नवरा येई मदतिला तोची दिवाळी दसरा

पुन्हा एकवार नवरा पुराण. काय करणार? जगातल्या सगळ्या पुरूषांना विनोद करण्यासाठी बायका पुरतात तसंच आम्हा बायकांनाही फ़ावल्या वेळेत काही लिहायचं म्हटलं की नवरयाचे प्रतापच सुचतात त्याला काय करायचं?आज आवरू उद्या आवरू करत घरात पसारा प्रचंड झाल्यावर कुठून आवरावं हे कळेनासं झालं की नवरयाला साद घालण्याशिवाय पर्यायच रहात नाही. संकटसमयी एखादा भक्त जसा गलितगात्र होउन भगवंताला साद घालतो तशीच साद नवरोबांना घातल्यावर तोही बि़चारा तत्परतेनं धावत येतो. त्याचा हेतू इतका प्रचंड चांगला असतो की त्या मदती दरम्यान जे घोळ होतात त्याबद्दल त्याच्यावर चिडावं की आपल्या डोक्यात दगड पडल्यासारखं त्याला मदतिला बोलवलं म्हणून स्वत:वरच चिडावं काही समजत नाही.
जरा दिवाळी तोंडावर आलीय म्हणून कधी नव्हे ते पडदे वगैरे धुवायचं काम अस्मादिकांनी कामवालीकडे न सोपविता स्वत:कडे घेतलं. आता उंचीवरचे पडदे काढण्याइतकी उंची नसल्यानं घरातल्या एकमेव जिवंत शिडीला साकडं घातलं. पडदे काढण्यासाठी पायाखाली खुर्ची हवी होती म्हणून ती ओढताना त्यावरचा कपड्यांचा ढीग ढबाककन खाली पडला. झालं. आमची शाळा सुरू. ही काय कपडे ठेवायची पध्दत झाली? अमूक आणि तमूक. इतकी छान सुवर्णसंधी लाभल्यावर गाडी आमच्या जवळपास दर रविवारच्या कपडे खरेदीवर घसरली नसती तरच नवल.इतकं सगळं होईपर्यंत पडदे काढायला चढलेला नवरा बारसहित उतरतो. म्हणजे पुन्हा बार चढविण्याचं काम वाढलं नाही का? बरं काही बोलायची सोयही नाही. किचन स्वच्छ करण्यासाठी किचमधली ट्रॊली बाहेर काढ म्हट्लं तर अशी बाहेर काढली की ती आत घालविण्यासाठी सुताराला बोलवायला लागलं. पुन्हा ट्रॊली काढतानाही याचा तोंडाचा पट्टा चालूच, हॊटेलातून पार्सल मागवल्यानंतर रिकामे डबे घासून त्यात काही बाही ठेवण्याची माझी मध्यमवर्गिय सवय, तर डब्यांचा हा ढीग पाहून त्याचं डोकं तडकलं, अगं किती हे डबे, कशाला हवेत हे रिकामे डबे? टाकून द्यावेत ना वेळच्यावेळी. असं म्हणत त्यानं भराभर डबे मोठ्या पिशवीत गोळा करायला सुरवातही केली.जीव तुटला हो तटतट. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. किचन मधून हकलण्यासाठी व्हॆक्युम क्लिनर लाव म्हटलं तर याला जाम उत्साह चावला. हातात घुईं वाजणारा व्हॆक्युम क्लिनर घेउन दे दणादण सग्ळीकडे सैरवैरा धावत सुटला. या गोंधळात सोफसेट भिंत सोडून मैदानात आला, सेंटर टेबल पार बाहेर टेरेसमध्ये गेलं, वॊलयुनिटनं त्याची जागा सोडली थोडक्यात सगळ्या गोष्टिंनी त्यांची आसनं सोडली आणि अंदाधुंधी माजल्यासारख्या त्या इकडे तिकडे पस्ररल्य. सगळं घर घाम गाळून स्वच्छ केल्यानंतर त्याला व्हॆक्युम क्लिनर स्वच्छ करण्याची उचकी लागली. कसं करायचं हे सांगायच्या आत पिशवी काढून कचर्याच्या डब्यात ती उलटीही झाली होती. त्यातून उडालेली धूळ त्याच्या तोंडावर आणि आजुबाजुला पसरली. म्हणजे आता या सगळ्याच्या सफ़ाईचं जास्तिचं काम उगवलं. कुठून याला मदतिला बोलवलं असं झालं. घर आवरण्यापेक्षा जसं होतं तसंच बरं होतं म्हणायची वेळ आली. पुन्हा दोन तासात मला शिस्त कशी नाही हे त्यानं प्रत्येक काम करताना पटवून दिलं. आता मात्र रडायला यायला लागलं. एकतर आवरासावरीचा उत्साह ओसरला होता आणि पोटात भुकेनं कल्लोळ माजवला होता. आता आवर बाबा तुझं सफ़ाई अभियान असं म्हणावसं वाटलं. किल्ली दिलेलं खेळणं कसं किल्ली उतरेपर्यंत वाजतच रहातं वाजतच रहातं तसा हा किल्ली मारल्या सारखा आवरतच राहिला आणि सगळं पसरतच राहिला. अखेर एकदाची किल्ली उतरली आणि दमलो बुवा म्हणून हुश्श करून बसला. इतक्या पसारयात जेवणाचे बारा वाजले होतेच त्यामुळे बाहेरून मागा्वलेलं भुरकून खाताना म्हणतो कसा, बघ, आज मी होतो म्हणून तुझं आवरून झालं. नाहीतर तुझ्या एकटिच्यानं झालं असतं का सगळं? जेवण झाल्यावर हा घोरत पडला आणि मी त्यानं पसरलेलं आवरत बसले. दिवसभर आवरल्यानंतर डोकं इतकं भणभणायला लागलं की रात्री स्वप्नातही मी आवरतच होते.