नॊक नॊक........रूम नं.१६.

माझी ऎसिडिटी
मला पित्ताचा त्रास सर्दी पड्शासारखा सतत व्हायचा. त्यातून मेसचं जेवण चालू झाल्यावर तर ही व्याधी मुक्कामालाच आली. एक दिवस मी डोकं गच्च बांधून आई गं ऊई गं करत झोपले होते आणि माझी पारू डोक्याला झंडू बाम लावून देत होती. मॆडम माझा आवाज ऐकून आत आल्या आणि काय होतंय म्हणून विचारायला लागल्या. डोकं पित्तानं दुखतंय समजल्यावर त्यांनी माझ्या पारूला त्यांच्या रूममध्ये नेलं आणि छोट्या वाटीत मोरावळा दिला. आम्ही तोअर्थातच वाटून खाल्ला. त्याची चव इतकी अप्रतिम होती की तो पुन्हा पुन्हा खावासा वाटायला लागला. मग आठवड्यातून एक दोन वेळा लोकाग्रहास्तव मला पित्ताचा भयंकर त्रास व्हायला लागला. तो ही नेमका केम्पसमधला दवाखान बंद झाल्यावर. आमचा मोरावळ्याचा खुराक व्यवस्थित चालू होता. एक दिवस मी स्टडीत अभ्यास करत होते. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्यामुळे जाम भुक लागली होती म्हणून कॆंटिनमधून वेफर्स आणले आणि खात खात गप्पा मारत मारत मी आणि दुसर्या विभागाची एक मैत्रीण रमत गमत टिवल्या बावल्या करत येत होतो. होस्टेलमध्ये येताना आपापली पत्रं आलीत कां हे चेक करून येण्याचा प्रघात असल्यानं आम्ही पोस्ट बघत उभ्या होतो. इतक्यात समोरून मॆडम आल्या. मी गप्प बसावं की नाही? नको तिथं आणि नको त्यावेळेस बोलायची खोड नडली मॆडमचं लक्श नव्हतं तरी मी उगाचच त्यांना चढवायचं म्हणून हाक मारून म्हणाले,"मॆडम आज काय मस्त साडी नेसलाय. काय विशेष? गजरा तर घमघमतोय." मॆडम माझ्याकडे बघून ओरड्ल्या "अगं कन्ये आत्ता थोड्यावेळापूर्वी तुला उलट्या होत होत्या नां? आणि आता वेफर्स काय खात बसलीस?" मला कळेचना की मला कधी बाई उलट्या झाल्या?"मी म्हटलं नाही. आज मला काही धाड भरली नाहीए. मी मस्त आहे की" यावर मेडम फणफणत गेल्या. मी चकीत झाले आणि रूममध्ये आल्यावर ही ब्रेकिंग न्युज आणि मॆडमचं विअर्ड वागणं उत्साहाच्या भरात बाकिच्या पारूंना सांगितलं. त्यावर सगळ्याजणींचं एकमत होउन त्यांनी तारस्वरात मला हाक मारली"ए, मंद. अगं मघाशी आम्हाला मोरावळा खायचा होता म्हणून आम्हीच मॆडमला सांगितलं होतं की मोरावळा द्या. छ्या, काय गरज होती, नाही म्हणायची? तसंही आठवद्यातून चार दिवस डोकं धरून बसलेली असतेसच नां? ऒक ऒक करत असतेसच की, आमच्यासाठी आजच्या दिवस खोटी खोटी ओक ओक केली असतीस तर काय बिघडलं असतं?" असो. त्यादिवसापासून आमचा हा घरगुती उपाय कायमचाच बंद झाला. आजही मोरावळा पाहिला की माझा त्यावेळेस नसलेला पित्ताचा त्रास आणि तुरट गोड मोरावळा बोटानं चाटून चाटून खाणं आठवतं.......
 

0 comments: