शिमला-२......टिम्बर ट्रेलवरुन निघालो आणि हवेतला गारवा वाढतच चालला. हिमाचलमध्ये आलो आहोत हे जाणवायला लागलं. शेवटी तर बॆगमधून शाली आणि स्वेटर निघालेच. आम्ही गेलो त्याच्या दोन दिवस आधी शिमल्यात पाऊस हजेरी लावून गेला होता त्यामुळे तर नेहमिपेक्शा जास्तच गारठा जाणवत होता. एव्हाना रात्र म्हणावी असा अंधार पडला होता. गच्च झाडांची गर्दी अंधारात जास्तच भितीदायी वाटत होती. अधून मधून घरं दिसायला लागली, मग रस्त्याकडेला लावलेल्या गाड्या दिसायला लागल्या आणि शिमल्यात पोहोचल्याचं समजलं. हिमाचलमध्ये जिथे जिथे गेले तिथे अगदी ठळकपणानं दोन गोष्टी दिसल्या एक हिमालयाची शिखरं आणि दुसर्या प्रचंड संख्येत असणार्या गाड्या. रस्त्याच्याकडेला कठड्याप्रमाणे गाडया ओळित लावून ठेवल्या होत्या. आम्हाला पोहोचेपर्यंत बराच उशिर झालेला असल्यानं शिमलावाले डाराडूर झालेले होते. एव्हाना रात्रिचे अकरा वाजले होते, आमचं हॊटेल एजंट नक्की कोणत्या भागात केलंय काही माहित नव्हतं. अशा किर्र रात्री पावसानं धुतलेल्या आणि गारठून रजईत गुडूप झालेल्या शिमल्यात आम्ही आमचं थोर हॊटेल शोधत होतो. एखादा माणूस दिसतोय का पहात होतो. आत्तापर्यंत एक गोष्ट स्वच्छ समजली होती की ज्या ड्रायव्हर महाशायांवर आम्ही माहितगार म्हणून विसंबलो होतो ते ही आमच्याइतकेच नवखे होते. त्यामुळे पत्ता शोधण्याची जबाबदारी आमच्यावर आली. आणि अखेर त्या थंडगार रात्री आम्हाला समोरुन एक अख्खा माणूस येताना दिसला, तो टप्प्यात आल्या आल्या झप झप सगळ्यांनिच काचा खाली करुन त्याला एकाचवेळेस शंभर एक प्रश्न विचारले. तो बिचारा थंडित पटपट पावलं उचलत हात चोळत घर गाठायला चालला होता आणि आमच्या कचाट्यात सापडला. अखेर त्याला सगळ्यांच्या प्रश्नातला एकच कॊमन शब्द समजला "कुफ्री रोड". बहुदा तो हुशार असावा त्यानं सांगितलं की आगे सिध्दे जाके लेफ्ट मारो जी. सुटलो एकदाचे म्हणत पुन्हा एकदा गाडी चालली. सिध्दे जात असतानाच ड्रायव्हरनं दिलेल्या सुचनेप्रमाणे सगळ्यांची डोकी डाव्या बाजुला वळून हॊटेलचा बोर्ड कुठे दिसतोय का शोधत होती. सगळा लेफ्ट संपला, तुरळक दिसणारी हॊटेल संपली, रस्ता खाली उतरला तरी काही दिसेना. अखेर एका चौकात आल्यावर ड्रायव्हरनं अधिकृतरित्या जाहिर केलं,"ओ सरजी मुझे डाऊट है की हम रस्ता भुल गये....शायद. अब आगे जाने का मतलब ही नही है. आप एक काम करो जी वु हॊटलवाले को फोन करके पता पुछो". आमच्यापैकी बुकिंगवगैरेची जबाबदारी ज्याच्यावर होती त्याच्याकडे सगळे अपेक्शेनं पहायला लागले. तर चष्म्याच्या आडून लुकलुकत्या निष्पाप डोळ्यानं त्यानं सांगितलं की,"होटल का नंबर तो नहीं है. उसने बताया कुफ्री रोड बोलेगे तो ड्रायव्हर समझ जाएगा". सगळेजण त्याच्या या बोलण्यावर जितक्या संयमात त्याच्यावर डाफरता येईल तितक्या संयमात डाफरले. मग आता काय याचा खल चालू झाला. येण्यापूर्वी मी त्या होटेलची साईट पाहिली असल्यानं मला हॊटेलचा नसला तरी साईटचा पत्ता पाठ होता. तेव्हढ्या रात्री थंडितही मला कल्पना सुचली की मित्रमंडळिंपैकी रात्री हमखास ऒनलाईन असणार्या कोणालातरी साईटचं नाव सांगून ती साईट उघडायला लावून किमान फोन नंबर तरी मिळवावा. किमान माझ्या कल्पनेप्रमाणे तरी ही अगदी वर्ल्ड बेस्ट आयडिया होती पण ही कल्पना मांडल्या मांडल्या नवर्याचा जो "लूक" मिळाला त्यावरुन सुद्न्यास अधिक सांगणे न लगे समजून मी गप्प राहिले. आमचं हे सगळं मागे चालू होतंच तोपर्यंत ड्रायव्हर महाशयांनी गाडी वळवून परत पावली जायला सुरवातही केली होती. येताना ज्या ठिकाणी तुरळक हॊटेल दिसली होती तिथे परत एकदा नीट पहायचं ठरवलं तर यंदा आम्हाला आमच्या डाव्या बाजुला ते हॊटेल चक्क सापडलं. हॊटेलचं मूळ नाव मध्यात लहान अक्शरात आणि वर खाली इतर काही असल्यानं आमच्या नजरेतून ते सुटलं असावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मघाशी तो जो थंडिनं काकडलेला मनुक्श होता त्यानं बरोब्बर उलट्या बाजुला वळायला सांगितलं होतं. अंत भला तो सब भला म्हणत आम्ही होटेलकडे जाणार्या रस्त्याकडे वळलो. रस्ता संपेना आणि हॊटेल दिसेना म्हटल्यावर वैतागलेल्या ड्रायव्हरनं विचारलच "सरजी ये होटेल आपको किसने सुझाया"? म्हटलं कप्पाळ आमचं. इतक्यात आम्ही अगदी हॊटेलच्या दारातच आलो. फटाफट उड्या मारत सगळेजण खाली उतरले. होटेलच्या रिसेप्शनमध्ये झोपलेली मंडळी बिचारी उठून बसली आणि हसतमुखानं आम्हाला सामोरी आली. तोंडानं काही म्हणत नसली तरी मनात त्यांच्या काय आहे वाचायला येतच होतं. दार उघडून आत आलो आमच्या मागोमाग होटेलचा केयरटेकर कम मॆनेजर जो कोणी होता तो स्वत: सामान घेउन आला. त्याला विचारलं, "खाने को क्या मिलेगा"? तो म्हणाला,"किचन तो कब का बंद हो गया मॆडमजी, चाहिए तो सॆंडविच बन सकता है" मनात म्हटलं"ई मध्यरात्री सॆंडविच कोण तोडणार"? कल्पनेनंही अंगावर काटा आला. पण वरुन साळसूदपणानं म्हटलं,"भैय्या साथ में चोटे बच्चे है, कम से कम उनके लिए तो चावल घी दो" त्यानं फारसा भाव दिला नाही. म्हटलं नाही तर नाही पण खडा तर मारुन पाहिला. एव्हाना परत एकदा नवर्यानं त्याचा वर्ल्ड फेमस तुच्छ ’लूक’ देउन झाला होता. मिही सराईतपणानं त्याला उलट लूक दिला. इतक्यात दार वाजलं आणि तो केयरटेकर कम मेनेजर आत आला आणि प्रचंड अपराध केल्यासारखा चेहरा करुन म्हणाला, ’मॆडमजी अभी आपको हम सिर्फ तवा रोटी, दाल, मिक्स सब्जी और सादा राईस दे सकते है, चलेगा’? त्याला म्हटलं,’चलेगा? दौडेगा’. त्या बोलण्यानंतर अर्धा पाऊण तासानं आम्ही सगळे जेवायला बसलो होतो मध्यरात्री बाराच्याही पुढे कितीतरी वाजले होते, आजुबाजुला हुडहुड थंडी होती आणि त्या तशा थंडित आमच्यासमोर गरमागरम पहाडी जेवणाची भांडी होती. व्वा व्वा! स्वर्गिय सुख यालाच म्हणतात की काय कोण जाणे. मघाशी,"आधी रात को खाना क्या खाएंगे? ब्रेड जाम खाके सोते है" म्हणणारी मंडळी भक्तिभावानं रोट्या चापत होती. ज्या अर्ध झोपलेल्या लेकिच्या नावावर हा घाट जमवून आणला होता तिनंही जणू माझी लाज राखण्यासाठी अगदी न कुरकुर करता व्यवस्थित जेवण केलं. त्यावर तिच्या बाबाकडे मी विजयी नजरेनं बघत आणि इतरांना मराठी समजत नव्हतं याचा ऎडव्हानटेज घेत तिथल्या तिथे म्हटलंच की बघ केवळ माझ्यामुळे तुझी भुकेली मुलगी ब्रेड जाम न खाता गरम गरम जेवण जेवतेय. यावर त्यानंही माझा आगावुपणा मान्य करत सगळ्यांच्यावतिनं जोरात म्हटलं, ’थॆंक्यु मॆडमजी, आपकी वजह से ये खाना नसिब हुवा’ यावर सगळ्यांनी संमतिची मान डोलवायचे कष्ट घेतले आणि पोटभरल्याचे ढेकर देत, कल सात बजे मिलेंगे म्हणत गुड नाईट केलं......
(अपूर्ण)
 

0 comments: