प्रुथ्वीच्या आत काय असतं गं आई?

काल लॆपटॊपवर काम करण्यात गुंग असतानाच मागून अचानकच प्रश्न आला, "दुनियाच्या आत काय असतं गं आई?" मी मागे पाहिल,ं इतकं सुंदर मराठी आमच्या घरात एकच माणूस बोलतं आणि ते बोलतं कमी प्रश्न जास्त विचारतं. शक्यतो आम्ही चिलखतं घालूनच वावरतो. कारण कधी प्रश्नांचा मारा चालू होईल सांगता येत नाही पण गनीम कधी ना कधी खिंडीत सापडणारच नां? तर आजही मला बरचसं काम हातावेगळं करायचं असल्यानं मी या "प्रश्नासुराला" तिच्या आवडिची पुस्तकं पसरुन दिली होती, तिच्या आवडत्या सिडी बाहेर काढून ठेवल्या होत्या, भातुकली मांडून दिली होती आणि खाऊही दिला होता शिवाय हंगामा लावून दिलं होतं आणि कधी नव्हे ते चक्क शिनचॆन बघायची परवानगी दिली होती. काहीही कर पण दोन तीन तास शांतता दे बाई असा या तयारीमागचा हेतू होता. मला काही काम होतं म्हणून मी प्रुथ्वीच्या अंतरंगाची चायाचित्रं असणारं संकेतस्थळ उघडलं होतं. त्यात पथ्वीचं चायाचित्रही होतं. आणि मी हे करत असताना नेमका शिनचॆनमध्ये ब्रेक आला होता. गनीम बरोबर प्रश्नासुराच्या तावडीत सापडला. त्यात परवा सुट्टीत नेहरु प्लॆनेटोरियमला भेट झाल्यानं बेसिक नॊलेजमध्ये मोलाची भर पडली होतीच. तर हा वर सांगितलेला प्रश्न सटकन आल. करता काय. काम बाजुला ठेवलं आणि तयारीत बसले कारण आता किमान अर्धा तास तरी भुगोलापासून खगोलशास्र्त्रापर्यंतच्या व्हायवाला तोंड द्यावं लागणार होतं. शिवाय आदर्श बालसंगोपनावर नितांत विश्वास असल्यानं मुलांच्या जिद्न्यासा मारायच्या नाहीत हा नियम घालून घेतलेला. इथं तर फाजिल चौकशा नव्हत्या. मग वयवर्ष साडेचारच्या मेंदुला झेपेल इतपत सोप्या भाषेत प्रुथ्वी कशी असते हे समजावून झालं. हाताशी इंटरनेट होतंच म्हणून सरळ चार दोन संकेतस्थळं उघडली आणि तिला सूर्यमंडलाची माहिती दिली. सगळ्या ग्रहांशी ओळख करुन दिली त्यातली आपली प्रुथ्वी म्हणजे प्रश्नासुराची "दुनिया" तिनं लग्गेच ओळखली. माझ्या प्रेमाला मग उधाणच आलं. मनाशी ताडल्याप्रमाणं तासभर व्हायवा झाला आणि शंकासुराच्या शंका कमी झाल्या. मला अलिकडे या प्रश्नांना थोपवायचा अक्सीर इलाज सापडला आहे. बेसिक माहिती दिल्यानंतर मी तिला सांगते तू बिग होशील आणि फर्स्ट मध्ये किंवा सेव्हन्थमध्ये जाशील तेव्हा टिचरच हे सगळं तुला शिकवतील. तुम्हाला बुक देतील नां त्यात हे सगळं असतं. याचा दुहेरी फायदा होतो. एक तर शाळेच्या आणि होमवर्कच्याबाबतीत काही कटकट रहात नाही कारण लवकर मोठ्ठं होउन सेव्हन्थमध्ये जायचं असतं नां? आणि दुसरा फायदा म्हणजे शंका कमी होतात. सगळं झाल्यावर मला अचानकच आठवलं की मी साधारण दुसरी तिसरीला असताना आईला असंच प्रुथ्वी कशी असते हे विचारुन भंडावून सोडलं होतं. आई शिक्शिका असल्यानं तिनं मला छान समजावून सांगितलं. शेवटी हे ही सांगितलं की प्रुथ्वी गोल असते. शाळेत नेउन मॊडेल दाखवलं. हे सगळं मला जाम नवं होतं. मला आजही शंका आहे की जर प्रुथ्वी गोल आहे तर आपल्याखाली असणारी(म्हणजे चेंडुच्या दुसर्या उलट बाजुला असणार्या देशातली माणसं) उलटी पडत कशी नाहीत? म्हणजे ती माणसं खाली डोकं वर पाय अशी उभी आहेत का? शेवटी मी आईला म्हटलं की,"आई गं, मला धावत जाऊन प्रुथ्वीच्या खाली वाकून बघायचंय" आई म्हणाली,"जा हं. मोठ्ठी झालीस की जा. म्हणजे वाकून बघताना पड्णार नाहीस" आजही सगळं पुराण ऐकून झाल्यावर प्रुथ्वीच्या पोटात काय काय असतं याची यादी ऐकल्यानंतर शंकासूरानं अखेरची घोषणा केली,"आई आपण आपल्या किचमधला नाईफ घेउन दुनिया चिरुन पाहुया का आत काय आहे?" पहिल्यांदा दचकलेच. म्हटलं डायरेक्ट चिरफाडीची भाषा? पण मग हसायलाही आलं. म्हटलं चिरुया हं पण आता मला जरा काम आहे नां, ते झालं की मग किंवा सण्डेला करुया का? तर शंकासूर टाळ्या वाजवून म्हणाला"हे ढिंक टिका. मस्त चालेल. सण्डेला मॊलमध्ये जाउया नको, त्यापेक्शा हे काम करु. आणि आत्ता बाबुपण झोपलाय नां? तो उठला की त्यालाही ही आयडिया सांगुया का?" कपाळाला हात लावायचा राहिला. इतक्यात परत शिनचॆन लागलं आणि गनीम सुटला. कधी नव्हे तो शिनचॆन लागल्याचा मला जाम आनंद झाला.
 

1 comments:

meg said...

Ekdam patla mala he.. mulancha shankasur asne aani aapan kaushalyane shankanirasan karat rahne... khup gammat aste nahi pan tyaat?

ajun ek mhanje tyanchya shankan madhe gradual change mast hot astat jashi mothi hotaat tase...

aajkal mi he tiche nursery level che prashna.. he senior madhle ani he 1st madhe hoti tevhache ashi category ch keliye shankanchi.