रूम नं. १६ मधला "मेस" प्रथम अध्याय

......तर आमच्या रूममध्ये जवळपास अख्खं हॊस्टेल ठिय्या मारून असायचं. एक तर आमची रूम आल्या आल्या पहिलीच होती आणि डिपार्टमेंटमधून तंगडतोड करून आलेले थकलेले जीव घटकाभर टेकायला म्हणून रूममध्ये डोकावायचे. कोणी स्टडीमधून उशिरा परत यायचं आणि तोपर्यंत मेसवाली मावशी भांडी वाजवायच्या तयारीत असायची त्यामुळे भुकेले जीव पोळ्या तोडायला धाव घ्यायचे. घरातलं तूप, लोणचं चटण्यांसोबत मेसमधलं रबर खायचा प्रयत्न केला जायचा. तिसर्या मजल्यावर रहाणार्या पोरी त्यांच्या तुपा-लोणच्याच्या बरण्या आमच्याच खोलीत ठेवून जायचा. रोज इतकं "ओझं" उचलून आणायचे न्यायचे कष्ट वाचावेत म्हणून आमच्या "कोठी घरात" ही सगळी रसद साठवली जायची. कोणाचे इस्त्रीवाल्याला द्यायचे कपडे कोणाचे इस्त्रीचे आलेले कपडे.....आमची खोली खर्या अर्थानं नांदती होती. \
बर्याचदा आंघोळीहून  ये ईपर्यंत उशिर झालेला असायचा मग समोरच्या इस्त्रीहून आलेल्या गठ्यातून साधारण आपल्या अंगात जाईल असा ड्रेस उचलून तो चढवून धावत डिपार्टमेंट गाठायचो. गठ्ठ्यावर अडीचरूपये ठेवून जाण्याइअतकं सौजन्य दाखवण्याइतक्या समंजस सगळ्याचजणी होत्या म्हणून बरंय. आमच्यात एक अलिखित करार होता, ड्रेस कोणाचा आहे बाहेर सांगायचं नाही. काही ड्रेस तर कमालिचे संशयास्पद होते. वर्गात हा ड्रेस नक्की कोणाचा आहे? यावर चर्चा व्हायची. संध्याकाळी जेवणं झाल्यावर अड्डा जमायचा. हातात सगळ्यांच्या पुस्तकं असायची मात्र आज कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये काय झालं याचे अपडेटस दिले-घेतले जायचे. "लफड्यांचे" अपडेट घेतले जायचे. जमलेली, जमू घातलेली आणि जमून तुटलेली प्रकरणं हा तर फेव्हरीट विषय. नऊ साडेनऊला मॆडम राऊंडला यायच्या. त्यावेळेस आम्ही सगळ्या अभ्यासात बुडून गेलेल्या असायचो. मॆडम यायच्या आणि बाकिच्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या खोलित हकलायच्या. "ए कन्या, चल आता रूमवर पळ, मी आईचा फोन आला तर सांगेन हं" असं अनुनासिक स्वरात त्या सांगायच्या तेंव्हा आम्ही घाबरल्याचं नाटक मस्त वठवायचो. सगळ्याजणी आपापल्या खोलीत गेल्यासारखं करायच्या. पुढच्या खोल्यांपुढून जाताना मॆडम नुसत्याच, रूम १५,रूम११,रूम१०नअशी आरोळी द्यायच्या की आतून पोरी आहे मॆडम असं सांगायच्या.

.
 

0 comments: