चमाला तू चंगतेसा चमी चकए चज्जाम!!

परवा एक मजाच झाली. लेकीच्या शाळेत प्रोजेक्ट डिस्प्ले होता आणि "आईबाबा इन्व्हायटेड" होते. सक्काळी सक्काळी आम्ही आणि इतर लुकलुकत्या डोळ्यांचे पालक वर्गात पोहोचलो. पाच वर्षांच्या पोरांना प्रोजेक्टचा विषय दिला होता, "सोलर सिटिम". अर्थात सगळे ग्रह पालथे घालताना आम्हालाही त्यांच्या बरोबरीनं "गुगलायला" लागलं होतं. प्रकरण चांगलं महिनाभर गाजत होतं. रोज शाळेतून आल्या आल्या नवीन काही ऐकायला मिळत होतं. त्यामुळे प्रोजेक्ट डिस्ल्पेच्या दिवशी नक्की काय असणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. तर वर्गात गेल्यानंतर आधी मुलांची गाणी बिणी झाली मग एक "क्वीझ" चालू झालं. मुलं विरूध्द त्यांचे आईबाबा असे गट होते. आता जनरली कसं चित्र असतं की आपलं पोट्टं नीट उत्तरं देईल की नाही याचं टेन्शन आपल्याला असतं तर अगदी सेम तेच टेन्शन मी चक्क माझ्या समोर बसलेल्या सत्तर चिमुकल्या डोळ्यात बघत होते. एका प्रश्नाचं उत्तर फ़क्त माझ्या (अगं बाई गं हुश्शार गं माझं बबडं ते! :)) नवरयाला आलं. त्यावेळे मुलांच्या गटातल्या माझ्या लेकीनं हाताला झटका देऊन "येस्स" केलं. युनिफ़ॊर्मची नसलेली कॊलर जाम टाईट झालेली स्पष्ट दिसलीच. बाबापण काय मस्त ताठलाच लगेच. त्यानंतर मुलांचे प्रोजेक्ट दाखवणं चालू झालं (बरेचजणांच्या पालकांनिच प्रोफ़ेशनली बनवले होते मात्र माझ्यासारख्या काही वेड्यांनी चक्क मुलांकडून बनवून घेतले होते. असो.) तर पहिलाच प्रोजेक्ट माझ्या लेकीचा होता आणि "बेस्ट प्रोजेक्ट" म्हणून कौतुकाचा वर्षावही होता. टिचरचं वाक्य होतं,"द बेस्ट प्रोजेक्ट ड्न बाय सानियाज मदर"! सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या , मी उठून उभी राहिले, धन्यवाद म्हटलं आणि आवर्जून सांगितलं की मी फ़क्त मदत केली बाकी सगळं सानुनं केलंय. त्यामुळे खरं श्रेय तिचंच आहे (बिचारी सहा तास खपून बोटं दुखेपर्यंत लिहित होती) यावर तर टाळ्यांचा आवाज आणखिनच वाढला. पाचव्या रांगेतल्या दुसरया स्टुलवर बसलेले दोन हात जरा जास्तच जोरात टाळ्या वाजवत होते आणि नजरेत नेहमिचेच भाव स्पष्ट दिसत होते "माय वल्ड्र बेस्ट आई". शाळा सुटल्यानंतर एक माझा आणि एक बाबाचा हात धरून झुलत चाललेल्या लेकीच्या चेहरयावर प्रचंड अभिमानाचे भाव होते. अगदी तसेच जसे तिनं एखादं बक्षिस मिळवल्यावर आमच्या डोळ्यात असतात तसे. गंमत आहे नां?
 

नसता की्डा

परवा कधितरी म्हणजे आता दिवस नक्की आठवत नाही. तर त्या दिवशी रात्री सर्फ़ करता करता एका वाहिनीवर (नाव मुद्दामच नाही लिहिलं, हो उगाच कशाला कोणाची फ़ुकट जाहिरात करायची नाही का?) अफ़गाणी भाषेतला शिनुमा दिसला आणि त्यात एक अगदी गोड लहान मुलगी दिसली म्हणून थांबले. सिनेमा ऐन बहरात आला असावा. पाठीवर दफ़्तर, डोक्याला रूमाल आणि एक हात बॆंडेजमुळे गळ्यात असणारी ती जी गोड छोटी मुलगी होती तिला शाळा सुटल्यानंतर आई घ्यायला येणार असते पण ब्रराच वेळ झाला तरी ती येत नाही मग ही चिमुरडी कसा बसा रस्ता ओलांडून परत शाळेच्या गेटवर येते. तिथे शिक्षिका कोणाशीतरी "ब्ला ब्ला ब्ला" बोलत असते. चिमुरडी मधून मधून सांगाण्याचा प्रयत्न करत असते की माझी आई मला न्यायला आलेली नाही आता मी काय करू? तुम्ही म्हणाल हे आम्हाला कसं समजलं तर खाली विंग्रजीत पाट्या येत होत्या त्यावरून समजलं. तर ती शिक्षिका समोरच्याच्या बोलण्याला आधीच वैतागलेली असते त्यात या पोरीची कटकट ऐकून जाम पकते. समो्रचा बाबा शिक्षिकेला सांगतो की ती जर त्याच्या कसल्याशा कार्यक्रमाला यायचं कबूल करणार असेल तर तो या मुलिला तिच्या बसमध्ये बसवून द्यायला तयार आहे. अशा रितिनं ती मुलगी बसमध्ये चढते. एका म्हातारीच्या बाजुला हिला बसायला जागा मिळते. पुढच्या स्टॊपवर एक लहान मूल कडेवर असणारी बाई बसमध्ये चढते त्यावेळेस म्हातारी या मुलिला म्हणते "यंग लेडी तू ऊठ आणि तिला बिचारीला बसायला जागा दे" आपल्याच विचारात दंग असणार्या मुलिला हे ऐकायलाच येत नाही. यावर खडूस म्हातारी परत एकदा तिला खडसावून सांगते त्यानंतर आपली चिमखडी उठून उभी रहाते. "काय बाई तरी आजकालची मुलं, अजिबातच ऐकत नाहीत की. आता या पोरटीचंच बघ मी चारचारदा सांगितलं तेंव्हा उठली बया" असं म्हणून म्हातारी शेजारणीसोबत "ब्ला ब्ला ब्ला" बोलायला जी चालू करते ते थांबायचं नावच घेत नाही. इतक्यात चिमखडीला तिची आई रस्त्यावरून जाताना दिसते आणि ती ओरडायला लागते,"बस थांबवा, बस थांबवा" अखेरीस थोडी दूर जाऊन बस थांबते. चिमखडी उतरून मागे धावत सुटते. भर रस्त्यावर आल्यावर तिला आई कुठेच दिसत नाही. भांबावलेली बिचारी परत धावत येऊन त्याच बसमध्ये चढते. परत एकदा तिच्या कानात आणि पर्यायानं आपल्याही बसमधली असंख्य प्रकारची "ब्ला ब्ला ब्ला" घुसायला जाते. कोणीतरी कोणाचातरी हात बघून भविष्य सांगत असतं, कोणी लग्नाळू मुलिला असंख्य सल्ले देत असतं, मध्येच एक भिकारी येऊन गाणं म्हणून जातो. असली सगळी चायनिज भेळ कानात घुसतच जाते. आपण अगदी ईरीटेट झालेले असतो मात्र उत्कंठाही जाम वाढलेली असते. अखेरीस अखेरचा स्टॊप येतो आणि सगळेजण उतरून जातात. बसचा चालक या मुलिला पहातो आणि विचारतो की तुला कुठे जायचंय आणि तू एकटी अशी? तुझ्यासोबत कोणी नाही का? यावर ती सगळी स्टोरी सांगते. तो तिला विचारतो की, तुला तुझा स्टॊप माहित आहे का? त्यावर ती सगळं वर्णन करते मग तो सांगतो की अगं मुली तो स्क्वेअर तर खूप मागे आहे. ती म्हणते काका तुम्हीच मला परत त्याच स्टॊपवर सोडा नां. तो म्हणतो ई नाही गं बाई आता माझी ड्युटी संपली मी चाल्लो घरी. मग तो त्याच्या दुसरया एका चालक मित्राला सांगतो आणि तिला त्याच्यासोबत घेऊन जायला सांगतो. तिला बसमध्ये बसवून तो निघून जातो, इतक्यात क्लिनरसाहेब अवतरतात ते म्हणतात की ए मुली या दारातून पुरूषमाणसं चढतात चल उतर खाली. बिचारी परत उतरते आणि मागच्या दारानं चढण्याचा प्रयत्न करते मात्र तिथे ही भली गर्दी असते. तितक्यात ती बसच सुटते. ही आपली बिचारी इकडे तिकडे पळतच सुटते आणि अखेरीस थकून उभी रहाते. (इथे आपला श्वास अडकतो की, अयाई गं आता हिचं काय होणार?)इतक्यात क्लिनरसाहेबच तिला बोलावायला येतात. (आपण हुश्श एकदाचे) बसमध्ये चढल्यानंतर चालक महाशय विचारतात की, कुठे सापडली ही? क्लिनर म्हणतो भर रस्त्यातच उभी होती. चालक म्हणतो, तू पण लेका भारीच आहेस कशाला उतरवलंस तिला. क्लिनर म्हणतो, आता मला काय माहित ही तुमच्याबरोबर आहे. असं सगळं चाललेलं असताना आपल्या डोक्यात विचार चालू होतात की ही पोरगी आतातरी सुखरूप आईपर्यंत पोहोचेल की नाही? इतक्यात ती मुलगी हाताचं बॆंडेज, डोक्यावरचा रूमाल आणि पाठीवरचं दप्तर कढून फ़ेकून देते आणि चिडून म्हणते,"बस्स झालं. आता यापुढे मला एक मिनिटही काम करायचं नाहीए." बस अर्थातच थांबते आणि ती मुलगी उतरून फ़ुटपाथवर जाऊन बसते. आता कॆमेरा बसच्याआत वळतो तिथे लाईट, कॆमेरे आणि युनिटची माणसं असतात ते सगळे त्या मुलिच्या आईला सांगतात की हा चित्रपटाचा अखेरचा सिन आहे, एव्ह्ढा पार पडू दे. तिला समजावून सांग. आता आई खाली उतरून मुलिला समजवायला लागते आणि ही मात्र जाम हट्टाला पेटलेली असते. आता काय करायचं म्हणून सगळं युनिट डोक्याला हात लावून बसलेलं असतं........एव्हाना हे सगळं शिनुमातल्या शिनुमात चाललेलं आहे याचा उजेड पडलेला असतो आणि शिनुमातल्या शिनुमाचं आणि त्या मायलेकीच पुढे काय झालं? याची उत्सुकता लागलेली असतानाच खडाक्कन लाईटच गेली. असा काहीतरी विचित्र शेंडा ना बुडखा न बघता मधला भागच बघितल्यानं काय झालं असेलचा डोक्यात कीडा वळवळयाल लागला. वैताग नुसता.
 

एका घराची गोष्ट

परवा काय झालं नां की, दुपारच्या वेळेत आमचा तुफ़ानी सैतान अगदी शांत होता. बराच वेळ झाला काही आवाज नाही म्हटला की ज्याप्रमाणे सगळ्याच आयांच्या मेंदुंचे सॆटेलाईट कार्यरत होतात तसे माझेही झाले आणि चाललंय तरी काय पहावं म्हणून हळूच तिच्या खोलीत डोकावले तर उपडं बसून जीभ बाहेर काढून मन लावून रंगकाम चाललं होतं. इतकं कसलं रंगकाम चाललंय म्हणून मागून जाऊन पाहिलं तर बरोबर त्रिकोणी आकाराच्या डोंगरांच्या रांगेमागून तळपणार्या सूर्यदेवाचं दर्शन झालं. डोंगरांच्या पायथ्याशी कौलारू घर चितारणं चाललं होतं. खूप वरर्षांपूर्वी घराचं चित्र काढायचं म्हटलं की आम्हीही अगदी असंच कौलारू घर चितारत असू. आता कौलारू घरं किमान मुंबईत तरी गायब झाली असताना घराची कल्पना आजही टुमदार कौलारू घराभोवतीच फ़िरतेय हे पाहून गंमतच वाटली. माझी चाहूल लागल्यावर मान वळवून लुकलुकत्या डोळ्यांनी आणि रंगलेल्या चेहर्यानं तिनं विचारलं,"कसं आलंय माझं होम" म्हटलं एकदम "स्वीट" . चित्रातल्या घरावर बेहद्द खुश झालेलं पिल्लू म्हणालं,"आई आपण ना सेम टू सेम असंच एक घर बांधुया." तिला म्हटलं "तुझ्या दादोबांचं घर अगदी असंच होतं".यावर चकीत होऊन ती म्हणाली, "हो? तू रहात होतीस तेंव्हा त्या घरात? कुठे होतं? मला सांग नां त्या घराची गोष्ट". तिनं विचारण्याआधीच मी आमच्या जुन्या घरात जाऊन पोहोचले होते.

.................आमच्या घराची गोष्ट मी पाच वर्षांची असताना सुरू झाली. कराडातल्या सोमवार पेठेतल्या ऐसपैस वाड्यात वावरलेल्या माझ्या आईला दोन खोल्यात रहाणं म्हणजे बांधल्यासारखं वाटायचं. त्यातून भाड्याच्या घरात शंभर बंधनं असायची ती वेगळीच. एक खिळा ठोकला तर आमचे घरमालक म्हणे धावत यायचे. दारासमोर फ़ुललेली बाग होती पण देवासाठी चार फ़ुलं तोडायची परवानगी नव्हती. बाथरूम तुंबतात म्हणून आठवड्यातून एकदाच केस धुण्याची अट तर घराच्या किल्ल्या देतानाच घातली होती हे सगळं कमी म्हणून आणखी एअ विचित्र अट घरमालकीण बाईंनी अगदी कडकपणानं घातली होती वर जर ही अट मान्य असेल तरच घर मिळेल म्हणून तंबिही दिली ती अट अशी होती की,"आमचं घर देव धर्म करणार्यातलं आहे. आम्ही कडक सोवळं ओवळं पाळतो म्हणून तर ब्राह्मणांशिवाय कोणाला वाड्याचा उंबरा चढू देत नाही त्यामुळे तुम्हाला या वास्तूत रहायचं तर सगळं सोवळं पाळायला पाहिजे. अगदी बाहेरचंही बसावं लागेल". असली विचित्र अट मान्य करण्यावाचून आईदादांपुढे पर्याय नव्हता कारण खिसा परवानगी देणारं हे एकच घर होतं. मला जसं समजायला लागलं तसं आईचं एअ वाक्य मला सतत ऐकायला यायचं,"अहो, काहीही करू पण जागा घेऊन किमान एक खोली तरी उभी करू. माझ्या जागेवरून कोणी मला ऊठ म्हणणार नाही अशी हक्काची जागा मला हवीय" आमची आई जाम हिकम्ती तर दादा कमालिचे संयमी. कोणतिही गोष्ट दहा बाजुंनी विचार करून पन्नास जणांसोबत मसलत केल्याशिवाय करत नसत. आई म्हणजे आधी कती मग विचार असा मामला. अखेर एक दिवस गावाबाहेर पाच हजार स्क्वे. फ़ु.ची जागा घ्यायला आईनं दादांना राजी केलं आणि नुसतं राजी केलं नाही तर जवळचं होतं नव्हतं ते सगळं सोनं त्या जागेपायी विकलं. गळ्यात काळी पोत आणि हातात काचेच्या बांगड्या अशी आई आनंदानं इतई फ़ुलली होती की तिचं दागिन्यांविना ओकंबोकं रूपही तितकच देखणं दिसत होतं. स्वत:चं हक्काचं घर होणार या गोष्टीचा तिला इतका आनंद झाला होता की त्यामुळे तिला पुढच्या अडचणी जाणवतच नव्हत्या. जवळचं होतं नव्हतं ते विकल्यानंतर पाया आढून झाल्यावर घराचं काम अर्थातच ठप्प झालं. मग जसे पैसे जमतील तसं घर उभं रहायला लागलं. जागा कुठच्या कुठे गावाबाहेर होती, पाणी वीज कसली म्हणून सोय नाही, रस्त्यांच्या पत्ताच नाही त्यात काळी जमिन त्यामुळे पावसाळ्यात गुडघाभर चिखल व्हायचा अशा ठिकाणी पैसा ओतला म्हणून आईदादांना सगळ्यांनिच अगदी वेड्यात काढलं. त्यावर आई म्हणायची,"असुदे कशिही असली तरी जागा, हक्काची आहे हे काय कमी आहे? उद्या तशिच वेळ आली तर चार पत्रे उभे करून राहिन". तिच्या हट्टापुढे कधिच कोणाचंच काही चाललं नव्हतं याहीवेळेस काही चाललं नाही. आमचं घर बांधायचं काम दिगंबरकाका नावाचे एक गवंडी करत होते. आमच्या खिशाचा अंदाज असलेले दिगंबरकाका त्याचा विचार करून त्याबेतानं विट न विट उभी करत होते. जवळच असलेल्या एका चुन्याच्या भट्टीतून चुना येत होता, विटा काकांच्य ओळखितून येत होत्या सगळं हळूहळू का होईना पण शिस्तीत चाललं होतं याचं कारण आईदादांची लोकांतली स्वच्छ प्रतिमा. अत्यंत गप्पिष्ट, मनमिळावू, अगत्यशिल असलेली आई पेशानं शिक्षिका होती त्यामुळे तिला सगळेच "बाई" म्हणत असत. एका पैशाचिही चौकशी न करता "बाईंच्या प्लॊटवर" सामान येत राहिलं. सामानची जुळवा जुळव झाली तरी हाताखालच्या मजुरांचे पगार थकवणं आईदादांनी कधिच केलं नाही पण हळू हळू दर शनिवारी त्यांचे पगार देण्यासाठी पैसे जमवणं जरा ओढीचं व्हायला लागलं. दिगंबर काकांनी आमचं घर उभं राहिल्यानंतरच त्यांचे पैसे एकदमच घ्यायचं ठामपणानं सांगितलेलं असलं तरी हाताखालच्या लोकांना पैसे देणं आवश्यक होतं. मग आईनच सांगितलं अगदी एक किंवा दोनच माणसं हाताखाली घ्या बाकीचं आम्ही बघू. आम्ही शाळासंपल्यानंतर दिवसभर घरात एकटेच असायचो तर आईनं एअ दिवस आम्हाला म्हणजे मला आणि भैय्याला बोलवून सांगितलं की उद्यापासून प्लॊटवर जायचं आणि बांधकामावर पाणी मारणं आणि इतर किरकोळ कामं करायची. म्हणजे अगदी घमेली उचलायला लागली नाहित पण विटांवर पाणी मारून ठेवणं वाळूचा ढीग करून ठेवणं अशी बारीक कामं आम्ही दोघं अरायला लागलो. आम्हाला काय उलट मजाच यायची. दुपारी जेवणाचे डबे घेऊन आम्ही दोघं सायकलवरून डबलसिट प्लॊटवर जायचो. तिथं पाणी मारायच्या निमित्तानं पाण्यात मनसोक्त खेळायचो. संध्याकाळी शाळेतून आई थेट तिकडेच यायची. काम कुठवर आलंय ते पहायची कौतुकानं लावलेल्या झाडांना पाणी घालायची मग सायकलच्या हॆंडलला पाण्याच्या पाईपचं भलं मोठं भेंडोळं, बादल्या आणि डबा लटकावून आम्ही तिघं चालत चालत घरी यायचो. असं काम थोडं थोडकं नाही तर वर्ष दीड वर्ष चाललं. मध्ये पैशाची अगदीच ओढ झाल्यानं बंदच पडलं. प्लॊटवर जायचा नेम मात्र तिनं स्वत: चुकवला नाही आणि आम्हालाही चुकवू दिला नाही. दरम्यान आम्ही लावलेलं झाड न झाड फ़ोफ़ावलं होतं. त्यांची निगा राखायला रोज जायलाच हवं असं तिचं म्हणणं होतं. आमच्या घराचं बांधकाम हा घरमालकांच्या चेष्टेचा विषय झाला नसता तरच नवल. आईची येता जाता कुजक्या शब्दात मालकीणबाई थट्टा करायच्या. मात्र आई न चिडता, संतापता त्यांचे वार परतवायची. अखेर एक दिव घरमालकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आणि घर सोडायला सांगितलं. आई तर पण करून बसली होती की हे भाड्याचं शेवटचं घर. आता जायचं ते स्वत:च्या घरात. ती जे बोलायची ते करायची हे पक्कं जाणून असणारे दादा दुहेरी काळजित पडले. घराचं अर्धं काम झालेलं होतं आणि तिथे रहाणं शक्य नव्हतं, लगोलग घर उभं करायचं तर दातावर मारायला पैसे नव्हते अशातच आमच्याचकडे रहाणार्या लहान मावशिच लग्न ठरल्यानं घरात ती घाई चालली होती. तिचं लग्न इतरत्र चार पैसे खर्च करायला उसंत देत नव्हतं. कसं करायचं या विवंचनेत आईदादा होते...........