मै और मेरी रेसेपी

लग्न जमवताना आपल्याकडे कुंडली पहायची किंवा जमवायची पध्दत आहे. अगदी तसंच  एखादा पदार्थ बनवण्यासाठी आपलं आणि त्याचं कितपत जमणार आहे हे पहावं की काय या विचारापर्यंत मी आता आले आहे. एक तर हे असे नवीन नवीन पदार्थ बनवायची हौस दांडगी आणि त्यात भर म्हणजे ते कौतुकानं दुसर्याला खाऊ घालायची हौस तर त्याहुन भारी. मुळात रोजचा स्वयंपाक मी करणं आणि इतरांनी खाणं हीच एक रीस्क त्यात नवीन पदार्थ म्हटला की तो बरा बनावा म्हणून माझा मनातल्या मनात देवाचा धावा चालू होतो तर "देवा ही जे काही बनवणार आहे ते खरंच बरं बनु दे" असा घरच्यांचाही  धावा, कारण अखेरीस जे काही बनेल ते चावायचं त्यांनाच असतं नां? बरं नशिब तरी असं दगा दणारं की जो पदार्थ जसा होणं अपेक्शित असतं बरोबर त्याच्या विरुध्द का बरं घडत असावं? म्हणजे चकली हटकून मऊ होते आणि लाडू....जाऊदे काय बोलावं आपल्याच तोंडानं? नशीब कोणी अजून तो फेकून मलाच मारलेला नाही.  
                                      ढोकळा नावाचा पदार्थ तर मोगॆम्बो आहे मेला. कध्धी म्हणून माझ्यावर खुश होत नाही. इतरांचे छान छान जाळीवाले ढोकळे खाताना माझ्या जीवाला जी घरं पडतात ती मलाच माहित. काय नाही केलं याच्यासाठी. जितके म्हणून उपाय सांगितले ते सगळे करुन झाले. अगदी सोड्याची बाटली ओतून झाली, ताकं बरं पासून आंबटढाण पर्यंतच्या सगळ्या प्रकारचं घेउन झालं, चितळेंपासून गिटस फिट्स सगळे यच्चयावत रेडीमेड पीठं वापरुन झाली पण आजही माझा ढोकळा कुकरमध्ये गेला की परतताना पिठलं की वडी? अशा संभ्रमात असल्यासारखा बाहेर पडतो.  त्यावरुन आठवलं, पहिल्यांदा उत्साहानं गुलाबजाम केले होते.  सगळी रेसेपी पुस्तक समोर ठेवुन बनवली असल्यानं जाम कॊन्फिडन्स होता. जेवायला सगळे बसल्यावर गुलाबजामच्या पातेल्यावरचं झाकण दूर करुन भैय्यानं डाव हलवला....खरं तर डाव हलविण्याचा "फर्स्ट ऎटेम्प्ट" केला. डावानं गुलाबजामाच्या पाकाशी इतकी घट्ट दोस्ती केली होती की या प्रेमी युगुलाला एकमेकापासून दूर करण्यासाठी आम्ही सगळे शर्थीचे प्रयत्न केले. अखेर जवळपास फोडून काढावे लागले. ते कडक गुलाबजामही सगळ्यांनी वा मस्त म्हणून खाल्ले. आता वाटतं तिथेच मला सांगायला पाहिजे होतं की बाई गं झालं एव्हढं पुष्कळ झालं पुन्हा या अशा वाटेला तू जाऊ नको. त्यांनी माझा उत्साह वाढवयची चूक केली आणि त्यांच्या खाण्यामुळेच माझा करण्याचा सोस वाढला.  मी काय करु? भोगा (पक्शी खा)आता आपल्याच कर्माची फळं. मध्यंतरी मोमो नावाच्या पदार्थाच्या मागे मी हात धुवून लागले होते. मी नक्की काय करणार आहे बाकीच्यांना लक्शात न आल्यानं सगळे माझी नजर चुकवून मोमो नावाचा गनीम इंटरनेटवर गाठ पडतोय का? ते पहात होते. म्हणजे आपल्याला नक्की कशाला तोंड द्यावं लागणार आहे याचा बिचारे अंदाज घेत होते. शेवटचा प्रयत्न म्हणून बारीक आवाजात म्हणूनही झालं की अगं तो पदार्थ नॊनव्हेज असतो म्हणे, आपण शाकाहारी नां?मी पण किती तयारीची म्हटलं, मी त्याची शाकाहारी रेसेपी मिळवली आहे. करतात काय? केलं की खातात चुपचाप हे इतक्या दांडग्या अनुभवानंतर मला बरोब्बर समजलं आहे. कधी तरी हौसेनं यांना विचारलं की आज काय करु जेवायला? तर म्हणतात "पचण्यासारखं काहीही कर" मी मात्र त्यांच्या या असल्या टोमण्यांना अजिबात भीक घालत नाही माझा नवे पदार्थ करण्याचा उपद्व्याप चालूच ठेवते. रविवार जवळ आला की या रविवारी काय बेत करायचा या विचारानं शुक्रवारपासूनच माझी झोप उडते. बाय दी वे, या रविवारी आमच्याकडे फक्कड बेत आहे, येताय जेवायला?
 

2 comments:

rohini gore said...

khupch mast lekh aahe!!! khup hasle :D

shinu said...

@ rohini

thanku