मी कोण? मी कोण?…मी कोण?



कसं नां की आपलं सगळं वर वर पहाता नीटपणानं चाललेलं असतं आणि तरीही राही उणे प्रमाणे काहीतरी दोन बोटं रितेपण असतंच… निराश असलं की हे रितेपण केवळ आपल्याच वाट्याला आहे असं वाटतं आणि मन शहाणं स्थिर चित्त असलं की हे दोन बोटं उणं रितेपण सगळ्यांच्याच मनात दाटलेलं दिसतं… म्हणजे असं चरचरित दु:ख वगैरे अजिबात नाही तरीही काहीतरी आत हळू हळू बोचणारं,… मी आहे ती खरी की दुसरी कोणी हा प्रश्न कुरतडत रहाणारं… नावामागच्या पदव्या कुठेबरॆ अडगळीत गेल्या हा प्रश्न तर महाभयानक जीवघेणा… बरं पुन्हा पदव्यांनुसार नोकरी म्हणजेच काहीतरी ग्रेट असणं असतं का? हा शहाणा प्रश्नही हळॊच डोकावतो. मुळात काहीतरी नोकरी बिकरी करत रहाणं म्हणजेच काहीतारी साध्य करणं का? मग जे आत्ता हातात आहे त्याचं काय? …. पण मग याचसाठी केला होता का अट्टाहास हा वेडा प्रश्नही तापच देतो… हे असलं सगळं वेडेपणाचं मनात येत असतानाच दोन चिमुकले हात पाठीमागॊन गळ्यात येतात आणि माझी आई वर्ल्डबेस्ट आहे असं मोठ्या डोळ्यानं कौतुकानं म्हणतात.… वर्ल्ड बेस्ट आई होण्यासाठी नां गंमत म्हणजे कोणतीच पदवी लागत नाही. एका बाउल टोमेटो सूप, कधीतरी केलेली दोन मिनिट में तैय्यार मेगी , सरप्राईज म्हणत हातात ठेवलेलं चोकलेट आणि रोज झोपताना कुशीत घेउन सांगितलेली कायच्या काई गोष्ट, एव्हढ्या पाठबळावर वर्ल्डबेस्ट आई होता येतं . इतक्या कमी क्वालीफिकेशानामध्ये मिळणारा हा जगातला अत्युच्च जॉब आहे. पुन्हा परतावा म्हणून मिळणारे आनंदाचे बोनस निराळेच …. हे सगळं घडत सातम नां तेंव्हा गंमत म्हणजे तो दोन बोटं रितेपणा गायबच असतो… तात्पुरता का होई ना..