियाला वगैरे नाही (पटियाला: कर्टसी: सिंग इज कींग:)) कसलंस मद्य, मिरच्या, नारळाचं दूध....बाई गं.....अहो हे पदार्थ पाहिले आणि वाटलं या सगळ्याच्या मिश्रणातन जे काही बनू पहातंय ते पहाण्यापेक्षा "पवित्र रिश्ता" बघायला काय हरकत आहे? गेला बाजार निदान सांस भी कभी बहू थी सुध्दा परवडेल.
मला नां कमालच वाटते लोकांची. म्हणजे निरनिराळे पदार्थ करून बघणार्‍यांची. करा की बाबांनो तुम्हाला कशात काय घालायाचं ते घालून काय हवं ते करा. पण या राजस फ़ळाचा हा असा पाण उतारा नका करू. ज्याच्या नुसत्या वासानं छातची निर्वात पोकळी भरून निघावी, ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं, ज्याच्या दर्शनानंही बेहोश व्हायला व्हावं (ज्याच्या दर्शनानंही किलोभर वजन वाढावं :() त्या आंब्यापुढे इतर पदार्थांची काय मिजास? ज्याच्या नुसत्या असण्यानच इतर घटक पदार्थांचा उ्ध्दार होतो तिथंयाच ्यात त्याच्यात मिसळून त्याला बिचार्‍याला बापुडवाणा का करून टाकतात कोण जाणे?
आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फ़ोडी इथं पर्यंत ठीक आहे पण भातात आंबा, पिठात आंबा, दूध, दही दगड आणि माती. हे म्हणजे दिसला आंबा की घाल कशात तरी आणि बनव नवी पाककृती असं झालं.
हे असं भाता बितात आंबा घालून काहीतरी बनवण्यापेक्षा मला सोपी कृती माहितिय, मस्त वासाचा गोजिरा आंबा घ्यावा, तो धुवावा (बरं असतं पोरा टोरांना हायजिन बियजिन सांगायला), नंतर (जर पेशन्स असतील तर) सुरी घेऊन आंब्याचे अवघे दोन तुकडे करा(भारी नजाकतीचं काम आहे हो!) (पुन्हा पेशन्स असतील तर) डिश मध्ये हा आंबा घ्या, जवळपास कोणी नाही असं बघा आणि डोळे मिटून हाणा.(जास्तिची आणि अर्थात अगाऊ (पणाची) सूचना- कृपया आंबा खाताना, मोबाईल स्वीच ऑफ़ ठेवा आणि डोअरबेल बंद ठेवा)आंबा खायला इतका सोप्पा असताना त्याला ढवळायचा, शिजवायचा, थापायचा, बडवायचा....सांगितलंय कोणी? मुळात समोर घमघत असलेला आंबा ठ्वून असल्या पाककृती करणार्‍यांचंच मला कौतुक वाटतं. कोठून आणतात इतका पेशन्स वगैरे काय की. आम्हाला म्हणजे साधा पातेलंभर आमरस करायचा म्हटला तरी मनावर, उरावर, जिवावर जडशिळ धोंडा ठेवावा लागतो.आंब्याचा रस काढणार्‍या हातांना मनातल्या मनात हज्जारदा दटावावं तेंव्हा कुठे वाटीत आमरस पडतो. (सोप्पं नाही हं हेसुध्दा)
आजच्या घडीला मला विचाराल की, जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर त्याचं उत्तर म्हणजे आंबा खाणार्‍यांना (खाऊ शकणार्‍या.) सर्वसु्खीचा किताब द्यायला हवा.
 

फ़ावल्या वेळेत


 

रब ने बना दी जोडी!!


आपल्या हिंदी सिनेमावाल्यांचा एक आवडता संवाद आहे, "जोडीया तो ऊपरवाला बनाता है". आपल्या आजुबाजुला नजर टाकली तर या (न वापरताच जन्मापासूनच गुळगुळीत असलेल्या नव्या पन्नास आणि पंचवीसपैशाच्या नाण्यासारखं)गुळगुळीत वाक्यामधली सत्यता वावरताना दिसेल. तो जो कोणी ऊपरवाला आहे त्याचं "मॅचमेकींग डिपार्टमेंट" सॉलिडच आहे. प्रत्येक नवरा-बायकोच्या जोडीत एक चंमतग सापडेल. म्हणजे नवरा कटकटी असेल तर बायको शांत. बायको पीर्पीर्र करणारी (पिरपिरची सुपरलेटिव्ह डिग्री) असेल तर नवरा कानात बोळे घालून वावरत असल्यासारखा. नवरा हौशी तर बायकोला चिंतांचा डोंगर उपसायला आवडत असणार.(रूकावट के लिए खेद है....)इथे उदाहरण पेरायचा मोह होतोय. लग्नाच्या एका वाढदिवसाला माझ्या ओळखितल्या जोडप्यातल्या नवर्यानं (अरे या नवर्या तला र आणि या योग्य पध्दतिनं लिहायची आयडिया कोणीतरी सांगारे हा नवरा दरवेळेस असा उमटताना पाहून कोण दु:ख होतंय) बायकोला सरप्राईज द्यायच्या उद्देशानं महागडा ड्रेस आणला तर तो पाहिल्यावर बायकोची पहिली प्रतिक्रीय होती-"अगं बाई, आता याला दरवेळेस ड्रायक्लिनला द्यावं लागणार, घरी धुता नाही येणार रे" (नवर्याच्या रोमॅंटिक गिफ़्ट्वर बायकोची इतकी वस्तुस्थितीनिष्ठ प्रतिक्रीया मी तरी अजून ऐकली नाही). बर्याच घरात (पक्षी घराघरात) उलट चित्र असतं. बायकोची महाप्रचंड हौशी असते आणि नवरा डोक्यावर लादी घेऊन वावरत असल्यासारखा थंड. पुन्हा एक उदाहरण पेरण्याचा मोह आवरत नाही. हे अर्थात अस्मादिकांचं आहे. मागे एकदा एका प्रदर्शनात लाकडी राजस्थानी झरोका मला जाम आवडला, म्हटलं घ्यायचा का रे? तर नवरा शांतपणानं म्हणाला, "अगं पण आपली खिडकी तर किती मोठी आहे". यावर त्याच्याकडे हा आला कुठून? असा कटाक्ष टाकून त्याला विचारलं,"तुला काय वाटलं हा एकच झरोका मी आपल्या घराच्या ऍक्च्युली खिडकीला लावणार आहे? बरं तसा लावायचा म्हटला तरी मग मी एकच घेऊया कसा म्हणेन? जितक्या खिडक्या तितके झरोके मागेन नां? पुन्हा आपण फ़्लॅटमध्ये रहातो हवेलीत किंवा स्वतंत्र बंगल्यात नाही. मग हा झरोका खिडकीला लावायला मला हवाय असं तुला वाटलंच कसं" यावर आधिच्याच शांतपणानं (वरून भोळेपणाचा वगैरे आव आणून) हा कसा म्हणतो,"काय नेम बाई तुझा. तुला कसली हौस फ़ुटेल (हो तो हौस फ़ुटली असंच म्हणतो) कोणी सांगावं. कोणत्या तरी साईवर घर सजवायचं काहीतरी पाहिलं असशिल तर मला कसं कळणार"? असो. तर काही जोडप्यात नवर्याला साहसकार्य आवडतं तर बायको आपली जिवाला भिऊन असते. म्हणजे बीचवर गेलं तरी हा आत आता चालत जातो आणि काळजाचे ठोके बिके चुकवत किनार्यावर स्वत:च्या चपला, पर्स आणि नवर्याचे कपडे सांभाळत बसलेली असते. एकाला गतिचं आकर्षण तर दुसर्याला संथ लयिचं, एकाला बोलायला आवडावं तर दुसर्याला गप्प रहायला. या सगळ्या विरोधाभासातसुध्दा एक छानशी लयच असते, म्हणून तर अशी दोन टोकं पकडून असणारी जोडपी वर्षानुवर्षं छान गुण्यागोविंदानं नांदतात. पाण्यात दूरवर चालत जाणार्या नवर्याला माहित असतं की किनार्यावर दोन डोळ्यातलं काळीज आपली अतीव काळजी करत बसलंय म्हणून तर एका टप्प्यावर पावलं किनार्याकडे वळतात. सतत चिंता करणर्या बायकोवर चिडत ती मोकळी व्हावी यासाठी नवरा तिला सुखाचे, आश्चर्याचे धक्के देतच रहातो. निरनिराळ्या हौसांचे (?) झटके येणार्या बायकांच्या नवर्याना ती हौस पुरवण्यात मजाही येतच असते फ़क्त अगं अगं म्हशीसारखा..... प्रकार असतो.
बघा जरा टाका आजुबाजुला नजर आणि शोधा अशा जोड्या.





(citra sau.-weddingabc.net)