शिमला-५

.....ड्रायव्हरनं एका दुकानापुढे गाडी उभी केली. दुकानात तोबा गर्दी. कोण काय करतंय काही कळत नव्हतं. भाजीबाजारासखा गोंधळ माजलेला. हवेत प्रचंड गारठा आणि थंडगार वारं सुटलेलं होतं. हे दुकान होतं रोहतांगमध्ये बर्फात घालायचे कपडे, स्किईंग्ज आणि शुज भाड्यानं मिळण्याचं. अखेरीस आम्ही आम्हाला साजेसे आणि मुख्य म्हणजे बसणारे कपडे घालून पुन्हा गाडीत बसलो. आता कपड्यांनी आम्ही चांगले जाडजूड झालेलो होतो त्यामुळे गाडीत दाटी झाली. आम्ही सगळे चंद्रमोहिमेला चालल्यासारखे दिसत होतो. अखेरीस मधल्या रस्त्यावर मी ते चिलखत काढून टाकलंच. आता कालपासून बर्फाचे दूरवर दिसणारे डोंगर अगदी कवेत आल्यासारखे दिसत होते. अधून मधून चक्क बर्फाचे कडे रस्त्याच्या बाजुला उभे होते. इतक्याजवळ बर्फाचा अख्खा डोंगर पाहून खुळावल्यासारखं होत होतं. हळू हळू बर्फाच्या भिंतिंचं प्रमाण वाढायला लागलं. चेकपोस्टजवळ गाडी थांबली. खालच्या बाजुला बर्फातले खेळ चालले होते. इथे वेळ घालविण्यापेक्शा बर्फात खेळायला लागू असा विचार मांडला जाऊ लागला. पण आमच्यासोबत आलेल्या गाईड कम प्रशिक्शकाचं दुकान झिरो पोईंटवर होतं शिवाय ड्रायव्हर महाशयना आमच्या गुडियाला बडफ की गुंफा दाखवायची सुरसुरी आली होतीच. अखेर दोन अडीच तास तिथे घालविल्यावर आम्हाला ओके सिग्नल मिळून आम्ही रोहतांगच्या रस्त्याला लागलो. ह्रद्य कमकुवत असणार्यांनी इकडे तिकडे न बघता नाकासमोर बघत जावं असा सगळा रस्ता. एकाचवेळेस दोन गाड्या समोरा समोर आल्या तर दरीकडेची गाडी अगदी दरीकडेला झुकलेली दिसायची आणि तो अर्धा मिनिट श्वास घ्यायलाही सुचायचं नाही. आता हवेतला गोठलेपणा वाढत चालला. दूर टोकाकडे बोट करून गाईड म्हणाला अपने को उध्धर जाना है जी. त्यानं दाखवलेल्या दिशेनं पाहिलं तर आकाशा, डोंगर एकच झालेलं. जसं काही पांढरा शुभ्र पडदाच कोणितरी उभा केला होता. आता त्या पांधरट ओल्या पडद्याकडे आम्ही चाललो होतो. जसे पुढे जाऊ तसे रस्ता दिसत होता. अचानकच पुढच्या गाड्या वळायला लागलेल्या दिसल्या. पोलिस दिसले. म्हटलं काय झालं? तर रस्त्यात एक भला दांडगा हिमनग ढासळला होता. रस्ताभर बर्फाचा चिखल झाला होता. गाड्या रुतत होत्या. अखेर सगळ्या गाड्या मागे वळविल्या. म्हटलं आता काय? गाईड म्हणाल उतरा इथेच. आता आलोच आहोत. सगळे खाली उतरलो. आता खरी गम्मत चालू झाली. रस्त्यावरुन वर चढून जायचं होतं. पहाताना सोप्पं वाटत होतं पण पाय ठेवल्यावर समजलं. पाय ठेवला की तो आत रुततच नव्हता परत खाली घसरायचा, पायात भले मोठे गम शुज आणि थंडिनं बधिरता आलेली त्यामुळे पायाच्या संवेदना जवळपास गेलेल्या होत्या.त्यामुळे घसरत खाली आल्यावरच समजायचं की आपण घारलोय. पुढच्या चार आठजणांची सर्कस पाहिल्यावर युक्ती केली गाईडकडून स्किईंगसाठी असणारी स्टिक घेतली आणि ती रुतवून वर चढलो. हीच युक्ती मागे येणार्या सगळ्यांनी वापरली. वर आलो तर नजर जाईल तिकडे बर्फ आणि नाकासमोरुन वहाणारं बर्फ. गाईडनं सटासट फोटो काढायला सुरवात केली. बर्फाचे गोळे बिळे एकमेकाला मारुन झाले, बर्फाचा किल्ला करुन झाला आणि मग जवळ दगडासारखं काही तरी दिसत होतं त्यावर टेकलो तर गाईड म्हणाला चलो मॆडमजी चलते है. म्हटलं आता कुठं चलते है बाबा. झालं नां? तो म्हणाला नहीं अभ्भी हमारी दुकान कहां है? वहां चलो. बर्फ के गेम खेलेंगे. त्याला विचारलं की कुठं आहे दुकान? त्यानं समोर बोट करुन दाखवलं. धुकट हवेमुळं फार लांबचं दिसत नव्हतं. म्हणून गेलो त्याच्या मागे. जरा पंधरा मिनिटं चाललो(चाललो कसले? खरं तर चढलो) तर आमच्यातले निम्मे ढेपाळले. बाकिचे गाईडला और कितना दूर विचारत चालतच राहिले. तो आपला सतत समोरच बोट दाखवत होता. अखेर डोंगराच्या टोकावर आलो. मग म्हणाला आता खाली उतरायचं. करतो काय. उतरलो. तर आम्ही परत रस्त्याला लागलो होतो. मधला बर्फाचा कडा कोसळलेला भाग वगळून त्यानं आम्हाला चक्क ट्रेक करत आणलं होतं. बहाद्दरच म्हणायला हवा. नाही तर आमच्यातल्या रडक्या शिपायांकडे पाहून एखाद्यानं तिथेच सोडलं असतं. मग रस्त्यावरुन परत एकदा मघाच्याप्रमाणे वर चढलो. आता कधी येईल तेव्हा येईल तो झिरो पोईंट असं म्हणत त्याच्या मागोमाग चालत राहिलो. जरा चढून वर आलो तर लोकांच्या दंग्याचे आवाज यायला लागले. समोर पाहिलं तर एका ओळीत टपर्या दिसायला लागल्या होत्या. टपर्या ओलांडून आलो आणि बघतच राहिलो. समोर बर्फाचं विस्तिर्ण मैदानच पसरलं होतं. लोक मजेत बर्फातले खेळ खेळत होते, खिदळत होते. गाईडनं मग स्किईंग करुन दाखवलं. बघून वाटलं सोप्पंच तर आहे. पण त्याच्या शुजमध्ये पाय घातले, अजून लोक केलं होतंच आणि तो सूचना देतच होता की पाय वर! कसं बसं सावरत उठले. आता मात्र गाईडनं धोका पत्करला नाही. स्किईंगच्यामगे त्यानं पाय ठेवला आणि हळू हळू पुढे झुकुन जायला सांगितलं. हळू हळू कुठलं? गाडीनं एकदम पाचवा गियर टाकल्यासारखी सुसाट उतारावरुन सुटले. म्हटलं संपलं आता. राम बोलो. आजुबाजुनं स्नोबाईक्स सुसाट येत होत्या, कुठे ते स्लिजवाले धावत येत होते, घोडे होते या सगळ्यात मी आणि माझ्यासारखे सुसाटलेले स्किईंगवाले. अखेर तो क्शण आलाच! सरसरत जात असतानाच काय झालं माहित नाही, जरा उजवीकडे आपोआप वळल्यासारखं झालं आणि धडाम! पाय वर, स्टिक एक वर एक खाली पाठ टेकवून सपशेल पलटी मारली. आता तर उठायचिही शक्ती नव्हती. कारण एकदम सुसाट आल्यामुळे, ते ही अजाणता, गाळण उडालेली होती त्यात अचानकच पलटी खाल्यानं भेदरुनच गेले. पण किरकोळ दिसणार्या गाईडनं उठवून उभं केलं आणि परत एकदा आमची शिकवणी चालू झाली. आता कसलंही थ्रिल अनुभवायची इच्छा रहिली नव्हती. म्हटलं बाबा, झालं तेव्हढं बास झालं, आता इथुन जाते साधेपणानं चालत. तर हा ऐकायलाच तयार नाही. मला लहानपणिचा प्रसंग आठवला. सायकल चालवायला शिकत असताना पहिल्यांदाच अशीच पडले होते, गुडघे फुटले होते, भावाला म्हटलं आता बास बाबा, जाते इथुन चालत घरी. तर हा ऐकायलाच तयार नाही. घरी जायचं तर सायकल घेउनच अशी तंबीच दिल्यावर डोळ्यातून पाणी काढत जीव मुठीत घेउन सायकल कशी बशी घरी आणली. तेच आठवलं आत्ता. आत्ता अगदी पाणी नाही आलं पण काकुळतिला येउन परत आले आणि मग हुश्श झालं. खुर्चिवर बसकण मारल्यावर मात्र गाईड खो खो हसायलाच लागला. इतक्या मनोरंजनानंतर हसायलाच येणार नां? सगळेचजण असेच पडण्यात गुंग होते. कोणी फोटो काढत होतं. एक सलमान खान तर शर्ट काढून बर्फावर झोपून पोझ देत होता. एव्हाना चक्क उकडायला लागलं होतं. थोडिशी पोटपुजा करुन आम्ही परतिच्या वाटेला लागलो. परतिची वाट तीच होती. आता बच्चेकंपनिचे पाय दुखायला लागले होते म्हणून स्लेजवाल्याला ठरविला. मी म्हटलं मी चालत येणार तर सगळे आग्रह करायला लागले. म्हटलं तेव्हढाच व्यायाम. नाही तरी आता परत बर्फात चालण्याचा योग लवकर थोडाच येणार आहे? पण खरं सांगायचं तर त्या स्लेजलाच मी घाबरले होते. कसलं काय ते? अखेर मला बसावंच लागलं. उतारावरुन सरसरत खाली आलो आणि अगदी शेवटच्या क्शणाला व्रात्य स्लेजवाल्यानं स्लेज तिरकी करुन आम्हाला हिमालयापुढे नतमस्तक व्हायला लावलंच. धडपडत उठलो तर आमच्या मागून अशीच बरीच मंडळी किंचाळत लोटांगण घालत होती. त्यांचं धडपडणं बघून मात्र जाम हसायला येत होतं. एव्हाना वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. गाडीत बसलो आणि घड्याळ पाहिलं तर चार वाजले होते. महत्वाचा टप्पा संपला होता. रुख रुख लागली होती. खरं सांगायचं तर एकदा हा निसर्ग पाहिल्यानंतर काहीच बघावसं वाटत नव्हतं.
 

0 comments: