आडवाट

कधी कधी आपण वाट चुकतो. म्हणजे "तशी" वाट नाही हं, तर साधी चार माणसं कशी नवख्या ठिकाणी वाट चुकतात तशी वाट चुकतो, रस्ता हरवतो, म्हणजे मुळात तो सापडलेलाच नसतो मग आपण नुसतेच भिरभिर भिरभिर इकडे तिकडे जात रहातो, बहुतेक इथेच वळायचं होतं वाटतं, हा सरळ गेलेला रस्ताच घ्यायचा होता वाटतं, असा अंदाज करत चालत रहातो, कधी तरी आडवाटेलाला लागतो आणि मग धस्स होतं. बाप रे! आता? मागे रस्ता लक्शात राहिलेला नसतो पुढच्या रस्त्याचा भरवसा नसतो, मनात भितिचं गच्च गाठोडं पकडून आपण चालतच रहातो.....आणि....अचानकच आपल्याला त्या आडवाटेचं एक विलक्शण सुंदर रुप दिसतं. आपण त्या वाटेच्या त्या क्शणी प्रेमात पडतो. पुढच्या वेळेस न चुकता त्या चुकिच्या वाटेनंच जातो. ती चुकिची वाट, आडवाट आपल्यासाठी रुळून कधी जाते समजतही नाही. तुम्हाला भेटलिय कधी अशी आडवाट? तुम्ही पडलाय प्रेमात अशा आडवाटेच्या? माझं आणि आडवाटांचं तर बहुदा मागच्या जन्मातलं नातं असावं असं वाटतं. रस्ता चुकणं हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्यावेळेस न चुकता ठरलेल्या ठिकाणी गेलं तरच मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. रस्ता चुकत माकत पत्ता विचारत ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की कसं काहितरी जिंकल्याचं समाधान दरवेळेस मिळतं. मागे काय झालं? एका रविवारी सुस्तावून सांगलिच्या घरात बसलो होतो, दुपारी घाई घाईत भैय्या आला म्हणाला चला मला रत्नागिरिला काम आहे, एकटा जायला बोअर होईल तुम्हिही बसा गाडीत, माझं काम आटपेपर्यंत तुम्ही रत्नागिरीत भटका आपण एकत्रच परत येउ. मग घरात बसायचं ते गाडीत म्हणून सगळ्यांची बुडं गाडीत नेउन टाकली. सगळी जमवाजमव होईपर्यंत निघायला सात वाजले आणि तिथे पोहचायला बारा. अशा अपरात्री एखाद्या गावात गेलं नां की त्या गावाचं एक वेगळंच रुप दिसतं. मग अशा निरव रात्री हे होटेल ते होटेल करत अखेर एक हॊटेल मिळवून तिथे आमची बोचकी घोरत पडली. दुसर्या दिवशी भैय्या गेला त्याच्या कामाला, मग आम्हीही नुसतं हे बघ ते बघ करत रत्नागिरीत भटकलो. तरी अजुन सकाळही ओलांडली नव्हती. मग ठरलं चला आता गणपतीपुळ्याला जाऊ. पहिल्यांदा वाटलं हातखंबा मग गणपती पुळे करत जाउन येईपर्यंत उशिर होईल पण बसून काय करायचं म्हणून गेलोच. नेहमीप्र्माणे मस्त वाट चुकुन बरोब्बर उलट दिशेने मजेत चाललो होतो. बरंच पुढं आल्यावर समजलं, विचार केला इतकं उलटं जाण्यापेक्शा जाऊ असंच जिथे जाईल तिथे. मध्ये एक दोन पंचे भेटले त्यांना विचारलं तर म्हणाले जा जा या रस्त्यानेही पुळं येतं. म्हटलं चला कधी तरी का होईना पोहचुच आपण गणपती पुळ्याला. वाटेत एक पाटी दिसली "आरे-वारे पूल" नाव वाचून आम्ही आमची करमणूक करुन घेत चाललो. कुठुन कुठे गेलो कसे गेलो काय माहित? पण अचानकच समुद्र दिसायला लागला आणि आम्ही चक्क पुळ्यात पोहोचलो होतो. दिवस तिथे घालवला आणि संध्याकाळी सहा वाजले तशी जाग आली की आता परत जायला पाहिजे. अजून सूर्यदेव होते पण आम्ही रत्नागिरीत पोहोचेपर्यंत काही त्यानं साथ नसती दिली. एका काकांकाडे हातपाय धुवायला गेलो, त्यांचं घरगुती लॊज होतं, काका भारी उत्साही निघाले. गप्पिष्ट होते. त्यांनी विचारलं की, नव्या रस्त्यानं जाणार का? लवकर पोहोचाल आणि रस्ता अगदी फोरिनसारखा आहे. आम्ही काय? एका पायावर तयार. त्यांनी कसं जायचं, कुठे वळायचं ते सांगितलं. आम्ही तिथे वळलो, पुढे जाउन रस्ता चुकलो, चुकत परत रस्त्याला लागलो, काकांच्या खुणा दिसायला लागल्या. म्हटलं अरेरे! काकांचा फोरोनचा रस्ता बहुदा हुकला. आपण वाट चुकलो तिथे गडबड झाली..........असावी असं म्हणून वाक्य पूर्ण करायचं विसरुन समोर बघतच राहिलो, गाडिचा गियर कधी बदलला, रस्त्याकडेला कधी घेतली आणि ती बंद करुन उतरलो कधी काही समजलंच नाही त्या रस्त्यानं, त्या वळणानं आणि त्या रुपानं नजरबंदी केल्यासारखे खिळून उभे राहिलो. बाप रे! काय सुंदर दिसत होतं सगळीकडे. आम्ही उंच डोंगराच्या कडेकडेने कोरलेल्या रस्त्यावर उभे होतो आणि खाली निळाभोर समुद्र असा या हातापासून त्या हातापर्यंत पसरलेला होता. लाडावलेलं पोट्टं असतं नां तसा खोडकर मस्त निळा निळा समुद्र, त्याच्या शुभ्र फेसाच्या कुरळ्या लाटांच्या बटा, हिरवीकंच झाडी, सौंदर्याची सगळी लक्शणं तिथे होती. त्या रस्त्यानं समुद्राचं बोट पकडून आम्हाला कधी रत्नागिरीत आणून सोडलं समजलंच नाही. पलक झपकते म्हणतात नां तसे आम्ही आलो. आणि हो एक सांगायचंच राहिलं, येताना आम्हाला जो "आरे वारे" पूलाकडे असा बोर्ड दिसला होता नां, तो हाच रस्ता बरं कां.
 

0 comments: