शिमला-३
.......दुसर्या दिवशी डोळे उघडले आणि खिडकीचा पडदा बाजुला करुन बाहेर पाहिलं आणि शप्पथ सांगते इतकी अप्रतिम सकाळ बहुदा आयुष्यात पहिलीच असेल. काल रात्री अंधारात आम्ही शिमल्याच्या केवळ रस्त्यावरुन आलो होतो आज शिमला डोळ्यासमोर असं उभं होतं. अप्रतिम. सुंदर जे काही काठवतील ते शब्दही तोकडे पडावेत असं सुंदर द्रुष्य समोर दिसत होतं. समोर खोल हिरवीकंच झाड्यांच्या टोप्या घातलेली दरी, त्यात असणार्या दोन चार घरांच्या तुरळक वस्त्या, त्यात काम करणारे स्थानिक लोक, स्वच्छ कोवळा सूर्यप्रकाश, पाखरांची चिलचिल, सगळं एखाद्या कल्पनेतल्या कॆन्व्हासमध्ये चितारल्यासारखं.....इतकं छान प्रसन्न पूर्वी कधी वाटलं होतं आठवेचना. त्याच उत्साहात, रजईत हरवलेल्या बापलेकीला वरुन माझ्याही रजईत लपेटून एकटिच छान भटकायला निघाले. पावसानं सगळं छान धुतलं गेलं होतं. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाईच दिसत होती, मनात आतवर झिरपत जाणारा शांतपणा होता, कोठेही कसलिही घाई दिसत नव्हती की जाणवत नव्हती. सगळं निवांत होतं, माणसंही फार दिसत नव्हती म्हणजे नव्हतीच त्या शांत रस्त्यावर बहुदा मी एकटिच होते. तंद्रीत किती दूर चालत गेले समजलंच नाही. अखेर लक्शात आलं की अरे आता परतायला हवं. परत आले आणि हॊटेलचा फेरफटका मारुउन आले. टेकडिच्या कुशित लाडानं विसावलेलं आमचं हॊटेल इतकं गोंडस दिसत होतं. तसं पहायला गेलं तर चार मजली होतं पण एकावर मजले नव्हते तर टेकडिच्या उतारानं ते मजले विसावले होते. त्यामुळे प्रत्येक मजल्यापुढे टेकडिचा एक तुकडा होता. बाहेरुनही वरपर्यंत जाता येत होतच आणि आतूनही सोय होती. मी त्या क्शणी हॊटेलच्याच प्रेमात पडले. ज्यानं कल्पकता वापरुन ते बांधलं होतं त्याचं खरंच कौतुक वाटलं. एव्हाना नवर्याची सकाळ झाली होती आणि डोळे चोळत मला शोधत तो आमच्या खोलीबाहेर फिरत होता. मी वरुन त्याला हाक मारुन मी वर असल्याचं सांगितलं. चार चार पायर्या एकदम ओलांडत धावत तो वर आला. शिमल्याची लोभस सकाळ पाहून त्यानं डोळे विस्फारले की मी चक्क त्याच्या आधी उठून अशी आवरुन सावरुन ताजी उभी होते म्हणून कोण जाणे. पण त्याचा चेहरा लगेच खुलला. कित्येक वर्षांनंतर दोघेच अशी छान सकाळ अनुभवत होतो. प्रसन्न वातावरणाचा मनावरही लगेचच परिणाम होतो. जशी मी त्या हॊटेलच्या त्याच्या आजुबाजुच्या नजार्याच्या प्रेमात पडले होते तसाच तो ही पडला होता. तिथल्या तिथे आम्ही निर्णय घेतला की पुढच्यावेळेस केवळ शिमल्यातला निवांतपणा भरुन घ्यायला यायचं आणि याच हॊटेलमध्ये रहायचं. एव्हाना आम्हाला आमच्यातल्या तिसर्याची आठवण झाली. आम्ही खाली गेलो तरी बाबाच्या लेकीचे डोळे उघडले नव्हते. तिला उठवून सगळ्यांचं आवरुन मग कुफ्री पॊईंट बघायला गेलो. तिकडे जाण्यासाठी घोड्यावरुन जावं लागणार होतं. पहिल्यांदा जाम भिती वाटली पण हिय्या करुन बसलेच. दगडांनी खचाखच भरलेल्या वाटेवरुन घोडं वर चढायला लागलं आणि कढी पातळ झाली. कधी एकदा वर पोहचू असं झालं. अखेर वर गेलो. तिथे तासभर टाईमपास केला. लेकीला भूक लागली. म्हटलं आता हिला काय द्यायचं तर एकदम चिरपरिचित वास आला. लेक तर धावतच गेली. त्या टोकावरच्या टपरीत चक्क दोन मिनिट मध्ये तैय्यार होणारं मॆगी बनत होतं. ती पहिली भेट होती. हिमाचलमध्ये कोणत्याही कड्याच्या अगदी टोकावरही दो मिनिट मॆगी मिळतं याचं नंतर आश्चर्य वाटणं बंद झालं पण तिचं इतक्या टोकावरचं पहिलं दर्शन मात्र चकीत करणारं होतं. सकाळपासून छान कोवळं ऊन अंगावर घेतलेल्या पहाडिवरचं वातावरणं काही मिनिटांत बदललं. आकाश काळंभोर झालं. थंडगार बोचरं वारं वहायला लागलं. बरोबरचा गाईड खाली उतरण्याची घाई करायला लागला. आम्हीच त्याला थोपवत होतो. त्यावरचं त्याचं वाक्य एकमदम मस्त होतं,"ओ मॆडमजी पहाडी का मौसम और बंबई का फॆशन का कुछ भरोसा नहीं. कब बदले पताही नहीं चलता". त्याच्या या वाक्यावर यथेच्छ फिरक्या घेतच आम्ही माघारी फिरलो. उतरण जास्त भयान होती. पण एव्हाना घोड्यावरचा माझा अविश्वास कमी झाला होता. भिती घालविण्यासाठी जोरजोरात गप्पा टप्पा करत आम्ही उतरलो. गाडीत बसतच होतो की पावसानं झोडपायला सुरवात केली. गाईडचं म्हणणं शब्दश: पटलं. मिनिटभरापूर्वी छान हवा होती आणि आता तुफानी पाऊस. वाटेतच जाताना एका ठिकाणी जेवलो आणि चुपचाप हॊटेलवर जाऊन बसलो. आत्ताशी निम्मा दिवस सरला होता आणि अवेळी आलेल्या पावसानं आमच्या उत्साहावर पाणी टाकलं होतं. देव करो हा अवेळी आलेला पाऊस त्याचं बरसणं आटोपतं घेवो असं घोकत. खिडकीबाहेर डोळे चिकटवून बसलो.....
 

0 comments: