शिमला-४

.....अखेर पावसाला दया आलीच. संध्याकाळी पाच वाजायच्या सुमारास तो थांबला आणि आम्ही थेट गाडीत बसलो. आता जायचं होतं शिमल्यातल्या प्रसिध्द माल रोडला. या ठिकाणचं वैशिष्टय म्हणजे या रोडवर जाण्यासाठी लिफ्ट आहे. तिकिट आहे पण चालताना, चढताना दम लागणार्यांसाठी उत्तम सोय होते. माल रोडवर जाम भटकलो. चर्च पाहिलं. मुख्य म्हणजे हुडहुड थंडितला माहोल अनुभवला. त्याच रोडवर असणार्या हॊटेलमधून जेवून बाहेर पडलो आणि परत लिफ्टनं खाली येउन गाडीची वाट पहात उभे राहिलो. गाडी येईपर्यंतची पंधरावीस मिनिटं बर्फ झाला अगदी. गाडीत हुश्शार ड्रायव्हरनं आधीच हिटर लावून ठेवला होता म्हणून बरं. परत हॊटेलवर आलो आणि गुडूप झोपलो. दुसर्या दिवशी शिमल्यातला मुक्काम हलवला. बाय शिमला म्हणत असतानाच परत एकदा फुरसत के रात दिन अनुभवायला यायचं असं पक्कं ठरवूनच तिथून निघालो. आता मनाली गाठायचं होतं. बर्फ बघायचे वेध लागले होते. मनालिचा रस्ता चालू झाला आमची कौतुकानं आणि बरोबरीच्यांची भितिनं नजरबंदी झाली. एका बाजुला उंचच उंच कडा आणि दुसर्या बाजुला खोल दरीत रुद्र रुप दाखवत वहाणारी नदी हा नजारा मनाली येईपर्यंत होता. बरोबरीची मंडळी चुपचाप बसली होती. आम्हाला अशा रस्त्यांची सवय असल्यानं आम्ही मात्र प्रवास मस्त एंजॊय करत होतो. खरं तर सतत वाटत होतं की अशा प्रवासाला काही अर्थ नाही. मध्ये मध्ये उतरायला हवं. काही ठिकाणी तर नदिचं पात्र अगदी शहाण्याबाळासारखं होतं. तिथे खाली नदीत उतरण्याचा मोह आवरता येईना. अखेर एका ठिकाणी तशी संधी मिळालिच. पावसानं त्याची एक लकेर घेतल्यानं गाडीवरच्या बॆगा प्लॆस्टिकनं झाकणं अपरिहार्य होतं. म्हणून ड्रायव्हरसाहेब त्या कामाला लागले, आणि आम्ही नदिचं बोट पकडायला धावलो. अखेर मन कसं शांत शांत झालं. गाडीत बसलो आणि मनालिला कुच केलं. वाटेत कुल्लू आलं आणि लेक जोरात किंचाळली "बडफ". सगळे पेंगत होते ते एकदम जागे झाले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर बर्फाचे सुळके दिसत होते. ते पहिलं गोंडस दर्शन झालं आणि भेटी लागी जिवा लागलिसे आस अशी स्थिती झाली. कधी एकदा बर्फात जाऊन त्याच्यात मस्ती करतोय असं झालं. मग तो सुळका जसा काही आम्हाला वाट दाखवायलाच आल्यासारखा अखेरपर्यंत दिसत राहिला. मध्येच काही मिनिटासाठी गायब व्हायचा आणि लेक ड्रायव्हरला सारखं, "डायव्हड अंकल बडफ देखना है" म्हणून भुणभुण करायची. त्यावर ड्रायव्हरही हसत म्हणायचा, "अभी ये लास्ट नाईट गुडिया. कल हम आपको बडफ की गुंफा में ले जाएंगे". त्यावर गुंफा काय हे माहित नसल्यानं मोर्चा सहाजिकच आमच्याकडे वळला. तिच्या एकामागूनएक येणार्या प्रश्नांना उत्तरं देईपर्यंत मनाली आलंच. ड्रायव्हरनं गाडी थेट मनालीच्या बाजारपेठेत नेली आणि मग लक्शात आलं इथेही आमचं हॊटेल मिसिंग आहे. मग पुन्हा पत्ते विचारत फिरणं आलं. अखेर आठ साडे आठ वाजता आमचं कन्याल रोडवरचं हॊटेल आम्हाला सापडलं. इथे जाऊन आधी जेवणाची ऒर्डर दिली आणि भुकेल्या पोटानं वाट बघत बसलो. साडे आठ वाजता दिलेली ऒर्डर साडे अकरा वाजता आली आणि तिही मस्त चुकिची. आधिच पोटात भुकेनं कल्लोळ लाजलेला त्यात भलतिच ऒर्डर बघून काय करावं हे संतापानं सुचेना. बरं तसं गिळावं तर त्यापैकी रोटी सोडली तर सगळेच आम्ही न खाणारे आमच्या ब्लॆकलिस्टमधले पदार्थ. मग काय. मॆनेजरबरोबर जाम जुंपली. अखेर कसंबसं जे आहे ते समोर त्यातलं वेचून वेचून पोटात ढकललं आणि झोपायच्या तयारीला लागलो. एव्हाना साडेबारा वाजून गेले होते. इतक्यात दार वाजलं म्हणून उघडलं तर दारात वेटर तीन चॊकलेटं घेउन उभा. म्हटलं हे काय नवीन? तर म्हणाला शेफ सरनी सॊरी म्हटलंय. करता काय ते सौजन्य स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. सकाळी उठलो तर नविनच नाटक. अंघोळीला गरम पाणिच नाही. एक बादली काढल्यावर तासभर दुसरी बादली येण्यासाठी. मग थंड पाणी अंगावर आरडाओरडा करत घेउन अंघोळ आटोपली आणि गाडीत बसलो. आज रोहतांगपासला जायचं होतं. सकाळी सहाचं टार्गेट होतं पण अंघोळ प्रकरणामुळे बाहेर यायलाच सात वाजले.
 

0 comments: