नसता की्डा

परवा कधितरी म्हणजे आता दिवस नक्की आठवत नाही. तर त्या दिवशी रात्री सर्फ़ करता करता एका वाहिनीवर (नाव मुद्दामच नाही लिहिलं, हो उगाच कशाला कोणाची फ़ुकट जाहिरात करायची नाही का?) अफ़गाणी भाषेतला शिनुमा दिसला आणि त्यात एक अगदी गोड लहान मुलगी दिसली म्हणून थांबले. सिनेमा ऐन बहरात आला असावा. पाठीवर दफ़्तर, डोक्याला रूमाल आणि एक हात बॆंडेजमुळे गळ्यात असणारी ती जी गोड छोटी मुलगी होती तिला शाळा सुटल्यानंतर आई घ्यायला येणार असते पण ब्रराच वेळ झाला तरी ती येत नाही मग ही चिमुरडी कसा बसा रस्ता ओलांडून परत शाळेच्या गेटवर येते. तिथे शिक्षिका कोणाशीतरी "ब्ला ब्ला ब्ला" बोलत असते. चिमुरडी मधून मधून सांगाण्याचा प्रयत्न करत असते की माझी आई मला न्यायला आलेली नाही आता मी काय करू? तुम्ही म्हणाल हे आम्हाला कसं समजलं तर खाली विंग्रजीत पाट्या येत होत्या त्यावरून समजलं. तर ती शिक्षिका समोरच्याच्या बोलण्याला आधीच वैतागलेली असते त्यात या पोरीची कटकट ऐकून जाम पकते. समो्रचा बाबा शिक्षिकेला सांगतो की ती जर त्याच्या कसल्याशा कार्यक्रमाला यायचं कबूल करणार असेल तर तो या मुलिला तिच्या बसमध्ये बसवून द्यायला तयार आहे. अशा रितिनं ती मुलगी बसमध्ये चढते. एका म्हातारीच्या बाजुला हिला बसायला जागा मिळते. पुढच्या स्टॊपवर एक लहान मूल कडेवर असणारी बाई बसमध्ये चढते त्यावेळेस म्हातारी या मुलिला म्हणते "यंग लेडी तू ऊठ आणि तिला बिचारीला बसायला जागा दे" आपल्याच विचारात दंग असणार्या मुलिला हे ऐकायलाच येत नाही. यावर खडूस म्हातारी परत एकदा तिला खडसावून सांगते त्यानंतर आपली चिमखडी उठून उभी रहाते. "काय बाई तरी आजकालची मुलं, अजिबातच ऐकत नाहीत की. आता या पोरटीचंच बघ मी चारचारदा सांगितलं तेंव्हा उठली बया" असं म्हणून म्हातारी शेजारणीसोबत "ब्ला ब्ला ब्ला" बोलायला जी चालू करते ते थांबायचं नावच घेत नाही. इतक्यात चिमखडीला तिची आई रस्त्यावरून जाताना दिसते आणि ती ओरडायला लागते,"बस थांबवा, बस थांबवा" अखेरीस थोडी दूर जाऊन बस थांबते. चिमखडी उतरून मागे धावत सुटते. भर रस्त्यावर आल्यावर तिला आई कुठेच दिसत नाही. भांबावलेली बिचारी परत धावत येऊन त्याच बसमध्ये चढते. परत एकदा तिच्या कानात आणि पर्यायानं आपल्याही बसमधली असंख्य प्रकारची "ब्ला ब्ला ब्ला" घुसायला जाते. कोणीतरी कोणाचातरी हात बघून भविष्य सांगत असतं, कोणी लग्नाळू मुलिला असंख्य सल्ले देत असतं, मध्येच एक भिकारी येऊन गाणं म्हणून जातो. असली सगळी चायनिज भेळ कानात घुसतच जाते. आपण अगदी ईरीटेट झालेले असतो मात्र उत्कंठाही जाम वाढलेली असते. अखेरीस अखेरचा स्टॊप येतो आणि सगळेजण उतरून जातात. बसचा चालक या मुलिला पहातो आणि विचारतो की तुला कुठे जायचंय आणि तू एकटी अशी? तुझ्यासोबत कोणी नाही का? यावर ती सगळी स्टोरी सांगते. तो तिला विचारतो की, तुला तुझा स्टॊप माहित आहे का? त्यावर ती सगळं वर्णन करते मग तो सांगतो की अगं मुली तो स्क्वेअर तर खूप मागे आहे. ती म्हणते काका तुम्हीच मला परत त्याच स्टॊपवर सोडा नां. तो म्हणतो ई नाही गं बाई आता माझी ड्युटी संपली मी चाल्लो घरी. मग तो त्याच्या दुसरया एका चालक मित्राला सांगतो आणि तिला त्याच्यासोबत घेऊन जायला सांगतो. तिला बसमध्ये बसवून तो निघून जातो, इतक्यात क्लिनरसाहेब अवतरतात ते म्हणतात की ए मुली या दारातून पुरूषमाणसं चढतात चल उतर खाली. बिचारी परत उतरते आणि मागच्या दारानं चढण्याचा प्रयत्न करते मात्र तिथे ही भली गर्दी असते. तितक्यात ती बसच सुटते. ही आपली बिचारी इकडे तिकडे पळतच सुटते आणि अखेरीस थकून उभी रहाते. (इथे आपला श्वास अडकतो की, अयाई गं आता हिचं काय होणार?)इतक्यात क्लिनरसाहेबच तिला बोलावायला येतात. (आपण हुश्श एकदाचे) बसमध्ये चढल्यानंतर चालक महाशय विचारतात की, कुठे सापडली ही? क्लिनर म्हणतो भर रस्त्यातच उभी होती. चालक म्हणतो, तू पण लेका भारीच आहेस कशाला उतरवलंस तिला. क्लिनर म्हणतो, आता मला काय माहित ही तुमच्याबरोबर आहे. असं सगळं चाललेलं असताना आपल्या डोक्यात विचार चालू होतात की ही पोरगी आतातरी सुखरूप आईपर्यंत पोहोचेल की नाही? इतक्यात ती मुलगी हाताचं बॆंडेज, डोक्यावरचा रूमाल आणि पाठीवरचं दप्तर कढून फ़ेकून देते आणि चिडून म्हणते,"बस्स झालं. आता यापुढे मला एक मिनिटही काम करायचं नाहीए." बस अर्थातच थांबते आणि ती मुलगी उतरून फ़ुटपाथवर जाऊन बसते. आता कॆमेरा बसच्याआत वळतो तिथे लाईट, कॆमेरे आणि युनिटची माणसं असतात ते सगळे त्या मुलिच्या आईला सांगतात की हा चित्रपटाचा अखेरचा सिन आहे, एव्ह्ढा पार पडू दे. तिला समजावून सांग. आता आई खाली उतरून मुलिला समजवायला लागते आणि ही मात्र जाम हट्टाला पेटलेली असते. आता काय करायचं म्हणून सगळं युनिट डोक्याला हात लावून बसलेलं असतं........एव्हाना हे सगळं शिनुमातल्या शिनुमात चाललेलं आहे याचा उजेड पडलेला असतो आणि शिनुमातल्या शिनुमाचं आणि त्या मायलेकीच पुढे काय झालं? याची उत्सुकता लागलेली असतानाच खडाक्कन लाईटच गेली. असा काहीतरी विचित्र शेंडा ना बुडखा न बघता मधला भागच बघितल्यानं काय झालं असेलचा डोक्यात कीडा वळवळयाल लागला. वैताग नुसता.
 

3 comments:

यशोधरा said...

:D
janavala vaitaag tumacha! malapan vatala ki tumhi sanganar kay shevat jhala vagire.. :)

shinu said...

@ yashodhara

tech na toch tar waitag watala

kirti said...

bharich item