आता आठवतही नाही......

आज पुन्हा आभाळ भरुन आलंय
अगदी त्या दिवशीसारखंच
तसंच गच्च दाटून आलेलं....

मागे वळून पाहिलं तेव्हा समजंलच नाही
नभ बरसतायत की डोळे
पापणीवर ट्पोरी फुलं होती उमलली
गालावरुन वहात होतं ते पाणी की अश्रु?
आता आठवतही नाही...

रस्ता पुढे होता, पावलं मात्र मागेच रेंगाळली
तुझ्या हातात गुंफलेली बोटं सुटली तरी कधी?
तुझी पाठमोरी सावलीही मला माझी भासत होती
वळून पाहिलं होतंस कां रे एकदा तरी...
आता आठवतंही नाही...
आजही पुन्हा तसंच दाटून आलंय आभाळ....गच्च

तुलाही आठवतो का तो दिवस?
गच्च अंधारलेल्या भर दुपारी
घेतला होता निरोप.....
काय म्हणाला होतास त्यावेळी
आता आठवतही नाही...
ओठ थरथरले होते ते कशानं
दाटलेल्या हुंदक्यानं की
शब्दांनी साथ सोडल्यानं
काहीच आठवत नाही.....

आज पुन्हा एकदा सगळं आठवतंय
अंधुकसं....त्या दिवशिच्या दुपारसारखं
कारण आजही आभाळ तसंच आहे गच्च दाटलेलं....
 

0 comments: