शिमला-१



यंदा सुट्टीत शिमल्याला जायचं जायचं जपत असताना अगदी जायचा दिवस येउन ठेपला. पॆकिंगचा गदारोळ, निरोपाचे फोन उचलतच पहाटे पहाटे विमानतळ गाठलं. शेवटच्या क्शणापर्यंत कसलं गं पॆकिंग करता नेहमी नेहमी ची कटकट ऐकतच घर सोडलं. वेळ गाठली आणि हुश्श झालं तर विमान तब्बल पंचेचाळीस मिनिटं उशिरानं उडलं. दिल्लीत उतरल्या उतरल्या घाणेरड्या वासानं डोकं उठलं कदाचित ही पुढच्या वैतागाची नांदी होती. बाहेर आलो तर हातात फलक घेउन आमचे सारथी महाशय उभे होते. त्यांच्यासोबत गाडीपाशी आल्यावर लक्शात आलं की माणसांच्या तुलनेत गाडी लहान आहे. इथुन पुढे दीड तास एजंट, सारथी अशा फोनच्या फैरी झडल्या. ही गाडी रहित करुन सरळ दोन स्वतंत्र गाड्या कराव्यात का? अशिही व्यापक चर्चा झाली. अखेर जाऊदे आता वेळ नको घालवायला असं म्हणून पदरी पडलेली गाडी पवित्र करुन घ्यायचं ठरलं. एक पिल्लू मांडिवर आणि दुसरं दोन सिटच्यामध्ये बॆग ठेवून त्यावर विराजमान करण्याचं सर्वानुमते ठरलं. बांधाबांध होउन अखेर निघालो. आमचे सारथीमहाशय फारच सावधपणानं गाडी चालविणारे निघाले. डिचक्यांव डिचक्यांव करत आमचा प्रवास चालू झाला. मध्ये कधीतरी कंटाळवाण्या प्रवासात जेवायला थांबलो तर ते हॊटेल चक्क अती उत्तम निघालं. क्या बात है! म्हणत जेवणावर तुटून पडलो. आता पुढचा प्रवास चालू झाला. मजल दरमजल करत पिंजौर गार्डनला पोहोचलो. प्रथम दर्शनी ताजमहालसारखं वाटत होतं. तिथे तासभर काढून पुन्हा एकदा गाडीला स्टार्टर दिला. शिमल्यातली पाईन झाडांच्या गर्दितली हिमशिखरं कधी एकदा पहातोय असं झालं होतं. पण गाडी तर आपल्याच नादात चालली होती. एरवी गाडिचा वेग कबूत ठेवावा अशा मताची मी आज मात्र चालक फारच हळू गाडी चालवतोय म्हणून कुरकुरत होते. माझ्या या कुरकुरीवर पतिराजांनी नजरेनच स्पिडॊमिटरकडे बघ असं सांगितलं. काटा शंभरच्या मागेपुढे झुलत होता. श्शी! शंभरच्या वेगाला गाडी इतकी हळू? आता तर हळू हळू सूर्यदेवही कलटी मारायच्या तयारिला लागले होते. त्यांची अशी आवरा सावर चालू असतानाच आम्ही काल्कात प्रवेश केला. आता कुठे शिमल्याच्या बोटावर आल्यासारखं फिलिंग यायला लागलं. हवेतला फुफाट्याचा कोरडेपणा जाऊन थंडावा यायला लागला. हिमाचलमध्ये आल्याचं जाणवायला लागलं. काल्काच्या बाजारपेठेतून गाडी जात असताना तिथली निवांत रेंगाळलेकी संध्याकाळ पहाताना एक प्रकारची गंमतच वाटायला लागली. काय मस्त निवांत संध्याकाळ होती त्या लोकांची, माणसांचे घोळके घराच्या, दुकानांच्या समोर निवांत बसले होते, कोणालाही कसलिही गडबड किंवा घाई दिसत नव्हती. एव्हाना आम्ही टिंबर ट्रेलपाशी आलो होतो. नवरा यापूर्वी तिथे जाउन आल्यानं त्याचा अगदी हट्टच होता की हा अनुभव घ्यायलाच हवा. म्हटलं चल बाबा! तिथे गेलो तर तिथल्या माणसानं विचारलं की "आप सचमुच जाना चाहते हो"? म्हटलं ही काय भानगड? असं का विचारलं यानं? नवर्र्याचं डोकं पोखरत केबलकारपाशी पोचलो. तिकिटं काढली आणि वाटपहायला लागलो. फोटो काढून होईपर्यंत ती आलिच आणि मग तिच्यात बसलो. बंदुकितून गोळी सुटावी तशी ती निघाली सुरवातिला जाणवलं नाही पण मध्येच खाली पाहिलं आणि पोटात गोळ्याचं गाठोडंच आवळलं. बाप रे! आम्ही दोन दर्यांच्यामधोमध लटकत होतो. मनात नाही म्हटलं तरी एका सेकंदासाठी विचार आलाच की, आत्ता या क्शणाला जर काही झालं, म्हणजे वायर वगैरे तुटली तर? कसलं सिमला आणि कसलं बर्फ. इथेच आटोपणार सगळं. हा विचार करेपर्यंतच टॊवर आला आणि डोळेच मिटून घेतले. म्हटलं आता या टॊवरवर जाउन आपण आदळणार....पण त्याला बगलेत घेत ज्या वेगानं केबल सुटली होती त्याच वेगानं ती पलिकडच्या तळावर आली आणि डुलत डुलत स्थिरावली. त्यातून टुण्णकन खाली पहिली उडी मारणारी मिच होते हे काही वेगळं सांगायला नको. आता इथं काय बघायचं असं वाटत असतानाच अंगावर छान थंडगार हव्या हव्याशा वार्याची शाल पांघरली गेली. हॊटेलच्या टोकावर जाउन सूर्यास्त पहात असताना मनात आलं नंतर कधीतरी फक्ता या हॊटेलमध्ये निवांत रहायला यायचं. अशा ठिकाणी हॊटेल बांधणार्याचं मला मनापासून कौतुक वाटलं. मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्यासाठी तर हे हॊटेल म्हणजे अगदी आयडियल ठिकाण वाटलं. सारी दुनियासे दूर....हवा तितका एकांत....कोणाची कटकट नाही...कोलाहल नाही..नजर जाईल तिकडे फक्त डोंगररांगा आणि शिरशिरी आणणारा थंडगार वारा....गरजेला हायफाय हॊटेल...उत्तम जेवण...रहाणं उत्तम...मधुचंद्रासाठी जाणार्या जोडप्याला यापेक्शा वेगळं आणखी काय हवं असतं?......हम्म....फारच रोमॆंटिक वगैरे वाटायला लागून पुढची ट्रिप कॆन्सल होण्याआधीच आम्ही पुन्हा एकदा केबलराणीत बसून परतलो. परतिचा प्रवास जरा कमी भितिचा झाला. गाडीत बसून चलो सिमला म्हणत किल्ली फिरवली.....

(अपूर्ण)
 

2 comments:

pady said...

Atishay sundar. Chhan blog lihila aahe.

Unknown said...

Great. Reminds me of my trip abt three yrs ago.