टि व्ही चे भन्नाट किस्से

परवा मावशी आली होती. टि व्ही कोणती सिरियल पहायची यावरुन माझा आणि लेकिचा वाद चालू होता. तर तिनं दोन भन्नाट किस्से सांगितले. त्यांचे एक स्नेही आहेत एस के मामा म्हणून त्यांच्याकडे एक भाडेकरु कुटुंब होतं. नवरा बायको दोघेच रहायचे आणि त्यांच्यातही काय पहायचं यावरुन भांडणं व्हायची. या भांडणाला कंटाळून त्यांनी एक दिवस टि व्ही उचलला आणि सरळ एसकेमामांकडे नेउन ठेवला. ज्याला त्याचा कार्यक्रम पहायचा त्यानं त्या वेळेत शेजारच्या घरात जाउन टिव्ही पहायचा असं ठरलं. यापे़क्शा दुसरा किस्सा मस्त आहे. रामायण चालू होतं तेव्हा. गावी एका माणसाचं छप्पर गळत होतं म्हणून तो कर्ज मागायला बॆंकेत गेला तर त्याला सांगितलं की असल्या कारणासाठी कर्ज मिळत नाही. याला तर नड होती. मग बॆंकेतल्याच एका माणसानं सांगितलं की असं कर टि व्ही साठी कर्ज मिळू शकतं तेव्हा तू त्यासाठी अर्ज कर मग टि व्ही विकून छप्पर दुरुस्त कर. पावसाळा तोंडावर आल्यानं त्यानं नाईलाजानं कर्ज काढलं आणि टि व्ही घेतला. त्यावेळेस टि व्हीवर रामानंदसागर यांचं रामायण लागायचं. हा शेतावर गेलेला असायचा आणि निम्मा गाव याच्या घरात भक्तीभावानं रामायण बघत असायचा. अशानं त्याला टि व्हीही विकता येईना. यावर कळस म्हणजे एक दिवस तो घरात होता आणि रामायण चालू झालं. नवरा बायकोत कशावरुन तरी भांडण चालू झालं. लोकांनी दोघांनाही सरळ घरातून बाहेर जाउन भांडायला सांगितलं. सिन असा होता की गावातल्या मारुतिच्या देवळात हे जोडपं तावातावानं भांडत होतं आणि गाव शांतपणानं-भक्तीभावानं यांच्या घरात रामायण बघण्यात तल्लीन झालं होतं.
 

0 comments: