रूम नं १६ मधला "मेस" भाग २

........
जुनं आणि नवं अशा दोन इमारतींमध्ये होस्टेल विभागलं होतं. आम्ही जुन्या इमारतीत रहायचो. दोन इमारतिंना फरशा घातलेल्या पायवाटेनं जोडलं होतं. रात्री दोन्ही इमारतिंच्या मुख्य दरांना कुलुपं लावली जायची. चूकून तिकडची मुलगी इकडे किंवा इअकडची तिकडे गेलेली असेल आणि मॆडम आलेली समजलं नसेल तर हमखास अडकून पडायला व्हायचं. किंवा कधी कधी मुद्दामच अडकून राहिल्याचं नाटक व्हायचं. आमच्या खोलीत अडकणारयांची संख्या लक्शणिय होती आणि दिवसेंदिवस त्यात भरच पडत होती. त्यातून आम्ही पडलो हुश्शार मुली. मॆड्मला सापडायला तयार नाही. एक दिवस मॆडम लवकर गेल्या, आम्ही मस्त ट्रॆन्झिस्टर लावून क्रिकेटची कॊमेंट्री ऐकत होतो. सचिन मस्त फॊर्ममध्ये होता मॆडम गेल्या असं वाटल्यानं गाफिल होतो, अंगावर पांघरूणं घेउन रेडिओ ऐकत होतो, जवळपास पुस्तकं वगैरे काही नाही आणि अचानकच दार टकटक वाजलं, एका पारूनं उठून बिनधास्त दार उघडलं तर बाहेर साक्शात मॆडम उभ्या. ही त्यांना आत घ्यायला तयार नाही, दारातून फुटाची गोळी द्यायच्या प्रयत्नात आणि आत आम्ही ट्रान्झिस्टर बंद करण्यासाठी पांघरूणाच्या आतून चाचपडत होतो, सगळ्यांनी एकदमच हालचाल केल्यानं तो एव्हढासा ट्रॆन्झिस्टर पांघरुणांच्या आणि उशांच्या ढिगार्या गायब तर झालाच पण इतका वेळ हळू आवाजात चाललेली कॊमेंट्री कोणाचा तरी हात बित बटनाला लागल्याने मोठ्या आवाजात ऐकायाला यायला लागली. आता हॆण्डसअप करण्यावाचून पर्यायच राहिला नाही. मॆडम आत आल्या आणि त्यांनी आम्हाला उठून उभं रहायला सांगितलं, आम्ही धडपडत उभ्या राहिलो. त्याबरोबर कॊटवरची पांघरूण अर्धी खाली, अर्धी वर अशी लटकायला लागली. मॆडम म्हणाल्या इथे रेडिओचा आवाज येत होता, कुठे आहे तो? पटकन द्या नाहीतर मी रेक्टरना सांगेन. आम्ही सगळ्याजणी कॊट चाचपडायला लागलो रेडिओ सापडेना. मग मॆडम जातीनं शोधकार्यात सहभागी होण्यासाठी सरसावल्या तर त्यांचं पहिलं पाऊल आंघोळिच्या मगात अडकलं(एका पारून हा मग होता. तो मग म्हणजे एक छोटी बादलीच होती), त्यातून सावरत पुढे आल्या आणि मगातून पाय काढताना आधार म्हणून दारातल्या फडताळाला पकडलं तर कसा कोण जाणे धक्का लागून लोणच्याचा बाटला खाली पडला. त्याच्याकडे बघताना त्यांना खालच्या कप्यात ठेवलेली घासायची भांडी आणि धुवायच्या कपड्यांचा ढीग दिसला. तिथून बाऊट टर्न मारेपर्यंत मॆडम ट्रॆन्झिस्टर आणि कॊमेंट्री साफ विसरल्या होत्या. आता त्यांनीच कॊमेंट्री द्यायला सुरवात केली. अगं अगं काय गं हे. मुली नां तुम्ही? उद्या संसाराला लागाल तर अशा रहाणार का? वेळच्यावेळी भांडी घासत जा, कपडे धुवत जा. या सगळ्या होस्टेलच्या तुपाच्या आणि लोणच्याच्या बरण्या कशाला ठेवल्यात? अगं रूम आहे की कचरा कोंडाळं? रहावतं कसं तुम्हाला? अस म्हणत कशा बशा त्या टेबलपर्यंत पोहोचल्या. आता त्यांना बसा म्हणायचं तर खोलितल्या एकुलत्या एका खुर्चीवर असणार्या फाईलचा ढीग, पुस्तकांचा गठ्ठा आणि ओढण्या, स्कार्फ, रूमाल सलवारी या सगळ्यांच्या प्रेमालाप दूर करणं भाग होतं. सवयिनं नेमकं एकीनं जे नको करायला तेच केलं. तिनं गुड गर्ल बनायच्या नादात खुर्चीवरचा सगळा ढीग उचलून पटकन कॊटच्या कोपर्यात फेकला. थंड होत आलेल्या मॆडम पुन्हा बरसो बरसो रे मेघा करत कडाडायला लागल्या. त्यांनी रूममध्ये असलेल्या सगळ्याजणींना कामालाच लावलं. सगळे कपडे घडी घालायला लावले. ते हॆंगरला लावायला लावले. पुस्तकं जिथल्या तिथे गेली, खोली झाडून साफ झाली. हे सगळं होत असताना तिकडे बिचार्या सचिनची विकेट पडून आपल्या टिमची गळती चालू झाली होती. रेडिओ चालूच होता . आता मॆडमच्या लक्शात आलं की त्या कशासाठी आत आल्या होत्या. त्यांनी खबदाडात पडलेला रेडिओ उचलून तो बंद केला. मला म्हणाल्या कोणाचा आहे गं कन्ये हा? मी म्हटलं काय की. आमच्या रूममध्ये होता कोणीतरी ठेवलेला. मॆडम- असा कसा ठेवला? नियम माहित नाहीत? रेडिओ लावायचा नसतो. आता रेक्टरनी मला विचारलं तर काय सांगू? इतक्यात एव्हढ्या थंडीतही एका पारूची दिमाग की बत्ती पेटली. तिनं घाई घाईत सांगितलं, मॆडम कोणाला माहित नाही पण दुपारी मीच हा गावातल्या काकांकडून आणला होता. आम्ही या शहिद व्हायला निघालेल्या भगतसिहांकडे साश्रु नयनांनी बघतच राहिलो. आम्ही कोणी तोंड उघडून माती खाण्यापूर्वी तिनं लगबगीत सांगितलं की, "मॆडम आम्हाला क्रिडाच्या बातम्या कव्हर करायला सांगितल्या आहेत. आता आम्ही कुठे जाणार? म्हणून आज अनायचे मॆच होती तर सर म्हणाले रेडिओ ऐका आणि उद्या न्युज आयटम बनवा." अक्शरश: भरून आलं तिच्या हुशारीमुळे. आम्ही हो त हो मिसळण्यात माहिर होतोच.
 

0 comments: