बाई आणि गाडी


बायका आणि गाडी चालविणं, रस्त्यावरुन चालणं, रस्ते ओलांडणं यावर इतके प्रॅक्टिकल विनोद आहेत की, त्यावर एक स्वतंत्र पुस्तक निघेल. हे विनोदी अनुभव अस्मादिकांनाही वेळोवेळी आलेले असल्यानं तमाम महिला वर्गाची माफी मागून हे काही गाळीव नमुने सादर करत आहे. तर, एरवी आत्मविश्र्वासानं वावरणाऱ्या बायकांना अशा वेळेसच काय होतं माहित नाही. साधी रस्ता ओलांडायची गोष्ट पण ,पटकन रस्ता ओलांडतील त्या बायका कसल्या? आधी रस्त्याच्या कडेलाच बाॅलरसारखा स्टार्ट घेतील, म्हणजे जागच्या जागीच एक पाय मागे, दुसरा पुढे ,मग पुन्हा उलट असं चारचारदा मान झटकवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बघतील. मग जरा पुढं आल्यासारखं करतील, पुन्हा एकदा डावीकडे उजवीकडे मानेचे हिंदोळे होतील, मग धावत एकदमच रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत येतील, आता इथे हमखास होणारी क्रिया म्हणजे अर्धा रस्ता व्यवस्थित आलेल्या या बायका अचानकच अबाऊट टर्न करुन परत रस्त्याच्या कडेला जातील. हा खास बायकी रस्ता ओलांडणे प्रकार. म्हणजे शंभरातल्या नव्वद बायका असाच रस्ता ओलांडतात. म्हणून समोरुन बाई रस्ता ओलांडणार असली की, आपण आपलं सावध असावं. ती कधिही मागे परतेल हे लक्षात घेऊनच गाडिचं सुकाणू सांभाळावं. 

एकवेळ पायी चालणारी बाई परवडली पण गाडी चालविणारी नको. समजा तुमच्या पुढे एखादी बाई गाडी चालवत असेल तर तुमच्या वाहन चालविण्याच्या कौशल्याची आणि तुमच्यातल्या संयमाची कमाल मर्यादा तुम्हाला तपासून घेता येते. एक तर हातात स्टिअरिंग घेतल्यापासूनच गोंधळ, की नक्की कुठे जायंचंय आणि डोक्यात पार्लरपासून सासूपर्यंतचे सगळे विषय त्यामुळे गाडी विचारांसारखीच जवळपास उधळलेली असते. चार चाकीवालीपेक्शाही दुचाकीवाली बाई जास्त धोकादायक. "मुक्त मी स्वच्छंद मी" असा सगळा मामला असल्यानं आजुबाजुच्या गाड्या, रहदारी कशा कशाची तमा न करता सगळ्या जगापासून या मुक्त आधुनिक झाशिच्या राण्या आपला वारु मोकळा सोडतात. एक महत्वाचं म्हणजे समोर गाडी चालविणारी जर बाई असेल तर वाहतुकिचे नियम पाळायची जबाबदारी मागच्यावर असते हे पक्कं लक्षात ठेवा. समोरची बाई इंडिकेटर न देता कधिही आणि कुठेही वळू शकते, करकचून ब्रेक मारुन कधिही मधेच थांबू शकते. थोडक्यात पुढच्या बाईचा अंदाज घेतच मागच्यानं गाडी चालविणं हे त्याच्या दृष्टीने सुरक्षेचं. एकदा एक बाई इंडिकेटर न दाखवताच अचानकच वळल्या. त्यांना म्हटलं, काकू वळताना इंडिकेटर देत चला, बरं असतं. तर म्हणाल्या, "अय्या! म्हणजे मी हात दाखवलाच नाही? मला वाटलं मी दाखवला". घ्या. आता ज्या बाईंना आपला स्वत:चा हात वर आहे की खाली हेच समजत नाही त्यांच्याकडून बाकीचे नियम पाळण्याची अपेक्शा काय कप्पाळ करणार? वळण्यावरुन आठवलं समजा, आपल्याला जर डाविकडे वळायचं असेल तर सामान्यपणे आपण काय करतो? तर, आधी इंडिकेटर देत हळू हळू डावीकडे जातो आणि मग वळतो. पण बाई असं कधीच करणार नाही. ती आधी सुसाटपणानं गाडी पुढे काढेल, पुढच्या गाडीला ओव्हरटेक करेल आणि मग तिच्या पुढ्यातून डावीकडे वळेल. की मागचा उलटा पालटाच. मग? मागच्याला ब्रेक कशासाठी दिलेत? पंजाबी सुटच्या ओढण्या तर मागच्या गाडिवाल्याचे डोळे झाकण्यासाठिच असतात अशा त्या मोकळ्या सोडलेल्या असतात. काही बायकांना तर अजबच सवय असते. दोनही पाय खाली सोडून दुचाकी चालविण्याची. आता अशी गाडी का चालवायची ? हे त्यांनाच माहित. पण अशी गाडी चालविणाऱ्या बायकांची संख्या मात्र भरपूर आहे. जरा अतिशयोक्ती आहे पण, बायकांच्या या गाडी चालविण्याला वैतागलेल्या एका सभ्य गृहस्थानी म्हटलं होतं की, रस्त्यावरुन वाहन चालवताना बायका आणि म्हशींना कधिही गृहित धरु नका. त्या तुम्हाला कधी उलटं पाडतील नेम नाही. 
नियमला अपवाद असतात. आहेत. पण, एकुणत बाई आणि गाडी हा टिंगलीचा विषय आहे. तो का? बायकांनो विचार करा.

त.टी.- विनोद हा विनोदातच घ्यायचा असतो. 
 

2 comments:

मोरपीस said...

बायकांनी खरच विचार करण्याची गरज आहे.

xetropulsar said...

बाई तुमची कमाल आहे.

मागे तमाम महिलावर्ग एटीएम् मशीन कसे वापरतो यावर एक विरोप आला होता त्याची आठवण झाली.