पत्ता

लोक आपल्या घराचा पत्ता सांगताना कसा सांगतात कधी नीट ऐकलंय? जितके स्वभाव नां तितक्या प्रकारानं हा पत्ता सांगितला जातो. म्हणजे बोलायला अघळपघळ माणसं कसा सांगतील बघा, ते रामाचं देउळ नाही का? ते हो पेशवेकालिन आहे ते? काय बांधकाम आहे, अजुनही भक्कम उगाच नाही? नाहितर अलिकडच्या इमारती, दोन वर्षात गळती चालू (इकडे पत्ता बेपत्ता), हां तर ते रामाचं देउळ आहे नां त्याच्या डाव्याबाजुनं वळून लगेच उजवीकडे या. काही जणांना कसं यायचं यापेक्शा कसं नाही हे सांगायची भलती हौस असते. हे लोक असं सांगतील, सरळ आला नां पुढे तर एक मोठ्ठं वडाचं झाड लागेल, त्याला मस्त पार वगैरे आहे बांधलेला, ते एकच झाड आहे इतकं मोठ्ठं, तर त्या झाडाकडे नाही जायचं त्याच्या आधी एक चौक आहे तिथुन वळा. म्हणजे आधी पुढे जाउन आपण तो ऐतिहासिक वड पाहून यावा असं यांना वाटतं की काय? हे तर काहिच नाही. एका बाईंनी अमुकचं घर कुठे असं विचारल्यावर सांगितलं गणपतिच्या देवळाच्या दरवाजाच्या समोरचा वाडा, बाईंना म्हणलं मंदिराला दरवाजे दोन आहेत त्यातला नक्की कोणता? तर त्या म्हणाल्या, अहो देवळातला हत्ती आहे नां त्याच्या पाठिची बाजू. इतका विनोदी पत्ता खरं सांगते अजून कोणी ऐकला नसेल. म्हणजे आधी देवळात जायचं, हत्तिला पहायचं त्याचं तोंड न पहाता तो कोणत्या दिशेला पाठ करुन उभा आहे हे पहायचं मग त्या दिशेच्या दरवाज्यातून बाहेर पडून समोरच्या विरुध्द दिशेच्या दारातून आत गेलं की आम्हाला आमचं घर मिळणार होतं.


 

0 comments: