
काल झी वर लिमयेकाका आंब्यापासून घरी बनवायच्या रेसपिज दाखवत होते. "आंबा स्पेशल" एपिसोड असल्यानं हाताला लागेल ते पदार्थ आणि आंब्याची पेटी घेऊन आंबा स्पेशल सुरू झाली. पहिल्याचपदार्थात घालायला आपल्या हापूस सोबत ग्लासभर (छोटासाच ग्लास बरं का, ते पटियाला वगैरे नाही (पटियाला: कर्टसी: सिंग इज कींग:)) कसलंस मद्य, मिरच्या, नारळाचं दूध....बाई गं.....अहो हे पदार्थ पाहिले आणि वाटलं या सगळ्याच्या मिश्रणातन जे काही बनू पहातंय ते पहाण्यापेक्षा "पवित्र रिश्ता" बघायला काय हरकत आहे? गेला बाजार निदान सांस भी कभी बहू थी सुध्दा परवडेल.
मला नां कमालच वाटते लोकांची. म्हणजे निरनिराळे पदार्थ करून बघणार्यांची. करा की बाबांनो तुम्हाला कशात काय घालायाचं ते घालून काय हवं ते करा. पण या राजस फ़ळाचा हा असा पाण उतारा नका करू. ज्याच्या नुसत्या वासानं छातची निर्वात पोकळी भरून निघावी, ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं, ज्याच्या दर्शनानंही बेहोश व्हायला व्हावं (ज्याच्या दर्शनानंही किलोभर वजन वाढावं :() त्या आंब्यापुढे इतर पदार्थांची काय मिजास? ज्याच्या नुसत्या असण्यानच इतर घटक पदार्थांचा उ्ध्दार होतो तिथंयाच ्यात त्याच्यात मिसळून त्याला बिचार्याला बापुडवाणा का करून टाकतात कोण जाणे?
आईस्क्रीममध्ये आंब्याच्या फ़ोडी इथं पर्यंत ठीक आहे पण भातात आंबा, पिठात आंबा, दूध, दही दगड आणि माती. हे म्हणजे दिसला आंबा की घाल कशात तरी आणि बनव नवी पाककृती असं झालं.
हे असं भाता बितात आंबा घालून काहीतरी बनवण्यापेक्षा मला सोपी कृती माहितिय, मस्त वासाचा गोजिरा आंबा घ्यावा, तो धुवावा (बरं असतं पोरा टोरांना हायजिन बियजिन सांगायला), नंतर (जर पेशन्स असतील तर) सुरी घेऊन आंब्याचे अवघे दोन तुकडे करा(भारी नजाकतीचं काम आहे हो!) (पुन्हा पेशन्स असतील तर) डिश मध्ये हा आंबा घ्या, जवळपास कोणी नाही असं बघा आणि डोळे मिटून हाणा.(जास्तिची आणि अर्थात अगाऊ (पणाची) सूचना- कृपया आंबा खाताना, मोबाईल स्वीच ऑफ़ ठेवा आणि डोअरबेल बंद ठेवा)आंबा खायला इतका सोप्पा असताना त्याला ढवळायचा, शिजवायचा, थापायचा, बडवायचा....सांगितलंय कोणी? मुळात समोर घमघत असलेला आंबा ठ्वून असल्या पाककृती करणार्यांचंच मला कौतुक वाटतं. कोठून आणतात इतका पेशन्स वगैरे काय की. आम्हाला म्हणजे साधा पातेलंभर आमरस करायचा म्हटला तरी मनावर, उरावर, जिवावर जडशिळ धोंडा ठेवावा लागतो.आंब्याचा रस काढणार्या हातांना मनातल्या मनात हज्जारदा दटावावं तेंव्हा कुठे वाटीत आमरस पडतो. (सोप्पं नाही हं हेसुध्दा)
आजच्या घडीला मला विचाराल की, जगी सर्वसुखी असा कोण आहे? तर त्याचं उत्तर म्हणजे आंबा खाणार्यांना (खाऊ शकणार्या.) सर्वसु्खीचा किताब द्यायला हवा.
22 comments:
पहिल्या अक्षरापासून अखेरच्या पूर्णविरामापर्यंत एकूण एक शब्दाशी १०१% सहमत.. !!!!! अजून काय लिहू :)
१०१% आभार :)
आणि 'आंबाआख्याना'त स्ट्रॉबेरीचा फोटो कशाला ग???
अगदी भारी बरं का... एकदम सोप्पी रेसिपी आहे. ट्राय करतोच.
@ हेरंब
:) ते आपलं असंच रे. म्हटलं लोकं व्हिस्कीबिस्कीत आंबा घालतायत आपण साध्यासुध्या स्ट्रॉबेरीत का घालू नये?
@पंकज
.....:) जरूर कर. अगदी गॅरेंटेड जमून येईल बघ.
ज्याच्या नुसत्या वासानं छातची निर्वात पोकळी भरून निघावी, ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं... अगदी खरे.. :) हल्ली मात्र घाल आंबा..बनव पदार्थ.. हेच सुरू असते... :) नुसत्या आंब्याची चव कशालाच नाही.
@ रोहन
मग काय रे! मला तर भितीच वाटायला लागलीय की हे असंच चालू राहिलं म्हणजे लोकांच्या आंबा रेसेपिजचं वेड आटोक्यात राहिलं नाही तर आंबा नुसताही खाता येतो हे आंब्यासकट त्यालाकखाणारेसुध्दा विसरून जातील. :)
शिनु तुझ्या लेखाशी, हेरंबच्या आणि रोहनच्या कमेंटशी मी सुद्धा १००% सहमत आहे...
मी सुद्धा १०१% सहमत.... अगं लिमयेबुवांचे काय विचारावे..बोबडे बोल बोलत ते जो काही पदार्थ सुचवतात तो कधीही खावासा वाटत नाही :(.....
आंबा काय बोलावे गं ..अतिशय लाडके फळ.... मला तर ना फोडी करेपर्यंत पण धीर धरवत नाही त्याऐवजी मस्त ओघळ चाटत चाटूनपूसून आंबा संपवावा :)
@आनंद
आभार.
@ tanvi
आभार.
अगदी खरंय. लिमयेबुवा म्हणजे .....असो.
पण मला अगदी मनापासून वाटतं की आंबा खाण्याचं फ़िलिंग यायला हवं तर तो कापायच्या भानगडीत न पडता असाच हाणायला हवा. अगं ज्याचे ओघळही चाटून घ्यावेसे वाटत नाहीत तो आंबा कसला?
लोकं आजकाल आंबा खाण्यतसुध्दा इश्टाईल मारायला लागलेत परवा एका पार्टीत काटा चमच्यानं आंब्याच्या फ़ोडी खाणारी बिचारी माणसं पाहिली आणि जीव कळवळला गं! :)
ज्याच्या केवळ एका रसाळ तुकड्यानं जिभेचं कैवल्य व्हावं, ज्याच्या दर्शनानंही बेहोश व्हायला व्हावं::200%सहमत...शिनु तुला माहितेय का...मंगला बर्वे ह्यांच्या अन्नपुर्णा पाककृतीच्या पुस्तकामध्ये आंब्याच्या रसातले पोंप्लेट अशी एक पाककृती आहे..म्हणजे बघ काय उच्छाद !!!
आंबा आख्यान भलतेच सुरेख लावलेस गं. इतके राजस फळ त्याच्या चवीचा मनसोक्त-मनमुराद आस्वाद घ्यायचा सोडून कशात कशात- अगदी तू म्हटलेस तसे दगड - माती... घालून कशाला वाटोळं करतात कोण जाणे. तोंड माखून मस्त ब्रम्हानंदी लावून आंबा खाण्यात जी मजा आहे ती काटे चमच्यातून म्हणजे... अगदी कीव करावीशी वाटते बघ. सर्वसुखीचा किताब एकदम पटेश गं... आम्हाला नुसते फोटोवर समाधान.
@माऊ
आभार :) अगं आई गं....आमरसातलं पापलेट म्हणजे भलंतच काय हो भलतंच काय....
@ भानस
का गं बाई इतकी कष्टी? यंदा हापूसचं उत्पादन विक्रमी आहे म्हणे?
kharach... 1000% avadle aamba aakhyan! maandi thokun aamras kadhtanache maze baba dolyasamor aale... aata te sukh mi anubhavte! manasokta!
गुगलणारी माणस हा लेख वाचला. आवडला म्हणुन सगळे लेख वाचले माझ्या मते नव-याला हा शब्द लिहीताना सरळ मायनसचे चिन्ह वापरुन य लिहावा
@ मेघना
धन्यवाद. :) नुकतेच पुण्याहून आंबे हाणून आलियस की काय :)पण खरंच आपल्यावेळेसच आंबे खायची खरी मज्जा होती. अख्ख्या अंगाला आंब्याचा महिना दीड महिने वास यायचा. मस्त गं .....
@ shendeatharva
ब्लॉगवर स्वागत. तुमच्या प्रतिक्रीया नेहमीच उत्साह वाढवतात. असेच भेट देत जा आणि वाचून प्रतिक्रीयाही.
नवरा लिहिण्याचा प्रॉब्लेम ब्लॉगर फ़्रेंडांमुळे सुटलेला आहे तरिही आवर्जून दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद :)
अगं आंबा खायला म्हणून खास वैशाख वणव्यात मुंबैला जाऊन आलो बघ आणि लेकाला तर आंबे खायचे धडेही द्यावे लागले नाहीत....:)
बाकी एक अजरामर रेसिपी लिहून ठेवल्याबद्दल कौतुकच हो तुझं नाहीतर काळाच्या (आणि अशा लिमये सारख्या बुवांच्या) ओघात गुडूप व्हायची...:)
बयो अपर्णा खरंच गं मी तर आता पुरणपोळीसकट सगळ्या पदार्थांच्या खास खाण्याच्या रेसपीज लिहिण्याच्या विचारात आहे. बघ नाहीतर आणखी काही वर्षांनी पुरणपोळी काचेच्या डिशमधून सर्व्ह होऊन काट्या चमच्यानं खाल्ली जाईल, वरणभातही असाच चमच्या चमच्यानं स्टाईलमध्ये तोंडात जाईल, नको गं बाई त्यापेक्शा लिहितेच कशी :) बाकी या मोसमातला आंबा अगदी मन लावके खाल्लेला दिसतोय.
Post a Comment