आमचा तो बाब्या

आमचा नां एक बाब्या होता. म्हणजे कोणी छोटा मुलगा नाही तर आमचा बाब्या नावाचा एक बोका होता. या बाब्याचे एक एक प्रताप म्हण्जे एक एक किस्सा आहे. या बाब्याला एक विचित्रच सवय होती तो चक्क कपडे खायचा. म्हणजे उंदरानी कपडे खाऊन वात आणल्यामुळं याला पाळलं तर यानं उंदरांना व्ही आर एस देउन ते काम आपल्याकडेच घेतलं. उंदीर, झुरळं याच्या मिशीसमोरुन जायची पण हां त्यांच्याकडे "हुंगुनही" पहायचा नाही. त्यानं आपल्या राज्यात सगळ्यांना अभय दिल्यानं सगळे किटक-प्राणी आमच्या घरात निर्भयपणानं वावरायचे. एकदा तर यानं कमालच केली. झालं काय की शेजारच्या पाटलांच्या दीपकनं पॆंटच्या खिशातून अंडी आणली होती, त्यातल एक फुटलं म्हणून त्यानं पॆंट धुवायला टाकली, तेव्हढ्या वेळात हा तिथे गेला आणि मागचा तो खिसाच त्यानं कुतरडला. ती पॆंट नंतर टाकवेनाही आणि घालयचिही पंचायतच नां? आम्ही एकदा जेवत असताना हा आपला शांतपणानं रगात डोकं खुपसून झोपला होता. आम्हाला वाटलं की बिचर्याला थंडी वाजत आहे म्हणून झोपला असेल. जेवणं झाली, सगळी आवरा आवर झाल्यावर अंथरुणं घालून आम्ही झोपायला गेलो तर अंधारात बाबांचा जोरात आवाज आला,"बाब्या<<<" आम्ही सगळे दचकून उठलो आणि खटाखट लाईट लावून काय झालं म्हणून बाबांकडे पहायला लागलो, समोरचं द्रुष्य पाहून एक क्शण सगळे चुपचाप उभे होते आणि मग बाबांसहित सगळेच खो खो हसायला लागले. 
बाब्यानं कुरतडलेल्या रगाच्या ताज्या ताज्या भोकातून बाबांचा रागीट चेहरा बाहेर डोकावत होता. ते द्रुष्य कमालिचं विनोदी होतं. आजही ते ऐतिहासिक रग आमच्याकडे आहेत. 
त्यांचं काय करावं न सुचल्यानं बरेच महिने ते तसेच पडून होते. 
मग मोठ्या भावाला एक कल्पना सुचली 
आणि त्यानं त्या दोन फाटक्या रगांचा मिळून एक धड रग बनविला. 
आजही घरी येणार्या पाहुण्याला तो रग दिसला की ते हमखास प्रश्न विचारतात,"अरेच्चा! हा रग असा काय?", मग त्याला बाब्याचं सगळं पुराण सांगावं लागतं. 
हे ऐकल्यावर पुढचं वाक्यही प्रत्येक पाहुणा न चुकता बोलतो,"अरेच्चा? मग तुम्ही त्याला इतके वर्ष घरात ठेवलंच कसं?" आता तुम्हीही सांगा आपल्या घरात जर असा व्रात्य बाब्या असेल आणि
 तो आपलाच मुलगा असेल तर त्याला आपण सोडून देतो? मग या बाब्याला तरी कसं सोडणार?  
या आणि त्या बाब्यात फरक असेलच तर इतकाच आहे की आमच्या बाब्याला दोन पाय जास्त होते आणि हो एक शेपुटही होतं. म्हणून काय झालं? तो "आमचा बाब्या" होता. 
एक दिवस बाहेर भटकायला गेला तो परत आलाच नाही.
 

0 comments: