काचाकवड्या


उन्हाळ्याची सुट्टी आणि काचाकवड्यांचं माझ्या द्रुष्टिनं एक खास नातं आहे. सुट्टी लागली की अगदी पहिल्या दिवशी पहिलं काम करायचं ते म्हणजे मोठ्ठा लाकडीपाट काढायचा तो स्वच्छ करायचा आणि खडूनं त्याच्या मागे चौकटी आखायच्या. चिंचोके मधोमध फोडून त्याच्या दान पाडायच्या सोंगट्या बनवायच्या. बांगड्यांच्या रंगीबेरंगी काचांचे तुकडे शोधायचे किंवा बांगड्या फोडून बनवायच्या. त्यासाठी वर्षभर अशा एकेकट्या बांगड्या साठवायच्या. लाल रंगाच्या बांगडिचे तुकडे मला खास आवडायचे कारण पाटाच्या पार्श्वभुमीवर ते खुप देखणे दिसायचे. लाल रंगाच्या बांगडिचे तुकडे खास माझे असायचे बाकी कोणी त्या रंगाचे काचेचे तुकडे घेतले की आमची भांडणं ठरलेली. मोठा भाऊ नेहमी ब्लॆकमेल करायचा म्हणायचा मला तुझ्या चिंचोतले दोन बटुके दिलेस तरच या लाल काचा तुला देणार. काय करणार? त्यासाठी गांभुळलेल्या आंबटगोड चिंचेच्या तब्बल दोन बटुकांचा मला त्याग करावा लागायचा. चिंचोके पाटिवर पदले तर आठचं दान आणि पोटावर पडले तर चारचं दान असायचं. मनात देवाचा धावा करत करत हातात चिंचोके खुळखुळवताना देवा आठ देवा आठ असा जप चाललेला असायचा. मनासारखं दान पडलं तर मग उडीच माराविशी वाटायची आणि नाही पडलं तर राग यायचा. नाकाचा शेंडा फुरफुरायचा. भाऊ चिडवायचा ’चिडका बिब्बा चिडला’ की जास्तच राग यायचा. अशी चिडवाचिडवी करत एकमेकाला काटत काचाकवड्या दिवस दिवस रंगायच्या. जोडिला गांभुळलेल्या चिंचा, जांभळं, करवंद किंवा खोबरी कैरी आणि खड्याचं रगडलेलं मीठ-तिखट असायचं. किती फस्त व्हायचं याची गणतीच केली जायची नाही. घरातले अधून मधून ओरडायचे. अरे किती आंबट चिंबट खाता म्हणायचे. आम्ही खाली मान घालून तेव्हढ्यापुरतं ऐकून घ्यायचो. परत चालूच रहायचं. या सगळ्या मेव्याचा हिशेबही चोख ठेवला जायचा. काल आमच्या बागेतल्या कैर्या होत्या आज तुमच्या बागेतले पेरु आण असं सरळ सरळ फर्मानही सोडलं जायचं. आळीपाळीनं सगळे खेळायचे. चारजण खेळत असताना बाकिचे आपापले भिडू पकडून जोशा वाढवत असायचे. रोज कोणाचं तरी नशिब साथ द्यायचं नाही, त्याला सगळे जाम पिदडवायचे. दुपार कलायला लागल्यावर मग पांगापांग व्हायची. म्हणून उन्हाळ्याच्या उकाड्याबरोबर, दमटपणाबरोबर मला काचाकवड्यांत रमलेली ती आंबट दुपारच आठवते.
 

0 comments: