सिनेमा के साईड इफेक्ट

फिल्मचा अभ्यास जोरात चालू होता. चांगला सिनेमा शिकता शिकता वाईट सिनेमाही समजत गेला. यात सगळंच गंभीर आणि अभ्यासपूर्ण असायचं असंही नाही. बर्याचदा गंमती जमतीही घडायच्या. त्यातून आम्ही माधुरी आणि अमिताभ, अनिल कपूर, शाहरुख, अमीर 
असल्या मसाला नायक नायिकांचे पंखे त्यामुळे  कसेही असले तरी भक्तीभावानं या मंडळीचे सिनेमे बघायची सवय लागली होती. आता या सवयीला धक्का बसण्याचे दिवस आले होते बहुदा. एक दिवस नोटीस फिरली. कसलंसं फिल्मचं वर्कशॊप होतं. भारतीय चित्रपटातलं स्त्रीयांचं शोषण असल्या भयाण नावाचं. आम्हाला पर्याय नव्हता आम्ही "फिल्मवाले" होतो त्यामुळे आम्हाला जाणं भाग होतं. आमच्यासोबत वर्कशॊप ऐच्छिक असल्यानं आणखी काही हौशी मंडळीं सहभागी झाली. पहिल्याच दिवशी सक्काळी सक्काळी व्यावसायिक मसालापटातलं नायिकेचं चित्रण असा विषय होता. समोरच्या पडद्यावर काय सांगायचं तुम्हाला माधुरी अवतरली. बेटा मधलं सैंया जी से चुपके गाण्यावर मुरकणारी माधुरी किती भक्तीभावानं पाहिली होती माहितीए? आताही सकाळीच तिचं दर्शन झाल्यावर सगळे सरसावून बसले. आमच्याकडे हेव्यानं पहता "नॊनफिल्मी" मंडळी, हे असे सिनेमे बघता आणि आम्हाला सांगताना मात्र जडशीळ नावं सांगता, अशा नजरेनं पहात होती. गाणं ऐन मध्यात आलं होतं आणि ते कचकन थांबलं. समोरच्या वक्त्यानं आता त्या गाण्यातलं एक्सप्लोयटेशन सविस्तर समजावून द्यायला सुरवात केली. ते ही चक्क फळ्यावर आक्रुत्या काढून! माधुरी म्हणजे एक रेष, इतर बायका म्हणजे रेषा रेषा आणि अनिल कपूर म्हणजे एक टिंब असं स्पष्टिकरण फळ्यावर अवतरल्यावर"नॊनफिल्मी"मंडळी गांगरली. सेशन होतं दोन तासांचं. दोन तास संपले तेंव्हा माधुरीच्या 
पंधरावीस रेषाअनिलची टींब टिंब आणि त्यानंतर समाचार घेतलेल्या काजोल-शाहरुखच्या जाती हूं मैं जल्दी है क्या? या करन अर्जून मधल्या गाण्याच्या फराफरा ओढलेल्या रेषा आणि वर्तुळ यांनी काळा फळा पांढरा धोप झाला होता. सेशन संपलं आणि बाहेरून वेलदोडा घातलेल्या चहाचा दरवळ आला. आम्ही फाईल उचलत उठलो तरी आमचा एक "नॊनफिल्मी" मित्र तसाच सुन्नपणानं फळ्याकडे बघत बसला होता. त्याला म्हटलं, ऊठ की, संपलं सगळं, काय पहातोयस इतकं? त्यावर तो म्हणाला समोरच्या फळ्यावरच्या माधुरी, काजोल आणि शाहरुख अनिलला शोधतोय. बिचारे गरगर फिरून भोवळ येउन पडले असतील.
त्या सेशननंतरची उरलेली सगळी सेशन चहाच्या टारीवर पार पडली हे सांगणे न लगे! काय? :)
 

0 comments: