जानुची गोष्ट : २

...........झालं ते झालं म्हणत त्या दिवसापासून जान्हवीनं घरातून लक्षच काढलं. एकाएकी तिला समरची आठवण यायला लागली. आपला निर्णय चुकला ही शंका ममाशी झालेल्या वादावादीनंतर पहिल्यांदाच आली आणि लग्नात कौतुकं पुरवून घेणार्या धनुला पाहून तिला खात्रीच पटली की आपण त्यागा बिगाच्या नशेतच होतो...फक्त आपण....धनू, आई, समर सगळे उघडे डोळे असणारे होते आणि आपल्याच डोळ्यावर गुंगी चढली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तिनं कोणाकोणाकडून समरचा पत्ता घेतला, त्याचा ई-मेल मिळवला आणि थरथरत्या बोटांनी त्याला एका आवेशातच मेल लिहिली. तिच्या मेलला उत्तर म्हणून समरनं फोटो पाठवले होते, त्याच्या टुमदार बंगलिचे, ज्यात कदाचित जान्हवी राहिली असती, बंगलिसमोरच्या सुंदर बगिच्याचे, जो कदाचित जानुच्या हातांनी फुलला असता, सगळ चित्र समर-जान्हवीनं पाहिलेल्या चित्रासारखंच होतं, अचूक....मात्र त्यातल समरसोबतचा हसरा समाधानी चेहरा जान्हविचा नव्हता, त्या हसर्या चेहर्याशी चिमण्या मुठींनी मस्ती करणारा गोंडस जीव जान्हवीचा अंश नव्हता...चित्राची एक बाजू परिचित होती आणि दूसरी मन भयभित करणारी. तिच्या मेलला उत्तर देण्याची तसदिही समरनं घेतली नव्हती, तिनं जीव तोडून लिहिलेल्या शब्दांना उत्तर म्हणून त्यानं पाठवलेली चार छायाचित्रं तिला सैरभैर करून गेली. यथावकाश फोटोतल्या समाधानी चेहरयाचं आणि कडेवरच्या बाळाचं नावही समजलं. ज्यांच्या तिचा काहीच संबंध नव्हता. धनुच्या संसाराला मदत म्हणून गेलेली ममा तिकडेच रमली. तिच्या आयुष्यातलं धनुचं स्थान पहिल्यांदाच जानुला टोचायला लागलं. एरवी त्यांचं गुळपीठ हा तिच्या थट्टेचा विषय असायचा आता संतापाचा झाला...........आयुष्य कोणासाठी थांबतं? आपल्या गतीनं त्याला जितकं पुढे सरकायचं तितकं ते सरकतच रहातं. जानुचं आयुष्यही सरकत राहिलं, तिला नकोसं झालेलं असलं तरी. धनुचं लग्न झाल्यावरचा रितेपणाही हळू हळू सवयिचा झाला. आपली गरज खरं तर कोणालाच नसते हे सगळे आपण निर्माण केलेले पाश असतात....धनुच्या बायकोचं आणि ममाचं रितीप्रमाणे पटेनासं झालं. सुरवातिला त्यांना ममाची गरज होती. तितके दिवस त्यांनी तिच्याशी गोड बोलून काम साधून घेतलं. नंतर नंतर वाद व्हायला लागले. धनुची बायको, श्र्वेता, त्याला सुचवू लागली की तिकडे जानू एकटीच आहे. सगळ्या घरावर कब्जा करेल आपल्या माघारी, मग काय कराल? त्यापेक्षा तुमच्या आईला तिकडे पाठवा, त्यांच्यावर वचक राहिल. धनुलाही हे पटलं त्यानं निमित्त काढून आईला परत पाठवलं. तिला समजलं नव्हतं असं नाही पण धनुशिवाय तिच्या असण्याला तिच्यालेखी काही किंमत नव्हती. सगळं आयुष्य त्याच्याकडे पाहून काढल्यावर आता ती कोणासाठी जगणार होती? जानुकडे ती परतल्यावर या दोघिंचं असं आयुष्य पहिल्यांदाच चालू झालं. दोन टोकांवर रहाणार्या दोघीजणी आधीच एकमेकीसाठी परक्या होत्या. त्यात ममाला अलिकडे काय झालं होतं कोणास ठावून जानुचे पैसेही ती घरासाठी वापरायची नाही. धनुच्या पैशांची वाट पहात रहायची. सगळ्याचा एकीकडे त्रास होत असतानाच सवयही होत होती. श्र्वेताला दिवस गेल्याचे कळल्यावर ममा त्या आनंदाच्या भरात चक्क जानुशी चांगलं बोलली, गोड जेवण बनवलं आणि तिच्याचसोबत जेवायला बसली. दुसर्या दिवशी सकाळी उठून तिनं बॆग भरली, जानुनं विचारलं की बॆग का भरलीस? तर म्हणाली, धनुचा कधिही फोन येईल, तिच्या मदतिला जायला नको? जानूनं विचारलं,"अगं तिची आई आहे नां करायला? तू कशाला दगदग करतेस?" यावर कुठेतरी हरवलेली ममा म्हणाली,"एकच एक मुलगा, त्याचं सगळं व्यवस्थित झालं की मी डोळे मिटायला मोकळी"......
श्र्वेताला मुलगी झाली आणि आईनं तिच्या गर्भारपणातल्या तिसर्या महिन्यापासून सगळं घर सांभाळलं. श्र्वेताच्या आईनं बाळंतपण करायला जमणार नाही म्हणून सांगितलं तर हिनं आनंदानं केलं. बाळाला सांभाळणं, स्वयंपाक सगळं ममा जातिनं करायची. धनुची मुलगी, ईशा वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसाला गेलेली जानू धनुच्या संसारात पहिल्यांदाच जात होती. बारशाच्यावेळेस अनोळखी माणसांच्या गर्दित हरवलेली जानू अंधार्या गॆलरीत एकटिच उभी होती आणि तिच्या कानावर आतल्या खोलितले संवाद पडले, आतल्या लोकांना बहुदा जानुच्या तिथं असण्याची कल्पना नसावी."अजून किती दिवस सासुला ठेवून घेणार आहेस? आलिय नां तुझी नणंद तिच्यासोबत पाठव तिला." एका पोक्त बाईचा आवाज होता."हो, नां, अगदी गळ्यातच पडल्यात लग्न झाल्यापासून. जरा म्हणून मोकळीक नाही. सतत आपलं धनू धनू करत यांच्यापाठी असतात. उगाच एका माणसाचा जास्तिचा खर्च आम्हीच काय म्हणून सोसायचा? तिकडे त्या मॆडम घरखर्चाला पैसेही देत नाहीत बहुतेक. सतत यांना फोन करत असतात, इतके पैसे दे आणि तितके पैसे दे. यावेळेस मी सरळ सांगणार आहे की आई दोघांची आहे नां, मग खर्चही निम्मा करा. शिवाय आमच्या घरावर कब्जा करून बसल्यात ते वेगळंच. आता या तिथे आयुष्यभर रहाणार म्हणजे ते घर विकताही येणार नाही आणि आम्ही तिकडे जाणार नाही म्हणजे आम्हाला त्याचा काही उपयोगही नाही. इकडे जरा मोठं घर घ्यायचा विचार होता पण तिकडचं घर विकलं तर पैसे वरच्यावर उभे रहातील नां, कुठलं काय या बाईसाहेब जोवर त्या घरात आहेत तोवर आम्हाला काही एक पैसा मिळू द्यायच्या नाहीत." हा आवाज नक्की श्र्वेताचा होता. खरं तर इतकं ऐकल्यावर संतापानं जानुच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं होतं. एकदा वाटलं सरळ समोर जाऊन जाब विचारावा पण मग तिनं ठरवलं की इथेच उभं राहून आणखी काय गरळ ओकतायत ते ऐकावं. आता श्र्वेताची आई म्हणाली,"तरी बरं, अधून मधून गोड बोलून तुम्ही दोघांनी सासुचे दागिने तरी किमान तुमच्याजवळ ठेवून घेतले ते. नाहितर सगळंच तुझी देखणी नणंद हिरावून घेउन बसली असती. स्वत:च्या रूपाचा इतका गर्व आहे तर लग्न का करत नाही? अजुनही किमान एखादा बिजवर तरी नक्की मिळेल" यावर श्र्वेता म्हणाली,"अगं त्यांना म्हणे कोणीतरी मुलानं धोका दिला त्यामुळे यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अगदी लग्नापर्यंत प्रकरण आलेलं असताना तो पळून गेला म्हणे परदेशात, प्रकरण इतकंच होतं की पुढे गेलं होतं कोणास ठावूक" "तरी बरं बाई श्र्वेता तू बाळंतपण सगळं तुझ्या सासुच्या गळ्यात घातलंस, शिवाय वर्षभर बाळही सांभाळायला लावलंस. तेव्हढेच पैसे वाचले बेबीसिटिंगचे"यावर दोघी खिदळत बाहेर पडल्या. संतापानं लाही लाही झालेली जानू बाहेर आली. चार लोकांत मिरवणार्या श्र्वेताला बघून तिला तिडिक आली. एरवी वन्सं वन्सं करत गोड बोलणार्या श्र्वेताचा खरा चेहरा असा असेल याची तिला कल्पनाही नव्हती. कार्यक्रम संपल्यावर सगळे बसलेले असताना तिनं धनुला सांगितलं की सकाळी ती जाणार आहे आणि सोबत ममालाही घेउन जाणार आहे, हे सांगताना तिनं श्र्वेताकडे सहेतूकपणानं पहात म्हटलं की,"नाही तरी आता दुसरं मूल होईपर्यंत बेबीसिटिंगचं काम संपलेलंच आहे नाही का? शिवाय तिकडे माझ्याकडे आणि घराकडे लक्ष द्यायला आई हवीच नाही का?" माझ्याकडे आणि घराकडे यावर विशेष जोर देत तिनं श्र्वेताच्या आईकडेही जळजळीत नजरेनं पाहिलं. धनूला काहिच कल्पना नसल्यानं तो आपला म्हणत राहिला की,"पहिल्यांदाच आली आहेस तर रहा की आणखी काही दिवस. आलीस तेंव्हा तर म्हणत होतीस की निवांत राहिन म्हणून आता एकदमच काय झालं?" यावर काही न बोलता तिनं आईला बॆग भरायला सांगितली आणि अचानक आठवल्यासारखं धनुला म्हणाली की," धनू , इतके दिवस का माहित नाही पण ममा तू पाठवलेले पैसेच वापरायची, मी तिला दिलेले पैसे तिनं तिच्या कपाटात जसेच्यातसे ठेवले आहेत. पण आता तूच तिला सांग. महिन्याचा घरचा सगळा खर्च मी पाहिन आणि तिला खर्चाचे पैसे दोघेही निम्मे निम्मे देत जाऊ" आता मात्र श्र्वेता आणि तिची आई चपापल्या आणि सरळ स्वयंपाकघरातच निघून गेल्या. आईच्या मनात तिथेच रहायचं होतं पण जान्हविच्या रेट्यापुढे तिचं काही चाललं नाही आणि धनू किंवा त्याची बायकोही तिला रहा म्हणाले नाहीत तेंव्हा नाईलाजानं ती यायला तयार झाली. प्रवासात जानुनं ममाला श्र्वेता आणि तिच्या आईच्यातला संवाद जसाच्या तसा सांगितला त्यावर ममा म्हणाली,"तुझं आपलं काहीतरीच जान्हवी. चार माणसं म्हटली की चार तर्हा आल्या, त्याचा इतका बाऊ करू नये. त्या काही वेगळं बोलत असतील आणि तू आपलं अर्धं काही ऐकून डोक्यात राख घालून घेतली असशिल. धनुच्या सासुरवडिच्या लोकांना तुझ्यापेक्षा जास्त मी चांगलं ओळखते. सोन्यासारखी माणसं आहेत. तू ऊगाच नाही त्या शंका पसरवू नको" हे ऐकून जानुच्या डोक्यात तिडिकच गेली. ती ममाला म्हणाली,"तू, तुझा धनू आणि त्याची बायको, खड्ड्यात जा. मला वाईट वाटलं म्हणून बोलले. आज बोलले ते अखेरचं समज." त्या दिवसापासून जानुच्या आयुष्यातून घरगुत समस्यांना पूर्णविराम मिळाला....
 

जानुची गोष्ट

जानूनं दार उघडलं आणि रितूला "गुड नाईट" म्हणून निरोप दिला. रितूनं विचारलंही,"आर यू ओके बेबी?" त्यावर जानून हसत सांगितलं,"वन थाऊंजंड पर्सेंट, बा<<<य सी यू टु...मा....रो" म्हणत दार धाडकन लावून घेत ती तशीच भेलकांडत आत आली. तेव्हढ्या वेळातही बाजुच्या म्हातार्यानं दार उघडून तिच्या येण्याची दखल घेतल्याचं तिला जाणवलं आणि तोंडून कधी नव्हे ते प्रकट शिवी आली,"स्साला". कशीबशी आत येत ती बेडवर आडवी झाली आणि उलट सुलट विचारांच्या गरगरीनं झोपेच्या आधीन झाली. मनातले उलटे सुलटे विचार तिला झोपू देत नव्हते आणि मद्याचा अंमल तिला जागू देत नव्हता. अशाच भिरभिर अवस्थेत कधीतरी ती झोपून गेली. सकाळी जाग आली तेंव्हा सुलभामावशी घर आवरत होती. खरं तर तिला जाग आलीय की नाही हेच आधी समजलं नाही. तिच्या संवेदना जणू संपून गेल्या होत्या. मात्र "काफी करू का ताई?" असा सुलभामावशीचा परिचित आवाज कानावर पडला आणि खरंच जाग आलीय याची खात्री पटली. तिच्या अवताराकडे पाहून सुलभामावशी काळजिनं म्हणाल्या,"तब्येत बरी नाही का ताई?" तिला काही उत्तर न देताच जानू बाथरुममध्ये शिरली. गरम पाण्याच्या शॊवरखाली बरं वाटेल म्हणून उभी राहिली आणि उलट विचारांचा गुंता आणखिनच सुटा व्हायला लागला. सुधेंदू तर म्हणाला होता की,’एक दोन पेगनंतर यु विल बी ऒल राईट, ये गम, तकलिप सब हवा में उड जाएगा बेबी. हॆव इट’ रात्री काहीकाळ वाटलंही तसंच पण मग घरात आल्यावर पुन्हा त्याच गुंत्यात मेंदू गुरफटत गेलाच. आता अजून डोळे उघडले नाहीत तोवर परत तेच विचार आणि तेच कढ....रात्री गाडीत रितू विचारत होती,"तुला आशु गेलाय याचं वाईट वाटतंय की तो समरसारखाच गेला याचं? तू तुलना करतेयस तुझ्याच भूतकाळाची तुझ्या वर्तमानाशी. समर वॊज पास्ट आणि आशुही लवकरच तुझा पास्ट बनेल, कोणाच्या जाण्यानं कोणाचं आयुष्य थांबत नाही जान्हवी आणि ते थांबुही नाही. कोणा समर आणि आशुपुरतं आयुष्य जगायला देवानं तुला जन्माला घातलेलं नाही. जिसको जाना है बेबी वो जायेगाही तकलिफ में रहेगी तू. समरने अपनी जिंदगी ढुंढ ली आशुभी ढुंढही लेगा. तू अकेली हो जाएगी. ज्यादा सोच मत...." हे आणि असंच काही बाही रितू जानुला समजावत राहिली होती. त्यातलं काही डोक्यात शिरत होतं काही नव्हतं. सगळं पटत होतं आणि तरीही पटत नव्हतं. रात्री झोपेतही सतत आशु आणि समर आळीपाळीन दिसत राहिले. समर म्हणत होता,"कम ऒन जानू, तू एकटीच परदेशी सेटल होणार नाहीएस. तू तिकडे आलीस याचा अर्थ तू तुझी नाती तोडलीस, जबाबदार्या झटकल्यास असा होत नाही. थिंक शोनू. मी जाणार आहेच तुही बरोबर असावस असं वाटतं. आलीस तर तुझ्याबरोबर नाहीतर तुझ्याशिवाय....प्लिज जानू नाही म्हणू नको" समुनं लाख विनवण्या केल्य होत्या. पण त्यावेळेस आपल्याच डोक्यावर कसलं भूत चढलं होतं देव जाणे. भूत म्हणण्यापेक्षा जबाबदारी वाहून नेण्याची नशा चढली होती. बाबांच्यामाघारी बाबा बनून घराला सावरण्याची धुंदी. घरी येणारे जाणारे, नातेवाईक सगळेचजण नावाजत म्हणत, "जानू भक्कम आहे म्हणून बरं आहे." ते ऐकताना आणखी कणखर वाटायचं. धाकट्या भावाला, धनुला, शिकवायचं आणि त्याच्या पायावर उभं करायचं स्वप्न होतं. शिकवायचं म्हणजे खरं तर त्याचं शिक्षण शेवटच्या पायरीवर होतं. तरीही आपल्याशिवाय धनू आणि ममाला कोणी नाही ही जाणिव मनात कुठेतरी सुखीही करायची. त्याच धुंदीत तिनं समरला नकार दिला. धनुलाही भरून वगैरे आलं होतं, "यु डिझर्व्ह मच बेटर" म्हणत त्यानं धीर दिला होता. समरला नकार दिला तो दिवस जानू कधिही विसरली नाही. अखेरचा आणि निकराचा प्रयत्न करावा म्हणून समरनं तिला भेटायला बोलवलं होतं मात्र त्यावेळेस तर आणखिनच ठामपणानं नकार देउन जानू घरी आली होती. समरला ती म्हणाली होती,"मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय समर. आता माझं पाऊल मागे ओढू नकोस" समर गेला त्या दिवशी तिला एक अनामिक रितेपणा जाणवायला लागला आणि नकळत डोळे घळघळा वहायला लागले. ममाला समजलं होतं कदाचित जानू रडतेय ते पण ती काही बोलली नाही. जानुला मनातून वाटत होतं की मामा येउन पाठीवरून हात फिरवून म्हणेल,"सगळं ठीक होईल बेटा" पण मामा खोलीत आली आणि जानुला झोपलेली पाहून दार ओढून घेउन परत गेली. त्यामुळे तिला आणखिनच तुटल्यासारखं झालं. समर गेल्यावर तो मेल करेल, फोन करेल याची तिला खात्री होती; पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. जायच्या आदल्या दिवसापर्यंत तळमळणारा समर तिकडे गेल्यावर जणू हवेत विरघळून गेला. त्यानं सगळ्यांना मेल केले फोन केले पण जानुला एकही फोन कधिही केला नाही. जसं काही डायरीतलं नकोसं पान फाडावं तसं जान्हवी हे पान त्यानं काढून टाकलं असावं. हळूहळू हे शल्य जानुला बोचायला लागलं. एक दिवस बोलता बोलता ती निमाला बोललीही की समरनं तिला किमान एखादी मेल करायला हरकत नव्हती. त्यावर निमा म्हणाली,"हा निर्णय तुझाच होता जानू. समरला तू हवी होतीस तुलाच तुझा कोष तोडायचा नव्हता. आता तक्रार का करतेस? त्यानं तुझ्याशी संपर्क नाही ठेवला तरी खरं तर आता तुझं काही बिघडायला नकोय नाही का?"..................


........दिवस भराभर उलटून गेले. धनूचं शिक्षण झालंे, त्याला दिल्लीत चांगली नोकरीही मिळाली. त्यानंतर सहा आठ महिन्यातच त्यानं छान स्थळं वगैरे बघून लग्न केलं. त्याच्या लग्नाच्यावेळेस जानू म्हणालिही की,"काय गडबड आहे धनू? अजून एखाद दोन वर्षांनी लग्न नाही केलं तरी चालेल" त्यावर धनूनं तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की,"मला एकटं रहायचा कंटाळा आलाय. तिकडे दिल्लीत मी एकटा असतो, माझे जेवणा खाण्याचे हाल होतात शिवाय आज काय आणि आणखी दोन वर्षांनी काय लग्न करायचंच आहे. मला तुझ्यासारखं आझाद पंछी रहायचं नाही बाबा". यावर जास्त वाद न घालता जानुनं रात्री जेवताना ममालां सांगितलं यावर कधी काही न बोलणारी ममा तिला तटकन म्हणाली,"हा ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे जान्हवी, त्यात एकमेकांनी तोंड खुपसू नये." हे वाक्य ममा ज्या पध्दतिनं बोलली त्याची धार जान्हविच्या मनाला झर्रकन कापत गेली. एक सेकंदभर तर ममा आपल्याला काही टोला हाणू पहातेय कां असंही वाटलं. एकंदर धनुचं लग्न तापदायक प्रकरणच झालं. धनू आठ दिवसांच्याच सुट्टीसाठी आला होता, तेव्हढ्यात ममानं चार चार मेरेजब्युरोत त्याचं नाव नोंदवलं. मैत्रिणिंना फोन करकरून सांगितलं. ममाची ही धांदल जानुला ठुसठुसत होती हे असं कां हे तिलाही उमगत नव्हतं आणि एक दिवस त्याचा उलगडा अगदी अचाकनपणानं तिला झाला. त्या दिवशी प्रभामावशिला मामा धनुला स्थळं बघण्याविषयी सांगत होती. प्रभामावशी ममाला म्हणाली एकदम धनुचं लग्न कसं काढलंस? जानुचं लग्न नको व्हायला? त्यावर ममा म्हणाली,"तिल नवरा बघणं माझ्या कुवतीबाहेरचं आहे. आम्ही काय बाई सामान्य माणसं." एकाएकी असा वर्मी घाव बसल्यानं जानू विचारात पडली, याचा अर्थ काय? ममाला तिनं प्रभामावशीसमोरच विचारलं तर ममा म्हण;ाली,"तुझ्या आयुष्यातले सगळेव निर्णय तुझे तू घेत आलीस जान्हवी. बाबा होते तोपर्यंत तुम्हा दोघांचं सगळं चालायचं. मला कधी विचारलंत? साधं शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायचा झाला तरी मला विचारायची तसदिही घेतली नाही, समरशी नातं मोडलंस त्यावेळेसही आधी एका शब्दानं सांगितलं नाहीस आणि नंतरही काही बोलली नाहीस. कदाचित तू माझ्याशी असलं काही बोलावं इतकी माझी लायकी तुला वाटली नसेल." संतापानं थरथरणारी ममा मोठा श्वास घेउन थांबली. तिचं हे रूप प्रभाला नवं होतं आणि जान्हविलाही. दोघी आवाक होउन पहातच राहिल्या. ममा पुढे म्हणाली,"मी तुझी आई होते जान्हवी. पहिल्या पहिल्यांदा मलाही तुझ्यापासून तुटलं जाण्याचा त्रास व्हायचा, तुझ्यात ना माझं रूप आलं ना गुण. तू तुझ्या बाबांची डुल्पिकेट म्हणून जन्माला आलीस आणि बाकिच्यांनीही याची जाणिव मला सतत करून दिली. मी अगदी सामान्य रूपाची आणि गुणाची होते पण मी तुझी आई होते याची जाण ना इतरांनी राखली ना तू. माझ्या आयुष्यातून तुला वजा करायला मला खुप कष्ट पडले जान्हवी पण तुला तर तो त्रासही झाला नाही कारण मी तुज्या आयुष्यात कधी नव्हतेच." इतकं बोलून ममा तिच्या खोलीत निघून गेली. आज पहिल्यांदाच जान्हविला आपल्या आयुष्यात काहीतरी विसंगती होती हे जाणवलं. विचार केला तर ही वस्तुस्थिती होती. तिनं ममाचा "आई" म्हणून विचार कमीच केला होता. ममाला "ममा" म्हणायचं हे देखिल बाबानंच ठरवलं होतं. बाबा दिसायला खुपच देखणा होता, हुशार होता आणि त्याच्या घरची परिस्थिती सधन होती याऊलट आई दिसायला अगदीच सामान्य म्हणावी अशी. शिक्षण म्हणायचं तर बीएची पदवी होती पण परिक्षा दिली आणि लग्न झाल्यानं तिनं बाहेरचं जगही पाहिलं नव्हतं. पहिल्याच वर्षात जान्हवी झाली. दिवस गेले तेंव्हा बाबानं खरं तर आईला खुपच झापलं होतं. इतकी कशी वेंधळी म्हणून हिणवलं होतं. इतकंच नाही तर हे मूल नको असंही सांगितलं होतं मात्र ममानं सगळा त्रास सहन करत जानुला जन्म दिला. बाळाला बघायला अनिच्छेनं आलेला बाबा बाळाचं गोंडस रूप पाहून हरवूनच गेला. बाळ बघायला येणारा प्रत्येकजण "बाबांसारखीच गोरीपान झालीय" म्हणून कौतुक करत होता. सुरवातिला ममलाही याचं काही वाटत नव्हतं पण जानू मोठी व्हायला लागली आणि तिच्या आयुष्यातलं बाबाचं स्थान पाहून मनात कुठेतरी झुरत राहिली. धनू झाल्यावर ती सावरली. धनू दिसायला ममासारखाच झाला होता. शिक्षणातही अगदी हुश्शार नाही पण ठीकच होता. नातेवाईक, सासूबाई सतत धनू आणि जानूची तुलना करत. जानू त्या स्तुतीनं सुखावत असे तर धनू आत येउन आईला बिलगत असे. धनू अगदी ममाज बॊय होता. सुरवातिला जानुचा तिरस्कार करणारा धनू वय वाढलं तसा जानुचा चांगला मित्र बनला. म्हणजे जनुला तसं वाटत राहिलं. बाबा असेपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण अचानकच बाबा गेला आणि घडी विस्क्टली. ती सावरायची जबाबदारी कोणी न सांगता जानुनं स्वीकारली. त्यावेळेस तिनं असंच ग्रुहित धरलं होतं की बाबा गेल्यावर ममा एकटी सगळं सांभाळुच शकणार नाही. हे घर सांभाळणं आणि चालवणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्यावेळेस आपण ममावर कुरघोडी करतोय असं तिला जाणवलंही नाही आणि आज ममानं इतक्या स्पष्टपणानं सगळं बोलल्यावर तिला आजवरचं तिचं जबाबदार असणं फुकाचं वाटायला लागलं. त्या दिवसांनंतर सगळं बिनसतच गेलं......