जिंदादिल मुंबई

मुंबईकर नसणार्‍याला मुंबईचं फ़ारच कवतिक. या शहराचा आब वेगळाच आणि एकाच मुंबईत कितीतरी छोट्या मोठ्या मुंबई सामावल्या आहेत. चाळींची मुंबई, गिरण्यांची मुंबई, झोपडपट्यांची बजबजलेली मुंबई, पावसाच्या पाण्यानं तुंबणारी तरिही न थांबता धावणारी मुंबई, बॉम्बस्फ़ोटानं हादरणारी मुंबई आणि चोवीस तासात पूर्वपदावर येणारी मुंबई, बॉलिवुडची मुंबई, तोर्‍यात फ़टकून वागणारी साऊथ बॉम्बे मुंबई, ट्रॅफ़िकनं गच्च भरलेली मुंबई, फ़्रीवेवरून सुसाट धावणारी मुंबई.....ज्याला जशी बघायची तशी मुंबई!
जुनी ओळख अंगाखांद्यावर मिरवत असतानाच नवी कात टाकत शांघाय बनू पहाणारी मुंबई. हिचं जुनं रूप जितकं लोभस तितकंच नवं चकचकीत रूपही बघत रहावं असं.
मुंबईच्या बाहेर रहाणार्‍या मला मुंबईतली जुहू, अंधेरी ही नावं पेपरमधल्या बातम्यांत ऐकून माहित होती. वीस पंचवीस वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की कधीतरी याच रस्त्यांवरून तू सराईतासारखी फ़िरशील तर ते अगदीच अशक्य वाटलं असतं. याची कारणं दोन, एकतर त्यावेळेस माझा स्वभाव आजच्या अगदीच उलट म्हणजे मुखदुर्बळ होता त्यामुळे मुळात मी जर्नलिझमच्या वाटेला जाईन हेच कोणाला पटलं नसतं आणि दुसरं म्हणजे गड्या आपला गाव बरा अशा मनोवृत्तीमुळे फ़ारच लांब म्हणजे पुण्यापर्यंतची धावच मी घेऊ शकले असते. पण कसं असतं नं, आपला प्रवास आधीच कोणीतरी ठरवून ठेवलेला असतो आपण फ़क्त वेळ आली की त्या त्या गाडीत जाऊन बसतो. तसंच काहिसं झालं आणि मी बातम्यांच्या हेडिंडमधे भेटणार्‍या आणि तेव्हढीच ओळख असणार्‍या या मुंबईत पाऊल ठेवलं. मुंबईच्या बगलेत राहून कामाच्या निमित्तानं मुंबई भटकताना एक वेगळीच ओळख या शहराशी झाली आणि वेगळीच गट्टीही.
अनेकजण इथल्या प्रदुषणाला नावं ठेवतात, अनेकजण इथल्या घामट हवेची तक्रार करतात, अनेकांना लोकलला लटकणार्‍यांचा त्रास होते तर अनेकांना पावसानं तुंबणार्‍या रस्त्यांचा. मला मात्र हे शहर वंडरलॅंडसारखं वाटतं. कमालिचं जिंदादिल! तुम्ही देशाच्याच काय जगाच्याही कोणत्याही कोपर्‍यातून इथे या, हे शहर तुम्हाला आपलसं करतं. तुसडेपणा या शहराच्या स्वभावातच नाही. बारा ते चारची सक्तीची विश्रांती नाही की सातनंतरची बाहेर पडायची असुरक्षितता नाही. अहोरात्र जागं असणारं हे शहर. दिवसा जितकं छान दिसतं तितकंच रात्रीही लोभस दिसतं. म्हणूनच जाता जाता अचानक कुठेतरी एखाद्या चौकात आय लव्ह मुंबई दिसतं आणि आपोआप फ़ोटो गॅलरीत भर पडते.