रूम नं. १६.....

सुरवातिला काही समजायचं नाही. चार ठिकाणांहून आलेल्या आम्ही चौघीजणी नवी नवरी कशी सासरच्या घरातला अंदाज घेत वावरत असते तशा एकमेकीला पारखत होतो. हळूहळू मस्त चौकडी बनली. आमच्या समोरची रूम होती तिच्या शेजारीच फोन होता, जिथे पोरींचे फोन यायचे. आमचा बहुतांश मुक्काम याच खोलीत असायचा, ज्या मुलींची प्रकरणं चालू असायची त्या जरा बाजुला सरकून फुसूफुसू बोलत असायच्या. त्यांच्या दुर्दैवानं त्या ज्या बाजुला सरकायच्या तिथे आमची खिडकी यायची. आम्हाला यांची फुसफुस थेट ऐकायला यायची. ज्या दिवशी हा शोध लागला त्यादिवसापासून आम्ही टिव्ही पहायला जाणं बंद केलं. कारण सिरियलच्या वेळेतच अशा मुलिंचे फोन नेमके यायचे. हे गूढ आम्हाला पहिल्यांदा उलगडलं नाही मग लक्शात आलं की रेक्टर मेडम त्या मालिका पहाण्यात गुंग असायच्या त्यामुळे कोणाचा फोन, कुठून, किती वेळ अशा चौकशा व्हायच्या नाहीत. नाहीतरी त्या मालिका पहाण्यात काही रस नसाय़चाच उगाच टिवल्या बावल्या करत बसण्यापेक्शा हे मनोरंजन आम्हाला बरं वाटलं. हळू हळू आमच्या रूममधली लोकसंख्या वाढायला लागली. मग नुसतंच एकतर्फी ऐकण्याऐवजी इकडून उत्तरं द्यायचा नवा खेळ चालू झाला.
एक कन्नड भाषिक मुलगी फोनवर सतत "येन्नं" "येन्न" करत असायची, एक दिवस सगळ्यांनी ठरवून गंमत करायची ठरली. ती येन्नं म्हणाली की आम्ही इकडून आलो आलो म्हणून ओरडायचो. पहिल्यांदा या टारगटपणावरून नाही म्हटलं तरी आमची आणि इतर मुलींची खिटपिट झाली पण
 आम्ही साळसूदपणानं त्यांना म्हणायचो, मग मेडमच्या खिडकितला फोन इथंपर्यंत आणून कशाला बोलता? सारखं आम्हाला तुमचं सगळं ऐकत बसावं लागतं नां? त्यावर त्या चपापायच्या. त्यांनी अत्यंत हळू आवाजात बोलून पाहिलं पण आजुबाजूला इतका आवाज असायचा की त्यांनाच काही समजायचं नाही अखेर आमच्याशी मैत्री करण्यावाचून त्यांना पर्यायच राहिला नाही आणि अशारितिनं आमचा संसार बहरत गेला. नंतर नंतर अख्ख्या हॊस्टेलच्या प्रेमप्रकरणांचा एनसायक्लोपेडिय तयार झाला आणि आम्ही निरोपही घेउन पोहोचवायला लागलो.  एखादी मुलगी मॆडमच्या खोलीत "मटा" म्हणजे महाराष्ट्र टाईम्स निवांतपणानं वाचत बसली की ओळखावं आज तिचा फोन येणार आहे. कारण फोन आल्यावर जर ती मुलगी तिथे नसेल तर मामा जाऊन तिला हाक मारून येईपर्यंत मॆडम फोन कट करायच्या आणि परत फोन लागणं हे जवळपास मल्लिकानं पौराणिक सिनेमा करण्याइतकं कठीण काम होतं. म्हणून मग कोणत्या दिवशी कधी फोन येणार आहे हे आधीच निश्चित करून मग त्यावेळेस तिथे थांबणं जास्त सोयिचं असायचं. त्यातही आम्ही भोचकपणा करणं सोडायचो नाही. एखादीची गंमत करायची असली की ती पेपर वाचताना आम्ही तिथे जायचो आणि तिला म्हणायचो, पेपर पाठ करू नको, दोन पानं इकडे दे. असं करत तिच्याकडे एखादंच पान रहायचं आणि अखेर ती जाम ऒकवर्ड व्हायची. आमची खोली म्हणजे खिदळण्याचा अड्डा बनतोय हे मॆडमच्या लक्शात यायला फार दिवस लागले नाहीत कारण त्यांच्या ऒफीस आणि आमच्या खोलीत एका की रूमचं अंतर होतं फक्त. त्या योग्य संधीची वाट पहात होत्या आणि ती त्यांना दिली सचिननं........
 

4 comments:

Unknown said...

wa zakas athawani ahet

शिनु said...

thanku

Unknown said...

Khoopch masst..
Aaj pahilyandach tumche post wachale...
sahaj sundar ...lihita

Tuzhya aathavanichya pudhil Posts chi waat pahatoy

..Mahesh

शिनु said...

@ mahesh

thanku. nakkich ajun room no. 16 madhalya baryach ghadamodi sanagayachyat. :)