हॆलो टोनआजकाल कोणाच्याही भ्रमणध्वनीवर म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं तर मोबाईलवर फोन करा. तुम्हाला पलिकडून ट्रिंग ट्रिंग अशी रिंग ऐकू येणं जवळपास दूर्मिळ म्हणण्याइतकं दुरापस्त झालंय. अलिकडे हेलोट्युन्स लावायची फॆशन आहे. म्हणजे आपण नंबर फिरवला की पलिकडून थेट गाणंच ऐकायला येतं. कोणी कोणतं गाणं लावावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, यामुळे काय भयानक विनोद होतात हे एकदा पहाच. एका मैत्रिणिच्या मोबाईलवर कित्येक महिने आंखो में तेरी अजब सी अजब सी अदाएं है, असं गाणं होतं. एक दिवस म्हटलं संपल्या बाई सगळ्या अदा, आता तरी बदल की गाणं. एकिला कधिही फोन करा तिच्या मोबाईलवर कायमची आरती चालू असायची,"ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे" महिनोन महिने नुसतीच आरती ऐकून वैताग आला. तिला म्हटलं आता बास झाली आरती. मंत्रपुष्प म्हण आणि प्रसाद वाट. यावर कडी म्हणजे फॆमिली डॊक्टरांच्या मोबाईलवर आये हो मेरी जिंगदी में तुम बहार बनके हे गाणं होतं. आता बोला. इकडे आम्ही "लोटापरेडला" वैतागून डॊक्टरची अपॊईंटमेंट घेण्यासाठी फोन कारावा तर ते म्हणतायत आये हो बहार बनके? कसली बहार अन कसलं काय? एकिच्या फोनवर होतं,"कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम". हिला सकाळी फोन करा नाहीतर रात्री हिचा पाळणा आपला सततचा हलता. राम जोजवून जोजवून इतका झोपवल्यावर पुढच्या रामायणाचं काय होणार? ही गाणी परवडली पण "ते" गाणं नको. कोणतं? तेच ते फेमस "कोंबडी पळाली तंगडी धरुन". आमच्या एजंटच्या मोबाईलवर हे गाणं होतं. या एजंटनं अगदी रितिप्रमाणं आमचे पैसे घेउन आम्हाला वर फसवलंही होतं. त्याचा जाब विचारायला फोन करावा तर याची कोंबडी आपली सतत तुरुतुरु इकडून तिकडे पळतेय. वात आणला नुसता या कोंबडिनं. एखाद्याला तावातावानं भांडायला किंवा शिव्या घालायला फोन करावा आणि पलिकडून जगजितसिंगचं "तु ही माता, तु ही पिता है......हे राम हे राम" ऐकू यावं यापेक्शा डोक्याला दुसरा ताप नाही. एक तर अख्खी रामधून होईपर्यंत पलिकडचा फोनच उचलत नाही आणि त्यानं उचलल्यावर आपण तोपर्यंत शिव्याच विसरलेलो असतो. आहे की नाही गंमत. कशाचा कशाला संबंध नसताना तर ही गाणी ऐकली की भयंकर विनोदी वाटतं. आता रोज चिरलेली निवडलेली भाजी देणारा भाजिवाला असतो, आपल्याला दोन चार दिवस भाजी नको असते म्हणून आपण त्याला फोन करावा तर याच्या मोबाईलवर ऐकू येतं,"हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना". आता त्याचा आणि आपला काय संबंध? पण हे गाणं ऐकावं लागतं नां? इस्त्रीवाल्याला कपडे घेउन जा बाबा म्हणून निरोप देण्यासाठी फोन करावा तर त्याच्या फोनवर थेट ’डोली में बिठाके, सितारों से सजाके ले जाएगा एक रोज तुझे सावरियां’ असं ऐकल्यावर नाही म्हटलं तरी दचकायला होणारच नां? त्याच त्या गाण्यांना वैतागुन मध्यंतरी मी चक्क तामिळ ट्युन लावली तर लोक दचकून फोन कट करायला लागले. त्यांना वाटायचं की चुकिचा नंबर फिरवला की काय? मग परत नंबर फिरवून मूळ मुद्दा राहिला बाजुला आधी या ट्युनवरुनच झापायचे. अखेर करणार काय लोकआग्रहास्तव बदललं ते गाणं. बाय दी वे तुमची हॆलो ट्युन कोणती आहे?
 

2 comments:

Shreeprasad said...

Mazi tune, apali tune, sagalyanchi tune,
Tiirrrrrinng Tiirrrrrinng

sskaryakarte@yahoo.com

shinu said...

धन्यवाद श्रीपाद.